ग्रहमान : ७ ते १३ जुलै २०१८

अनिता केळकर
गुरुवार, 5 जुलै 2018

ग्रहमान 

मेष ः रवी व शुक्र अनुकूल आहेत त्यामुळे आवश्‍यक ते फेरबदल व्यवसायात करावेत. चिकाटीने व सातत्याने काम करावे. आर्थिक लाभ अनेक तऱ्हेने होईल. फक्त त्याचा सदुपयोग कसा होईल याची काळजी घ्यावी. नोकरीत कामात तत्पर राहावे व मिळालेल्या संधीचा फायदा उचलावा. अचानक धनलाभाची शक्‍यता.

वृषभ ः व्यवसायात व नोकरीत थोडी विश्रांती घेऊन नवीन कामाची तयारी कराल. धावपळ दगदगही बरीचशी कमी होईल. नाकारलेल्या वस्तू हव्याहव्याश्‍या वाटू लागतील. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे येतील. नोकरीत कामानिमित्ताने प्रवासाचा योग येईल. बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. महिलांना मुलांकडून चांगली बातमी कळेल.

मिथुन ः व्यवसायात नवा उच्चांक निर्माण करू शकाल, इतके चांगले ग्रहमान आहे. तुमचे आखलेले बेत व्यवस्थित पूर्ण होतील. नवीन कामामुळे उत्साह वाढेल. नोकरीत मनाप्रमाणे कामे कराल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. महत्त्वाचे करारमदार होतील. गोड व उत्साहवर्धक बातमी कळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे यश मिळेलच.

कर्क ः मंगळ व शुक्र दोन्ही अनुकूल आहेत. ते तुमच्या ऐहिक वैभवात भर घालतील. व्यवसायात प्रगती व धनलाभ होईल. गोड बोलून दुसऱ्याच्या पोटात शिरून वागलात तर सर्व काही लाभेल; पण हटवादीपणा केलात तर हाती आलेले यश नाहीसे होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत वरिष्ठांना तुमचे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल.

सिंह ः उत्साहवर्धक वातावरण लाभेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. अपेक्षित यश मिळेल. प्रगतीचा आलेख वाढता राहील. नोकरीत अतिमहत्त्वाकांक्षेच्या आहारी जाऊ नये. कामाच्या बाबतीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे बद्दल विश्‍वास निर्माण होईल. महिलांनी कामे त्वरित गतीने करावी म्हणजे प्रवासाची आलेली संधी घेता येईल.

कन्या ः व्यवसाय नोकरीत हळूहळू सुधारणा होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. जुनी येणी व वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. कामात जी पीछेहाट झाली होती ती संपुष्टात येईल. आत्मविश्‍वास वाढेल. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. प्रकृतीची थोडी कुरकूर राहील. काळजी घ्यावी. महिलांच्या सर्व गरजा पूर्ण होतील.

तूळ ः व्यवसायात पुढे येणाऱ्या काळाचा साकल्याने विचार करून मगच पुढे जावे. कामात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. कामात भरपूर यश मिळेल. नोकरीत हातातील कामे वेळीच पूर्ण करण्याचा चंग बांधावा. आर्थिक लाभ होईल. पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. महिलांना थोडी विश्रांतीची गरज भासेल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान.

वृश्‍चिक ः या सप्ताहात स्वस्थता लाभणे अवघड आहे. तुम्ही स्वतःहून नवीन उद्योग मागे लावून घ्याल. जिवापाड कष्ट करून त्यात यश संपादन कराल. नोकरीत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर कामे पूर्ण कराल. आर्थिक व्यवहारात आळशीपणा करू नये. कौटुंबिक प्रश्‍न घेऊन तडीस न्याल. विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी कळेल.

धनू ः ईप्सित साध्य करण्यासाठी मुलायम वातावरण तयार करण्याचा संकल्प करावा. व्यवसायात हाती घेतलेले काम तडफेने पूर्ण कराल. केलेल्या श्रमाचे चीज होईल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत तऱ्हेवाईकपणा कमी करावा. सहकाऱ्यांच्या मर्मावर बोट ठेवून टीका करण्याचे टाळावे. महिलांचा वेळ मनोरंजन व करमणुकीत मजेत जाईल.

मकर ः प्रयत्नांती परमेश्‍वर हे धोरण तुमचे सध्या ठेवावे म्हणजे निराशा येणार नाही. व्यवसायात गाफील राहू नये. भावनाशीलता महत्त्वाचे निर्णय घेऊ नये. नोकरीत सहकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. केलेल्या कामाचे श्रेय ताबडतोब मिळेल. ही अपेक्षा ठेवू नये. कामानिमित्ताने प्रवासाचे योग. महिलांचा घरकामात बराच वेळ जाईल. कलावंत, लेखक यांना प्रसिद्धी मिळेल.

कुंभ ः आपले स्वतःचे विचार सौम्य व प्रभावीपणे मांडून शत्रुंना आपलेसे करून घ्याल. भरारी व उत्तेजन देणारे दिवस आहेत. व्यवसायात बरीच प्रगती कराल. महत्त्वाची कामे करताना गडबड - धांदल करू नये. परिस्थितीचा अंदाज घेऊन धोरण ठरवावे. नोकरीत आळस झटकून काम उरकावे. वरिष्ठांच्या मर्जीत राहण्याचा प्रयत्न करावा.

मीन ः व्यवसायात मोठ्या उत्साहाने कामे कराल. नवीन कामेही मिळतील. अपेक्षित पत्ते हाती येतील. आनंदाची बातमी कळेल. नोकरीत महत्त्वाच्या कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. त्यासाठी जादा सवलती देतील. गृहसौख्याचा आनंद मिळेल. महिलांचा आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. आनंदाची बातमी कळेल.

संबंधित बातम्या