ग्रहमान : ११ ते १७ मे २०१९

अनिता केळकर
सोमवार, 13 मे 2019

ग्रहमान

मेष : द्विधा मनःस्थिती होईल, तेव्हा निर्णय घेताना सबुरी ठेवावी. भविष्याची तरतूद करून ठेवण्याचा तुमचा मानस असेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कामामुळे नवीन हितसंबंध जोडले जातील. नवीन करार करताना त्यातील बारकाव्यांचा नीट अभ्यास करावा. महत्त्वाचे निर्णय घेताना निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरीत सतर्क राहून कामात गुप्तता राखावी. अनावश्‍यक खर्चाला फाटा द्यावा. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील, ही अपेक्षा ठेवू नये. घरात वैचारिक मतभेद होतील, तरी डोके शांत ठेवावे. दगदग, धावपळ कमी करून प्रकृतीची काळजी घ्यावी. विवाहोत्सुकांनी विवाह करण्याची घाई करू नये.

वृषभ : कामाची आखणी करून त्याप्रमाणे कामे पूर्ण करण्यावर भर राहील. अनपेक्षित चांगली घटना जीवनाची दिशा बदलेल. व्यवसायात कामाचा उत्साह राहील. स्पष्ट बोलण्याने गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. नोकरीत आपले काम बरे नि आपण बरे हे धोरण उपयोगी पडेल. कामानिमित्त प्रवास घडेल. नवीन अनुभव येतील. काही कारणाने घरात ठरलेले बेत पुढे ढकलावे लागतील. पाहुण्यांची ये-जा राहील. पैशांची चिंता मिटेल. तरुणांना प्रेमात रुसवे-फुगवे सहन करावे लागतील.

मिथुन : डोळ्यासमोर खूप कामे असतील, त्यामुळे कुठल्या कामाला प्राधान्य द्यावे हा संभ्रम राहील. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवावीत. कामात विलंब झालेला सहन होणार नाही. नोकरीत लवचिक धोरण ठेवलेत, तर त्रास कमी होईल. स्वतःची मते मांडताना थोडे तारतम्य ठेवावे. घरात कुटुंबासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. वादाचे प्रसंग आले, तर दुर्लक्ष करावे. मुलांकडून अपेक्षित यश कळेल.

कर्क : भोवतालच्या व्यक्तींच्या विचित्र वागण्याचा अनुभव येईल, तरी शांत राहावे. व्यवसायात हितशत्रूंपासून सावध राहावे. कामातील बेत गुप्त ठेवावेत. पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच होईल, याची काळजी घ्यावी. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामे करावीत. नोकरीत सहकारी व वरिष्ठांना तुमचे महत्त्व कळून येईल. जोडव्यवसायातून विशेष फायदा मिळू शकेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात कामावरून विनाकारण भांडणतंटा होण्याची शक्‍यता आहे, तरी शांतचित्तांने वागावे. अफवांवर व आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवू नये. प्रकृतीची काळजी घ्यावी.

सिंह : तुमच्या खर्चिक स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल. पैशाची ऊबही हाती असल्याने सढळ हाताने पैसे खर्च कराल. व्यवसायात  उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्याप्रमाणे प्रगती कराल. पूर्ण झालेल्या कामाचे पैसे हाती मिळतील. नवीन कामेही हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. त्यामुळे कामे पुढे ढकलावीशी वाटतील. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवावीत. नवीन ओळखी होतील. घरात कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. इतर व्यक्तींच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. गृहिणींनी स्वास्थ्य सांभाळावे.

कन्या : भोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील, तेव्हा चार हात लांबच राहावे. व्यवसायात पैशाचे सोंग घेता येत नाही, हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे पावले टाकावीत. उधार-उसनवार शक्‍यतो टाळावे. खेळत्या भांडवलाची गरज हितचिंतकांच्या मदतीने पूर्ण होईल. नोकरीत नियोजनबद्ध काम केलेत, तर वरिष्ठांची तक्रार नसेल. प्रवासयोग संभवतो. नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. घरात पेल्यातील वादळे उठतील, तरी डोके शांत ठेवावे. मनःस्वास्थ्य सांभाळावे. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटतील.

तूळ : घर व व्यवसाय या दोन्ही गोष्टींकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात कुठल्या कामांना प्राधान्य द्यायचे हा क्रम ठरवून त्याप्रमाणे कृती करावी. समतोल ठेवून कामे वेळेत पूर्ण कराल. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत अंधविश्‍वासाने कुठलीही कृती करू नये. कामाची सत्यता पडताळून बघावी. गोड बोलून तुम्हाला कुणी फसवत नाही ना? याची काळजी घ्यावी. विचारल्याखेरीज स्वतःचे मत मांडू नये. घरात विचित्र अनुभव येईल. घरगुती कामाचा तुम्हाला फारसा उत्साह नसेल. परंतु, तेच काम करावे लागले. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.

वृश्‍चिक : लोकांशी वागण्याचे तंत्र बदललेत, तर फायदा तुमचाच होईल. व्यवसायात स्वयंसिद्ध राहून कामे उरकावीत. फायदा मिळवून देणारी कामे वेळेत पूर्ण करून नवीन कामे मिळविण्याकडे कल राहील. नवीन कामांमुळे नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत सहकारी व वरिष्ठ यांच्यावर विसंबून न राहता कामात चोख राहावे. वरिष्ठांच्या अपेक्षेनुसार काम कसे होईल, याचे ध्यान ठेवावे. घरात कामाची वाटणी करून स्वतःचा भार हलका करावा. तरुणांचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांनी आपले लक्ष विचलित होऊ देऊ नये.

धनू : कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. तांत्रिक अडचणींवर मात करून कामांना गती द्याल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन राहील. स्वतःचे असे स्थान निर्माण करण्याचा मानस पूर्ण होईल. आव्हानात्मक कामात रस वाटेल. नोकरीत बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. जोडव्यवसायातून जादा कमाई करता येईल. घरात वादाचे प्रसंग येतील, तरी मौनव्रत पाळावे. स्वतःचाच हेकेखोरपणा चालू ठेवू नये. शब्द हे शस्त्र आहेत, हे लक्षात ठेवावे. तरुणांनी अति आत्मविश्‍वास बाळगू नये.

मकर : नेहमीपेक्षा वेगळा अनुभव घ्याल. ग्रहांची साथ राहील. व्यवसायात मनातील सुप्त इच्छा प्रत्यक्षात साकार होईल. मात्र, नवीन कामे हाती घेण्यापूर्वी हातातील कामे वेळेत पूर्ण करावीत. हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावू नये. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची भिस्त तुमच्यावर राहील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्या गळ्यात येईल. परंतु, सहकाऱ्यांशी गोड बोलून कामे करून घ्यावीत. पैशाची चिंता मिटेल. घरात आनंदाची वार्ता कळेल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे.

कुंभ : ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’ ही म्हण सार्थ कराल. व्यवसायात एखाद्या क्षुल्लक कारणावरून वादविवाद होतील. गैरसमजुतीचे प्रमाण जास्त असेल. व्यवहारात पैशाच्या बाबतीत काटेकोर राहावे. दिलेली आश्‍वासने पाळावीत. नोकरीत तुमच्या कामात इतरांनी केलेली ढवळाढवळ तुम्हाला सहन होणार नाही. बोलण्यापेक्षा कृती करण्याकडे कल राहील. नवीन कामामुळे नवीन ओळखी होतील. घरात विरोध जास्त राहील, तेव्हा आग्रही भूमिका सोडा. तडजोडीने प्रश्‍नांची उकल करावी.

मीन : स्वभाव खूपच हळवा होईल, त्यामुळे भावनेला महत्त्व द्याल. व्यवसायात कामामुळे त्रास सहन करावा लागेल. अपेक्षा बऱ्याच असतील, पण वेळ कमी पडेल. पैशांचीही चणचण भासेल. स्पर्धक हातातोंडाशी आलेली कामे काढून घेतील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. मानसिक अशांतता राहील, तेव्हा थोडी सबुरी ठेवावी. कामात बदल संभवतो. घरात तुम्हाला एकटेपणा जाणवेल. त्यामुळे तुम्ही स्वतःचा वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. प्रकृतीची म्हणावी तशी साथ मिळणार नाही. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.

संबंधित बातम्या