ग्रहमान : १२ ते १८ ऑक्टोबर २०१९

अनिता केळकर
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

ग्रहमान
 

मेष : एखादे काम सहज होईल असे वाटून गाफील राहू नये. तसे केले तर हातातील एखादी चांगली संधी गमावून बसाल. व्यवसायात प्रत्येक निर्णय घेताना भविष्यात होणाऱ्या परिणामांचा विचार आधी करावा, मगच कृती करावी. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये. नोकरीत कामात हलगर्जी राहू नये. जबाबदारी व्यवस्थित सांभाळावी. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.

वृषभ : मोठ्या उत्साहाने कामाला लागाल, पण येणाऱ्या अडचणींमुळे कामात दिरंगाई होईल. व्यवसायात उद्दिष्टे ठरवून पावले टाकाल. त्यातील आर्थिक धोके लक्षात घेऊन मगच कृती कराल. पैशांची तजवीज होईल. नोकरीत वेगळ्या कामासाठी तुमची निवड होईल. त्यासाठी नवीन प्रशिक्षण घ्याल. घरात तुम्ही दिलेल्या सल्ल्याला महत्त्व येईल. आवडीचे काम कराल. केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. नवविवाहितांकडून चांगली बातमी कळेल.

मिथुन : स्वतःची आर्थिक व शारीरिक कुवत ओळखून कामे हाती घ्यावीत. कामात अंथरूण पाहून पाय पसरावेत. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवाल. कामाचा व्याप वाढेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत लवचीक धोरण स्वीकारून हातातील संधी निसटू देऊ नये. घरातील इतर व्यक्तींवर राग काढू नये. चुकांची उकल समजून घ्यावी. एखादी चांगली बातमी मनावरील ताण हलका करेल.

कर्क : 'रात्र थोडी सोंगे फार' अशी स्थिती तुमची असेल. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. ज्यांच्यावर कामे सोपवली असतील त्यांच्यावर देखरेख ठेवावी लागेल. अतिविश्‍वास टाळावा. पैशांच्या व्यवहारात चोख राहावे. नोकरीत कामातील बेत गुप्त ठेवावेत. आपले काम बरे नि आपण बरे हे धोरण फायद्याचे ठरेल. विरोधकांना टीका करण्याची संधी देऊ नये. घरात वैचारिक मतभेद होतील. वादविवाद होतील. मुलांच्या हट्टासाठी चार पैसे जादा खर्च कराल. सामूहिक कामात मान मिळेल.

सिंह :  'खाईन तर तुपाशी' हा बाणा थोडा बाजूला ठेवून सामंजस्याने विचार केलात तर बरेच प्रश्‍न मार्गी लागतील. व्यवसायात योग्य वेळी योग्य व्यक्तींची केलेली निवड लाभदायी ठरेल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत 'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' या म्हणीचा अवलंब कराल. गोड बोलून सहकाऱ्यांकडून कामे करून घ्याल. घरात मनाप्रमाणे कामे करता येतील. पाहुण्यांची सरबराई कराल. तब्येतीचे तंत्र मात्र सांभाळावे. 

कन्या : अनेक गोष्टी साकार करण्याचा तुमचा मनोदय असेल. ग्रहांची मदतही मिळेल. व्यवसायात इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. कामाचे योग्य नियोजन भविष्यात भरपूर पैसे मिळवून देणारी संधी उपलब्ध करून देईल. परदेशगमन व व्यवहार (परदेश) या कामांना चालना मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. तुम्हाला व तुमच्या कामाला बरीच मागणी राहील. घरात शुभसमारंभ ठरतील. आवडत्या व्यक्तींची भेट होईल. प्रकृतीमान सुधारेल.

तूळ : पैशांची वाहती गंगा असली, तरी सद्यपरिस्थितीत ती कमीच वाटेल. पूर्वीची देणी व इतर खर्च यामुळे हाती काहीच शिल्लक नसेल. व्यवसायात काम व पैसे दोन्हीही मिळेल, पण समाधान मात्र नसेल. थोडा धीर धरावा. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करणे हितावह राहील. कामात चोख राहून सहकाऱ्यांनाही मदत करावी. अपेक्षा न ठेवता कामे करावीत म्हणजे अपेक्षाभंग झाल्याचे दुःख वाटणार नाही. घरात जुने वाद पुन्हा डोके वर काढतील, तरी शांत राहावे.

वृश्‍चिक : इच्छापूर्ती करायला ग्रहांची मदत मिळेल. सुरुवातीला कठीण वाटणाऱ्या कामात हळूहळू सुधारणा होईल व प्रगतीचा मार्ग सुकर होईल. व्यवसायात प्रयत्नांची पकड ढिली होऊ देऊ नये. मोठ्या कल्पना मनात डोकावतील. त्यातून आर्थिक लाभ व्हावा ही इच्छा असेल. परंतु, 'सब्र का फल मीठा होता है' हे लक्षात ठेवावे. नोकरीत कामाचे समाधान मिळेल. नवीन नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. घरात महिलांचा आवडत्या छंदात वेळ जाईल. गृहसौख्याचा आनंद घ्याल.

धनू : मनातील इच्छापूर्ती एखादी जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे पूर्ण व्हावी ही तुमची अपेक्षा असेल. परंतु, वास्तवात थोडी सबुरी ठेवावी, यश मिळेलच. व्यवसायात नवीन कामांमध्ये आलेले अडथळे दूर होतील. हितचिंतकांची याकामी मदत होईल. पैशांची ऊब मिळेल. नवी उमेद नवा जोश व उत्साह देईल. नोकरीत, कामात बेफिकीर राहू नये. व्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात अनावश्‍यक खर्च टाळावा. छोटी ट्रिप मन प्रसन्न करेल.

मकर : पैशांचा वापर व माणसांची पारख तुम्हाला अचूक असते या सप्ताहात पैशांच्या जोरावर कामे पूर्ण कराल. ओळखीचा उपयोग करून तुम्ही तुमचे ध्येय गाठाल. अवघड व अशक्‍य वाटणाऱ्या कामात यश मिळवाल. पैशांची जुनी वसुलीही होईल. नोकरीत इतरांना न जमणारे काम स्वतः हाती घेऊन यशस्वी पार पाडाल. वरिष्ठ व सहकाऱ्यांची वाहवा मिळवाल. परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्यांना उत्तम कालावधी आहे. घरात प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत घालवाल. मानसिक समाधान मिळेल.

कुंभ : तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढायला सुरुवात झाल्यामुळे कामातील वेगळेपण सिद्ध करण्याची तुमची मनीषा असेल. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल वाढवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. कामाची नवीन योजना आखाल. त्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत कंटाळवाण्या कामातून सुटका झाल्याने समाधान वाटेल. धाडसी पावले उचलाल. घरात चांगली बातमी कळेल. नवीन खरेदीचा आनंद मिळेल. तरुणांचे विवाह जमतील.

मीन : तुमच्या चंचल व अस्थिर स्वभावाला लगाम घालून आलेली निराशा झटकून नव्या उमेदीने कामाला लागावे. व्यवसायात नवीन दिशा डोळ्यासमोर ठेवून कृती करावी. कामातील विस्ताराचे बेत पुन्हा हाती घ्यावेत. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत केलेल्या कामांचे कौतुक होईल. तुमच्या गुणांची कदर केली जाईल. बेकार व्यक्तींना नोकरी मिळेल. घरात चांगली बातमी कळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. खर्च वाढेल. सामूहिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल.

संबंधित बातम्या