ग्रहमान : ८ ते १४ फेब्रुवारी २०२०

अनिता केळकर
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

ग्रहमान 

मेष : यशाची झालर चाखता येईल. व्यवसायात प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून नवीन योजना हाती घ्याल. कामामुळे विक्री व उलाढाल वाढेल. पैशांची तात्पुरती चणचण भासेल. परंतु, ओळखीतून सोय होईल. नोकरीत अपार मेहनत घेण्याची तुमची तयारी असेल, वरिष्ठांना तुमच्या कामाची जाण असेल. त्यामुळे एखादी सवलत देण्यास ते तयार होतील. जोडव्यवसायात मात्र उधार उसनवार शक्‍यतो टाळावे. अनावश्‍यक खर्चाला फाटा द्यावा. तरुणांनी सहकाऱ्यांकडून फार अपेक्षा ठेवू नये.

वृषभ : जे काम कराल ते स्थिर वृत्तीने करावे, त्याचा लाभ होईल. व्यवसायात तुमच्या निर्णयामुळे भोवतालच्या व्यक्तींवर छाप पडेल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती साधाल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा आता होईल. नोकरीत कधी शक्ती, तर कधी युक्तीने कठीण काम सोपे कराल. कामात सहकारी व वरिष्ठांची मदत मिळेल. घरात इतरांबरोबर स्वतःचीही हौसमौज पूर्ण करू शकाल. कलाकार खेळाडूंना प्रसिद्धीझोतात राहण्यास उत्तम कालावधी आहे. महिलांना छंद जोपासता येईल.

मिथुन : या सप्ताहात कर्तव्य व विरंगुळा याला सारखेच महत्त्व द्याल. व्यवसायात तुमच्या पसंतीचे काम मिळाल्याने कामाचा आनंद मिळेल. कामामुळे धावपळ, दगदग मात्र बरीच करावी लागेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा वाढतील, त्यामुळे आळस करून चालणार नाही. कामामुळे नवीन ओळखी होतील. नवीन अनुभव येतील. घरात अत्यावश्‍यक कामासाठी वेळ काढून ठेवावा लागेल. पाहुण्यांची ये-जा राहील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.

कर्क : तुमच्या उद्योगप्रिय स्वभावाला खतपाणी घालणारे ग्रहमान आहे. व्यवसायात नवीन योजना किंवा बेत आकर्षित करतील. विचार व कृतीचा योग्य समन्वय साधून कामे पूर्ण करावीत. अपेक्षित कामात चांगली प्रगती होईल. महत्त्वाचा सौदा व करार होण्यास अनुकूल काळ आहे. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. कामाच्या वेळी काम करून इतर वेळी सुखसुविधा उपभोगता येतील. पैशांची चिंता मिटेल. घरात मनाप्रमाणे वागता येईल. नवीन खरेदीचा आनंद घेता येईल.

सिंह : एकाच वेळी घर, व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात योग्य नियोजन करून कामाचा दर्जा उत्तम ठेवण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी बाजारातील घडामोडींचा आढावा घेतलात, तर त्याचा लाभ होईल. नोकरीत स्वतःचे वेगळेपण कामातून दाखवू शकाल. कामानिमित्त छोटा प्रवास घडेल. घरात लांबच्या प्रवासाचे बेत निश्‍चित होतील. गृहसौख्याचा आनंद मिळाल्याने उत्साही राहाल. नवीन जागा, वाहन खरेदीचे बेत सफल होतील. तरुणांचे विवाह ठरतील. प्रकृतीमान सुधारेल.

कन्या : यशातील कसर भरून निघाल्याने तुम्ही उत्साही असाल. व्यवसायात मनात आलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न कराल. दूरदृष्टी ठेवून केलेली कामे फायद्याची ठरतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची फळे चाखता येतील. नवीन सौदे, करार होतील. नोकरीत वरिष्ठ वेगळ्या कामासाठी तुमची निवड करतील, त्यासाठी ते वेगळी सवलतही देतील, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. घरात शुभकार्याची नांदी होईल. मोठ्या खरेदीचे बेत सर्वांच्या संमतीने ठरतील. महिलांचे मनोबल उंचावेल.

तूळ : मनातील सुप्त इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. ग्रहांची अनुकूलता राहील. व्यवसायात कष्ट करण्याची मानसिकता वाढेल. अवघड कामे संपवण्याचा चंग बांधाल. जादा भांडवलाची तरतूद हितचिंतकांच्या मदतीने होईल. नोकरीत सहकारी व हितशत्रूंवर मात करण्यासाठी एखादी चाल आखाल. केलेल्या कामात यश मिळेल. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळेल. घरात शुभकार्य ठरतील. त्यानिमित्त आप्तेष्ट व मित्रमंडळी यांच्या भेटीगाठी होतील.

वृश्‍चिक : कामाचा तणाव कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल, त्यात यश येईल. व्यवसायात अभिनव पद्धती अमलात आणून नेहमीच्या कामातून मुक्तता करून घ्याल. विलंबीत कामे ओळखून मार्गी लावाल. पैशांची वसुली झाल्याने चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठ सांगतील ते आणि त्या पद्धतीने काम करून त्यांना खूश कराल, त्यामुळे इतर कामे करण्यासाठी फारसा वेळ मिळणार नाही. घरात आवडत्या व्यक्तींचा हट्ट पुरवण्यासाठी सढळ हाताने पैसे खर्च करावे लागतील.

धनू :  'हौसेला मोल नाही' ही म्हण सार्थ कराल. व्यवसायात प्रगतीसाठी कामाचा वेग वाढवाल. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उलाढाल व फायद्याचे प्रमाण वाढवाल. भांडवलासाठी कर्ज काढावे लागेल. नियोजनावर भर ठेवला, तर कामात यश मोठ्या प्रमाणावर मिळेल. नोकरीत मिळणाऱ्या सुखसुविधांचा भरपूर फायदा घेता येईल. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. नवीन ओळखी होतील. प्रवासाचे योग येतील. कामाचा आनंद मिळेल. घरात कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल.

मकर : सतत आपले काम व कामाचा दर्जा कसा वाढेल याचा ध्यास राहील, त्यासाठी वेगळे प्रयोग करण्याचे धाडस कराल. व्यवसायात तुमच्या व्यवहारी बुद्धीचा चांगला उपयोग करून घ्याल. कमी खर्चात जास्त नफा मिळवाल. नोकरीत महत्त्वाची कामे वरिष्ठ विश्‍वासाने तुमच्यावर सोपवतील, त्यासाठी जादा अधिकारही देतील. कर्तव्यदक्ष राहून कामे पार पाडण्यावर भर असेल. घरात सर्वांना पसंतीस असणारा कार्यक्रम आखाल. कलाकार खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात गुण दाखवता येतील.

कुंभ : अडीअडचणींवर मात करून यश मिळवाल, त्याला अनुकूल ग्रहमान लाभेल. व्यवसायात, कामात प्रत्यक्ष फायदा लगेचच मिळाला नाही, तरी एकप्रकारचे चैतन्य संचारेल. नेहमीपेक्षा वेगळी योजना आखून प्रतिस्पर्ध्यांना अचंबित कराल. जोडव्यवसाय असणाऱ्यांना कमाई चांगली होईल. नोकरीत तुमच्या कौशल्याला वाव मिळाल्याने तुमचा कामाचा मूड चांगला राहील. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. तरुणांचे विवाह ठरतील. महिलांना आवडत्या छंदात संधी मिळेल.

मीन : नेहमी स्वतःच्या मदतीत जीवन जगण्याकडे तुमचा कल असतो, त्यामुळे वेळेचे बंधन तुम्हाला आवडत नाही. परंतु, या सप्ताहात तुमचा नाइलाज असेल. व्यवसायात कामाचा पसारा वाढेल, त्यामुळे खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. स्वतःची मर्यादा लक्षात घेऊन क्षमतेनुसार काम करावे. धोका पत्करू नये. नोकरीत सहज वाटणाऱ्या कामात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होईल, त्यासाठी युक्तीचा वापर कराल. घरात व्यक्ती हवे तसे सहकार्य देऊ शकणार नाहीत.

संबंधित बातम्या