ग्रहमान : १६ ते २२ मे २०२०

अनिता केळकर
सोमवार, 18 मे 2020

ग्रहमान
 

मेष : कामावर लक्ष केंद्रित केले, तर बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात खेळत्या भांडवलाची गरज भासेल. कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवण्याकडे कल राहील. ओळखीतून नवीन कामे मिळतील. दगदग धावपळ वाढेल. कोणतेही काम करताना लक्षपूर्वक करावे. घरातील लहान आणि ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. विद्यार्थ्यांनी अतिताण घेऊ नये. महिलांचा घरातील कामात वेळ जाईल.

वृषभ : एकाचवेळी अनेक गोष्टींना महत्त्व येईल, त्यामुळे कामाचे नियोजन बिघडेल. कोणतेही काम करताना नियोजन करावे आणि महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. नफा वाढवणारी अनेक प्रलोभने तुम्हाला आकर्षित करतील, तरी चार हात लांब रहावे. कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. तुम्ही केलेल्या कामामुळे तुमचे महत्त्व वाढेल. घरात दोन पिढ्यांतील विचारांची तफावत जाणवेल. अनपेक्षित खर्च वाढतील. महिलांचा मनन चिंतनात वेळ जाईल.

मिथुन : भोवतालच्या परिस्थितीनुरूप तुम्ही तुमचे धोरण लवचिक ठेवाल. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा मानस असेल. व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील, तर नवीन कामे मिळतील. पैशांची चिंता मिटेल. नोकरीतील अडथळे काही प्रमाणात दूर होतील. आप्तेष्ट, नातेवाईकांची खुशाली कळेल. घरातील व्यक्तींसमवेत आनंदाचे क्षण अनुभवाल. महिलांना मनःशांती लाभेल. एखादी चांगली  बातमी कळेल, त्यामुळे मन प्रसन्न राहिल.

कर्क : विचारांचा गोंधळ संपून तुम्ही काही ठोस निर्णय घ्याल. प्रगतीचे विचार मनात घोळतील. व्यवसायातील उलाढाल वाढवण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब कराल. घरातील कामे वाढतील, त्यामुळे महिलांची थोडी चिडचिड होऊ शकते, पण मुलांची मदत होईल. विद्यार्थ्यांना अंगी असलेले कौशल्ये दाखवण्याची संधी मिळेल. महिलांना आवडत्या छंदात मन  रमावता येईल. तरुणांनी अतिसाहस दाखवू नये. ज्येष्ठांनी मनन चिंतनात वेळ घालवावा. 

सिंह : भोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. त्यामुळे थोडे आश्चर्यचकित व्हाल. व्यवसायात आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन कामाची आखणी करावी. अंथरूण पाहून पाय पसरावेत. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. काही कारणाने जुने करार व हितसंबंध संपुष्टात येतील. 'शब्द हे शस्त्र आहेत' हे लक्षात ठेवून बोलावे. मनाविरुद्ध वागावे लागले, तरी वाच्यता न करता काम करावे. कर्तव्यपूर्तीला प्राधान्य राहील. घरात खर्चाचे बजेट कोलमडले, त्यामुळे खर्च भागवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल.

कन्या : तुमची जिद्द जागृत झाल्याने एखादा धाडसी निर्णय घ्याल. व्यवसायात योग्य व्यक्तींची निवड कराल. लांबलेल्या कामांना चालना देण्यासाठी जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर कराल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. पूर्ण झालेल्या कामाचे पैसे हाती येण्यास विलंब होईल. घरातील वातावरण निवळू लागेल. तसेच घरात एखादा आनंदाचा क्षण सर्वजण साजरा कराल. प्रियजनांचा सहवास लाभेल. दिलासा देणारे ग्रहमान आहे. 

तूळ : हौसेमौजेसाठी हात सैल सोडाल, त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात कामगारांचे मूड व पैशांची चणचण यामुळे त्रस्त व्हाल, परंतु कामे वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित कराल. हातात असलेले व येणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन करावे. घरातील अनावश्यक खर्च टाळावा. घरात नको त्या कामात वेळ जाईल. निरर्थक प्रश्नांवर चर्चा होईल. मात्र त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. महिलांचा मूड चांगला राहील. विद्यार्थ्यांनी मात्र प्रकृतीची काळजी घ्यावी.

वृश्चिक : 'रात्र थोडी, सोंगे फार' अशी स्थिती होईल. प्रत्येक काम महत्त्वाचे व फायदा देणारे असल्याने बरीच धावपळ होईल, पण मार्ग मिळतील. व्यवसायात मिळालेल्या संधीचे सोने करावे. नेहमीपेक्षा जादा कमाई होण्यासाठी काही योजनांचा विचार कराल. जुनी येणी वसूल होतील. घरात सर्वांना सुखी ठेवणे कठीण जाईल. सर्वांचे मूड सांभाळणे अवघड आहे, तरी दुर्लक्ष करावे. सामंजस्याने प्रश्नांची उकल करावी. महिलांनी जमेल तेवढेच काम करावे.

धनू : मनःस्थिती द्विधा होईल, तरी थोडे सबुरीने निर्णय घ्यावेत. व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा मोबदला आर्थिक स्वरूपात मिळेल. कामाचा व्याप वाढेल. मिळालेल्या पैशांचा वापर पुन्हा गुंतवणुकीतच केलात, तर भविष्यात विशेष लाभ होईल. नवीन नोकरीचे बेत तूर्तास लांबणीवर टाकावेत. घरात वातावरण चांगले राहील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ मिळेल. अपेक्षित चांगली बातमी कळेल. महिलांनी तब्येत सांभाळावी.

मकर : तुम्ही तुमचा हेतू साध्य करून घेण्यात यशस्वी व्हाल. त्यासाठी जुन्या नव्याचा योग्य समन्वय साधाल. व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारेल. आवश्यकतेनुसार खेळत्या भांडवलाची सोय करून उलाढाल वाढवाल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामातील गती वाढवाल. घरामध्ये तातडीच्या गरजांसाठी पैसे खर्च होतील. प्रियजनांचा सहवासात वेळ मजेत जाईल. महिलांना आवडत्या छंदात वेळ घालवता येईल. कलाकारांना नव्या संधी मिळतील.

कुंभ : 'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' याची आठवण ठेवून कामे केलीत, तर प्रत्येक आघाडीवर सफलता मिळेल. व्यवसायात पात्रता व दर्जा ओळखून कामाचे वाटप करावे. बोलण्यापेक्षा कृतीवर भर राहील. नवीन जागा व वाहन खरेदीचे विचार मनात येतील, त्यावर घरातील व्यक्तींसमवेत चर्चा होईल. तरुणांच्या प्रगतीतील अडथळे दूर होतील, मात्र अतिधाडस  करू नये.  प्रकृतीमान सुधारेल. महिलांना आत्मिक बळ मिळेल, त्यामुळे दिवस आनंदात जातील व मानसिक आरोग्य चांगले राहील.

मीन : तुमच्यात उत्साह ओसंडून वाहील, त्यामुळे कामाचा वेग आपोआप वाढेल. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. हितचिंतकांची कामात मदत होईल. कामे पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कराल. पैशांची चिंता मिळेल, तरी हातातील पैसे काटकसरीने खर्च करावेत. आप्तेष्ट, नातेवाईकांची  खुशाली कळेल.  घरात आनंदी वातावरण राहील. मात्र ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. महिलांना गृहसौख्य उपभोगता येईल. मानसिक आरोग्य चांगले राहील.

संबंधित बातम्या