ग्रहमान १८ ते २४ जुलै २०२० 

अनिता केळकर
मंगळवार, 21 जुलै 2020

ग्रहमान
१८ ते २४ जुलै २०२० 

मेष : केलेल्या कामाचे चीज होईल. हाती पैसे खुळखुळेल. व्यवसायात कामाच्या पद्धतीत मदत करून वेग वाढवू शकाल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. कामगारांना जादा पैशांचे अमिश दाखवून जास्त काम करून घेता येईल. नोकरीत मनाप्रमाणे काम करता येईल. जादा कमाई करण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी होतील. घरात तणाव कमी होईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. तरुणांना विवाहाची संधी चालून येईल. मित्रमैत्रिणींच्या सहवासात वेळ मजेत जाईल.

वृषभ : प्रगतीपथावर नेणारे ग्रहमान आहे. व्यवसायात परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी स्वतःच्या कार्यपद्धतीत बदल कराल. ठरवलेले बेत साकार होतील. कामे मार्गी लागतील. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत कामानिमित्त नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. घरात मुलांकडून चांगली बातमी कळेल. आवश्यक खरेदी कराल. अनपेक्षित लाभ मन प्रसन्न करेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. महिलांचा घरकामात वेळ जाईल.

मिथुन :  कामात सतत नावीन्य आणण्याचा प्रयत्न असतो, त्यात यश येईल. व्यवसायात नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतींचा अवलंब करून बाजारातील प्रतिष्ठा वाढवाल. नवीन कराराचे प्रस्ताव नजरेच्या टप्प्यात येतील. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. सहकारी व वरिष्ठांची कामात मदत होईल. घरात तुमच्या कलागुणांना योग्य संधी लाभेल. लांबलेले शुभसमारंभ निश्चित होतील. कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. महिलांना मानसिक समाधान लाभेल. 

कर्क : माणसांचे नवीन अनुभव येतील. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा दृष्टिकोन ठरवाल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण कराल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत आश्वासनांवर अवलंबून न राहता तुमचे कर्तव्य पार पाडावे. कामानिमित्त प्रवासयोग येईल. घरात सांसारिक जीवनातील जबाबदाऱ्यांचा कंटाळा येईल. त्यामुळे कामे पुढे ढकलाल. विरंगुळा म्हणून छोटीशी सहल काढाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

सिंह : तुम्ही स्वयंसिद्ध राहून कामे मार्गी लावाल. स्वतः पुढाकार घेऊन काहीतरी करण्याची तुमची इच्छा प्रबळ होईल. व्यवसायात उत्पन्नात वाढ करण्याचा मानस राहील, पण त्यासाठी कोणतेही धोके पत्करू नयेत. इतरांशी बोलताना शब्द हे शस्त्र आहे, हे लक्षात ठेवावे. नोकरीत सहकाऱ्यांची कामात मदत होईल. वरिष्ठ नवीन कामे तुमच्यावर सोपवतील. जोडव्यवसायातून वरकमाई होईल. घरात भोवतालच्या व्यक्तींच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल, तरी शांत रहावे.

कन्या : थोडी संभ्रमावस्था झाली असेल, तर तूर्तास शांत बसावे. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेऊन त्याप्रमाणे वाटचाल करावी. व्यवसायात कामाचे नियोजन करून कामे मार्गी लावावी. चिंता न करता कामे करावीत. कार्यपद्धतीत आधुनिकीकरण करून प्रगती करण्याचा मानस राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून आपल्या मागण्या मांडाव्यात. केलेल्या कामाचे समाधान लाभेल. घरात अट्टहासाने वागून त्रागा करू नये. पाहुण्यांची ये-जा राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ : प्रयत्नांना नशिबाची जोड लाभल्याने यशाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात कामाचे पैसे हातात पडतील. मिळालेल्या संधीचा किती आणि कसा फायदा घ्यायचा हे तुमच्याच हातात राहील. उलाढाल वाढवण्यासाठी कामाचे आधुनिकीकरण कराल. नोकरीत इतरांना न जमलेले काम तुम्ही कराल. कमी श्रमात जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न राहील. घरात कुटुंबासमवेत प्रवास व मेजवानीचा बेत आखाल. वेळेचा सदुपयोग करून घ्याल. आप्तेष्टांच्या भेटीने आनंद मिळेल.

वृश्‍चिक : कामाचा व्याप वाढेल, त्यामुळे अहोरात्र कामाचाच ध्यास राहील. व्यवसायात कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. पैशांची आवक समाधानकारक राहील. हितचिंतकांची मदत मिळेल. गरजेच्या वेळी खेळत्या भांडवलाची तरतूद झाल्याने तणाव कमी होईल. नोकरीत वरिष्ठ कामाचे स्वातंत्र्य देतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने कामे करू शकाल. घरात चांगल्या कारणाने खरेदीचे बेत ठरतील. तरुणांचे विवाह जमतील. चांगली बातमी कळेल. आरोग्य उत्तम राहील.

धनू : कामे मार्गी लावल्याने तुमची धावपळ दगदग वाढेल. मात्र सर्व कामे एकट्याने न करता योग्य व्यक्तींवर ती सोपवावीत. व्यवसायात कामानिमित्त नवीन व्यक्तींशी संपर्क साधता येईल. नफा मिळवून देणारी कामे हाती घ्याल. जुने प्रश्न मार्गी लागल्याने कामांना वेग येईल. नोकरीत गोड बोलून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्याल. नवीन नोकरीच्या प्रयत्नांना यश लाभेल. प्रतिष्ठा मिळवून देणारी कामगिरी हातून घडेल. घरात एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सुखद प्रसंगाची नांदी होईल.

मकर : तुमच्या लवचिक स्वभावाचा तुम्हाला उपयोग होईल. व्यवसायात ज्या कामात फायदा जास्त अशा कामांना प्राधान्य द्याल. उधारीपेक्षा रोखीवर भर राहील. त्यामुळे पैशांची ऊब मिळेल. नोकरीत कामाच्या स्वरूपात तात्पुरते बदल होतील. वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत कामात होईल. घरात तुमचे विचार इतरांना पटवून देण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असेल, ती भागेल. खाण्यापिण्यावर मात्र बंधन ठेवावे.

कुंभ : तुम्हाला पूरक ग्रहमान आहे. नवे ध्येय व  लक्ष तुमच्या नजरेसमोर असेल. व्यवसायात अपेक्षित व्यक्तीकडून उत्स्फूर्तपणे साथ मिळाल्याने काम करायला मजा वाटेल. छोटे-मोठे प्रवास घडतील. नोकरीत बुद्धीला खाद्य देणारे काम मिळाल्याने तुम्ही खूश असाल. कामाचे समाधान राहील. घरात नातेवाइक आप्तेष्ट यांच्या येण्याजाण्याने वातावरण आनंदी राहील. नशिबाची साथ मिळेल. मनाप्रमाणे वागता येईल.

मीन : बदलाशिवाय प्रगती नाही, याची जाणीव होईल. त्यानुसार तुम्ही तुमची मानसिकता बदलाल. व्यवसायात मनाप्रमाणे उलाढाल राहील. फायद्याचे प्रमाण वाढवण्यासाठी नवा पर्याय शोधावा लागेल. मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रोत्साहनाचीही गरज भासेल. नोकरीत कोणत्याही कामात गुप्तता राखावी. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश दिसेल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. वातावरण हलकेफुलके ठेवण्यासाठी जादा पैसे खर्च करण्याची तयारी असेल. नवीन वातावरणाचे आकर्षण राहील.

संबंधित बातम्या