ग्रहमान - २६ डिसेंबर2020 ते १ जानेवारी 2021

अनिता केळकर
सोमवार, 28 डिसेंबर 2020

ग्रहमान - २६ डिसेंबर2020 ते १ जानेवारी 2021

मेष 
सध्या तुम्हाला ग्रहांची साथ आहेच. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन आशावादी राहील. व्यवसायात तुमचा कामाचा उत्साह प्रचंड असेल. नवीन योजनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्नशील राहाल. नोकरीत तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळेल. नवीन ओळखीतून अनेक लाभ होतील. प्रगतीचा आलेख चढता राहील. गृहिणींना मनाप्रमाणे वागता येईल. घेतलेले निर्णयही अचूक असतील. कुटुंबासमवेत प्रवासयोग संभवतो.

वृषभ
शुक्राची रास असल्याने जीवनातील हौसमौज उपभोगण्याचा मोह होईल. परंतु धाडस करण्यापूर्वी पुढचा अंदाज घेऊन पावले टाका. व्यवसायात विचार व कृती यांचा समन्वय साधून निर्णय घ्या. नवीन करारमदार होतील. पैशाची वसुलीही होईल. नोकरीत स्वतःच्या कामात काटेकोर रहा. फार मोठे धोके न पत्करता थोडे वेगळे करण्याचा प्रयत्न राहील. घरात गृहिणींना कामात सजगवृत्ती ठेवावी लागेल. सर्व काही ठीक असूनही मनःशांती टिकवावी लागेल. तडजोडीच्या धोरणाचा उपयोग होईल.

मिथुन
तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान आहे. व्यवसायात परिस्थिती बदलण्याची वाट न बघता स्वतःमधे बदल करून प्रगती साधाल. हितचिंतक व सहकार्‍यांची साथ मिळेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळेल. तुमच्या क्षमतेची व कामाची दखल वरिष्ठ घेतील. गृहिणींना स्वतःचे छंद जोपासण्याची  संधी मिळेल. मित्रमैत्रीणींच्या समवेत वेळ मजेत जाईल. मुलांकडून अपेक्षित यश कळेल. आनंद वाटेल. तुमची बौद्धिक भूक ओळखीतून शमविली जाईल.

कर्क
जे योग्य तेच बरोबर मानून कृती करा. व्यवसायात कामाचा ताण भरपूर असेल. पैशाची थोडी चणचण भासेल परंतु हितचिंतकांची मदत मिळून काम मार्गी लागतील. नवीन ओळखी होतील तरी सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवा. नोकरीत भूरळ पाडणार्‍या घटना घडतील तरी दुर्लक्ष करा. कोणतेही बदल तूर्तास करू नका. घरात पेल्यातील वादळे उठली तरी डोके शांत ठेवा. विनाकारण कोणालाही सल्ला देऊ नका. तरूणांनी अतिघाई करून अविचाराने वागू नये.
सिंह
तुमचा आत्मविश्‍वास बळावेल त्यामुळे काहीतरी वेगळे करून दाखवून सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. व्यवसायात तुमच्या कल्पना व विचारांना चालना मिळेल. अपेक्षित यश संपादन करू शकाल. पैशाचीही तजवीज होईल. नोकरीत अवघड कामात बाजी माराल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. घरात कौटुंबिक सोहळा साजरा कराल.  
प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. सामूहिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल.

कन्या
स्वतःची कुवत ओळखून प्रगती करा. व्यवसायात नवीन योजना दृष्टीक्षेपात असतील परंतु हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे लक्ष द्याल. फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन पूर्ण कराल. त्यासाठी नवीन गुंतवणूकही कराल. नोकरीत तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. सहकारी व वरिष्ठांची कामात मदत होईल. जादा कामातून जादा कमाई करता येईल. घरात सजावट, दुरुस्ती, नवीन खरेदी इ. गोष्टीत पैसे खर्च होतील. सण समारंभाच्या निमित्ताने पाहुण्यांची ये जा राहील.

तूळ
सकारात्मक दृष्टिकोन जीवनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरेल. मनातील स्वप्ने साकार होण्यास ग्रहमानाची साथ मिळेल. व्यवसायात निर्णय अचूक ठरतील. योग्य व्यक्तींची संगत कामांना गती देईल. व्यवहाराला धरून कामे कराल. नोकरीत चांगल्या कामामुळे कौतुक होईल. नवीन संधीसाठी तुमची निवड होईल. स्वतःचा वेगळा ठसा कामात उमटवू शकाल. घरात तुमच्या मताला मान मिळेल. भावनांचा विचारही इतर करतील. मानसिक समाधान मिळेल.

वृश्चिक
कामातील योग्य नियोजन बरेच काही साध्य करून देईल, त्यामुळे तुमचा उत्साह दांडगा असेल. व्यवसायात हितचिंतकांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. कामे मार्गी लागतील. पैशाची वसुली झाल्याने पैशाची चिंता मिटेल. नोकरीत सहकारी व वरिष्ठ कामात मदत करतील. परंतु त्यांना तुमच्याकडून बरीच अपेक्षा राहील. कामानिमित्ताने प्रवास योग. घरात स्वतःचे विचार इतरांवर लादण्याचा प्रयत्न निष्फळ ठरेल. विनाकारण गैरसमज होतील. परंतु न चिडता सामंजस्याने तोडगा काढा. तरूणांनी तूर्तास लग्नाची घाई करू नये.

धनू
मानसिक पातळी चांगली राहील त्यामुळे भविष्यात लाभदायी ठरणार्‍या योजना आताच हाती घेण्याचा विचार असेल. व्यवसायात तुमचा हुरूप वाढेल. पूर्वीचा अनुभवाचा लाभ होईल. कामात केलेले बदल योग्य ठरतील. नोकरीत वरिष्ठांचा तुमच्याबद्दलचा विश्वास वाढेल. नवीन प्रशिक्षणाची संधी येईल, त्याचा लाभ घ्या. जोडधंद्यातूनही वरकमाई करता येईल. घरात तुमची स्वच्छंदी वृत्ती उफाळून येईल. मूड चांगला असल्याने घरातील व्यक्तींसाठी जास्तच खर्च कराल.

मकर
योग्य व अयोग्य यांची योग्य ती निवड करून यश मिळवण्याची धडपड राहील. व्यवसायात थोडी गोंधळाची अवस्था होईल. तेव्हा हितचिंतकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. एकाच वेळी सतरा दगडांवर पाय न ठेवता कामांचे नियोजन करून मार्गक्रमण करा. पैसे राखून खर्च करावे लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून त्यांच्या सूचनांचे पालन करा. वेळेचे बंधन पाळा. घरात मुलांच्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. मित्रमंडळींच्या भेटीगाठीने तणाव हलका होईल.

कुंभ
“मनी वसे ते स्वप्नी दिसे” ही म्हण सार्थ ठरेल. व्यवसायात अपेक्षापूर्तीचा आनंद मिळाल्याने तुमची अभिलाषा वाढेल. प्रयत्न व नशीब यांची योग्य सांगड घालून कामात सातत्य राखणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवावे. नोकरीत तुमच्या बुद्धीला आव्हान देणारे काम मिळेल. त्यातून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करून दाखवाल. घरात तडजोडीचे धोरण ठेवून वागा. अतिआत्मविश्वास न बाळगता पावले उचला. सामूहिक कामात मानसन्मानाचे योग येतील.

मीन
जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर प्रगतीमधे आलेल्या अडथळ्यांवर मात करून पुढे जाल. व्यवसायात तुम्हाला उत्तेजित करणारी घटना घडेल. नवीन करारमदार होतील. तुमची महत्वाकांक्षा वाढेल. नोकरीत कष्टाची तयारी असेल तर चांगली संधी मिळेल. प्रवासयोग येतील. नवीन ओळखीही होतील. घरात काहीतरी वेगळे करण्याचा इरादा राहील. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. मुलांकडून आनंदाची वार्ता कळेल

संबंधित बातम्या