ग्रहमान : १६ ते २२ जानेवारी २०२१

अनिता केळकर 
सोमवार, 18 जानेवारी 2021

ग्रहमान : १६ ते २२ जानेवारी २०२१

मेष 
घर व व्यवसाय या दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण करावी लागतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कामात आळस केलात तर तो वरिष्ठांच्या नजरेत येईल. हातातील कामे आधी पूर्ण करा मगच नवीन कामांकडे वळा. घरात तुमच्या मदतीची आवश्यकता इतरांना वाटेल. झेपेल तेवढी मदत अवश्य करा. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. महिलांना कामात मानसिक समाधान मिळेल. 

वृषभ 
कौटुंबिक सौख्य वाढवणारा सप्ताह आहे. व्यवसायात नवीन कामे मिळतील. मात्र ती स्वीकारण्यापूर्वी त्यातील अटी व नियमांचा अभ्यास करा. करारमदार शक्यतो पुढे ढकला. कोणालाही शब्द देताना जरा जपून, नाहीतर तुम्हीच शब्दात अडकण्याची शक्यता आहे. नोकरीत आपले काम बरे की आपण बरे हे धोरण उपयोगी पडेल. कामानिमित्ताने प्रवास व नविन ओळखी होतील. घरात आनंदाचे क्षण साजरे होतील. मनोकामना सफल होतील. पैशाची चिंता मिटेल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल. 

मिथुन 
सध्या तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा असेल. त्यामुळे कामाचे योग्य नियोजन करून कामे संपवा. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या. खेळत्या भांडवलाची तरतूद बँका व हितचिंतकांच्यामुळे होईल. नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागले तरी वाच्यता करू नका. जमेल तेवढे काम करा. सहकारी व वरिष्ठ मदत करतील ही अपेक्षा नको. स्वयंसिद्ध रहा. घरात विचारल्याखेरीज सल्ला देऊ नका. वातावरण खेळीमेळीचे राहील. मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल. महिलांना अपेक्षित कामाचा उरक पडेल. 

कर्क 
सभोवतालच्या व्यक्तींच्या वागण्याने थोडेसे बुचकळ्यात पडाल. मात्र थोडी सबुरी धरलीत तर प्रश्‍नांची उकल आपोआप होईल. व्यवसायात आश्‍वासन देताना त्याच्या परिणामांचा विचार आधी करा. तटस्थपणे राहून कामे स्वीकारा व वेळेत संपवा. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. नोकरीत हातातील कामे संपल्याशिवाय इतरांना मदत करू नये. कामातील बेत गुप्त ठेवावेत. घरात व्यक्तींशी कामापुरते बोलण्याचे धोरण ठेवा. भावनेपेक्षा कर्तव्यात प्राधान्य द्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण न घेता उजळणी करावी. महिलांनी प्रकृतीमान सांभाळून कामे करावीत. 

सिंह 
 सुख व समाधान देणारे ग्रहमान लाभत आहे. व्यवसायात कामाचे प्रमाण वाढेल. नवीन संधी चालून येईल. कामाच उत्साह राहील. आवश्यक त्या भांडवलाची सोय झाल्याने कामांना गती येईल. नोकरीत आव्हानात्मक काम कराल. जोडधंद्यातून फायदा होईल. सहकारी व वरिष्ठ यांची मदत आवश्यक तेव्हा येईल. घरात तुमचे सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. तरुणांना दिशा मिळेल. महिलांना कामाचा उरक दांडगा राहील. 

कन्या 
रवी तुम्हाला तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवेल. नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसायात मनाप्रमाणे गोष्टी घडत गेल्याने तुम्ही आनंदी दिसाल. जेवढे काम जास्त तेवढा मोबदला जास्त असा रेशो असेल. भांडवलाची तरतूदही होईल. नोकरीत आवडीच्या कामासाठी तुमची निवड होईल. तुमच्या शब्दाला मान मिळेल. नवीन ओळखी होतील. घरात नवीन खरेदीचे बेत प्रत्यक्षात साकार होतील. मनोकामना पूर्ण होईल. महिलांना मानाचे स्थान भूषवता येईल. कलाकार, लेखक यांना प्रसिद्धी मिळेल. 

तूळ 
श्रद्धा व सबुरी ठेवलीत तर बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात मनाविरुद्ध वागावे लागेल. त्यामुळे थोडी चिडचिड होईल. अपेक्षित व्यक्तींकडून मदतीचे आश्‍वासन मिळेल. कामाचे नियोजन करून कामे सहकार्‍यांवर सोपवा. नोकरीत कितीही काम केले तरी वरिष्ठांना ते अपूरेच वाटेल. परंतु उलटं बोलू नका. कामातील बेत गुप्त ठेवा. कामानिमित्ताने प्रवास घडेल. घरात इतर व्यक्तींची तुमचे मनोधैर्य टिकवून ठेवायला मदत होईल. तरुणांना मनःशांती मिळवताना त्रास वाटेल. महिलांना एकाग्रता साधणे कठीण आहे. 

वृश्‍चिक 
स्वप्नपूर्तीसाठी कल्पनाविलासात रंगून जाल. पण जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे रहा. व्यवसायात पैसे व प्रतिष्ठा यांचे महत्त्व वाढेल. परदेश व्यवहारातून चांगले पैसे मिळतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत मिळालेल्या सवलतींचा लाभ घ्याल. कामात हयगय खपून घेणार नाही. घरात महागड्या वस्तूंची खरेदी होईल. तरुणांना गुण दाखवण्यास वाव मिळेल. महिलांचा करमणुकीच्या कार्यक्रमात वेळ जाईल. 

धनू 
ग्रहांची मर्जी तुमच्यावर असल्याने कामात उत्साह वाढेल. व्यवसायात योग्य वेळी योग्य व्यक्तींची मिळालेली मदत भविष्यात कार्यविस्तार करण्यासाठी उपयोगी पडेल. पैशाच्या व्यवहारात मात्र सावधगिरी बाळगा. नवीन करारमदार पुढे ढकला. नोकरीत वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करू नका. कामात चोखंदळ रहा. सहकारी कामात मदत करतील. नवीन ओळखी होतील. घरात भावनावेग आवरावा. तुमच्या वागण्याचा तणाव इतरांना जाणवणार नाही याची काळजी घ्या. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रेंगाळलेली कामे मार्गी लागल्याने सुस्कारा टाकाल. महिलांना मनाप्रमाणे वागता येईल. 

मकर 
नशीब साथ देईल. व्यवसायात अनपेक्षित कामे मार्गी लागतील. नवीन कामेही मिळतील. पैशाची स्थितीही समाधानकारक राहील. नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळेल. कामात त्यांची मदत मिळेल. कामानिमित्ताने जादा अधिकार व सवलती वरिष्ठ देतील त्याचा लाभ घ्या. मानसिक समाधान मिळेल. घरात मुलांकडून सुवार्ता कळेल. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. प्रकृतीमान उत्तम राहील. महिलांना आध्यात्मिक प्रगती साधता येईल. 

कुंभ 
कामाचे वेळी काम करून इतर वेळी आराम करण्याकडे कल राहील. व्यवसायात कामाची घडी नीट बसवण्याकडे लक्ष राहील. सहकार्‍यांच्या आडमुठ्या स्वभावाचा थोडा राग येईल. चांगल्या शब्दात त्यांना समज द्या. नोकरीत वरिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य माना. अतिश्रम टाळा. कुसंगतीने चुकीची पावले टाकू नका. घरात तुमच्या वागण्या बोलण्यात पारदर्शकता ठेवा. कृतीवर भर देऊन कामाचा उरक पाडा. महिलांनी अतिचिकित्सक राहू नये. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यास करावा. 

मीन 
सध्या तुमचा आशावाद चांगला असल्याने सकारात्मक दृष्टिकोन राहील. व्यवसायात भावुक न बनता सावधतेने काम करा. सभोवतालच्या व्यक्तींवर फारसे अवलंबून राहू नका. नवीन सौदे करण्यापूर्वी त्यातील अटी नियम वाचा व व्यक्तींची नीट माहिती करून घ्या. नोकरीत सहकार्‍यांच्या मतलबी स्वभावामुळे वाईट वाटेल. त्यामुळे कामात तत्पर रहा. वेळीच काम उरका. नवीन ओळखी करताना पारख करा. घरात समजुतीचा घोटाळा होत नाही याकडे लक्ष ठेवा. बोलताना तारतम्य बाळगा. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रकृतीकडे वेळीच लक्ष द्या. महिलांनी मनःशांती मिळवावी

संबंधित बातम्या