ग्रहमान १० ते १६ एप्रिल २०२१

अनिता केळकर
सोमवार, 12 एप्रिल 2021

ग्रहमान १० ते १६ एप्रिल २०२१ 

मेष
महत्त्वाचे ग्रह शुभ असल्याने चांगली घटना घडेल. अडचणींवर मात करण्याची जिद्द निर्माण होईल. व्यवसायात नव्या उमेदीने कामाला लागाल. नवीन योजना आखाल. पैशाची चणचण दूर करण्यासाठी प्रयत्न केलात तर यश येईल. नोकरीत कामात गुप्तता राखा. तुमचे विचार मांडताना सभोवतालच्या व्यक्तींची विश्वासार्हता तपासून बघा. घरात तडजोडीने कामे मार्गी लावा. प्रकृतीची काळजी घ्या. विश्रांती घेण्याकडे कल राहील.

वृषभ
कमी श्रमात जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात कामाची वाटचाल योग्य रीतीने करण्यासाठी नवीन व्यक्तींशी संपर्क साधाल. काही अनावश्यक बदल करून खर्च कराल. योग्य ताळेबंद आखून त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत व्यवहारी दृष्टिकोन ठेवून काम करा. कोणतेही महत्त्वाचे निर्णय तूर्तास लांबणीवर टाका. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येईल. 

मिथुन
केलेल्या कष्टाचे निश्चित स्वरूपात फळ देणारा सप्ताह आहे. त्यासाठी मात्र दगदग धावपळ करावी लागेल. व्यवसायात नवीन करारमदारांबाबत बोलणी होतील. मात्र त्यातील अटी नियमांचा बारकाईने अभ्यास करा व निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या. पैशाचे व्यवहारात चोख रहा. नोकरीत मिळालेल्या संधीचा सदुपयोग करा. कामे मनाप्रमाणे होतील. नवीन ओळखी होतील.

कर्क
कामाचे वेळी काम करून इतर वेळी मजा कराल. कर्तव्याला प्राधान्य राहील. व्यवसायात प्रगतीला वेग देण्यासाठी काहीतरी वेगळे करावेसे वाटेल. त्यादृष्टीने पावले उचलाल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत स्वयंसिद्ध राहा. दुसऱ्यांवर विसंबून राहू नका. डोके शांत ठेवून निर्णय घ्या. बोलण्याने इतरांचे गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या. घरात गरजेनुरूप खर्च होतील. महिलांना स्वतःची हौसमौज पुरवता येईल.

सिंह
एखादी सुवार्ता तुम्हाला ताजेतवाने करेल व सकारात्मक पावले उचलण्यास उद्युक्त करेल. व्यवसायात प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी बदल करावासा वाटेल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुप्तपणे स्पर्धकांची खबरबात ठेवावी लागेल. पैशाची तजवीज करून भांडवल उभारणी  कराल. नोकरीत तुम्हाला कामानिमित्ताने सुखसुविधा मिळतील. सहकाऱ्यांना त्याचा हेवा वाटेल. तेव्हा कमी बोलणे उत्तम.

कन्या
ग्रहांची साथ मिळेल. तुमचे विचार कृतीत उतरवण्यासाठी ते मदत करतील. व्यवसायात तुमची महत्त्वाकांक्षा वाढत राहील. जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून उलाढाल वाढवाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. कामानिमित्ताने जादा सुखसुविधा मिळतील. जोडधंदयातून वरकमाई होईल. घरात कार्यक्रमा निमित्ताने आप्तेष्टांचा सहवास लाभेल.

तूळ
एकाच वेळी वेगवेगळया आघाड्यांवर सफलता प्राप्त करता येईल. व्यवसायात मोठी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून वाटचाल कराल. तुमच्या कामामुळे बाजारातील प्रतिमा उंचावेल. प्राप्तीचे प्रमाण मनासारखे होईल मात्र मोठे खर्च करण्याची तयारीही ठेवा. नोकरीत विशेष अधिकार मिळतील. जोडधंद्यातून चांगली कमाई होईल. कामानिमित्ताने प्रवासयोग संभवतो.

वृश्‍चिक
तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान आहे. ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहात होता त्या गोष्टी नजरेच्या टप्प्यात येतील. व्यवसायात नवीन योजना, प्रकल्प डोळ्यासमोर असतील. त्यासाठी पूर्वतयारी कराल. पैशाची चिंता राहील. त्यासाठी बँका, हितचिंतक यांचेकडून कर्ज घ्याल. नोकरीत जादा कामामुळे जादा भत्ते व सुविधा मिळतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. घरात नातेवाईक आप्तेष्ट भेटतील.

धनू
कामाचा लाभ मिळवण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहाल. व्यवसायात बाजारातील चढउतार तुमच्या फायद्याचे ठरतील. नवीन योजना हाती घेऊन प्रगती पथावर राहणे शक्य होईल. पैशाची चिंता नसेल. नोकरीत महत्त्वाच्या पदासाठी तुमची नेमणूक होईल. अपेक्षेपेक्षा चांगले रिझल्ट सहकाऱ्यांकडून मिळतील. घरात तरुणांचे विवाह ठरतील. वृद्धांना लांबच्या प्रवासाचे योग येतील. प्रियजनांच्या जीवनातील आनंदाचे क्षण उपभोगता येतील.

मकर
पैशाच्या व्यवहारात सजग वृत्ती ठेवाल. व्यवसायात नवीन योजना कार्यान्वित करण्यापूर्वी निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्याल. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणे, चर्चा करणे इ. गोष्टींना प्राधान्य राहील. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल, त्यामुळे कामे पुढे ढकलण्याकडे कल राहील. मिळणाऱ्या सुखसुविधांचा गैरवाजवी वापर करावासा वाटेल. घरात एखाद्या व्यक्तीचे हट्ट पुरवावे लागतील.

कुंभ
सध्या ग्रहांची कृपादृष्टी आहे त्यामुळे मान, प्रतिष्ठा, पैसे एकाच वेळी मिळण्याचे भाग्य लाभेल. व्यवसायात पूर्वी चांगले काम करून ठेवल्याचा फायदा होईल. नवीन वर्तुळात राहण्याचा योग येईल. नवीन कल्पना मनात येतील. नोकरीत नवीन विचारांचा प्रभाव राहील. जादा काम करून जादा भत्ते व पैसे मिळतील. नवीन ओळखी होतील. महिलांना अपेक्षित यश मिळेल.

मीन
तुमच्या रसिक व हौशी स्वभावानुसार तुम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घ्याल. व्यवसायात गरजेप्रमाणे पैसे खर्च कराल. पैशाची चिंता नसेल. एखादी मोठी संधी नजरेच्या टप्प्यात येईल. नोकरीत उत्पन्नात भर टाकणारी संधी लाभेल. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांना काळ अनुकूल आहे. घरात आनंदाचे प्रसंग घडतील. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत सुयश मिळेल.

संबंधित बातम्या