ग्रहमान - २४ ते ३० एप्रिल २०२१

अनिता केळकर
मंगळवार, 27 एप्रिल 2021

ग्रहमान - २४ ते ३० एप्रिल २०२१

मेष
या सप्ताहात तुम्हाला माणसांची पारख चांगली कळेल. स्वप्न व सत्य यातील फरकही लक्षात येईल. व्यवसायात मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कामात बदल करावा लागेल. हाती असलेल्या कामांना गती मिळेल. पैशाची तजवीज करून ठेवावी लागेल. नोकरीत बदलीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. बेकार व्यक्तींना नव्या नोकरीची चांगली संधी दृष्टिक्षेपात येईल. घरात नवीन खरेदीचे बेत सफल होतील.

वृषभ
महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत तेव्हा फायदा घ्या. व्यवसायात कामांना प्राधान्य देऊन त्याप्रमाणे वेळेचे नियोजन करा. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. त्यातून नवीन गुंतवणुकीचे विचार मनात येतील. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना, याची काळजी घ्या. कोणावरही अतिविसंबून राहू नका. आपले काम बिनचूक करा. घरात प्रवासाचे बेत ठरतील. शुभकार्येही ठरतील.

मिथुन
केलेल्या कामाचे समाधान मिळेल. सर्वजण कौतुकही करतील. त्यामुळे कष्टाचे चीज होईल. व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसू लागतील. विरोधकांचा विरोध मावळेल व ते तुमचा कल उचलून धरतील. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरी कामाचा झपाटा चांगला राहील. किचकट कामे हातावेगळी कराल. घरात तुमचे विचार इतरांना पटतील.

कर्क
तुमचे सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसायात पूर्वी योजून घेतलेल्या निर्णयाचा लाभ होईल. आर्थिक व इतर बाबतीत झालेली कुचंबणा कमी होईल. नवीन कामे मिळाल्याने तुमची उमेद वाढेल. नोकरीत नवीन आव्हाने पेलावी लागतील. पैशाची स्थिती थोडी नाजूकच राहील. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. घरात तुमचे धोरण लवचिक ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होईल. आनंदाचा सोहळा साजरा कराल.

सिंह
बराच काळ तुमची झालेली गैरसोय कमी होईल. व्यवसायात अडचणींवर मात करून प्रगती कराल. योग्य वेळी योग्य व्यक्तींचे मिळालेले सहकार्य तुमचा ताण कमी करेल. अस्थिरताही कमी झाल्याने  मानसिक समाधान मिळेल. देणी देता आल्याने जमाखर्च सारखाच राहील. नोकरीत रटाळ काम संपविण्याकडे तुमचा कल राहील. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या
कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही हे लक्षात येईल, त्यामुळे जे आहे त्यातून फायदा मिळविण्याकडे कल राहील. व्यवसायात नवीन कामाच्या संधी दृष्टिक्षेपात येतील. मात्र त्या स्वीकारताना स्वतःची आर्थिक व शारीरिक क्षमता ओळखून मगच पुढे जा. पैशाचे व्यवहारात चोख राहा. नोकरीत कोणावरही विसंबून राहू नका. अतिविश्‍वास ठेवू नका.

तूळ
कामात बदल करून विस्तार करण्याचा विचार असेल त्यासाठी आवश्यक वाटल्यास मध्यस्तांचा उपयोग होईल. व्यवसायात आर्थिक आवक फार नसली तरी केलेल्या कामाचे समाधान मिळेल. जुनी येणी वसूल करण्यावर भर राहील. खर्चासाठी तात्पुरता बचतीतील पैशाचा वापर करावा लागेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. त्यामुळे दगदग धावपळ होईल. चिडचिड वाढेल.

वृश्‍चिक
या सप्ताहात मिळालेल्या संधीचे सोने करा. जास्तीत जास्त लाभ घेण्याकडे कल राहील. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य व कामाचा झपाटा उत्तम राहील. तुमच्या प्रयत्नांना अचूक अंदाजाची जोड लाभेल. नोकरीत मनाप्रमाणे काम करण्याचे समाधान मिळेल. आवडत्या छंदात वेळ मजेत घालवता येईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात सुखद प्रसंग साजरे होतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. मनोकामना पूर्ण होईल.

धनू
कामाच्या वेळी काम करून इतर वेळी जीवनाचा पुरेपूर आस्वाद घेण्याकडे कल राहील. व्यवसायात धोरणात्मक निर्णय घ्याल. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न राहील. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत अत्यावश्यक कामांना प्राधान्य द्याल व इतर कामे सोईस्करपणे लांबणीवर टाकाल. बोलल्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. विचारापेक्षा कृतीवर भर द्या. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत सफल होतील.

मकर
बराच काळ रेंगाळलेली कामे तातडीने हाती घेऊन संपवा. नंतर त्याला फाटे फुटतील व तुमची विनाकारण चिडचिड होईल. व्यवसायात जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. स्पर्धकांच्या पुढे जाण्याचा विचार तुमचा असेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत कामानिमित्ताने जादा अधिकार मिळतील.

कुंभ
कधी शक्ती तर कधी युक्तीने कामे हातावेगळी कराल. व्यवसायात कामात आवश्यक व योग्य व्यक्तींकडून सहकार्य मिळाल्याने तुमचा कामाचा हुरूप वाढेल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. प्रवास घडेल. नोकरीत परदेशगमनाची संधी चालून येईल. लाभ घ्या. वरिष्ठ न मागता कामात सवलती देतील. तरुणांनी घरात सतर्क राहावे. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी.

मीन
भरपूर उत्साह देणारे ग्रहमान आहे. स्वतःचे कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसायात तुमच्या मताला मान मिळेल. त्यामुळे प्रगतीचा वेग राखता येईल. विचार व कृती यांची योग्य सांगड घालाल. कामे पूर्ण करता येतील. भांडवलाची तरतूद होईल. नोकरीत कामातून आर्थिक लाभाचा फायदा मिळेल. वरिष्ठ जादा अधिकार देतील त्याचा गैरफायदा घेऊ नका. घरात शुभकार्ये ठरतील. प्रवास घडेल. मित्रमैत्रीणींसमवेत वेळ मजेत जाईल.

संबंधित बातम्या