ग्रहमान  - १३ ते १९ नोव्हेंबर २०२१

अनिता केळकर
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

ग्रहमान  - १३ ते १९ नोव्हेंबर २०२१

मेष 
मनाला आलेली मरगळ व निराशा दूर करून नवीन आशावाद घेऊन प्रगती कराल. मनातील कल्पना व्यवसायात प्रत्यक्षात साकार होतील. रेंगाळलेली कामे गती घेतील. पैशाची चिंता मिटेल. व्यवसायात काही कटू अनुभव येतील तरी दुर्लक्ष करा. नोकरीत पगारवाढ व बढती होईल. सहकारी व वरिष्ठ कामात मदत करतील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात मनासारख्या घटना घडतील. वातावरण चांगले राहील.

वृषभ 
नशीब साथ देईल. व्यवसायात चांगल्या घटनांची नांदी होईल. नवीन कामे मिळतील. कामात हितचिंतकांची मदत होईल. जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची तजवीज होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल. वरिष्ठ कामाची नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवतील, त्यासाठी जादा सवलती व अधिकारही देतील. कामात विस्तार होईल. घरात व्यक्तीगत कामांना वेग येईल.

मिथुन 
सतत बदल व चंचल मन अशी तुमची प्रवृत्ती आहे. त्यात बदल करावा लागेल. व्यवसायात सावधतेने पावले टाका. कामात गुप्तता राखा. पैशाच्या व्यवहारात चोख रहा. नवीन कामे मिळतील. नोकरीत सतर्क रहा. मागण्यांसाठी वरिष्ठांपुढे हट्ट धरू नका. प्रकृतीला झेपेल तेवढेच काम करा. घरातील व्यक्तींच्या स्वास्थाविषयी चिंता वाटेल. तरुणांनी अतिधाडस करू नये. 

कर्क 
ग्रहमान धावपळ वाढवणारे आहे. मात्र गुरूची साथ मिळेल, त्यामुळे व्यवसायात गैरसोय संपून नवीन आशावाद निर्माण होईल. रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. नवीन उपक्रम कार्यान्वित होतील. नोकरीत मात्र धावपळ संपून कामाचे श्रेय देणारे काम मिळेल. नवीन ओळखी होतील. जोडधंदा असणाऱ्यांना विशेष लाभ मिळतील. घरात कामाचा ताण वाटेल. तसेच प्रकृतीकडेही लक्ष द्यावे लागेल. महिलांना मनःशांती मिळवणे गरजेचे भासेल.

सिंह 
संमिश्र ग्रहमान आहे. परिस्थितीचा फायदा कसा उठवायचा हे तुमच्याच हाती आहे. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना वेग द्या. खेळत्या भांडवलाची गरज असेल तर त्यादृष्टीने प्रयत्न करा. ओळखीतून महत्त्वाची कामे  होतील. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होतील. जोडधंद्यातून जादा कमाई करता येईल. घरात वाढता खर्च होईल. त्यासाठी हातातील पैशाचा वापर विचारपूर्वक करा. प्रकृतीची काळजी घ्या.

कन्या 
ग्रहमान पूरक असल्याने प्रगतीचा आलेख उंचावेल. व्यवसायात उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल कराल. ध्येयामुळे अभिलाषा वाढेल. मात्र हे करताना आर्थिक स्थितीचा अंदाज घ्या. खेळत्या भांडवलाची सोय करावी लागेल. नोकरीत कामाचा झपाटा वाखणण्याजोगा राहील. वेळेत बरीच कामे पूर्ण करू शकाल. वरिष्ठांची मर्जी राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.

तूळ 
केलेल्या कामाचा आनंद मिळेल. त्यामुळे नवीन कामांना उत्साह वाटेल. व्यवसायात गरजेप्रमाणे पैसे मिळतील. नवीन योजना साकार होतील. विरोधकांचा विरोध मावळेल. नोकरीत इतरांपेक्षा वेगळेपणा सिद्ध कराल. वरिष्ठांकडून कौतुकास पात्र व्हाल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात छोट्या, मोठ्या खरेदीमुळे समाधान मिळेल. प्रश्‍नांची उकल झाल्याने मनःशांती लाभेल.

वृश्चिक 
सध्या कळते पण वळत नाही अशी तुमची स्थिती आहे, तरी कोणावरही विसंबून राहू नका. व्यवसायात हातातील कामे स्वतः पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळा. कोणालाही आश्वासन देताना त्याची पूर्तता करू की नाही याची शहानिशा करून मगच पुढे जा. पैशाच्या व्यवहारात चोख राहा. नोकरीत तुमचे काम वेळेत व बिनचूक करा. स्वतःचे काम संपवून तुम्ही सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. डोके शांत ठेवावे. 

धनू 
पूरक वातावरण लाभल्याने कामे प्रगतिपथावर राहतील. सर्व आघाड्यांवर अग्रेसर राहण्याची ऊर्मी मनात असेल. व्यवसायात एकाच वेळी बरीच कामे हाती घ्याल. त्याकरिता योग्य व्यक्तींची निवड कराल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत बदली किंवा परदेशगमनाचे सूतोवाच होईल. त्याचा भविष्यात फायदा घेण्याकडे कल राहील. घरात वातावरण आनंदी व उत्साही असेल. तरुणांना नवीन व्यक्तीचे आकर्षण राहील.

मकर 
आशेचा किरण दिसू लागेल. त्यामुळे तुमचा उत्साह व्दिगुणीत होईल. व्यवसायात केलेल्या नियोजनाचा लाभ होईल. रेंगाळलेली कामे गती घेतील. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्या. जमाखर्चाची बाजू तात्पुरती समसमान राहील. नोकरीत वरिष्ठ नवीन प्रकारच्या कामाचे सूतोवाच तुमच्याजवळ करतील, मात्र त्याविषयी संदिग्धता असेल.

कुंभ 
पैशाची फारशी फिकीर नसल्याने खर्चावर बंधन राहणार नाही. ग्रह तुमच्या दिमतीला असतील, त्याचा लाभ घ्या. व्यवसायात नवीन विचार व कार्यपद्धतीचा अवलंब करून उलाढाल वाढविण्याकडे कल राहील. कामानिमित्ताने सभोवतालचे वर्तुळही बदलेल. मनाप्रमाणे काम करता येईल. नोकरीत वरिष्ठ मनाप्रमाणे काम करण्याची मुभा देतील. प्रवासाचे योग येतील.

मीन 
 गुरूची साथ तुम्हाला ताजेतवाने ठेवेल. व्यवसायात यशाची कमान उंचावत राहाण्यासाठी मेहनत करण्याची तुमची तयारी असेल. तुम्ही एखादा धाडसी निर्णय घ्याल. पूर्वी केलेल्या कामाचा आर्थिक व इतर स्वरूपात फायदा मिळण्याची तुमची इच्छा सफल होईल. योग्य व्यक्तींशी संपर्क साधा. नोकरीत चांगली कामगिरी करून वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. जोडधंद्यातून फायदा होईल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीने आनंद मिळेल.

संबंधित बातम्या