ग्रहमान : १८ ते २४ डिसेंबर २०२१

अनिता केळकर
सोमवार, 20 डिसेंबर 2021

ग्रहमान : १८ ते २४ डिसेंबर २०२१

मेष 
ग्रहांची अनुकूलता राहील. व्यवसायात कामाचे प्रमाण चांगले असेल, मात्र कष्ट प्रमाणाबाहेर करावे लागतील. नवीन कामे हाती घेण्यापूर्वी त्याला लागणाऱ्या वेळेचा अंदाज घ्या व त्याप्रमाणे कामाचे नियोजन करा. पैशाची बाजू चांगली असेल. नोकरीत वरिष्ठांना कामापुरती तुमची आठवण येईल. मूड बघून तुम्ही तुमच्या मागण्या मान्य करून घ्या. सवलतींचा लाभ घ्या. नवीन नोकरीत अडथळ्यांची शर्यत पार करावी लागेल.

वृषभ 
सभोवतालच्या व्यक्तींच्या वागण्याने थोडे बुचकळ्यात पडाल. परंतु कामाबाबत चांगली कलाटणी मिळाल्याने तुमचा हुरूप वाढेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कामांना सुरुवात होईपर्यंत गुप्तता पाळा. पैशाचा अपव्यय टाळा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखण्यात यश येईल. वरिष्ठ हवी असलेली सवलत तुम्हाला देतील. महिलांना आवडत्या छंदात वेळ मजेत घालवता येईल.

मिथुन 
आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवता येईल. त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्याल. बाजारातील तुमची प्रतिष्ठा वाढवणारे काम हातून घडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. त्यामुळे नको त्या कामात बराच वेळ घालवाल. मिळालेल्या सुखसुविधा उपभोगण्याचा कल राहील.

कर्क 
अवतीभवती असलेल्या व्यक्तींचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे कामाची आखणी कराल. व्यवसायात नेहमीपेक्षा वेगळे काम करण्याकडे कल राहील. प्रसिद्धी माध्यम व जाहिरातींचा वापर करून पैशाची आवक वाढविण्याचा प्रयत्न कराल. कामानिमित्ताने प्रवास घडेल व नवीन ओळखी होतील. नोकरीत केलेल्या कामात यश मिळेल. सहकारी व वरिष्ठ कामात मदत करतील. अनपेक्षित लाभाची शक्यता आहे. घरात तुमच्या मताला मान मिळेल.

सिंह 
सप्ताहात कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा मानस राहील. कामाचे प्रमाण वाढल्याने तुमची उमेदही वाढेल. जुनी येणी वसूल झाल्याने हातात चार पैसे येतील. केलेल्या कामाचे वरिष्ठ कौतुक करतील. जोडधंद्यातून विशेष कमाई करता येईल. घरात नवीन खरेदीचे बेत ठरतील. प्रियजन, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. विवाहोत्सुक तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

कन्या 
पैशाच्या बाबतीत तुम्ही अत्यंत भावनाशील असता. या सप्ताहात सर्व काही ठीकठाक असूनही तुम्हाला असुरक्षित असल्याची भावना सलत राहील. व्यवसायात कामाचा व्याप व विस्तार वाढेल. कामगारांना खूश ठेवण्यासाठी विशेष सवलती व प्रलोभने द्यावी लागतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरीत कामाचे योग्य नियोजन व त्याला कृतीची जोड लाभ घडवून देईल.

तूळ 
आवक कमी व खर्च जास्त, असा सध्या तुमचा ताळेबंद असेल. त्यामुळे थोडी निराशा व काळजी वाटेल. परंतु कामाची योग्य आखणी केलीत तर त्यातून बाहेर पडू शकाल. व्यवसायात महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने, वेळेत करून घ्या. क्षमतेपेक्षा जास्त काम स्वीकारू नका, म्हणजे त्रास होणार नाही. आर्थिक क्षमता ओळखून निर्णय घ्या.

वृश्‍चिक 
जे होते ते चांगल्यासाठीच होते, ही तुमची धारणा असते. त्यामुळे पुढे प्रगतीला पूरक मानसिकता या सप्ताहात राहील. व्यवसायात बाजारातील घडामोडींनुसार कामाच्या पद्धतीत बदल कराल. कामातील अडथळे दूर झाल्याने कामे मार्गी लागतील. नोकरीत कधी शक्ती तर कधी युक्तीने कामे करून घ्यावी लागतील. अधिकाराचा वापर योग्य वेळी करावा लागेल. घरात तरुणांचे विवाह जमतील. सुवार्ता कळेल.

धनू
अंगी असणारे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. पूर्वीच्या ओळखीचा उपयोग होईल. व्यवसायात योग्य वेळी योग्य व्यक्तींची मदत घेऊन कामे पूर्ण करता येतील. नवीन योजना कार्यान्वित होतील. पैशाची आवक वाढेल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. नोकरीत आवडीचे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. चांगल्या कामामुळे एखादे पद वरिष्ठ तुम्हाला देतील. घरात तुमच्या व्यक्तिगत जीवनातील महत्त्वाकांक्षा सफल होईल.

मकर 
सकारात्मक दृष्टी ठेवून कामांकडे बघाल. जी कामे रेंगाळलेली होती त्यांस गती येईल. व्यवसायात नवीन योजना करून विक्री व भांडवल वाढवण्याचा प्रयत्न राहील. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य राहील. नोकरीत वरिष्ठ दिलेल्या वचनांची पूर्तता करतील. नवी नोकरीची संधी उपलब्ध होईल. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. घरात लांबलेला कार्यक्रम निश्‍चित होईल.

कुंभ 
विनाकारण लांबलेली कामे आता गती घेतील. नवीन कामे नजरेच्या टप्प्यात येतील. अनपेक्षित पैसे हाती येतील. व्यवसायात तुमच्या तत्त्वाला मुरड घालून कामे कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे थोडी धावपळ होईल. नोकरीत वरिष्ठ एखादे पोकळ आश्‍वासन देऊन मागण्यांकडे दुर्लक्ष करतील, तरी रागावू नका. बोलण्यापेक्षा हाती असलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करा.

मीन 
गुरू मदतीला धावून येईल; त्यामुळे अडथळ्यांची शर्यत पार करता येईल. व्यवसायात हितचिंतकांची मदत मिळेल. त्या बळावर अवघड कामात मुसंडी मारू शकाल. विश्‍वासू व्यक्तींवर कामे सोपवून तुम्ही तणावमुक्त व्हाल. फायदा वाढवण्यासाठी एखादी महत्त्वाची योजना हाती घ्याल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून कामे केलीत तर काम सहजसाध्य होईल. कष्ट कमी होतील. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील.

संबंधित बातम्या