ग्रहमान : ८ ते १४ जानेवारी २०२२

अनिता केळकर
सोमवार, 10 जानेवारी 2022

ग्रहमान : ८ ते १४ जानेवारी २०२२

मेष 
हाती घेतलेली कामे पूर्णत्वाला आल्याने हायसे वाटेल. व्यवसायात कामात सतर्क राहा. अडथळ्यांवर मात करून कामे मार्गी लावाल. कामाची फार वाच्यता नको. पैशाच्या व्यवहारात चोख राहा. नोकरीत चांगल्या संधीसाठी तुमची निवड होईल. कामात झालेली हयगय मात्र तुम्हाला सहन होणार नाही तरी सजग रहा. चिकाटी सोडू नका. घरात कार्यपद्धतीत बदलामुळे व्यक्तींची विचारधारा बदलेल. मुलांकडून सुवार्ता कळेल.

वृषभ 
चांगल्या गोष्टींची नांदी होईल तरी वाट बघा. व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीतजास्त फायदा घ्या. निराशा झटकून ठरवलेल्या पद्धतीने कामे पूर्ण कराल. शक्यतो कुणावरही अवलंबून राहू नका. नोकरीत शिस्तबद्ध राहून हातातील कामे पूर्ण कराल. सहकारी व वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना याकडे लक्ष द्या. सहकाऱ्यांच्या गोड शब्दाला बळी पडू नका. तरुणांचे विवाह जमतील.

मिथुन 
स्वयंसिद्ध राहून कामे करण्याचा विचार राहील. व्यवसायात मर्यादा ओळखून कामे पूर्ण कराल. हाती घेतलेली कामे बिनचूक पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळा. पैशाची उभारणी करावी लागेल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे केलीत तर लाभ होईल. महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. योग्य संधीची वाट बघा. घरात मुलांच्या प्रगतीबाबत समाधानी राहाल.

कर्क 
या सप्ताहात सभोवतालच्या व्यक्तींची पारख होईल. कठीण प्रसंगी कोणीही मदतीला नसते याची जाणीव होईल. व्यवसायात कायद्याच्या चौकटीत राहून व्यवहार करा. नियमांचे उल्लंघन होणार नाही याची विशेष दक्षता घ्या. हातातील पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच करावा. नोकरीत कामात चोख राहून सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. मात्र इतरांकडून मदतीची अपेक्षा नको. प्रतिष्ठित व्यक्तींकडून चार हात लांब राहणे हितावह.

सिंह 
तडजोडीने कामे यशस्वी कराल. व्यवसायात ओळखीतून नवीन कामे मिळतील. बाजारातील चढउतारांचा व  स्पर्धकांचा अंदाज घेऊन तुम्ही तुमची धोरणे आखा. हाती घेतलेल्या कामात लक्ष केंद्रित करा. उधारीपेक्षा रोखीच्या व्यवहारांवर भर द्या. नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी जादा अधिकार व सवलतीही देतील. मात्र गैरवापर होणार नाही याची काळजी घ्या. नवीन हितसंबंध जोडले जातील.

कन्या 
प्रयत्न व नशीब यांची सांगड घालून कामे मार्गी लावाल. व्यवसायात तात्पुरती खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. सरकारी नियमांचे पालन करताना अडथळे येतील तरी सबुरीचे धोरण ठेवा. जुनी येणी वसूल करण्यावर लक्ष केंद्रित करा. सर्वांशी चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न राहील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचा अनवधानाने अपमान होणार नाही याची काळजी घ्या.

तूळ 
मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहाल. व्यवसायात कामातील अटी व शर्तींचा विचार करून मगच नवीन कामे हाती घ्या. हातातील कामे वेळेत बिनचूक पूर्ण करण्याकडे कल राहील. नोकरीत योग्य वेळी योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. केलेल्या कामाचा आर्थिक स्वरूपात मोबदलाही मिळेल. बोलण्यावर मात्र विशेष संयम ठेवा. नवीन खरेदीचा मोह होईल.

वृश्चिक 
प्रगतीच्या रथावर स्वार झाला असल्याने यशाची धुंदी राहील. मात्र ती धुंदी डोक्यात जाणार नाही याची दक्षता घ्या. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. भविष्यात फायदा देणाऱ्या कामासाठी धोका पत्करण्याची तुमची तयारी असेल. मात्र चुकीच्या संगतीने कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीत सहकारी व वरिष्ठ मतलबापुरता तुमचा वापर करतील. कामातील जादा सवलती देतील. महिलांनी आवडता छंद जोपासावा.

धनू 
येणाऱ्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा सकारात्मक विचार कराल. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी पैशाची तजवीज करावी लागेल. जुनी जागा विकून खेळते भांडवल उभारावे लागेल. फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण कराल. स्वयंसिद्ध राहून काम केलेत तर लाभ होईल. नोकरीत बढाया न मारता कृतीवर भर द्या. वरिष्ठांना कोणतेही आश्‍वासन देण्यापूर्वी क्षमता ओळखून मगच द्या. विचारांची योग्य सांगड घालून कामे मार्गी लावा.

मकर 
पैशाची ऊब मिळाल्याने हायसे वाटेल. व्यवसायात आत्मविश्‍वास बळावेल. अतिश्रम व अतिविचार मात्र टाळा. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामाचे योग्य नियोजन करा. आवश्यक वाटल्यास तडजोडीचे धोरण स्वीकारा. नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागेल तरी फार वाच्यता नको. कामात चोख राहून कामे पूर्ण करा. कामात विरंगुळा म्हणून छोटीशी सहल काढाल. मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल.

कुंभ 
सहज सोप्या राहणाऱ्या कामात विलंब झाल्याने चिडचिड होईल. व्यवसायात वेळेचे गणित मागेपुढे होईल. अपेक्षित मदत मिळेलच असे नाही. नवीन कामे स्वीकारताना त्यातील तांत्रिक अडचणींचा विचार करा. सरकारी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या. नोकरीत दुर्लक्ष झालेल्या कामांची वरिष्ठांना गरज असेल. तातडीने कामे हाती घेऊन पूर्ण करावी लागतील. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन 
सभोवतालच्या व्यक्तींचे नवीन अनुभव येतील. व्यवसायात सावध वृत्तीने वागा. फायद्यासाठी सलगी करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. भावनेच्या भरात अयोग्य व्यक्तीशी संगत ठेवू नका. नोकरीत सहकाऱ्यांवर कामे सोपवाल. तेव्हा वेळोवेळी लक्ष ठेवणे चांगले राहील. पैशाची चिंता मिटेल. अनपेक्षित लाभ होतील. घरात सर्वांच्या हितासाठी चांगले निर्णय घ्याल. मात्र त्यामुळे भविष्यात तुम्ही अडचणीत येणार नाही  याची दक्षता घ्या.

संबंधित बातम्या