ग्रहमान - ५ ते ११ फेब्रुवारी २०२२

अनिता केळकर
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

ग्रहमान - ५ ते ११ फेब्रुवारी २०२२

मेष 
ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहात होतात, त्या बाबत चांगली घटना घडल्याने तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात नव्या कल्पना मूर्त स्वरूपात आणाल. प्रतिष्ठित व्यक्तींची साथ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारल्याने हुरूप वाढेल. नोकरीतील कंटाळवाणे काम संपेल. नवीन कामात लक्ष घालता येईल. प्रवासयोग संभवतो. अनपेक्षित लाभाची शक्यता. घरात शुभसमाचार कळेल. प्रियजन, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. महिलांना मानसिक शांतता लाभेल .

वृषभ 
मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात आधुनिकीकरणाचे बेत होतील. दगदग धावपळ वाढेल. जमाखर्चाचे गणित मांडून त्याप्रमाणे कामाचे नियोजन करा. नोकरीत वरिष्ठ कामानिमित्ताने सुविधा देतील त्याचा वापर योग्य कारणासाठीच करा. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात जबाबदाऱ्या वाढतील, खर्चही वाढेल. पाहुण्यांची ये-जा राहील.

मिथुन 
ज्या संधीची तुम्ही वाट पाहात होतात, अशी संधी चालून येईल तरी लाभ घ्या. व्यवसायात हातातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा चंग बांधाल. पैशाची बाजू भक्कम राहील. ओळखीतून नवीन कामे मिळतील. चालू नोकरीत विशिष्ट कामानिमित्त जादा अधिकार मिळतील. दीर्घकाळचे एखादे स्वप्न साकार होईल. नव्या नोकरीच्या प्रयत्नात यश लाभेल. घरात मनाप्रमाणे खर्च करता येईल.

कर्क 
तुमच्या आशा पल्लवीत करणारे ग्रहमान आहे, त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. तसेच आत्मविश्वासही बळावेल. व्यवसायात नवीन पद्धतीचे काम करण्याची तुमची तयारी असेल. त्यासाठी आवश्यक ते भांडवलही जमवू शकाल. सरकारी नियमांचे पालन करून कामातील अडथळे दूर करू शकाल. नोकरीत कामात नवीन आव्हान स्वीकारावेसे वाटेल. प्रतिष्ठा मिळवून देणारे काम हातून घडेल. तुमच्या कामाचे महत्त्व इतरांना कळून चुकेल. सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतील.

सिंह 
‘थांबला तो संपला’ ह्या म्हणीची आठवण होईल व तुम्ही नव्या जोमाने कामाला लागाल. पण सध्या कोणत्याही गोष्टीत घाई करणे चुकीचे आहे, तरी सबुरीने वागा. व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी  लावण्यासाठी जादा मेहनत घ्यावी लागेल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी मुहूर्त लाभेल. नवीन ओळखी होतील. कामाचा आनंद मिळेल. घरात वातावरण आनंदी राहील. वादविवाद मिटतील.

कन्या 
नशिबाची साथ राहील. व्यवसायातील प्रयत्नात सातत्य ठेवणे गरजेचे होईल. कामात येणाऱ्या अडचणींवर निराश न होता जिद्दीने सामोरे जावे लागेल. यशाचे गमक ओळखून त्याप्रमाणे कामाचे नियोजन करा. नोकरीत कामाच्या प्रमाणात यश मिळेल. वरिष्ठ तुमच्यावर नवीन कामाची धुरा सोपवतील. झालेल्या कामाचे पैसे मिळवण्यास विलंब होईल. घरात ठरलेले कार्यक्रम पार पडतील.

तूळ 
कामातील प्रगती तुमचा उत्साह वाढवेल. व्यवसायात खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश येईल. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे मिळतील. मिळालेल्या पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच करा. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत कामात दिलासा मिळेल. सहकारी व वरिष्ठ मदत करतील. घरात ताण कमी झाल्याने सहजीवनाचा आनंद घ्याल. विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. महिलांना आवडता छंद जोपासता येईल.

वृश्चिक 
‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी तुमची अवस्था झाली असेल. व्यवसायात उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल कराल. अवघड कामे स्वतः हाती घेऊन पूर्ण कराल. सभोवतालच्या लोकांना बरोबर घेऊन कामे कराल. नोकरीत वरिष्ठांच्या वाढत्या अपेक्षांना तोंड देताना फार कष्ट पडतील. पैशाची तजवीज करून ठेवावी लागेल. घरातील व्यक्तींची कामाचे वेळी मदत होईल, ही अपेक्षा नको. प्रकृतीची वेळीच काळजी घ्या.

धनू 
कामे मार्गी लागल्याने कामाचा हुरूप वाढेल. व्यवसायात अशक्य वाटणाऱ्या कामातही चांगली प्रगती होईल. कष्ट व प्रयत्न यांची योग्य सांगड घालून नवीन कामे गती घेतील. पैशाची चिंता मिटेल. नवीन करारमदारही होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात प्रोत्साहन देतील. जादा काम करून वरकमाई करता येईल. भविष्यात उपयोगी ठरणारी ध्येय धोरणे आखाल. बेकारांना नोकरीची नवी संधी येईल. घरात कुटुंबासमवेत प्रवास योग संभवतो.

मकर 
मनाप्रमाणे वागता येईल, त्यामुळे थोडेसे स्वास्थ्य अनुभवाल. व्यवसायात कामाच्या वेळी काम इतर वेळी आराम करण्यावर भर राहील. ताणतणाव कमी झाल्याने हायसे वाटेल. कामे आटोक्यात येतील. कामात विस्तार करण्याचे विचार मनात घोळतील. परंतु आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन मगच निर्णय घ्या. नोकरीत सहकाऱ्यांवर फारसे विसंबून राहू नका. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील.

कुंभ 
तुम्ही कृतिशील बनाल, त्यामुळे कामातील प्रगतीचा आलेख चढता राहील. व्यवसायात नवीन योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न राहील. आव्हाने स्वीकारून कष्टप्रद कामे पूर्ण कराल. नोकरीत कामानिमित्ताने प्रवासयोग संभवतो. कमी श्रमात जास्त यश मिळवण्यासाठी सहकारी व वरिष्ठांची मदत लाभेल. कामासाठी नवीन संधी चालून येतील. घरात सर्व व्यक्तींचा तुम्हाला सक्रिय पाठिंबा राहील.
 
मीन 
मनोबल उंचावणारे ग्रहमान आहे. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तींची साथ मिळेल. पूर्वी ज्यांनी विरोध केला होता त्यांच्याकडून सहकार्य मिळेल. खेळत्या भांडवलाचीही सोय होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्‍वास बळावेल. नोकरीत मतलब साध्य करून घेण्यासाठी कामे कराल. आवडीचे काम ताबडतोब कराल. मात्र इतरांनी केलेली ढवळाढवळ तुम्हाला सहन होणार नाही. घरात नवीन खरेदीचे योग येतील.  महिलांना आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल.

संबंधित बातम्या