ग्रहमान : २३ ते २९ एप्रिल २०२२

अनिता केळकर
सोमवार, 25 एप्रिल 2022

ग्रहमान : २३ ते २९ एप्रिल २०२२

मेष
सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. व्यवसायात कार्यक्षमता वाढेल. कामाचा उरक दांडगा राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठांची मर्जी राहील. जादा सुविधा व सवलती मिळतील. नोकरदार महिलांना सहकाऱ्यांची मदत कामात होईल. महिलांना गृहसौख्याचा अनुभव घेता येईल. वेळेचा सदुपयोग होईल. मुलांकडून सुवार्ता कळेल. प्रकृतीमान सुधारेल.

वृषभ
मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहील. आत्मविश्‍वासाने नव्या कामांना लागाल. व्यवसायात कल्पकता दाखवून कामे मार्गी लावाल. चांगल्या घटना मन प्रसन्न करतील. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. नोकरीत इतरांचे छान सहकार्य मिळेल. सर्वजण केलेल्या कामाचे कौतुक करतील. बढती, पगारवाढीची शक्यता. महिलांना मनाप्रमाणे वागता येईल. प्रियजनांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. तरुणांचे विवाह ठरतील.

मिथुन
या सप्ताहात, ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ हया म्हणीचे प्रत्यंतर येईल. व्यवसायात स्वप्ने साकार होण्याच्या दिशेने नवीन पाऊल टाकाल. अधिक गुंतवणूक करणे भाग पडेल. विरोधकांचा विरोध मावळेल. कामे गती घेतील. नोकरीत तुमची व तुमच्या कामाची किंमत इतरांना कळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. कामानिमित्ताने प्रवास होईल. नवीन ओळखी होतील. महिलांना कामाचा हुरुप येईल. प्रकृतीमान चांगले राहील.

कर्क
‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी तुमची स्थिती होईल. व्यवसायात नजरेच्या टप्प्यात कामे असतील ती वेळेत  पूर्ण करणे हेच उद्दिष्ट  राहील. कर्तव्यपूर्तीकडे विशेष लक्ष द्याल. पैशाची आवक सुधारेल. नोकरीत कर्तृत्व दाखवण्याची सुसंधी मिळेल. बिनचूक राहून कामे वेळेत पूर्ण करा. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळेल. महिलांनी कौटुंबिक प्रश्नांकडे  लक्ष देणे गरजेचे आहे. वादाचे प्रसंग आले तर तडजोडीचे धोरण ठेवावे. 

सिंह
या सप्ताहात काही संस्मरणीय घटना घडतील. मानसन्मान, अनपेक्षित लाभाची शक्यता. व्यवसायात आत्मविश्‍वास वाढेल. महत्त्वाचे करारमदार होतील. कामात मोठ्यांच्या सल्ल्याचा उपयोग होईल. नोकरीत भेटीगाठींमुळे कामे होतील. मिळालेल्या संधीचा फायदा उठवाल. पैशाची चिंता मिटेल. नोकरदार महिलांना कामाचे समाधान मिळेल. महिलांचा आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. पैसे मनाप्रमाणे खर्च करता येईल.

कन्या
 व्यवहारी धोरण ठेवून कामांना प्राधान्य द्याल. फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन उलाढाल वाढवाल. परिस्थितीवर मात करून प्रश्‍न मार्गी लावाल. नोकरीत विरोधकांवर मात कराल. कामाचे व आर्थिक नियोजन अचूक होईल. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. कामानिमित्ताने प्रवास होईल. महिलांना घरातील इतर व्यक्तींच्या वागण्याचा विचित्र अनुभव येईल. कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. प्रकृतीमान ठीक राहील. काळजी घ्या.

तूळ
मनःशांती टिकवणे हे तुमच्या हातात आहे तरी प्राणायाम व ध्यानधारणा करून शांत राहण्याचा प्रयत्न करावा. व्यवसायात नवीन आव्हाने स्वीकारावी लागतील. हातून चांगली कामे होतील. नोकरीत संयमाने वागून सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. मते व विचार पटले नाहीत तरी शांत राहावे. पैशाच्या मोहमयी पाशापासून  चार हात लांब राहणे उचित ठरेल. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. नवीन उद्योग लावून घ्यावा. सामूहिक कामात प्रतिष्ठा वाढेल.

वृश्‍चिक
या सप्ताहात तुम्हाला माणसांची पारख होईल. व्यवसायात विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कर्तव्यपूर्तीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. पैशाची उभारणी करावी लागेल. नोकरीत कामात वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत मिळेल, ही अपेक्षा फोल ठरेल. अतिआत्मविश्‍वास टाळावा. पैशाचे  व्यवहार करताना मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नये. महिलांनी झेपेल तेवढेच काम करावे. दगदग धावपळ कमी करावी.

धनु
ग्रहमानाची साथ मिळेल. व्यवसायात हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. रेंगाळलेली कामे गती घेतील. प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरीत वेळेचा सदुपयोग कराल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. जुनी येणी वसूल झाल्याने आर्थिक प्रश्‍न संपेल. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांचे आरोग्य उत्तम राहील. सुवार्ता कळेल.

मकर
व्यवसायात अशक्य वाटणाऱ्या कामात यश मिळवून दाखवाल. तुमचा आत्मविश्‍वास, जिद्द वाखाणण्याजोगी असेल. हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामे हाती घ्याल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामासाठी तुमची  निवड करतील. त्या निमित्ताने नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी होतील. घरात महिलांनी अनावश्यक खर्च टाळावेत. विनाकारण चिंता व काळजी करू नये.

कुंभ
अनपेक्षित  फायदा देणार्‍या घटना या सप्ताहात घडतील. व्यवसायात वसुलीचे प्रमाण वाढेल. पैशाची चिंता मिटेल. मनातील  सुप्त बेत साकार होतील. नोकरीत पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय आता तुम्हाला मिळेल. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांना मनःस्वास्थ उत्तम राखता येईल. घरगुती प्रश्‍न मार्गी लागतील. सुवार्ता कळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. सामूहिक कामात मान मिळेल.

मीन
तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे अनेक तऱ्हेने लाभ होईल. व्यवसायात प्रगती चांगली राहील. नवीन कामे मिळतील. पत टिकून राहील. पैशाची आवक सुधारेल. नोकरीत परदेशगमन  व पत्रव्यवहाराच्या कामांना गती येईल. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. त्यामुळे वरिष्ठ अधिकार व सवलती  देतील, त्याचा उपयोग महत्त्वाचे निर्णय घेताना होईल. विद्यार्थ्यांना उत्तम ग्रहमान.

संबंधित बातम्या