ग्रहमान ः ३० जुलै ते ५ ऑगस्‍ट २०२२

अनिता केळकर
सोमवार, 1 ऑगस्ट 2022

ग्रहमान ः ३० जुलै ते ५ ऑगस्‍ट २०२२

मेष 
पैशाचे सोंग आणता येत नाही, हे लक्षात ठेवून खर्च करा. मनावर संयम ठेवा. पैशाची चणचण जाणवेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन लाभदायी ठरेल. केलेल्या कष्टाच्या मानाने यश मिळेल. नोकरीत स्वतःचे काम स्वतः करा. अतिविश्‍वास टाळा. उधार उसनवार शक्यतो टाळा. घरातील व्यक्तींचा नवीन अनुभव येईल. कामाचे वेळी सर्वजण हात वर करतील.

वृषभ 
अंधविश्‍वास ठेवून कोणतीही कृती करू नका. व्यावसायिक कामांतील अडचणी कमी होतील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. नोकरीत वरिष्ठ जादा कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी तुमची थोडी खुशामतही करतील. घरात नको त्या कामात बराच वेळ जाईल.

मिथुन 
मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा ठरवलात तरी जीवनाचा आनंद मिळेल. कामात कार्यतत्पर राहा. व्यवसायात हातातील कामे वेळेत पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळा. नवीन व्यक्तींवर जादा विश्‍वास ठेवू नका. प्रयोगापेक्षा कृतीवर भर द्या. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत मनाला जे पटेल तसेच वागा. कामात हेळसांड करू नका.

कर्क 
कार्यमग्न राहून प्रगती करण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात जुनी येणी वसूल होतील. पैशाची चिंता मिटेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात असतील. कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतीलच हे गृहीत धरू नका. चिडचिड न करता कामाची आखणी योग्य प्रकारे करा. तुमच्या कामात कसूर होऊ देऊ नका. घरात जादाची कामे करून दमणूक होईल.

सिंह 
जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला, ही म्हण आठवेल; तरी कामात हलगर्जीपणा न करता स्वतःची कामे स्वतः करा. व्यवसायात पैशाचे ठोकताळे चुकल्याने कामांना विलंब होईल. काही बेत पुढे ढकलावे लागतील. धंद्यात योग्य वेळी योग्य कृती करून प्रगती साधा. नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागेल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. वरिष्ठांच्या हेकेखोर स्वभावामुळे त्रास होईल.

कन्या 
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, ह्या म्हणीची प्रचिती येईल. प्रयत्न केल्याशिवाय व्यवसायात यश नाही, हे लक्षात येईल. कामातील प्रगती समाधानकारक राहील. नोकरीत जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. कामानिमित्ताने परदेशगमन व लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात नवीन खरेदीचे मनसुबे आखाल.

तूळ 
सभोवतालच्या व्यक्तींच्या वागण्याने आश्‍चर्यचकित व्हाल व कोणाशी कसे वागायचे, बोलायचे याबाबत गोंधळून जाल. व्यवसायात बुद्धीला जे पटेल तेच निर्णय घ्या. ओळखीचा उपयोग होऊन कामे मिळतील. पैशाची स्थितीही समाधानकारक राहील. नोकरीत सहकारी कामात मदत करतील ही अपेक्षा ठेवू नका. कामात चोख राहा. व्यवहारदक्ष निर्णय पुढे उपयोगी पडतील.

वृश्‍चिक 
स्वकर्तृत्वावर कामाचा उरक पाडाल. व्यवसायात उलाढाल मनाप्रमाणे राहील. कमी श्रमात जास्त पैसे मिळाल्याने आनंदी व्हाल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरी महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. सहकाऱ्यांकडून खुबीने इतर कामे करून घ्याल. जोडधंद्यातून विशेष कमाई होईल. घरात महिलांना कामात कोणतीही मदत मिळणार नाही तरी अपेक्षा ठेवू नये.

धनू 
माणसांची पारख छोा छोा गोष्टींतून होईल व भ्रमनिरास होईल. व्यवसायात वेळप्रसंगी जो उपयोगी पडेल तो देवासमान असेल. वसुली झाल्याने आर्थिक घडी सुधारेल. मनाप्रमाणे कामे पार पडतील. नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. कार्यपद्धतीत बदल करून बाजी माराल व कौतुकास पात्र व्हाल.

मकर 
व्यवसायात महिनाभरात बरीच प्रगती साधू शकाल. ग्रहांची साथ आहे. कामात सामंजस्य दाखवून कामांना गती द्याल. पैशाची चिंता नसेल. सरकारी कामात यश येईल. नोकरीत तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांकडून अधिकारात वाढ होईल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. घरात महिलांना स्वातंत्र्य लाभल्याने समाधान मिळेल. विद्यार्थ्यांनी मात्र अभ्यासात शॅार्टकट घेऊ नये. 

कुंभ
तुमच्या मनातील इच्छा प्रत्यक्षात साकार करण्याची संधी येईल. व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून काही ठोस पावले उचलाल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन योजना आखाल. खेळत्या भांडवलाची तरतूद केलेली लाभदायी ठरेल. नोकरीत हितशत्रूंपासून सावध राहा. कामातील बेत गुप्त ठेवा. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. 

मीन 
थोडेसे संभ्रमात टाकणारे ग्रहमान आहे, तरी मनाला योग्य वाटेल तसेच वागा व निर्णय घ्या. व्यवसायात योग्य मार्ग मिळवण्यासाठी थोडे सबुरीचे धोरण ठेवा. नवीन कामांमुळे जुने हितसंबंध संपण्याची शक्यता आहे तरी शांत राहा. पैशांची आवक चांगली असेल. नोकरीत हातातील कामात बिनचूक राहा. गडबड गोंधळ टाळा. चिडचिड न करता झेपेल तेवढेच काम करा.

संबंधित बातम्या