माझी दुचाकी माझे जीवन

अंजली तागडे 
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

ऑटोमोबाईल विशेष
सध्याच्या काळात सुपर वुमन आणि सुपर मॉम होण्याच्या नादात एकाच वेळी अनेक आव्हानांना सामोरे जायचे असते. महिला काय किंवा पुरुष काय आपण कमी वेळात अनेक गोष्टी करायला (multitasking) लागलो आहेत. काळाच्या ओघात हे खूप सहज आपल्या अंगवळणी पडले आहे. या सगळ्यांसाठी आपल्याला मोलाची साथ देते ते आपले वाहन. वाहन आपल्यासह आपल्या भावना, गरजा, मानसिकता दर वेळेला वाहून नेणारे चालते बोलते यंत्रच आहे.

खरेच आपण खूप अवलंबून असतो ना आपल्या वाहनावर. दररोज घरातून बाहेर पडल्यावर आपले वाहन अर्थात दुचाकी बरोबरच संसार असतो. सावलीपेक्षासुद्धा जवळची साथ देणाऱ्या माझ्या दुचाकीने माझ्याबरोबर अनेक ऊन, पावसाळे पाहिले असून सुखदुःखातील साक्षीदार आहे. दरवर्षी दत्तजयंतीला तिचा वाढदिवस असतो. तो साजरा करण्यासाठी मनातून मात्र रोजच मी तिला धन्यवाद देत असतो.

सकाळी निघताना आपण रोज अंघोळ करतो, पण दुचाकीला साधे कापड लावायलासुद्धा आपल्याला घाई झालेली असते. घोड्यासारखी आपली गाडी कधीच खाली बसत नाही. तिचेपण पाय दुखत असतील, ती पण सतत चालून दमात असेल, थकत असेल. एक दिवस हवा कमी आहे, सुरू व्हायला त्रास दिला तरी आपण खूप वैतागतो. एकदा तर डेक्कनवर अचानक गाडीतून आवाज आला आणि पुढे शंभर फूट गेल्यावर गाडी बंद पडली. जागेवरून हटायचे नावच घेईना. जणू एखाद्या लग्नात साडीसाठी अडून बसलेली विहीणबाईच. खूप प्रयत्न केला जागची हलायचे नावच घेईना. देवाचा धावा केला आणि मुलगी आणि मी तिला कशीतरी फरपटत भिडे पुलापर्यंत घेऊन आलो. पुढे पतीला फोन केला. अजून दोन जणांनी मदत केली आणि गाडी नारायण पेठेत फिटरकडे घेऊन गेलो. गाडी दोन दिवस त्यांच्याकडेच होती. पण जणू माझ्या भावना आपल्या घरातील कोणी हॉस्पिटलमध्ये आहे अशाच होत्या. दरम्यान दोन दिवस दिवसभरात २/३ चकरा तिकडे मारल्या पण ते जातानासुद्धा मला एकतर पायी किंवा नवऱ्यासोबत जावे लागत होते. कधीच कोणावर अवलंबून राहायची सवयच नाही आणि अचानक रोजची साथ माझ्या सोबत नव्हती. मनात अनेक विचारांचे काहूर माजले होते. आपण नाही का आजारी पडत, आपण नाही का सुटी घेत, कधीकधी आपण घरीच राहतो. पण गाडीला वाटले तर सुटी घेणे हे तिच्या हातात नाही, नाही का? दोन दिवसांनी गाडी ठीक झाल्यावर अक्षरशः तिला मिठीच मारली. गाडी दोन-तीन महिन्यांनी एकदा सर्व्हिसिंगला देतानापण मला खूप सारी ॲडजेस्टमेंट करून ती द्यावी लागते. एकतर तिच्या डिक्कीत माझा संसार असतो. दोन पिशव्या, रेनकोट, गाडी पुसायला दोन कापडे, आता भरीत भर म्हणजे माझे हेल्मेट, ऑफिसची महत्त्वाचे काही कागद, ऑफिस कामासाठी लागणारे प्रमोशन साहित्य, घरच्या आणि कोणाला काही द्यायचे आहे किंवा कोणाकडून काही घ्यायचे आहे ते सर्व गाडीत असते. घराबाहेर पाऊल टाकले, की जशी चप्पल माझे संरक्षण करते तसेच संपूर्ण शरीर आणि मनाचे व्यवस्थापन माझ्या दुचाकीने होते. ऑफिसच्या कामानिमित्त एकदा प्रचंड ओझे घेऊन मला दोन वेळा निगडी येथे भेळ चौकात जावे लागले. दिवसभर मिळून माझे १२३ किलोमीटर फिरणे झाले. मी मात्र रात्री थकून गेले होते. पण गाडी मात्र फ्रेश दिसत होती. यंत्र असले तरी तिची साथ मला नेहमीच प्रेरणा देते हे नक्की. 

गाडी न चालवणे, गाडी चालविताच न येणे किंवा घरात असून चालविण्याचा आळस करणे म्हणजे सध्याच्या काळातील आधुनिक अपंगत्व आले असेच मला वाटते. तब्येतीच्या कारणाने दोन दिवस गाडी चालविली नाही किंवा दौऱ्यावर असले तरी कधी गाडीवर फेरफटका मारून येते असे मला होते. दररोज सायंकाळी माझ्या मुलीला दुचाकीवर लांबवर चक्कर मारण्याचा अलिखित नियम आहे. त्याला फारसा अपवाद नसतो. त्यामुळे जास्तीत जास्त गाडीवर राहण्याची संधी मला मिळते.

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हा सुविचार आपण अनेक वेळा वाचतो. माझी गाडीच माझ्या ब्रेकची काळजी घेते हे नक्की. अनेक वेळा माझा मूड नाही, आज काहीतरी गडबडले आहे, मी आज एकदम ‘हर फिक्र को धुवे में’ असा मूड आहे हे मूड स्विंग गाडी नक्की ओळखते आणि मला तसतशी साथ देते हा माझा अनुभव आहे. माझ्या नेणिवेच्या मुळाशी तिचे शाश्वत स्थान आहे हेच खरे.

माझ्या सासऱ्यांचे गाडीवर विशेष प्रेम आहे. त्यांना साधा ब्रेक सैल झालाय. हवा जरा कमी आहे. गाडी जड जाते आहे. एका बाजूला ओढली जाते आहे अशा गोष्टी खूप लवकर समजतात. मी त्यांना गमतीने गाडीचे वैद्यच म्हणते. मुळात मला गाडी कोणी शिकवली नाही. निरीक्षणे करून मी ती शिकले. आयुष्यात प्रथमच स्वतः पैसे घालून गाडी खरेदी केली आणि तिला जिवापाड जपणे हेच मी माझे कर्तव्य समजते. पुष्कळ वेळा गाडी सर्व्हिसिंगला देताना तेथील माणूस ‘पॉलिश करायची का?’ असे आवर्जून विचारतो. मी नको म्हणत असताना माझे पती मात्र पॉलिश करायला लावतात. ‘तुम्ही नाही का दिवाळीच्या आधी पार्लरला जाता तसे तिलाही जरा चकचकीत करूया,’ असे त्यांचे म्हणणे असते.

एकदा आमच्या जवळच्या नातेवाइकाची दुचाकी रंगपंचमीच्या दिवशी हरविली. खूप कष्टाने घेतलेली गाडी आणि एका वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला गेल्यावर शेकडो गाड्यांमधून नेमकी गेली. सुरूवातीला चुकून कोणी नेली का, कोणाची चावी सहज लागली का, असे विचार करीत तक्रार दिली नाही. सायंकाळी तक्रार दिली आणि घरी गेले तर घरात अक्षरशः घरातील कोणी देवाघरी गेले आहे असे वातावरण होते. धाकट्या मुलाला तर खूप ताप भरला होता; कारण गाडी म्हणजे त्यांच्या घरातील एक अविभाज्य भाग होता. तीन आठवड्याने दुचाकी सापडली आणि ती घरी आणली तर या मुलाने चक्क लहान मुलासारख्या तिच्या पप्या घेतल्या. कुटुंबाशी नाते जोडलेली ही जुनी दुचाकी त्यांनी आजही जपून ठेवली आहे. त्यानंतर चार गाड्या घेतल्या तरी तिच्यावरील त्यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही. दरवर्षी लक्ष्मीपूजनाला तिचीसुद्धा पूजा होते घरात हे नवलच.

माझी एक मैत्रीण आसावरी, तिला गाडी चालविण्याचे खूप वेड आहे. दर रविवारी सकाळी लवकर उठून ‘एक उनाड दिवस’ सारखे किमान तासभर गाडी चालवून येते. यातून खूप ऊर्जा मिळते, असे तिला वाटते. त्या आनंदात मी आठवडाभराचे बूस्ट मिळवते असे तिचे म्हणणे असते. गाडीचे वेड माणसाला खरेच नुसते लागत नाही तर ते नसानसांत भिनते. याचाच प्रत्यय अशा अनेक गाडीवेड्यांना अनुभवताना येतो. अशाच एका आजींचे दुचाकीवरील प्रेम अजब करणारे आहे. आजींचे वय किमान ६८ आहे. केस पांढरे झालेत, सोबतीला बीपी, शुगर, कोलेस्ट्रोल, थायरॉइडसारखे सर्व श्रीमंत आजार पाठीशी आहेत, पण बाई अजिबात न डगमगता स्वतः रोज किमान २० किलोमीटर गाडी चालवते. विविध धार्मिक स्तोत्राचे वर्ग विनामूल्य घेतात. शिवाय त्यांच्या वयाच्या महिलांना गाडी चालविण्यासाठी तयार करतात. ‘या जन्मात शिकलो नाही तर कधी शिकायचे. आता काय हे सगळे आजार घेऊनच वर जायचे, मग माझी सहज शक्य आवड का नको जोपासू?’ हा त्यांचा वास्तव सवाल.

गरज म्हणून गाडी चालवावी लागतेच हे जरी त्रिकालाबाधित सत्य असले तरी समाजातील अनेक घटक आवड, छंद म्हणून सुद्धा ड्रायव्हिंगची मजा लुटतात. आधुनिक काळात आपल्या आवडीनिवडी बदलत चालल्या असल्या तरी त्याच्या मुळाशी अशा गोष्टीचा मनस्वी आनंद घेणे हाच निखळ उद्देश! खरय ना!

संबंधित बातम्या