नवीन आत्मविश्‍वास मिळाला...!

आशिष तागडे
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

ऑटोमोबाईल विशेष
‘मोठी बाइक चालविणे हे केवळ निमित्त नाही. मनात आणले तर आपण आयुष्यात काहीही करू शकतो, याचा वस्तुपाठ आहे. ‘हम भी कुछ कम नहीं...’ हे आम्हाला कोणाला दाखवायचे नाही. परंतु महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे पटवून द्यायचे होते. या ग्रुपमुळे आमच्या आयुष्यात वेगळा आत्मविश्‍वास निर्माण झाला....’ बाईकर्णी ग्रुपच्या रेशा जोशी सांगत होत्या.

पुण्यात उर्वशी पाटोळे यांच्या पुढाकाराने १५ जानेवारी २०११ मध्ये ‘द बाईकर्णी’ ग्रुपची स्थापना झाली. त्याला निमित्तही अचानक घडले गेले. पाटोळे यांच्यासह काही महिलांनी पुण्यातून बाइकवर थेट लडाख गाठले. याची गिनिज बुकमध्येही नोंद झाली. या घटनेपासून प्रेरणा घेत खास ‘बाईकर्णी’ ग्रुपचीच स्थापना झाली. सुरुवातीला पाच-दहा सदस्य असलेल्या या ग्रुपची आता सदस्य संख्या पुण्यात ५०-७५ च्या घरात गेली असून देशात दिल्ली, बंगळूर, मुंबई, इंदूर, मंगळूर, जयपूर अशा अनेक ठिकाणी ग्रुपची स्थापना झाली आणि त्याची सदस्य संख्या हजाराच्या घरात आहे. ग्रुपमधील बहुतांश सदस्यांकडे १५० सीसीपेक्षा मोठी बाइक आहे. केवळ बाइक घ्यायची आणि वीकएण्डला कोणत्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी या ग्रुपची स्थापना झालेली नाही. त्यामागे सामाजिक उद्दिष्टही आहे. दरवर्षी मोठी रॅली करत असताना दुसरीकडे वेगवेगळ्या संस्थांना आर्थिक, वस्तुरूपाने मदत करण्यासाठीही हा ग्रुप अग्रेसर आहे. गेल्या वर्षी कोरेगाव येथील अंध विद्यार्थिगृहाला काही वस्तू भेट म्हणून दिल्या. आता पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापूर येथे पुढील आठवड्यात जाऊन हा ग्रुप श्रमदानही करणार आहे.

थरारक अनुभव...!
‘मला बाइक चांगली चालविता येत होती, या ग्रुपची माहिती झाल्यावर त्याला जॉइन झाले,’ ग्रुपच्या पुणे चॅप्टरच्या ग्रुप ॲडमिन रेशा जोशी सांगत होत्या. ‘आम्ही साधारण महिनाभरात एखाद दुसरी राइड करतोच, असे स्पष्ट करत जोशी म्हणाल्या, ‘डिसेंबर २०१६ मध्ये आम्ही ‘रण ऑफ कच्छ’ ही मोहीम आखली. एकूण बारा सदस्या नियोजित दिवशी पहाटे साडेतीन वाजता पुण्याहून निघालो. मुंबईपर्यंत काही अडचण आली नाही. मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागल्यावर मात्र काही जणींच्या बाइकला अडचणी यायला लागल्या. एकीच्या बाइकची बॅटरी डिसचार्ज झाली. आणखी दोन बाइकला प्रॉब्लेम आला. वाहनांची दुरुस्ती करत मार्गक्रमण करत आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता अहमदाबादला पोचलो. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या नियोजनावर परिणाम झाला. केवळ चार तासांची झोप घेत आम्ही कच्छकडे प्रयाण केले. तेथून नियोजित दौरा करत आम्ही भूजकडे प्रयाण केले. परंतु अडचणी येथेही आमची पाठ सोडत नव्हत्या. दरम्यानच्या रस्त्यावर अनेक किलोमीटरचे जंगल होते. दुतर्फा नुसतीच झाडी होती. रस्त्यावर कोणीही दिसत नव्हते. सूर्य मावळायच्या आत भूज गाठणे हे आमचे ध्येय होते. भूजपासून २५ किलोमीटर अलीकडे रस्त्यावर ट्रेलर पलटी झाला होता. त्यामुळे रस्ता पूर्ण बंद होता. सायंकाळ व्हायला लागली होती. मी व काही सहकाऱ्यांनी जंगलात जात रस्ता आहे, का याची चाचपणी केली. थोड्या अंतरावर रस्ता दिसला; परंतु मधे खूप मोठा खड्डा होता. त्यातून बाइक काढणे हे मोठे कसरतीचे काम होते. काही जणांनी खड्ड्यातून व्यवस्थित बाइक बाहेर काढली; परंतु काही जणींच्या बाइक अक्षरक्ष: ओढून काढाव्या लागल्या. कसेबसे आम्ही रात्री दहा वाजता भूज गाठले.’

समस्यांची मालिका कायम..!
आमच्या समस्यांची मालिका सुरूच राहिल्याचे सांगत जोशी म्हणाल्या, ‘भूज पाहून झाल्यावर अहमदाबादकडे जात असताना एका महिलेच्या बाइकची चेन तुटली. वेग कमी होता म्हणून मोठा अपघात वाचला. ती चेन दुरुस्त करून पुढे जात नाही तर एका बाइकचा गिअर शाफ्ट तुटला. त्या ठिकाणी मेकॅनिक येण्याचा प्रश्‍नच नव्हता. अर्थात, आमच्याकडे स्पेअर पार्ट असल्याने ‘यू ट्यूब’वर व्हिडिओ पाहून तो मी बदलला. दरम्यान, आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली. आमच्यातील एकीच्या बाइकमधील पेट्रोल वारंवार संपत होते. आम्ही मग इतर बाइकमधील थोडे-थोडे पेट्रोल काढून ती पेट्रोल पंपावर आणली. दरम्यान, आमच्यातील एक महिला पुढे गेली होती. वेळ रात्रीची होती. ती एका पेट्रोल पंपावर थांबली होती. तो नेमका आमच्या लक्षात येत नव्हता. महिला आणि तिच्या हातात बाइक, त्यामुळे जाणारा येणारा हटकून पाहत असे. यामुळे ती घाबरली. तिने तत्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी मग आमचे लोकेशन घेऊन तिला आमच्यापर्यंत आणून सोडले, तेव्हा कोठे आमच्या ग्रुपच्या जिवात जीव आला.’

स्वत: करतो बाइकची सर्व्हिसिंग
महिलांना शक्‍यतो वाहनांबद्दल फारशी माहिती नसते, असा समाजात गैरसमज आहे. तो आम्ही दूर केला... जोशी सांगत होत्या. त्या म्हणाल्या, ‘आम्ही ठराविक अंतराने वाहनांमधील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करतो. त्यातून आम्हाला बाइकच्या प्रत्येक भागाची यद्यावत माहिती दिली जाते. आपल्यालाच आपली बाइक दुरुस्त करता आली पाहिजे, हा आमचा आग्रह असतो आणि आम्ही तो कसोशीने पाळतोही. कधी कधी तर एखाद्या पुरुषाची बाइक रस्त्यात खराब झाली तरी आम्ही दुरुस्त करून दिल्याची उदाहरणे आहेत.’

राइडचे नियोजन...
लॉंग राइडचे नियोजन करणे खूप जिकिरीचे असते. त्यासाठीची तयारी काय असते हे सांगताना जोशी यांनी स्पष्ट केले, ‘सर्वप्रथम आम्ही हवामानाचा अंदाज घेत असतो. त्यानंतर त्या परिसराचा. राइडमध्ये किती सदस्य सहभागी होणार आहेत, याचा पूर्ण तपशील तयार करतो, त्याप्रमाणे पुढील नियोजन होते. राइडच्या सुरुवातीला ‘राइड कॅप्टन’चे वाहन असते. त्यानंतर मध्यभागी स्कीपरचे आणि सर्वांत शेवटी ‘टेल बाइक’ असते. हा सिक्वेन्स आम्ही कधी मोडत नाही. एका सरळ रेषेत वाहन चालवीत असतो. त्यामुळे अन्य वाहतुकीवर परिणाम होत नाही. तसेच कोणी मागे राहिल्यास, वाहन नादुरुस्त झाल्यास लगेच संपूर्ण ग्रुपला सजग केले जाते.’

काय घेतो काळजी?
आम्ही अत्यंत सुरक्षितपणे वाहन चालवीत असतो. हेल्मेट त्याचबरोर रायडिंग जॅकेट, हॅंड ग्लोज, नी गार्ड, रायडिंग शूज घालूनच वाहन चालविले जाते. वाहनाची नियमित तपासणी आमच्यासाठी खूप महत्त्वाची असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.

जीवनात वेगळाच आत्मविश्‍वास
राइड करताना आलेले अनेक बरे-वाईट अनुभव शेअर करताना जोशी यांनी सांगितले, ‘अनेकदा मुलांचा एखादा ग्रुप मुद्दामहून आमच्या राइडच्या मधे मधे करतो, परंतु आम्ही त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करतो. शेवटी कंटाळून तोच ग्रुप गायब होतो. तर कधी कधी महिला बाइक चालवितात म्हणजे यांच्या नको नादी लागायला, अशीही भावना असते. आपण बाइक चालवू शकतो, हा विश्‍वासच खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जीवनातील अन्य गोष्टीही आम्ही आत्मविश्‍वासाने करू शकतो. ‘हे आपल्याला जमणारच नाही’ असा आमचा ‘ॲटिट्यूट’ कधीच नसतो. आपल्याला सर्व काही येते आणि आपण ते करू शकतो, हा आत्मविश्‍वास आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आमच्या दृष्टीने ‘राइड ऑन बाइक’ ही अभिमानास्पद बाब आहे. जगण्याचे नवे बळ आम्हाला प्रत्येक राइडनंतर मिळत असते. आता वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्याला आम्हाला आवर्जून निमंत्रण दिले जाते.’

संबंधित बातम्या