स्वतःची नको, भाड्याचीच बरी!

इरावती बारसोडे 
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

ऑटोमोबाईल विशेष
 

अगदी अलीकडच्या काळापर्यंत स्वतःची कार असणं हे प्रतिष्ठेचं मानलं जायचं. मग त्या कारचा वापर होतो की नाही ही बाब महत्त्वाची नसे. हल्ली रस्त्यांवर वाहनांची गर्दी इतकी वाढली आहे, की गाडी चालवणं हेसुद्धा कटकटीचं वाटू लागलं आहे. त्यामुळं ज्यांना ड्रायव्हिंगची हौस नाही, ते सहसा गरज नसेल तर गाड्या बाहेर काढतच नाहीत. हजारो रुपये खर्च करून मोठाली कार घ्यायची आणि पाडून ठेवायची. ती निघणार महिन्यातून, फार तर आठवड्यातून एकदा. बरं गाडी बाहेर काढलीच, तर ती लावायला जागा मिळेल याची शाश्‍वती नाही. म्हणूनच आता लोक व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत आणि त्यामुळं रेंटल कार्सचं प्रस्थ वाढू लागलं आहे. जेव्हा गरज भासेल तेव्हा कॅब बुक करायची किंवा लांबच्या प्रवासाला जायचं असेल, तर कार भाड्यानं घेऊन स्वतःच चालवत जायचं. पार्किंग शोधायची झंझट नको, गाडीच्या देखभालीचाही खर्च नको. शहरांमध्ये हा कार ऑन रेंटचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. 

शहरामध्ये किती चारचाकी गाड्या आहेत हे खरंतर पावसाळ्यामध्ये कळतं. याच काळात कॅब वापरणाऱ्यांची संख्याही वाढते. ट्रॅफिक जॅम होतो, कारण प्रत्येक रस्त्यावर चारचाकींच्या रांगा लागलेल्या असतात. या रांगांमध्ये दहापैकी सात गाड्या रेंटल कार्स असतात. रिक्षाला पर्याय म्हणून याचा विचार होतो आहे. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये ओला आणि उबरसारख्या कंपन्यांनी महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमध्ये चांगलाच जम बसवला आहे. सुरुवातीला फक्त कॅबची सेवा दिली जात असे, पण आता ऑटो रिक्षाही मिळतात. ‘ओला-उबर सहज उपलब्ध होतात. कॅब आधी बुक करायची गरज पडत नाही. पण, इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित नसेल, तर मात्र हे वेळखाऊ काम होतं. मोबाइलला रेंज नसेल आणि आसपास वायफाय नसेल, तर याचा वापर करता येत नाही,’ असं मत वारंवार ओला, उबर वापरणाऱ्या संकेत कुळकर्णी यांनी व्यक्त केलं. 

या सेवा सोयीच्या असल्या, तरी कधीकधी त्यांचा मनस्तापही होतो. चालकाला एखाद्या ठिकाणी जायचं नसेल, तर राइड कॅन्सल करण्यासारखे प्रकारही घडतात. हल्ली राइड कॅन्सल होण्याचे अनुभव अनेकांना वारंवार येत आहेत. असाच अनुभव स्वतः घेतलेले प्रणव फडणावीस सांगतात, ‘मला विमानतळावरून पटवर्धन बागेमध्ये जायचं होतं. मात्र, ओलाची एकही कॅब मिळत नव्हती. म्हणून मी उबर बुक केली. पहिला कॅब चालक १० मिनिटांच्या अंतरावर दिसत होता पण जागचा हालत नव्हता. म्हणून मीच फोन केला, त्यानं कुठं जायचंय विचारलं आणि राइड कॅन्सल केली. दुसऱ्यांदा पुन्हा कॅब बुक केली. तो विमानतळावरच होता. म्हणून मी बाहेर आलो. मला रस्त्यापलीकडं कॅब दिसत होती. पण पुन्हा तोच अनुभव आला. कुठं जायचंय विचारून राइड कॅन्सल केली. शेवटी तिसरा आला पण कॅशच द्या म्हणाला.’ 

अंतर कमी असलं तरी जास्त पैसे घेणं, लांब जायचं नसल्यास चालकाकडून राइड कॅन्सल होणं, जवळचा रस्ता माहीत असूनही गुगल मॅप दाखवतो म्हणून उगाचच लांबच्या रस्त्यानं नेणं, रश अवरच्या वेळी नेहमीपेक्षा जास्त पैसे आकारणं, घाईच्या वेळी पटकन कॅब/रिक्षा न मिळणं यांसारख्या घटनांचा अनेकांना अनुभव येतो. पण तरीही यांचा बिझनेस जोरात आहे, असंच म्हणावं लागेल. शेवटी अडला हरी... दुसरं काय!    

या सुविधा सोयीच्या का वाटतात?

  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दरवेळी सोयीची आणि वेळेवर उपलब्ध होणारी असतेच असं नाही. त्यामुळं लोक रेंटल कार सेवांकडं वळताना दिसत आहेत. 
  • या सेवा अॅपच्या माध्यमातून सहज उपलब्ध होतात. कोणत्याही वेळी आणि कुठूनही कॅब/ऑटो रिक्षा बुकिंग करता येतं. यांची ॲप्स युजर फ्रेंडली असल्यामुळं कोणालाही सहज वापरता येतात.  
  • प्रवासाचे किती पैसे होणार, हे आधीच कळतं.
  • शेअरिंगचाही पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळं भाडं कमी द्यावं लागतं. 
  • सुरक्षेच्या दृष्टीनंही या सेवांना प्राधान्य दिलं जातं, कारण वाहनाची आणि चालकाची माहिती घरच्यांबरोबर/जवळच्या लोकांबरोबर शेअर करता येते.
  • रात्री उशिरा किंवा सकाळी खूप लवकर निघायचं असेल, तर कॅब शेड्युल करता येते. ऐनवेळी शोधाशोध नको.  
  • सेल्फ ड्राइव्ह रेंटल कार्स सुविधेमुळं आपल्याला हवी ती गाडी हवी तेव्हा उपलब्ध होते. ड्रायव्हिंगची मनापासून आवड असेल, तर फक्त कार भाड्यानं घेऊन स्वतःच चालवता येते. 

सेल्फ ड्राइव्ह कार्स
अनेक कंपन्या ‘सेल्फ ड्राइव्ह कार ऑन रेंट’ची सुविधाही पुरवतात. म्हणजेच फक्त कार भाड्यानं घ्यायची आणि आपणच चालवायची. झूमकार, रेंटल कार्स, माय चॉइस, सवारी, एव्हिस यांसारख्या कितीतरी कंपन्यांची उदाहरणं देता येतील. हॅचबॅक, सेडान, एसयूव्ही, लक्झरी कार्स अशा सर्व प्रकारच्या गाड्या या कंपन्या उपलब्ध करून देतात. मुंबई, पुण्यासह भारतातल्या जवळपास सर्व मोठ्या शहरांमध्ये यांची सेवा उपलब्ध आहे. तुम्हाला शहरातल्या शहरात फिरायला जायचं असो किंवा बाहेरगावी जायचं असो, या कंपन्या अनेक कार्सचे पर्याय देतात.  

संबंधित बातम्या