महिलांसाठी आर्थिक साक्षरता

ॲड. सुकृत देव
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

बँकिंग विशेष कव्हर स्टोरी
 

आपण आजकाल बघतच आहोत, की आत्ताचे जग हे धावपळीचे, स्पर्धात्मक व वेळेला महत्त्व देणारे जग आहे. कोणाकडेही वेळ नाही, कारण पैसे कमवणेही सोपे राहिलेले नाही. दिवसाचे किमान ८-१० तास तरी काम हे करावेच लागते. पुरुषांबरोबरच महिलांनापण खूप आव्हानांना सामोरे जावे लागते. जसे की मुलांचे संगोपन/शिक्षण, पैसे कमवायचे आव्हान, खर्च, हौस सर्व गोष्टींचे आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. महिलादेखील आता उच्च शिक्षणामध्ये, पैसे कमवण्यामध्ये पुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. आवश्‍यक ती गुंतवणूक करणे, आर्थिक नियोजन करणे, कर नियोजन करणे यांमुळे महिला आर्थिक विषयामध्ये साक्षर, सक्षम होतील. आपण कमावतो किती, आपला खर्च किती, त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी बचत करणे आवश्यक आहेच. महिला जशा घरकाम, स्वयंपाक इत्यादींमध्ये सक्षम असतात, त्याचप्रमाणे आर्थिक गोष्टींमध्येपण साक्षर असल्या पाहिजेत.    
महिलांनी कोणत्या बाबतींमध्ये आर्थिक साक्षर असणे गरजेचे आहे त्यावर आपण जरा नजर टाकूया. त्यातील प्रमुख विषय म्हणजे- 

उत्पन्नाची माहिती
ज्या महिला नोकरी/व्यवसाय/उद्योग इत्यादी करतात, त्यांना हे पूर्णपणे माहिती पाहिजे, की त्यांचे उत्पन्नाचे नक्की स्रोत कोणते आहेत, वार्षिक उत्पन्न किती आहे आणि ते कुठल्या पद्धतीने त्यांना मिळत आहे; मग ते पगारातून मिळणारे असो, अथवा व्यवसाय, उद्योगामधून मिळणारे असो. त्या व्यतिरिक्त अजून इतर कुठलेही उत्पन्न मिळत असेल, तर ती माहितीपण असणे आवश्यक आहे. प्राप्तिकर कायद्याप्रमाणे प्राप्तिकर विवरणामध्ये इतर उत्पन्न दाखवणे अनिवार्य आहे. नुसता पगार खात्यात जमा होतो किंवा चेक खात्यात जमा होतो, पण बँकेचे खाते तपासायला वेळ होत नाही, असे बऱ्याचदा होते. उत्पन्न तपशील तपासणेदेखील महत्त्वाचे आहे.

बँकेची माहिती
आता भारत देश हा कॅशलेस इकॉनॉमीच्या वाटेने चालला आहे. बँकांचे महत्त्व वाढलेच आहे, अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे आहेच. त्यामुळे महिला उद्योजकांनी शक्यतो बँकेमार्फतच व्यवहार करावेत. महिलांना आपली सर्व बँक खाती माहीत असली पाहिजेत आणि वेळोवेळी त्यांनी त्याची शाहानिशा केली पाहिजे. बऱ्याच वेळेला असे होते, की आपल्या बँकेमध्ये किती पैसे आहेत, आपल्या मुदतबंद ठेवी, बचत ठेवी, जमा ठेवी किती आहेत याचा काहीच गंध नसतो. असे होता कामा नये. महिलांना इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, एटीएम, बिल भरणा, पेमेंट ॲप्स जसे की : पेटीएम, गुगल पे, भीम (यूपीआय) या सर्व आर्थिक बाबींतील ज्ञान असणे आवश्यक झाले आहे. ‘कॅश’च्या सवयी आपण कमी करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि महिला वर्गाने जर याला हातभार लावला आणि जास्तीत जास्त व्यवहार बँकेमधून केले, तर यासारखे सोन्याहून पिवळे काहीच नाही. महिलांमधील बँकेबद्दलची जागृती आता खूप वाढलेली दिसून येत आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे. 

गुंतवणुकीचे पर्याय
गुंतवणूक ही आत्ताच्या काळातली खूप महत्त्वाची गरज आहे, नवरा-बायको जे पैसे कमावतात त्यामधून दैनंदिन खर्च होतो, मुलांसाठी खर्च असतोच, पण त्याचबरोबर स्वतःच्या भवितव्यासाठी पैसे साठवायला हवेत. मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन करणे, उतारवयातील खर्चाच्या तडजोडी झाल्या पाहिजेत. त्यामध्ये वैद्यकीय, हॉस्पिटलचा खर्च, सहलींना जाणे, मजा करणे, सणवार व इतर या सर्व गोष्टी उतारवयात करण्यासाठी आणि मुलांकडे पैसे न मागता स्वावलंबी राहून स्वतः सगळे करण्यासाठी गुंतवणूक एक आवश्यक बाब आहे. आपल्याला मिळणारे उत्पन्न आणि त्यातून भविष्यासाठी गुंतवणूक करणे, ती कशी करायची, कुठे करायची हे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये गुंतवणुकीचे पर्याय म्हणजे- एलआयसी, शेअर्स, म्युच्युअल फंड, एसआयपी, पीएफ, पीपीएफ, बॉण्ड्स, प्रॉपर्टीमधील गुंतवणूक, ठेवी व त्यावर मिळणारे व्याज. या सर्वांची व्यवस्थित माहिती असल्याशिवाय गुंतवणूक करू नये. आपले पैसे चुकीच्या ठिकाणी गुंतवून अडकू नये. पैसे कुठे आणि कसे गुंतवावे ही समज गुंतवणुकीच्या आधी असणे गरजेचे आहे. गुंतवणूक ही नेहमीच विश्वासार्ह असावी. योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करावी. गुंतवणूक जेवढ्या लवकर किंवा कमी वयात सुरू कराल, तेवढा त्यातून अधिक परतावा मिळतो, जो फायद्याचा असतो.

करविषयक जागृती/माहिती
‘कर’ या विषयी जागरूकता कमी असल्याने, त्याविषयी जनतेच्या मनात भीती असते. महिला करदाते आता वाढू लागले आहेत. त्यामुळे महिलांची करविषयी जागृती ही वाढली पाहिजे. पगारदार महिला किंवा उद्योजक महिला जे उत्पन्न कमवतात, त्याचे प्राप्तिकर व त्याचे विवरण किंवा इतर कुठलाही कर व त्याचे विवरण केव्हा भरायचे, त्याच्या तपशिलाची माहिती नक्कीच आवश्यक आहे. कर किती भरला, गुंतवणूक व बचत किती केली व बचत किती करायची, त्याची सर्व माहिती महिलांना असणे आवश्‍यक आहे. (उदा : प्राप्तिकर विवरणामधून १ लाख ५० हजारपर्यंतची गुंतवणूक, ज्याची कर वजावट मिळते, ती केली आहे का, याचा आढावा आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपायच्या आधी दर वर्षी घेतला गेला पाहिजे). 
महिला उद्योजकांच्या संख्येतपण आता वाढ होते आहे. अशा उद्योजक महिलांना आपल्याला भराव्या लागणाऱ्या/लागू असणाऱ्या ‘करां’विषयी माहिती असली पाहिजे. उदा. वस्तू व सेवा कर, व्यवसाय कर, प्राप्तिकर इत्यादी. नवीन महिला उद्योजकांना कर सवलतींच्या घोषणांमुळे कर सवलत मिळू शकते, त्याचा फायदा घेतला पाहिजे. सरकार अर्थसंकल्पामध्ये जी घोषणा करते किंवा नवीन योजना आणते, जसे की स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, यांची माहिती असणे आवश्‍यक आहे.

आर्थिक नियोजन
आर्थिक नियोजन ही काळाची गरज आहे, या बदलत्या जीवनशैलीमुळे आर्थिक नियोजनाचे महत्त्व वाढले आहे. कारण दर शनिवार-रविवार बाहेर जाणे, चित्रपट बघणे, ट्रिपला जाणे, मजा करणे या जणू काही गरजा झालेल्या आहेत. पण या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या कमी पडत असू, तर खर्च कमी करणे, आपल्या गरजांपेक्षा जास्त उडी मारू नये. परदेशी जाणे, एसी कार, नवीन घर या सर्व गोष्टींसाठी नियोजन नक्कीच महत्त्वाचे आहे. आर्थिक नियोजनामध्ये महिन्याचे उत्पन्न किती आहे, खर्च किती आहेत, त्यातून आपली बचत किती होऊ शकते, त्याचा पूर्ण आढावा प्रत्येक महिन्याला घेतला गेला पाहिजे. आर्थिक नियोजन हे रोज, दर आठवड्याला, महिन्यालाही करता येऊ शकते. वार्षिक नियोजन तर झालेच पाहिजे. कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त पैसे कसे वाचवता येतील याकडे लक्ष दिले पाहिजे. महिलांमध्ये नक्कीच नियोजनाचे गुण उत्तम आहेत, कारण त्या नोकरी/व्यवसायाबरोबर घर-संसारही उत्तमरीत्या चालवतात.

हिशोबाचे तपशील
महिलांनी आपला व आपल्या परिवारामधल्या सर्वांचा विमा काढलेला आहे की नाही, याची शहानिशा केली पाहिजे आणि नसेल काढला तर काढून घेणे आवश्यक आहे. तसेच कर्ज घेणे, देवाण-घेवाणीचे व्यवहार, जमिनीचे व्यवहार, मालमत्तेचे व्यवहार यांसारख्या आर्थिक गोष्टींची थोडीफार जाण असणे आवश्‍यक आहे. त्यासाठीची कागदपत्रेदेखील माहिती असायला हवीत. हिशोब करणे आणि हिशोबाचे तपशील व्यवस्थित ठेवणे ही एक चांगली सवय आहे, जी प्रत्येकालाच असली पाहिजे. हिशोब जर प्रत्येक दिवशी करत असाल तर सर्वात उत्तम बाब आहे, कारण त्यामुळेच आपली आर्थिक परिस्थिती समजणे सोपे जाते आणि उत्तम आर्थिक नियोजन होऊ शकते. हिशोबाचा तपशील वेळोवेळी ठेवणे थोडे अवघड काम आहे, पण तेवढेच महत्त्वाचेपण आहे. आर्थिक बाबतीत हिशोब हा न तुटणारा धागा आहे. 
  
महिलांमध्ये आर्थिक साक्षरता असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्या अधिक सक्षम होतील, आपल्या पायावर भक्कमरीत्या उभ्या राहू शकतील आणि मुख्य म्हणजे त्यांना इथून पुढे कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. स्वतःचे सर्व व्यवहार स्वतः करतील आणि जागरूकतापण वाढेल. आर्थिक साक्षरतेने महिलांमध्ये आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

संबंधित बातम्या