विषामृताचा खेळ

दीपा कदम
मंगळवार, 5 जानेवारी 2021

‘ती’ची लढाई

कोविडने प्रत्येकाच्या आयुष्यात असं काही थैमान घातलंय की जगण्याची एक वेगळीच रीत यापुढच्या काळात पाह्यला मिळणार आहे. बाहेरच्या जगाशी बाईचं असणारं नातं पुन्हा एकदा मोठ्या वळणावर येऊन ठेपलं आहे. तिचे प्रश्न, तिचा लढा तिला नव्यानं उभारावा लागणार आहे. 

मानवी जगण्यामध्ये मानवी स्पर्शाला अनन्य साधारण महत्त्व आहे. स्पर्शाशिवाय माणसाचं जगणं पूर्ण होऊ शकत नाही. पण जगभर थैमान घातलेल्या कोविडने मात्र मानवी स्पर्शालाच शाप बनवून टाकलं. कोविडयोद्ध्यांच्या मते हा एक विष-अमृताचा खेळ झाला होता. काम करताना कोविड रुग्णांच्या संपर्कात येणं अनिवार्य होतं आणि त्यातून कोविडचा संसर्गही. त्यातूनही कोविड झाला नाही तर अमृत मिळाल्याचं समाधान.  

कोविडकाळामध्ये संसर्गावर मात केलेल्या अनेकांचे चांगले-वाईट अनुभव पुढे आले, अजूनही येताहेत. पण कोविडशी मुकाबला करणाऱ्या वैद्यकीय सेवा देणाऱ्यांची कथा मात्र इतरांपेक्षा खूपच वेगळी होती. केवळ रुग्णालयातील ताण, कोविडच्या धोक्यापाशी ती संपत नव्हती तर त्यांच्यापैकी अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला. रुग्णांना बरे करण्यासाठी जिद्दीने उभं राहताना, खासगी आयुष्याला बाजूला सारावं लागलं, मानसिक चढउतारांना सामोरं जावं लागलं. कोविडविषयी अज्ञान आणि अपुऱ्या वैद्यकीय साहित्यानिशी स्वतः कोविडच्या संसर्गाशी मुकाबला करावा लागला. 

वैद्यकीय सेवा देण्यामध्ये जगभरामध्ये महिला नर्सेसची संख्या अधिक असल्याने त्यांच्या परिस्थितीचा गेल्या काही महिन्यांत वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास झाला आहे. दुबई मेडिकल जर्नलने ऑगस्ट २०२० मध्ये ‘नर्सेस ऑन द फ्रंटलाइन अगेन्स्ट कोविड१९ पँडेमिकः अॅन इंटिग्रेटिव्ह रिव्ह्यू’ नावाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. रुग्णांच्या तुलनेत नर्सेसची असलेली कमतरता, कोविडविषयी अपुरी माहिती, अशा विविध विषयांवर या अहवालात चर्चा करण्यात आली आहे. चीन, अमेरिका, स्पेनसारख्या देशांमध्येही नर्सेसचे प्रश्न सुरक्षेचे साहित्य, बेडचा तुटवडा, अपुरी माहिती हे सर्व सारखेच होते. पण भारतामध्ये परिचारिकांना कोविडबरोबर सामना करतानाच कौटुंबिक दबावाचा सामनाही करावा लागला. देशात सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या नर्सेसनी या काळात कोविडसोबतच घरच्या पातळीवर देखील लढाई लढलेली आहे. 

या सगळ्या काळात कोविडने मानवी नात्यांचे उभे केलेले भेसूर चेहरे मन उद्विग्न करणारे आहेत. काहीजणींवर नर्सची नोकरी सोडण्यासाठी सासरच्यांचा  दबाव होता. काहींची ठरलेली लग्न मोडली. एखाद्या नर्सच्या कुटुंबात कोविडमुळे सासू -सासऱ्यांना कोविडने गाठले, कुठे दुर्दैवाने मृत्यू झालाच त्या साऱ्याचं खापर त्या नर्सवर फोडण्यात आलं. नवऱ्यानं बोलणं टाकलं, मनं दुरावली आहेत. या काळात कोविडमध्ये काम केलेल्या कुठल्याही नर्ससोबत गप्पा मारा; जगणं त्यांनी फार जवळून पाहिलंय.

भारतात कोविड पोहोचलाही नव्हता तेव्हा कोविडच्या बातम्या वर्तमानपत्रात मात्र तुरळक येत होत्या. मुंबईच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात काही जणींच्या तोंडावर फेब्रुवारी महिन्यात मास्कही दिसू लागला होता, तेव्हा श्रुती गमरे यांना आश्चर्य वाटलं होतं. परदेशातल्या साथीचा भारतात काही मागमूस नसताना मास्क लावून हिंडण्याच्या प्रकाराचा त्यांच्यासह त्यांच्या मैत्रिणींनाही खुळचटपणाच वाटला होता. मात्र त्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून श्रुती आपल्या सर्वांप्रमाणे फक्त मास्कच लावत नाहीत तर त्या दिवसातले सात तास पीपीई किटमध्येच असतात. 

केईएम हे मुंबईतलं असं रुग्णालय आहे की मुंबईकर तिकडे डोळे झाकून धाव घेतात. झालंही तसंच. कोविड रुग्णालय नसतानाही कोविड रुग्णांची रांग एवढी लागली की केईएमला कोविडला रोखण्यासाठी मैदानात उतरावं लागलं. सुरुवातीला आपत्कालीन सर्जरी वॉर्ड कोविड रुग्णांसाठी निश्चित केला गेला. श्रुती गमरे याच वॉर्डच्या इनचार्ज होत्या. सुरुवातीला नेहमी हॉस्पिटलमध्ये वापरले जाणारे साधे मास्क हॉस्पिटलच्या स्टाफला पुरविण्यात आले. श्रुती सांगतात, ‘सुरुवातीला कोणालाच काही माहीत नव्हतं. प्रशासन तरी काय करणार होतं. मार्च महिन्याच्या साधारण चौथ्या आठवड्यापासून कोविड रुग्ण येऊ लागले होते. आमच्याकडे साध्या मास्कशिवाय काही नव्हतं. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी एन-९५ मास्क असावा किंवा रुग्ण हाताळण्यासाठी पीपीई किट घातली जावी हा प्रोटोकॉल तयार होईपर्यंत कोविडने हातपाय पसरायला सुरुवात केली होती. ही साथ कशी पसरत जाते, रुग्णावर कोणते उपचार करायचे असतात या कशाचंही उत्तर कोणाकडेच नव्हतं. सगळेच हतबल होते. डॉक्टरांसोबत नर्स आणि वॉर्डबॉय यांचा रुग्णांशी सतत संपर्क येणार होता. पहिल्या पंधरा दिवसातच आम्हाला कोविडच्या रुग्णांना हाताळायचं कसं याचं ट्रेनिंग दिलं गेलं. शिफ्टमध्ये दोन वेळा बदलाव्या लागणाऱ्या पीपीई सूटपासून अनेक प्रश्न नव्याने निर्माण होत होते.  त्यांच्यावर उत्तर शोधली जात होती त्यावर मार्ग निघेल याची खात्री होती...यातही डॉक्टरांसमोरचे प्रश्न आणि नर्स, वॉर्ड बॉय यांच्या समोरचे प्रश्न वेगळे होते.’ 

विशेष करून मुंबईच्या या जुन्या रुग्णालयांचा पाया ब्रिटिशांनी घातलेला आहे. इथे रुग्ण दाखल झाल्यानंतर किंवा रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाच्या नोंदी कशा करायची याचा गेल्या अनेक वर्षांचा ठराविक ढाचा आहे. कोविडने हे सगळं मुळापासून एका रात्रीत बदललं. श्रुती सांगतात, एरव्ही रुग्णांसोबत त्यांचा नातेवाईक असतो. इथे मात्र हॉस्पिटलच्या आत आल्यावर रुग्ण आणि नातेवाइकांचा संपर्क संपूर्णच तुटत होता. रुग्ण निराश आणि हतबल होण्याची प्रक्रिया तिथूनच सुरू व्हायची. डॉक्टर आणि नर्सचा चेहरा दिसल्यावर रुग्णालाही आधार वाटतो, पण मास्क आणि पीपीईच्या मागे असलेले चेहरे दिसण्याचाही मार्ग नव्हता. मे महिन्यानंतर कोविडच्या रुग्णांचे प्रमाण अधिक वाढू लागले तेव्हा खरंतर कसोटीचा काळ होता. माझ्या वॉर्डमध्ये कोविड रुग्णांना दाखल करून मग इतर वॉर्डमध्ये त्यांना हलवलं जायचं. त्यामुळे इतर वॉर्डमध्ये जागा नसली की ते रुग्ण वॉर्डमध्येच असायचे. सुरुवातीला कोविडसाठी दोन वॉर्ड होते त्यामध्ये वाढ होत ते पंधरावर गेले होती. वॉर्डची रुग्ण ठेवण्याची मर्यादा ओलांडली जात होती. त्यावेळी रुग्णांना कदाचित बेड मिळाला नसेल पण तातडीने उपचाराची आवश्यकता होती ते उपचार मिळाले. मृतदेहांच्या नोंदणीच्या प्रक्रियेतही बदल होत गेले. हा बदल आता सांगताना सोपा वाटत असेल पण त्यामागे प्रशासकीय यंत्रणेला खूप निर्णय प्रक्रियेतून जावं लागत असतं. एका टप्प्यावर तर एकाच वेळी एकोणीस वॉर्डबॉय पॉझिटिव्ह आले होते. मृतदेह उचलायला, बांधायला कोणी नव्हतं. आम्ही नर्सनेच ही कामं केली. लॉकडाउनच्या काळात प्रवासाची सोय नाही, शिवाय घरच्यांना काही होवू नये म्हणून रुग्णालयाने सोय केलेल्या ठिकाणीच अनेक नर्स राहू लागल्या होत्या. श्रुतीसुद्धा दोन महिने केईएमने सोय केली होती तिथेच राहिल्या. त्या सांगतात, ‘कोविड म्हणजे विषामृताचा खेळ आहे. तुम्हाला संपर्क झाला तर तुम्हाला तो होणारच. म्हणून केईएमने व्यवस्था केली तिथेच मी दोन महिने राहिले. रुग्णालयानेदेखील आमची इतकी उत्तम सोय केली होती की नर्सेसनेही मागेपुढे न पाहता काम केलं. मे महिन्यापर्यंतच केईएममधल्या २०० नर्सेसना कोविड झाला. नंतर तर आम्ही मोजणंही सोडून दिलं.’

वैयक्तिक आयुष्यातले अनुभव असंख्य आहेत. साखरपुडा झालेल्या एका नर्सच्या सासऱ्यांना तिच्यामुळे कोविड झाला असं म्हणत सासूने लग्न मोडलं, आणखी एका नर्सची सासू कोविडने वारली म्हणून तिचा नवरा अजून तिला बोल लावतोय. 

कोविडची साथ आज ना उद्या जाणारच आहे. हे युद्ध तर संपेलच पण ‘ति’ची प्रत्येक वळणावरची लढाई कधी संपणार??

भारतामध्ये परिचारिकांना कोविडबरोबर सामना करतानाच कौटुंबिक दबावाचा सामनाही करावा लागला. देशात सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या नर्सेसनी या काळात कोविडसोबतच घरच्या पातळीवर देखील लढाई लढलेली आहे.

संबंधित बातम्या