कोनातील नयनरम्य कोनाकोपरे 

डॉ. अनिल लचके 
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

भटकंती
हवाई बेटांमधील सर्वांत मोठे बेट म्हणजे कोना! हा भाग ज्वालामुखीचा आहे, हे लक्षात येते कारण सर्व बाजूंना असंख्य भोके असलेले लाव्हाचे दगड दिसतात. येथे नारळ, विविध फुलझाडे असली तरी हा ज्वालामुखीचा प्रदेश आहे. निद्रिस्त ज्वालामुखी जसे इथे बघायला मिळतात, तसे ज्वालामुखींचे रौद्र रूपही बघायला मिळते.. त्याचे वर्णन करणारी हवाई बेटांची सफर...

बऱ्याच वर्षांपूर्वी ऑफिसच्या कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. जानेवारी महिन्यातील थंडीचे दिवस होते. माझी राहायची व्यवस्था ‘आयआयटी’मधील एका हॉस्टेलमध्ये केली होती. त्याचे नाव होते - ज्वालामुखी! त्यावेळी मनात विचार आला, की आपल्याला भूगोलाच्या पुस्तकात शिकलेला ज्वालामुखी कधी पाहायला मिळणार नाही, पण निदान अशा थंड ‘ज्वालामुखी’ हॉस्टेलमधे तरी राहायला मिळतेय. पण प्रदीर्घ कालावधीनंतर हवाई बेटांवरील ज्वालामुखीचे दर्शन घडण्याचा योग आम्हाला आला. ‘आम्हाला’ म्हणजे मी, माझी पत्नी जयश्री, तिची आई (वय ८५) आणि माझा मुलगा सलिल. या वर्षीच्या (२०१८) एप्रिल-मे महिन्यामध्ये एक वैज्ञानिक चर्चासत्र होनोलुलुमध्ये भरले होते. तिथे सलिलचा सक्रिय सहभाग होता. त्याने हवाई बेटांवरील एक सहल आधी केलेली असल्याने त्याला तेथील बरीच माहिती होती. हवाई बेटांची संख्या १३२ असली तरी नजरेत सहज भरणारी बेटे ८ आहेत. ती अमेरिकेच्या मुख्य भूमीपासून खूप दूर असली तरी पन्नासावे राज्य म्हणून त्यांची गेली पन्नास वर्षे ओळख आहे. ओहऊ बेटावर होनोलुलू ही राजधानी आहे. जपान, चीन आणि ऑस्ट्रेलिया येथून बरीच विमाने तेथे थेट जातात. विमानतळावर आशियाकडील बरेच प्रवासी दिसले. हवाई बेटांवरील आशियायी लोकांचे प्रमाण ४२ टक्के आहे, तर युरोपियन २४ टक्के. स्थानिक नागरिक फक्त १० टक्के आहेत. हवाईमधील सर्व बेटांवर निदान ५०० भारतीय कुटुंबे राहतात. हवाईमध्ये चायनीज, जापनीज, मेक्‍सिकन, फिलिपिन्स आणि थाई जेवण मिळते. येथील कोकोनट पुडिंग ही स्वीट डिश लोकप्रिय आहे. 
न्यूयॉर्क ते होनोलुलू हे अंतर आठ हजार किलोमीटर असून विमानाला साडेनऊ तास लागतात. हा जणू आंतरखंडीय प्रवासच होता. विमान होनोलुलूला पोचले आणि विमानाबाहेर पडल्यावर तेथील हवा आल्हाददायक वाटली. होनोलुलू आणि आपल्या नागपूरचे अक्षवृत्त साधारण सारखेच आहे. तापमान २८ अंश से. होते. तरीही  पुरेशा आर्द्रतेमुळे हवा गरम वाटली नाही. कारण सर्व बेटे प्रशांत (पॅसिफिक) महासागराने वेढलेली आहेत आणि येथे सतत झुळझुळणारा वारा आणि नारळाची बने आहेत. तथापि आम्हाला प्रथम होनोलुलुला जायचे नव्हते. जागृत ज्वालामुखी पाहायचा असल्यामुळे सुरुवातीलाच हवाई बेटांमधील ‘बिग आयलंड’ला भेट द्यायचे ठरले. 

कोनाकडे कूच 
हवाई बेटांना भेट देणारे बहुतांश पर्यटक प्रथम दक्षिणेकडे असणाऱ्या ‘बिग आयलंड’ला भेट देतात. नावाप्रमाणेच ते हवाई बेटांमधील सर्वांत मोठे, म्हणजे दहा हजार चारशे चौरस किलोमीटरचे बेट आहे. हवाईयन एअरलाईन्स कंपनीची अनेक विमाने होनोलुलुपासून बिग आयलंडमधील कोनाला जाणारी आहेत. विमान प्रवास अडीचशे किलोमीटरचा असून त्यासाठी पाऊण तास लागतो. विमान उतरायला लागल्यावर खालची जमीन सर्वत्र खडकाळ काळ्या रंगाची दिसते. अर्थातच ती लाव्हारसामुळे तयार झालेली आहे, हे लक्षात येते. कोनाचा एअरपोर्ट छोटेखानी असला तरी तो ‘इंटरनॅशनल’ आहे, हे विशेष. येथील मोटारीने गावात, म्हणजे कायलुवा कोनाला जाण्यासाठीचा रस्ता १४ किलोमीटरचा असून १५-२० मिनिटात तेथे पोचता येत. हा उष्णकटिबंधातील सागरी भाग असल्यामुळे वाटेत दुतर्फा नारळाची झाडे लावलेली आहेत. मधेच बोगनवेलीची आणि केळीची झाडेही दिसतात. तरीदेखील हा भाग ज्वालामुखीचा आहे, हे लक्षात येते कारण सर्व बाजूंना असंख्य भोके असलेले लाव्हाचे दगड दिसतात. कोना विमानतळाला जे दगडी कुंपण आहे, तेदेखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या लाव्हा दगडांचेच आहे. घरे बहुतांश एक मजली किंवा फार तर दोन मजली आहेत. कारण ज्या भागात ज्वालामुखीचे प्राबल्य आहे, त्या भागात धरणीकंप होत असतातच. यामुळे या बेटावर सहसा संभाव्य प्राणहानी आणि (फार) वित्तहानी होत नाही. विमानतळावरून गावात पोचल्यावर प्रथम कोना सी-साइड हॉटेलमध्ये आमचे सामान ठेवले. संध्याकाळी आजूबाजूचा परिसर पाहायचा ठरवले. तो एक विलोभनीय सागरी किनारा आहे. नुकतीच एक अवाढव्य बोट किनाऱ्याला येऊन थांबलेली दिसली. काही प्रवासी या बेटाच्या किनाऱ्याने प्रवास करून प्रेक्षणीय स्थळांना भेटी देतात. आल्या आल्या सागर किनाऱ्यावरच त्यांचे स्वागत करायला हॉटेलमधील स्वागतिका खास हवाईयन वस्त्रे करून सज्ज होती. प्रवाशांच्या गळ्यात ताज्या फुलांचा छोटासा गोल हार घालून ‘आलोहा’ म्हणत स्वागत केले जाते. अलोहा हा बराच लोकप्रिय झालेला शब्द मूलतः पॉलिनेशियन म्हणजे पॅसिफिक महासागरातील छोट्या बेटांवरून आला आहे. अलोहा हा अनेकार्थी शब्द आहे. त्यातील भावसाधारण - शुभेच्छा, स्नेह, आपुलकी, दया, सहानुभूती - असा आहे. अलोहाचा सखोल अर्थ आहे - रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल. येथे फक्त प्रवाशांच्या किंवा पाहुण्यांच्या गळ्यात हार घालतात असे नाही. हवाई बेटांवर फुलांचा हार सर्वसामान्य लोकांना प्रिय असून अनेक लोक गळ्यात हार घालून फिरताना दिसतात. डोक्‍यावरही फुलांचे गोल चक्कर ठेवतात. ही फुले प्लुमेरिया, म्हणजे आपल्याकडील पांढऱ्या चाफ्याची असतात. पांढऱ्या चाफ्याचे अजून दोन रंग आहेत. किरमिजी आणि पिवळसर गुलाबी झाक असलेला. तिन्ही रंग सर्वत्र आणि सर्रास दिसतात. येथील काळ्या फत्तरांनी बनलेल्या जमिनीवर विविध रंगांची फुले उमलत असतात. विशेषतः जास्वंदीची फुले बरीच लोकप्रिय आहेत. हवा अनुकूल असल्याने पिवळी आणि लाल जास्वंदीची फुले डेरेदार आणि बहारदार दिसतात. हवाई बेटांच्या राज्याचे अधिकृत फूल पिवळ्या जास्वंदीचे आहे. बेटांवरील तरुण मुली कानाच्या वरती जास्वंदीचे एकच फूल माळतात. त्यामध्येदेखील एक संकेत आहे. उजव्या कानाच्यावर फूल असेल तर ती तरुणी उपवर असून तिला लग्न करायची इच्छा आहे, असे समजायचे. तरुणीच्या डाव्या कानावर फूल असेल तर तिचे लग्न ठरलेले आहे; थोडक्‍यात नादी लागू नका! 

कोनातील फेरफटका 
कोनाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाला काही ना काही पाहण्यासारखे आहे, म्हणूनच येथे दरवर्षी २५ लाख पर्यटक भेट देत असतात. बिग आयलंड आणि पश्‍चिम बंगालची तुलना करण्यासारखी आहे. भारताच्या पश्‍चिम बंगाल राज्यात उत्तरेकडे सदैव बर्फाच्छादित शिखर असलेला कांचनगंगा पर्वत आहे. त्याची उंची ८५८६ मीटर (२८१६९ फूट) आहे. या राज्याच्या दक्षिणेला समुद्रसपाटी आहे. बिग आयलंडमध्ये काहीसे तसे आहे. दोन उत्तुंग पर्वत आणि लगेच समुद्रसपाटी! या पर्वतांची नावे मौना किया (सफेद पर्वत) आणि मौना लोवा (लांब पर्वत) अशी आहेत. मौना कियाचा पाया पॅसिफिक महासागराच्या तळाशी आहे आणि त्याचे हिमाच्छादित शिखर बिग आयलंडच्या जमिनीवर आहे. पायापासून शिखरापर्यंत मौना कियाची उंची १०२१० मीटर (३३,५०० फूट) भरते. एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर (२९००२ फूट) आहे. मौना कियाची एकूण उंची एव्हरेस्टपेक्षा दीड किलोमीटर जास्त असली तरी जमिनीपासून मात्र मौना किया ४२०५ मीटर (१३,८०० फूट) आहे. या पर्वतावरील वातावरण प्रदूषणमुक्त असून येथे आर्द्रता कमी आहे. येथील आकाश जास्त गर्द असते. यामुळे आकाशाचे निरीक्षण करण्यासाठी या पर्वतावरील जागा वेधशाळेसाठी योग्य आहे. गेली पन्नास वर्षे आकाश-निरीक्षणासाठी येथे एक आधुनिक वेधशाळा कार्यरत आहे. येथे आणलेल्या दुर्बिणी जगात सर्वांत अव्वल दर्जाच्या आहेत. असे असले तरी मूळ रहिवासी या पर्वताला पवित्र मानतात. येथे वैज्ञानिक प्रयोग केले तर पर्वताची विटंबना होते, असे त्यांना वाटते. शिखरावरील प्रयोगशाळेजवळ पॅलिया नावाचा पिवळसर सोनेरी रंगाचा पक्षी दिसतो. तो म्यॅमेन नावाच्या झाडावर बागडत असतो. वेधशाळा सुरू झाल्यापासून म्यामेन वृक्ष कमी झाले. परिणामी पॅलिया पक्ष्यांची संख्या घटत गेली. वेधशाळेमुळे जैवविविधतेला धोका झाला, असे आता मूळ रहिवासी म्हणू लागले आहेत. 
कोनामध्ये फेरफटका मारण्यासाठी कियावाकीकुवा या मूळ गावापासून सुरुवात केली जाते. याचा अर्थ आहे - ईश्‍वराकडे जाण्याचा मार्ग! हा सागरी किनारा असून ते ठिकाण कोनाच्या दक्षिणेला ३० किलोमीटर अंतरावर आहे. याच्या पलीकडील किनाऱ्यावर जगप्रसिद्ध दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूकचे सफेद स्तंभासारखे दिसणारे स्मारक आहे. तिथे जायला बोट मिळते. चालत जाऊन यायचा रस्ता चढ-उताराचा असून त्यासाठी किमान चार तास तरी लागतात. 
कोना कॉफीसाठी जगप्रसिद्ध आहे. या भागात ‘कोना कॉफी हिस्टरी फार्म’ आहे. लाव्हामुळे बनलेल्या खरपूस मातीत लज्जतदार कॉफीचे उत्पन्न वर्षातून दोन वेळा घेतले जाते. उचिडा कुटुंबीयांच्या तीन पिढ्यांनी येथे शंभर वर्षांपूर्वी कॉफीचे शास्त्रशुद्ध संशोधन केले. एवढेच नव्हे, तर सतत ८१ वर्षे दर्जेदार कॉफीची लागवड केली. येथील म्युझियममध्ये कॉफीच्या फुलापासून ते कॉफीच्या बिया दळल्या कशा जातात ते दाखवले जाते. माहितीपट दाखवला जातो. कॉफीप्रेमींना अनेक प्रकारच्या कॉफीची चव दिली जाते. येथे अस्सल चहाचे चाहतेदेखील कॉफीचा मजा लुटताना दिसतात. 

पियुहोनुआ 
या नंतरचे स्थळ म्हणजे पियुहोनुआ. बिग आयलंडच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील एक प्रेक्षणीय राष्ट्रीय उद्यान. याचे नाव होनाउनाऊ हिस्टॉरिकल पार्क. याला ऐतिहासिक महत्त्व आहे. जो कुणी जुने कायदे मोडेल, अशा गुन्हेगाराला या स्थळी आणायचे आणि धर्मगुरूंच्या स्वाधीन केले जायचे. यामध्ये मृत्युदंडाची शिक्षा झालेले गुन्हेगारही होते. त्यांचा गुन्हा माफ करून धर्मगुरू त्यांचे मनपरिवर्तन करायचे. केवळ दोन चौ.कि.मी.च्या या सागरी किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे. काही भाग गोवा किनाऱ्याची आठवण करून देतो. नारळाचे उंच वृक्ष, सागराचे निळेशार पाणी, गोड्या पाण्याची छोटी तळी, कासवे आणि सागराचे पारदर्शक स्वच्छ पाणी, हे तर इथले वैशिष्ट्य आहे. शेकडो वर्षांपूर्वी कोरलेल्या लाकडी देवाच्या मूर्ती हे येथील आकर्षण आहे. त्यांना ‘की’ नावाने ओळखले जायचे. त्यांना संरक्षक (प्रोटेक्‍टर) देव म्हणायचे. शंभर-दोनशे वर्षांपासून येथे कुटीरोद्योग चालत होते. उंच आणि भव्य उतरत्या छपराच्या शेडमध्ये त्याची झलक पाहायला मिळते. 
या स्थळापासून दक्षिण दिशेला व्होल्कॅनो व्हिलेज आणि नाहेलू ही दोन छोटी गावे लागतात. त्यांच्या मध्यावर पुनालुलु बीच लागतो. पुनालुलु याचा अर्थ मजेत उड्या किंवा सूर मारण्यासाठी! येथील किनाऱ्यावरील अत्यंत काळीभोर वाळू आकर्षक दिसते. ती जवसासारखी मऊ लागते आणि हाताला, पायाला बिलकूल चिकटत नाही. ज्वालामुखींमधून बाहेर पडलेला लाव्हा वाहात जाऊन थेट सागरी पाण्यात पडल्यामुळे कोळशाप्रमाणे वाळू काळी झाली आहे. हा बीच साधारण अर्धा किलोमीटर लांबीचा असून त्याचे सौंदर्य त्या वाळूत आहे. तेथील मऊशार वाळूत सूर्यस्नान करण्यासाठी ग्रीन टर्टल्स येतात. त्यांना स्थानिक भाषेत ‘होनु’ म्हणतात. बहुतेक वेळी ते जोडीने येऊन पहुडलेले असतात. दुसऱ्या प्रकारच्या कासवांना ‘हॉक्‍सबिल’ म्हणतात. (टर्टल आणि टरटॉइज दोन्ही सरपटणारे प्राणी असले तरी त्यांच्यात फरक आहे. टरटॉइज शाकाहारी असून ८०-१५० वर्षे जगतात. टर्टल बहुतांश मांसाहारी असून पाण्यात राहाणे पसंत करतात. त्यांचे आयुष्यमान २०-४० वर्षे असते). हॉक्‍सबिलचे तोंड टोकदार पोपटासारखे दिसते तर ग्रीन टर्टलचे तोंड बोथट चोचीसारखे वाटते. दोन्ही प्रकारची कासवे नामशेष होण्याच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यामुळे सांभाळून ठेवण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते. या बीचमध्ये पोहोणे धोक्‍याचे आहे. कारण पाण्याखाली टोकदार लाव्हाचे दगड आहेत आणि पाण्याचे भोवरे आहेत. पाण्याचे प्रवाह जमिनीकडून येत असल्याने ते बरेच गार आहे आणि गोडेपण आहे. बिग आयलंडवर काळ्या वाळूची सहा बीचेस आहेत, पण पुनालुलु जास्त आकर्षक आहे. साहजिकच येथे अनेक पर्यटक मनमुरादपणे सूर्यस्नान करताना दिसतात. 

ज्वालामुखीच्या वाटेवर 
पुनालुलु ते हवाई नॅशनल व्होल्कॅनोज पार्क हे अंतर मोटारीने अर्ध्या-पाऊण तासाचे आहे. या पार्कची स्थापना होऊन शंभर वर्षे झाली आहेत. युनेस्कोने ‘जागतिक वारसा’ म्हणून या पार्कला मान्यता दिलेली आहे. याचे क्षेत्रफळ १३०० चौरस किलोमीटर आहे. येथील पर्यटक केंद्रामध्ये ज्वालामुखी, भूस्तरशास्त्र आणि जीवशास्त्र यासंबंधीची माहिती मिळते. त्या भागाचे भौगोलिक मॉडेलही करण्यात आलेले आहे. ज्वालामुखीच्या संदर्भात इथे ‘बॉर्न ऑफ फायर... बॉर्न ऑफ द सी’ हा माहितीपट मोफत दाखवतात. येथून थोड्याच अंतरावर ज्वालामुखी आहे. त्याच्या समोर कायम असलेल्या कॅमेऱ्यांनी (क्‍लोज्ड सर्किट) टीव्हीवर ‘आँखो देखा हाल’ पाहायला मिळतो. त्यामुळे पर्यटकांना सद्यःस्थिती कळते आणि लाव्हा जवळून कोठे दिसेल, त्याचा अंदाज बांधता येतो. 
येथील परिसरात निद्रिस्त झालेला पौहाही ज्वालामुखी आहे. तो ११० मीटर रुंद आणि १५० मीटर खोल आहे. त्याचा उद्रेक १९७९ मध्ये झाला होता. आता हा राखट रंगाचा सपाट भाग वरून खाली पाहायचा असतो. येथून जवळच अजून एक किलावेहा ‘ईकी-पिट’ नावाचा गर्द काळपट रंगाचा निद्रिस्त ज्वालामुखी दिसतो. हे एक वर्षावन आहे. इथले ‘नाहुकू थर्स्टन लाव्हा ट्यूब’ हे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. घनतेच्या दृष्टीने पातळ असलेला प्रवाही लाव्हा वाहात असताना त्याच्या पृष्ठभागावरील कमी तापमान असलेला लाव्हा घट्ट होत जातो. मग निसर्गतःच तयार झालेल्या बोगद्यातून लाव्हा वाहात जातो. त्याचा ओघ कमी होत गेल्यावर एक नैसर्गिक बोगदा तयार होतो. हा बोगदा अर्धा कि.मी. आहे. आत ठिकठिकाणी दिवे आहेत. चालत जायच्या मार्गावर वरून जाताना अंगावर सुखद पाण्याचे थेंब पडतात. लाव्हा ट्यूब ओलसर, पण वेगळी अनुभूती देणारी आहे. ट्यूबमध्ये शिरताना आणि बाहेर पडल्यावर वैविध्याने नटलेली वनश्री दिसते. या भागात फर्नचे जंगल आणि व्होल्कॅनो आर्ट सेंटर आहे. तिथे ज्वालामुखी देवता पेले हिचे उत्कृष्ट पेंटिंग पाहायला मिळते. 
पार्कमध्ये दोन जागृत ज्वालामुखी आहेत. किलावेहा आणि मौना लोवा. किलावेहामधून सतत लाव्हा बाहेर पडतो. त्यामुळे या भागाचे लॅंडस्केप सतत बदलत असते. (पुन्हा एकदा या भागात फेरफटका मारला तर बराच फरक आढळेल). या पार्कची भौगोलिक उंची समुद्रसपाटीला शून्य आहे आणि मौना लोवाची उंची ४१६९ मीटर (१३७९६) आहे. परिणामी पर्यावरणाला अनुसरून या भागाचे  भौगोलिक भाग तयार झाले आहेत. त्यामध्ये अनेक वनस्पतींचे प्रकार, कुरणे, धबधबे, सागरी भाग, वर्षावने, उंच आणि मध्यम पर्वतीय भाग विशेष महत्त्वाचे आहेत. मौना लोवावरती हिमवर्षाव होतो, तर अन्य भागात हवेमध्ये उष्मा भासतो पण तरीही वातावरण पावसाळी! बिग आयलंडवर हे अनुभवताना इमर्सन या तत्त्वचिंतकाचे चिंतन आठवले - 
‘Live in the sunshine, Swim in the sea, Drink the wild air‘ 

लाव्हा येतोय ‘पूना डिस्ट्रिक्‍ट’मध्ये 
या भागातून जाताना सर्वत्र लाव्हामुळे तयार झालेली काळीभोर दगडांची जमीन दिसते. ती अतिशय उंच-सखल आणि खडकाळ असल्यामुळे त्यावरून चालता येत नाही. (पायात बूट पाहिजेतच. हवाई बेटात हवाई चप्पल चालणार नाही!) कोणता लाव्हा कोणत्या वर्षीचा आहे, ते काही ठिकाणी लिहिलेले आहे. नकाशातही दर्शवलेले आहे. त्या थिजलेल्या दगडांजवळ वर्ष लिहिलेले आहे - १९१५, १९२६, १९५०, १९७९, १९८३ इत्यादी. इथे लाव्हाच्या खडबडीत दगडांवर (कसेबसे) बसून काही फोटो काढून घेतले. थोड्याच अंतरावर जागृत किलावेहा ज्वालामुखीचे दर्शन घडणार होते. इथे जोरदार गार वारे वाहात होते. थंडी बरीच होती. तेवढ्यात एका छोट्या चौकोनी भागातून वाफ बाहेर येताना दिसली. त्या चौकोनी भागाला कठडा बांधलेला होता. त्यावर रेलून ऊब मिळवावी म्हणून काही क्षण वाफ अंगावर घेतली, पण ती फारच उष्ण वाटली म्हणून काढता पाय घेतला. जवळच किलावेहा व्हिजिटर सेंटरकडे चालत जायचा रस्ता होता. इथे ज्वालामुखींच्या आतापर्यंत झालेल्या उद्रेकांचा चित्रमय इतिहास दाखवला आहे. ज्वालामुखीची इतरही माहिती, चित्रे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. येथील नकाशे पहिल्यानंतर एक गमतीदार गोष्ट लक्षात आली.. किलावेहा ज्वालामुखीमधून बाहेर पडलेला ७० टक्के लाव्हा चक्क पूना डिस्ट्रिक्‍टमध्ये वाहात येतो! बिग आयलंडच्या नकाशात ‘पूना’ आहे! 

ज्वालामुखीचा उद्रेक 
सेंटरच्या बाहेर ज्वालामुखीचे रौद्र स्वरूप पाहण्यासाठी पर्यटक कॅमेरे, दुर्बिणी घेऊन सज्ज असतात. समोर ५ कि.मी. लांब आणि ३ कि.मी. रुंद अशा ज्वालामुखीची गोलसर कड दिसते. याला इंग्रजीत कालडेरा म्हणतात, पण त्याचे स्थानिक नाव हालेमाउमाऊ आहे. ज्वालामुखीची देवता म्हणजे पेले. तिचे वास्तव्य इथे आहे. स्थानिक लोक या देवतेला प्रसाद चढवत असतात. हा ज्वालामुखी ५ लाख वर्षांपूर्वी समुद्रात होता. एक लाख वर्षांपूर्वी तो ‘वर’ जमिनीवर आला. त्याची उंची १२५० मीटर (४११० फूट) आहे. हा १६५ मीटर खोल आहे. त्याच्या खाली धगधगणाऱ्या लाव्हाचे विस्तृत गोलसर सरोवर आहे. त्याच्या एका बाजूच्या चार ठिकाणांवरून लाव्हाच्या जोरदार उसळ्या बाहेर पडत होत्या. प्रत्येक उसळी अंदाजे ३० ते १०० मीटर उंच उडत होती. भुईनळा उडत असताना जशा उसळत्या ठिणग्या उडतात, तशा इथे वाफेसह उडताना दिसत होत्या. फरक एवढाच, की आमच्यासमोर उडणाऱ्या ठिणग्या वितळलेल्या जड दगडाच्या होत्या. त्या कित्येक किलोग्रॅमच्या असतात. ज्वालामुखीच्या आतील लाव्हाचे सरोवर सलग दिसत नव्हते, तर ते तडे गेलेल्या काळ्या फत्तरांचे असावेत असे भासत होते. याचा अर्थ उकळत्या लाव्हावर दगडांची ‘साय’ तरंगत होती. कारण बाहेरील तापमान दगड वितळेल एवढे नसल्यामुळे तो अतितप्त असला तरी त्याचा पृष्ठभाग घनरूपात गेला. आसमंतात गंधकाचा (सल्फरडायॉक्‍साइडचा) वास दरवळत होता. लाव्हा बाहेर पडत असताना आवाज होत असतो. तो तुमच्या कानापर्यंत पोचवण्याचे श्रेय जोरदार वाहणाऱ्या वाऱ्याला जाते. आवाज व्हिडिओ कॅमऱ्यात जास्त चांगला रेकॉर्ड होतो. आमच्या समोर ज्वालामुखीच्या उद्रेकाचे नाट्य घडत होते. हे नाट्य १९८३ पासून सतत घडत आहे. आजूबाजूच्या जमिनीवरील शेकडो फटींमधून जोरदारपणे धूर-मिश्रित वाफ बाहेर पडत होती. याचा अर्थ आम्ही होतकरू ज्वालामुखीवरती वावरत होतो. अंधार पडू लागला होता. ज्वालामुखीच्या विस्तीर्ण विवरात तप्त लाव्हाच्या उत्तुंग उसळ्यांचा नारिंगी प्रकाश आणि त्यात दिसणारे धुराचे लोट - पाहणाऱ्याला भेसूर-भयप्रद वाटले तरी वेगळीच अनुभूती देतात. निसर्गाचे रौद्र स्वरूप दाखवतात. या रौद्र रूपातूनच आपल्या पायाखालील जमीन तयार झाली आहे. पर्यटक भानावर आल्यावर आपल्या अस्तित्वाची पूर्वपीठिका काय होती, याची जाणीव त्याला होते. 

या पुढे असे दृश्‍य दिसणार नाही. कारण किलावेहा ज्वालामुखीचा पृष्ठभाग मे (२०१८) महिन्यातील प्रचंड उद्रेकामुळे खूप खोल खचलेला आहे. उकळत्या दगडाचे दृश्‍य जरी दिसले नाही तरी पर्यटकांना ज्वालामुखीतून धुमसत बाहेर पडणारा धूर दिसेल. मे आणि ऑगस्ट दरम्यान झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लाव्हारस अनेक उत्तम बांधलेल्या (उताराच्या) रस्त्यांवरून संथ-सावकाश वाहू लागला. रस्त्यांना अनेक ठिकाणी भेगा पडल्या आणि त्यातून वाफा, धूर आणि लाव्हा उसळत बाहेर पडू लागला. या उद्रेकामुळे ६६० घरे भस्मसात झाली. लाव्हा सतत वाहात असल्यामुळे ५५५ एकर नवी भूमी तयार झाली. आता किलावेला व्हिजिटर सेंटरला जाता येणार नाही. तेथील वस्तूदालनाचे खूप नुकसान झालेले आहे आणि ते संपूर्ण पांढऱ्या राखेने भरलेले आहे. आम्ही ज्या ठिकाणावरून ज्वालामुखी पहिला ते ठिकाण आता (तसे) राहिलेले नाही. 

मुक्काम मुक्काम पोस्ट ‘हिलो’ 
बिग आयलंडवर मुक्काम करण्यासारखी दोन ठिकाणे म्हणजे कोना आणि हिलो. दोन शहरांमधील अंतर १०० कि.मी. आहे. हिलो हादेखील एक आंतरराष्ट्रीय हवाई-अड्डा आहे. आम्ही हिलो हवाईयन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. हवाई राज्यात हॉटेलच्या खाली एक भव्य जपानी बाग आहे. बाजूने नजरेत भरतील असे वटवृक्ष आहेत. इथला आठवडे बाजार पाहण्यासारखा आहे. भाजीपाला, फळे, सरबते, स्वयंपाकगृहातील मसाले आणि दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी येथे मिळतात. बाजारात पपई आणि टरबूज कापून ठेवलेले होते. आश्‍चर्य म्हणजे ते ९० टक्के भरीव होते. पोकळ जागाच नाही! आंबे, केळी, लिची, अननस आदी फळांचे विक्रेते ग्राहकांशी मजेत गप्पा मारत व्यवसाय करीत होते. हवाईमध्ये जेम्स डोल यांनी शंभर वर्षांपूर्वी अननसाचे संशोधन करून भरपूर उत्पादन घेतले आणि कॅनिंग करून जगभर निर्यात करून लोकप्रिय केले. येथे एक मध्यमवयीन ‘फॉरिनर’ महिला भेटली. ती अगरबत्ती, धूप, मध, कापूर, च्यवनप्राश, आयुर्वेदिक चूर्णे असा सात्त्विक घरगुती माल विकत होती. तिचे नाव होते सीतादेवी. ‘एस्कॉन’ची कृष्णभक्त असणारी सीतादेवी पूर्वी कर्नाटकातील हंपी येथे राहात होती. बाजारात विविध प्रकारची रताळी दिसली. त्यात टारो नावाच्या कंदापासून पीठ मिळते. त्यापासून ब्रेड आणि बिस्किटे तयार होतात. बाजारातील ग्राहक खास हवाईयन ब्राईट-रंगीत शर्ट घातलेले दिसतात. त्यावर नारळाची झाडे, समुद्र, फुले-फळे अगदी ब्राईटपणे प्रिंट केलेले असते. इथे कागदी-कापडी फुले तसेच शंख-शिंपले आदी माल विक्रीला असतो. खरेदी-विक्री झाल्यावर हसून ‘महालो’ असे म्हणायचे; महालो म्हणजे धन्यवाद, थॅंक्‍स! संथ आणि शांत असे हे फार्मर्स मार्केट! तेथील सर्वच वातावरण फोटोजेनिक होते. पण तेवढ्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. मग माहिती मिळाली, की मेघालयमधील चेरापुंजी/मॉन्सिराममध्ये दरवर्षी ११२५० मि.मी. पाऊस पडतो आणि बिग आयलंडमधील बऱ्याच भागात दहा हजार मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडतो. येथील माउंट वायालेअले येथे एके वर्षी माँसिरामपेक्षा जास्त म्हणजे ११,६६४ मि.मी. पाऊस पडला होता. 
हिलोदेखील इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. येथून हेलिकॉप्टरची सहल करता येते. मी फक्त स्टंट पिक्‍चरमध्ये आणि दूरवर हवेतून उडणारे हेलिकॉप्टर पाहिलेले होते. मात्र इथे मला (प्रथमच) अगदी जवळून हेलिकॉप्टर पाहायला आणि त्यातून उड्डाण करायला मिळाले. ते पायलट धरून ५ उतारूंचे होते. आमची वजने करून कुणी कुठे बसायचे ते ‘बॅलन्स’च्या दृष्टीने ठरवले गेले. पायलटने ४५ मिनिटांच्या उड्डाणात बरीच माहिती दिली. ती हेडफोनने ऐकायची असते. बोलायचे असेल तर वॉकी-टॉकीवरच! आकाशातून ५०० ते १००० मीटर उंचीवरून ज्वालामुखीचे आणि धबधब्याचे दर्शन घडवले. सर्व लॅंडस्केप छान दाखवले गेले. विशेषतः तप्त भडक लाव्हा आणि निखाऱ्यासारख्या लालबुंद शिळा भयानक दिसल्या. हेलिकॉप्टरचे लॅंडिंगही अलगद झाले, पण मला हवाईमधील हा हवेतील प्रवास ‘हवाहवासा’ वाटला नाही! 

हिलोमधील खिळवून ठेवणारे दृश्‍य आकाका फॉलचे आहे. हा धबधबा आजूबाजूच्या घनदाट वनश्रीमुळे विशेष आकर्षक दिसतो. बांबू, नेचे आणि ऑर्किड्‌सच्या सावलीतून आखून दिलेली, पण तरीही नैसर्गिक अशी दोन कि.मी.ची पायवाट आहे. वाटेत निसर्गाचे मनोरम्य पैलू पाहत पदयात्रा करायची, हे इथले वैशिष्ट्य. भरगच्च झाडींमधून आकाका धबधब्याचा प्रपात १३५ मीटरवरून (४४२ फूट) खाली कोसळतो. वाटेत काहुना धबधबा आहे. तो ३० मीटरवरून कोसळतो. हिलोमधील ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डन पाहण्यासारखे आहे. या भागात सतत पाऊस पडत असतो. त्यामुळे भेट देणाऱ्यांना (तात्पुरती) मोठी छत्री दिली जाते. ऑर्किड्‌स आणि शोभिवंत वनस्पती पाहात आम्ही बाग उतरत खाली जाऊ लागलो. मधेच एक छोटा धबधबा दिसतो. अननसाची टवटवीत झुडपे दिसतात. बागेच्या उतरंडीवर अचानक पॅसिफिक महासागराचा रम्य किनारा दिसतो. हा सुखद धक्का होता. अशा अनेक सुखद आठवणींचे गाठोडे घेऊन होनोलुलूला जाणारे विमान गाठायचे होते. तेव्हा मार्गस्थ झालो. हिलो आणि कोनाच्या कानाकोपऱ्यातील नयनरम्य परिसरात २-३ दिवसांत मजेत भटकण्याचा हा एक प्रयास होता. वेळ कापरासारखा झपाट्याने उडून गेला; पण तरीही समाधान वाटले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एका ठिकाणी लिहिलेले आठवले - ‘The butterfly counts not months but moments, and has time enough!’ ही एक छोटीशी हवाई सहल होती. बिग आयलंडच्या छोट्या भेटीत जे काही मिळाले ते आमच्या दृष्टीने सर्वच व्हेरी ‘बिग’ होते; ‘इनफ’ होते. मग अजून तरी काय हवेय आपल्याला?  

हवाईमधील जीवसृष्टी 
येथील प्राणी आणि वनस्पतीदेखील खूप वेगळ्या आहेत. नेने आणि नेचे हे येथील खास वैशिष्ट्य आहे. नेनेचे तोंड काळे आणि बाकी रंग करडा असतो. हा बदकासारखा पक्षी हवाई राज्याचा अधिकृत पक्षी आहे. हा फारसा पाण्यात जात नाही आणि उडतपण नाही. त्यामुळे त्याला मासे खायला मिळत नाहीत, पण नेनेंना गवतात किडे आणि बेडूक खायला मिळतात. हा नामशेष होऊ शकणारा पक्षी आहे. त्याच्यावर शास्त्रशुद्ध संशोधन चालू आहे. बिग आयलंडवरील वटवाघूळ जन्मजात वृद्ध दिसते. यामुळे याला प्रसिद्धी मिळाली आहे. विविध प्रकारचे उंदीरही येथे आहेत, पण आम्हाला दिसले नाहीत. आपल्या भिंतीवरील पाल राखाडी रंगाची दिसते. येथील पाली बहारदार हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या पाठीवर गोल पिवळे ठिपके असतात. अचानक हिरवी पाल कुठेही दिसते. इथे वाजवीपेक्षा खूप जास्त बटबटीत डोळे असणारे पण गोड शीळ वाजवणारे बेडूक आहेत. आपण साधारणतः नेचे (किंवा फर्न) वनस्पतीचे छोटे प्रकार पहिले असतील. फर्न वनस्पतीला ना फुले येत ना फळे. या अवनीवरती ३५ कोटी वर्षांपूर्वीची ही वनस्पती म्हणजे जणू जिवंत जीवाश्‍मच आहे! हे बेट म्हणजे ऑर्किड्‌सचे जागतिक केंद्र आहे. फर्नचा प्रसार पानाखाली असलेल्या जेनेटिक यंत्रणेमुळे होतो. येथील फर्नचे प्रकार आकाराने मोठे आणि नजरेत भरतील अशा हिरव्या रंगांचे आहेत. या बेटांवर भारतातील अंजीर, पेरू, जांभूळ आणि आंब्याची झाडे २०० वर्षांपूर्वी गेली होती. ती दाटीवाटीने वाढलेली दिसतात.

लाव्हाच्या अंत‘रंगात’ 
लाव्हारसाच्या रंगावरून त्याचे अंदाजे तापमान कळू शकते. लाव्हारस अतितप्त असताना त्याचा रंग चमकदार लिंबासारखा पिवळा दिसतो. त्याचे तापमान १३५० अंश से. असते. संत्र्यासारखा भगवा असेल तर १००० अंश से., लालसर भगवा असेल तर ८५० अंश से., जर्द तांबडा असेल तर ७०० अंश से. आणि खाकी-लाल असेल तर ६०० अंश से. असते. अतितप्त लाव्हारस जोरात उसळून बाहेर पडत असताना तो उताराकडे पाण्यासारखा धो-धो वाहतो. लाव्हा वाहण्याचा वेग ताशी १० ते ६० कि.मी. असतो. नंतर त्याचा वेग घट्ट झाल्यामुळे खूप संथ होतो. त्याचे तापमान ५०० अंशापेक्षा कमी असत. लाव्हा घनरूपात जातो तेव्हा तो निवायला किमान एक आठवडा लागतो. किलावेहामधून वाहाणाऱ्या लाव्हाची जवळून पाहणी करायला परवानगी आहे, पण ती जोखीम ज्याने त्याने घ्यायची असते, असा नियम आहे. तेथे जायला रस्ता नसतो. खडबडीत जमिनीवरून जावे लागते. लाव्हापासून किमान ३ ते ४ मीटर (६-१२ फूट) दूर राहून पाहणी करता येते. क्वचित पर्यटक लाव्हा येत आहे, तिथे ‘एरेटेड ड्रिंक’चा कॅन ठेवतात. कॅन जवळ लाव्हा पोचताच त्यातून पेयांची प्रचंड उंच चुळकांडी उडते. (अर्थात असे करू नये!). लाव्हाची धग सहन होणे शक्‍य होत नाही. सहसा प्राणहानी होत नाही. लाव्हा लवकर निवला तर तो गुळगुळीत होतो. सावकाश निवला तर फेस तयार होऊन त्यावर गोल भोके तयार होतात. नंतर हवा, पाण्याचा त्यावर परिणाम होऊन तो गुळगुळीत होतो. लाव्हारसात सिलिकॉन, ॲल्युमिनियम, लोह, कॅल्शिअम, टायटॅनियम, सोडिअम, पोटॅशियम आदी मूलद्रव्ये आढळतात. किलावेहामधील लाव्हा वाहत जाऊन थेट पॅसिफिक सागरात जाऊन पडतो. प्रचंड वाफ तयार होते आणि त्याच बरोबर नवीन किनाराही तयार होतो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या