प्राकृतिक सौंदर्याने नटलेला भूतान

विलास गंधे
सोमवार, 17 जानेवारी 2022

भ्रमंती

गौतम बुद्धांचा अहिंसाप्रिय व अत्यंत शांत स्वभाव याचा खरा अर्थ भूतान देशातील लोकांनाच जास्त कळला असावा, असे सहा दिवसांच्या वास्तव्यात आम्हाला प्रकर्षाने जाणवले. निसर्गरम्य अशा भूतानच्या आनंद भूमीतील आनंदी लोकांच्या अनेक आठवणी आम्ही सोबत आणल्या. त्या आम्हास कायमच आनंदी व समाधानी राहण्याची ऊर्जा देतील.

दिल्ली विमानतळावरून ड्रक एअरच्या विमानाने आम्ही भूतानमधल्या पारो येथे पोहोचलो. पारो विमानतळावर उतरल्यावर आम्ही आधी विमानतळाच्याच प्रेमात पडलो. संपूर्ण विमानतळ सर्व बाजूंनी उंचच उंच डोंगरांनी वेढलेला आहे. ‘चॅरिटी बिगिन्स ॲट होम’, या उक्तीप्रमाणे संपूर्ण विमानतळावर अत्यंत स्वच्छता होती. हा विमानतळ समुद्रसपाटीपासून ७३०० फुटांवर असल्यामुळे अत्यंत धोकादायक म्हणून जगात गणला जातो. विमानतळाला लागूनच पारो नदी आहे. उंच पर्वत शिखरे, दाट झाडी यामुळे विमानतळाच्या प्रेमात न पडतो तरच नवल! धोकादायक विमानतळामुळे येथील वैमानिकही जगातील दहा उत्कृष्ट वैमानिकांमध्ये गणले जातात. दुपारची अडीचची वेळ होती व थंड वाऱ्‍यांनी आमचे स्वागत केले. विमानतळाच्या इमारतीच्या भिंती अत्यंत उत्कृष्ट अशा भूतानमधील पारंपरिक चित्रे, नक्षीकाम इत्यादींनी रंगविलेल्या होत्या. भूतानी लोकांचा आपलेपणा, प्रेमळपणा आम्हास इमिग्रेशन करण्यापासूनच अनुभवायला मिळाला. तेथील गाइडने पांढरेशुभ्र उपरणे प्रत्येकाच्या गळ्यात घालून आमचे आनंदाने स्वागत केले व अत्यंत अदबीने नमस्कार केला.

भूतान म्हणजे उंच भूमीचा देश. उंचच उंच पर्वतरांगा, खोल दऱ्‍या व घनदाट हिरव्या जंगलामध्ये वसलेला हा लहानसा देश, नैसर्गिक सृष्टीसौंदर्याने अपार नटलेला आहे. ड्रॅगनचा देश म्हणूनही हा प्रसिद्ध आहे. ड्रक (Druk) म्हणजे ड्रॅगन. बऱ्‍याच नावांच्या सुरुवातीस ड्रक शब्द लावण्याची पद्धत आहे. उदा. ड्रक  एअर, ड्रक्यूल हॉटेल इ. या देशाच्या नकाशावरच ड्रॅगनचे चित्र आहे. प्रत्येक गावामध्ये झोंग (Dzong) असते. ते त्यांचे धर्मपीठ. तेथील प्रमुख व्यक्ती म्हणजे मंक (Monk) व त्यांच्या मदतीला/जोडीला असतात ते लामा. येथे पारंपरिक राजेशाहीपण आहे. लोकनियुक्त संसद असल्याने, राजाचीही चौकशी करण्याचा अधिकार संसदेस आहे.

पारोहून आम्ही थिम्फू या राजधानीच्या गावी गेलो. संपूर्ण शहराला कवेत घेणारा १६९ फूट उंचीचा बुद्धांचा अत्यंत भव्य व डोळे दिपवणारा पुतळा आम्ही प्रथम पाहिला. याला ‘बुद्ध डोरडेन्मा स्टॅच्यू’ म्हणतात. पुतळा ब्राँझचा आहे, आणि त्याला सोन्याचा मुलामा दिला आहे. संपूर्ण परिसर खूपच भव्य आहे. उंच टेकडीवर असल्याने थिम्फू शहरातून कोठूनही या पुतळ्याचे दर्शन होते. पुतळ्याखालील भव्य मंदिरात बुद्धांचे बारा इंच उंचीचे एक लाख पुतळे व आठ इंच उंचीचे पंचवीस हजार पुतळे बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हा भव्य पुतळा २०१५मध्ये उभारण्यात आला व पर्यटनप्रेमींचे ते मुख्य आकर्षण आहे.

तेथून ‘मोतिथांग टाकिन प्रिझर्व्ह’ हे प्राणिसंग्रहालय पाहण्यास गेलो. टाकिन (Takin) हा मेंढासदृश प्राणी भूतानचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्याचे संवर्धन तेथील सरकार कसोशीने करत आहे. दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे १०,५०० फूट उंचीवर असणारी ‘डोचु ला’ -खिंड. अतिशय नयनरम्य असे हे ठिकाण आहे. हिमशिखरांचे, असंख्य रंगीबेरंगी पक्षी व फुलपाखरांचे आजूबाजूच्या परिसरात दर्शन होते. २००३मध्ये ‘आसामी गुरील्ला’ युद्धामध्ये मारल्या गेलेल्या भूतानी शूर सैनिकांचे स्मृतिस्थळही लक्ष वेधून घेते. १०८ लहान चोरटेन (मंदिरे/स्तूप) या सैनिकांच्या स्मरणार्थ अतिशय सुंदररीतीने रस्त्याशेजारील टेकडीवर बांधली आहेत. 

येथून आम्ही पुनाखा या गावी गेलो. पुनाखा हे भूतानचे सर्वात जुने व १९५५पर्यंत राजधानीचे शहर होते. येथील किल्लासदृश मॉनेस्ट्री म्हणजे झोंग (Dzong) अतिशय भव्य व देखणी आहे. शेजारून सुंदर नदी वाहते व त्यामुळे सौंदर्यात आणखीनच भर पडते. या नदीत आम्ही राफ्टिंगचा थरारक आनंद घेतला. त्यानंतर आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या पारो शहरी आलो. येथील राष्ट्रीय संग्रहालय व राजवाडा पाहण्यासारखा आहे. संग्रहालयामध्ये भारताच्या भूतपूर्व पंतप्रधानांसमवेत भूतानच्या राजांचे, भारत-भूतान मैत्रीचे अनेक फोटो आहेत. तसेच, भूतानबद्दलची बरीच माहिती आणि अनेक ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आहे. पारोपासून जवळच ‘चेले ला’ ही १२,४०० फूट उंचीवरील सर्वात उंच  खिंडही आम्ही पाहिली.  

शेवटच्या दिवशी पारोजवळील सर्वात गर्दी खेचणारे ठिकाण म्हणजे ‘टायगर्स नेस्ट’ पाहण्यास गेलो. याचे मूळ नाव ‘पारो ताक्त्सांग’. हे ठिकाण पारो गावापासून २० कि.मी. अंतरावर आहे. बसमधून उतरल्यावर तीन किमीचा चढ पायी अथवा घोड्यावर बसून चढता येतो. नंतर ३.५ किमीचा चढ पायीच चढावा लागतो. त्यातील एक टप्पा म्हणजे ४५० पायऱ्‍या दरीत उतरायच्या व नंतर २५० पायऱ्‍या परत चढायच्या, तेव्हा आपण या मॉनेस्ट्रीला पोहोचतो. परत येताना ६.५ किमी पायीच यावे लागते. येताना उतार खूपच तीव्र असल्याने घोडे वापरत नाहीत. कारण पडण्याची शक्यता खूपच असते. मुख्य मंदिराची समुद्रसपाटीपासून उंची १०,२३२ फूट आहे. उंचच उंच डोंगरावर कडेकपारीत हे वाघाचे घरटे बांधले आहे. 

‘टायगर्स नेस्ट’ या मंदिराची आख्यायिका मोठी मजेशीर आहे. आठव्या शतकामध्ये बौद्ध गुरू पद्मसंभव, ज्यांना दुसरे बुद्ध म्हणून संबोधिले जाते, ते एका वाघिणीच्या पाठीवर बसून तिबेटहून आले. तिबेटमधील एका राणीने वाघिणीचे रूप घेतले होते. गुरू पद्मसंभवांनी ‘गुरू डोरजी ड्रोलो’ अशा भीती वाटणाऱ्‍या व्यक्तीचे रूप घेतले व गुहेतील दुष्ट शक्तींचा निःपात करून गुहा पूर्णपणे शुद्ध केली. त्यामुळे बुद्ध धर्माचे पावित्र्य राखले गेले. त्यांनी तेथे तीन वर्षे कठोर तपश्चर्या केली व नंतर एकूण आठ आविष्कारात ते प्रगट झाले. यामुळे बुद्ध धर्मात हे ठिकाण अत्यंत पवित्र मानतात. इ.स. १६९२मध्ये दोन मजली मंदिर बांधले गेले. सध्या येथे एकूण नऊ मंदिरे आहेत. आम्ही एकूण आठजण तिथपर्यंत चढून गेलो. माझ्यासह आमच्यापैकी पाचजण ६० ते ७० वर्षे वयाचे होतो. मी सर्वात वयस्कर. सुरुवातीचे तीन किमी आम्ही घोड्यावर बसून गेलो. संपूर्ण प्रवासाला एकूण साडेपाच ते सहा तास लागले. दाट हिरवाई, सर्वत्र पसरलेल्या/लावलेल्या बुद्ध मंत्रातील रंगीत पताका (ज्याला आपण पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश अशी पंचमहाभूते म्हणतो), सकाळच्या अत्यंत थंड हवेतील ओलावा व या सर्व वातावरणामुळे एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारे आध्यात्मिक पवित्र्य यामुळे आम्हास एक वेगळीच शक्ती मिळाली. आमच्यासोबत परदेशी लोकांचा भरणा अधिक होता. आम्ही दोन काठ्या घेतल्याने उतरताना त्यांचा खूपच आधार मिळत होता. ‘टायगर्स नेस्ट’ची यात्रा सफल झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्‍यावर होता.

भारताच्या तुलनेत फक्त सात लाख लोकसंख्येचा भूतान हा सर्वच दृष्टीने अत्यंत लहान देश आहे. सहा दिवसांच्या अत्यंत अल्प वास्तव्यात आम्हास अत्यंत महत्त्वाच्या व खूप चांगल्या गोष्टी शिकायला व अनुभवायला मिळाल्या. भूतानमधील सर्वच रस्ते अत्यंत चांगले व स्वच्छ होते. गावातील रस्त्यांवर कोठेच सिग्नल्स नव्हते. कोणीही वाहनचालक हॉर्नचा वापर करत नव्हते. रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचाच वापर करायचा असा कठोर नियम आहे, अन्यथा दंड खूप आहे. गावात कोठेच गर्दी,  गडबड दृष्टीस पडत नसे. सगळीकडे स्वच्छतेस प्राधान्य होते. प्रत्येक पर्यटन स्थळाजवळ ‘पेड रेस्ट रूम्स’ होत्या. टायगर्स नेस्टला जातानाही तीन किमीवर एक कॅफेटेरिया होते. तेथेच वॉशरूम्स होत्या. त्यानंतर फक्त टायगर्स नेस्टच्या मंदिरातच. भूतानमध्ये तंबाखू, धूम्रपान व प्लॅस्टिकला पूर्ण बंदी आहे. विशेष म्हणजे नियमांचे पालन आनंदाने केले जाते. सार्वजनिक स्वच्छता कसोशीने पाळली जाते.

वैद्यकीय सेवा नाममात्रच आहे, पण पूर्णपणे मोफत आहे. पुरुष व स्त्रियांचे प्रमाण १:५ असे आहे त्यामुळे हॉटेलमध्ये व इतर बऱ्‍याच ठिकाणी, म्हणजे बारमध्येसुद्धा कामास मुली अथवा स्त्रियाच जास्त आहेत. कामाच्या ठिकाणी पारंपरिक पोषाखच घालावा लागतो. पुरुषांच्या पोषाखास ‘घो’ व स्त्रियांच्या पोषाखास ‘किरा’ म्हणतात. मुख्य चलन नूल्ट्रम (Nultrum) आहे. भारतीय रुपयाइतकीच त्याची किंमत असल्याने आपल्या चलनाच्या नोटा तेथे चालतात. राजालाही भूतानमधील मुलीशीच लग्न करावे लागते. येथील राजाने स्वतःचा बंगला संसदेस दिला असून स्वतः एका लहान बंगल्यात राहतो. बहुतेक सर्व ठिकाणी राजा-राणींचे फोटो लावलेले असतात व त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात अपार श्रद्धा व आदर असतो. घरात बाळ जन्मल्यावर धर्मगुरूंच्या आशीर्वादानेच त्याचे नामकरण केले जाते.

भूतानमधील सर्वसामान्य जनता भारतीयांचा आदर करते. वागण्यात अत्यंत नम्र, चेहरे नेहमी हसतमुख असतात. त्यात समाधानी वृत्ती, नेहमी दुसऱ्‍याला मदत करण्यास तत्पर, अशा सर्व गुणांमुळे भूतानी जनता नेहमीच आनंदी राहते, म्हणून या देशाला ‘आनंदी लोकांचा देश’ असेही म्हणतात. नव्वद टक्क्यांच्या वर जनता बौद्ध धर्मीय आहे. गौतम बुद्धांचा अहिंसाप्रिय व अत्यंत शांत स्वभाव याचा खरा अर्थ भूतान देशातील लोकांनाच जास्त कळला असावा, असे सहा दिवसांच्या वास्तव्यात आम्हाला प्रकर्षाने जाणवले. 

टूर संपवून परतताना आकाश संपूर्णपणे निरभ्र असल्याने विमानातून जवळजवळ दीड तास उत्तुंग हिमशिखरांचे मनमुराद दर्शन झाले. त्यात एव्हरेस्टसकट अनेक महत्त्वाची शिखरे होती. येताना आम्ही आनंद भूमीतील आनंदी लोकांच्या अनेक आठवणी सोबत आणल्या. त्या आम्हास कायमच आनंदी व समाधानी राहण्याची ऊर्जा देतील.

संबंधित बातम्या