अनोखे ओआहू

डॉ. दीपा नाईक
सोमवार, 16 मे 2022

भ्रमंती

ढगांनी आच्छादलेली डोंगरांची रांग. समुद्रावरून येणारा वारा झाडांशी झोंबाझोंबी करी आणि वाऱ्याचे संगीत ऐकू येत येई. मधूनच पिवळे किंवा लाल डोके असलेले पक्षी गवतावर येऊन दाणे टिपत होते. बदके पाण्यावर संथ विहार करत, तर एखादा बगळा सूर मारून पाण्यात उतरत होता. असे हे सुंदर दृश्य चितारायचा मोह कुठल्याही चित्रकाराला, कवीला व्हावा, असाच! पण, आम्हा सामान्यांना निदान डोळ्यांत तरी हे दृश्य साठवून घ्यावे असे वाटले.

‘अगर फिरदौस बर रूए जमीनस्त, हमीनअस्त ओ हमीनअस्त, ओ हमीनअस्त’ (जर पृथ्वीतलावर स्वर्ग असेल, तर तो इथेच)... या अमीर खुसरोंच्या ओळींमधील वर्णन ज्या ठिकाणाला चपखल बसेल, अशा हवाईमध्ये राहण्याचा योग नुकताच आला. ३ डिसेंबर २०२१ रोजी आम्ही हवाईत आमच्या मुलाकडे दाखल झालो. इथे येण्याचे वेध तर आम्हाला वर्षभरापासूनच लागले होते. पण कोरोनाची पहिली लाट, मग दुसरी लाट यात आमचे बेत वाहून गेले. तिसरी लाट येण्याची चाहूल लागल्याच्या मधल्या काळात कसेबसे आम्ही इथे येऊन पोहोचलो, तेही तब्बल २९ तासांच्या प्रवासानंतर. शिकागोमार्गे विमान पॅसिफिकवरून होनोलुलुला पोहोचले, तेव्हा उतरतानाच धावपट्टीच्या लगतच्या समुद्र किनाऱ्याचे हिरवे, निळे, मोरपंखी तळापर्यंतचे पारदर्शक पाणी पाहून मनातही आनंदाचे तरंग उठले.

तिथून घरी जाताना आजूबाजूच्या सुंदर हिरवळ, नारळ, पाम व इतर घनदाट झाडांमधून झालेले समुद्र किनाऱ्याचे दर्शन, डाऊन टाऊनमधील उंचउंच इमारती, तर उंचसखल रस्त्याच्या कडेने असलेली टुमदार घरे व त्या भोवतालीचे सुंदर बगीचे शहराच्या सौंदर्याची साक्ष देत होते. आम्ही आल्यानंतर तीन चार दिवस इथे ढगफुटीसारखा धोधो पाऊस पडत होता. असा धोधो पाऊस जरी क्वचित असला, तरी पाऊस व वारा हे इथे नेहमीचेच असते. आणि असा ऊन पावसाचा खेळ सुरू असला की मधूनच क्षितिजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेले सप्तरंगी इंद्रधनुष्य, असे देखणे दृश्य वारंवार पाहावयास मिळते. इथल्या शुद्ध हवेमुळे हा सोहळा शक्य होतो. पाऊस थांबल्यावर आम्ही अक्षय राहत असलेल्या कंट्रीक्लब परिसरातून फेरफटका मारायला खाली उतरलो. भोवताली बावीस मजल्यांच्या चार इमारती, तर प्रवेशद्वाराशी टुमदार घरांची रांग व मध्यभागी पाच मजली पार्किंगची इमारत. आजूबाजूला सुंदर हिरवळीचे पार्क, तर भोवतालून जाणारी नागमोडी पायवाट. नारळ, पामची झाडे तर सगळीकडेच. पण पायवाटेच्या कडेला लाल, पिवळी, पांढरी टपोरी जास्वंद फुललेली. त्या झुडुपांच्या पलीकडून वाहणाऱ्या स्वच्छ सुंदर प्रवाहामागे गोल्फ कोर्सची हिरवळ पसरलेली दिसत होती. त्याही पलीकडे असलेली ढगांनी आच्छादलेली डोंगरांची रांग. समुद्रावरून येणारा वारा झाडांशी झोंबाझोंबी करी आणि वाऱ्याचे संगीत ऐकू येत येई. मधूनच पिवळे किंवा लाल डोके असलेले पक्षी गवतावर येऊन दाणे टिपत होते. बदके पाण्यावर संथ विहार करत, तर एखादा बगळा सूर मारून पाण्यात उतरत होता. असे हे सुंदर दृश्य चितारायचा मोह कुठल्याही चित्रकाराला, कवीला व्हावा, असाच! पण, आम्हा सामान्यांना निदान डोळ्यांत तरी हे दृश्य साठवून घ्यावे असे वाटले.

हवाई हे अमेरिकेचे पन्नासावे राज्य १९९८मध्ये मेनलँडशी जोडले गेले. सहा बेटांचा समूह असलेले हवाई यापूर्वी १८१०पासून कामेहमेहा व त्याच्या वंशजांच्या आधिपत्याखालील राज्य होते. बाराशे वर्षापूर्वी ताहिती बेटांवरून इथे येऊन पोहोचलेल्या पोलिनेशियन वंशाच्या लोकांनी इथे वस्ती केली. पुढे ब्रिटिश, पोर्तुगीज व अमेरिकी लोकांनी इथे येऊन पाय रोवले. त्यांचे उद्योगधंदे फोफावले व हळूहळू इथल्या राजाच्या व प्रजेच्याही मनाविरुद्ध अमेरिकेने ते आपल्याशी जोडून घेतले. शेवटची राणी लिलिओकलानी हिने १९१०मध्ये लिहिलेल्या आत्मचरित्रात ही व्यथा सुरेख मांडली आहे. अजूनही तुम्ही जेव्हा शहराबाहेर जाता, तेव्हा काही शेतांबाहेर लावलेल्या ‘नो सिटी, कीप द कंट्री’ व ‘न्यू सिटी, व्हॉट पिटी’ असे फलक वाचावयास मिळतात. इतर सुधारणा स्थानिकांना पसंत असल्या, तरी उंचउंच इमारतींचे आक्रमण त्यांना आवडत नाही. आपल्याच वर्णाच्या ठसठशीत, बसक्या चेहऱ्याच्या, धिप्पाड शरीराच्या, पण सौम्य स्वभावाच्या हवाईयन लोकांना आपल्या संस्कृतीचा खूप अभिमान आहे.

 हवाई बेटे ही पॅसिफिक टेक्टॉनिक प्लेटच्या खाली असलेल्या हॉटस्पॉटमध्ये उसळलेल्या ज्वालामुखीच्या लाव्ह्याचे थर एकावर एक जमत जमत तयार झाली. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी बेटे तयार होत गेली. तशी ही बेटे शंभराच्या वर असली, तरी त्यातील सहा बेटे महत्त्वाची आहेत. त्यातील ‘बिग आयलँड’ हे सर्वात मोठे व सर्वात तरुण. तर राजधानीचे शहर होनुलुलु असलेले ओआहू हे बेट तिसऱ्या नंबरचे. या सर्व घटना लाखो वर्षांपासून घडत असल्या, तरी अजून काही बेटांवर जिवंत ज्वालामुखी आहेत.   

ओआहू या बेटावर सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी उसळलेल्या ज्वालामुखींची राख जमत जाऊन तयार झालेल्या डोंगरांच्या रांगा, सुंदर समुद्र किनारे व घनदाट जंगले पाहायला मिळतात. ‘डायमंड हेड’, ‘कोको क्रेटर’, ‘हनाउमा बे’, ‘पाली लुकआऊट’ या महत्त्वाच्या जागा त्याची साक्ष देतात. ‘डायमंड हेड’ या ५७० फूट उंच असलेल्या डोंगर पायथ्याशी क्रेटरच्या जागी गोलाकार सुंदर हिरवळीचा बगीचा आहे. तेथे वर चढून होनोलुलुच्या वायकीकी या डाऊन टाऊनचे मनोहारी दृश्य दिसते. ‘कोको क्रेटर’च्या मध्यभागी बोटॅनिकल गार्डन निर्माण झाले आहे. इथे जगातील निरनिराळ्या आकाराची कॅक्टस पाहावयास मिळतात, तर ‘हनाउमा बे’ हा सर्वात सुंदर कोनाकृती बे स्नॉर्कलिंगसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या नितळ आरस्पानी पाण्यात अनेक प्रवाळ व समुद्रजीव आहेत. आम्ही ही तिथं स्नॉर्केलिंग करून तळाशी असलेले रंगी बेरंगी कोरल व मासे पाहण्याची मजा अनुभवली. ‘पाली लुकआउट’ हाही कडा ढगांनी वेढलेला. तेथून ओआहू बेटाचे मनोहारी दर्शन होते. हनाउमा बेच्या लगतचा नागमोडी रस्त्याला लागून असलेल्या लाव्हांच्या खडकांवर उभे राहून उसळणाऱ्या लाटांची शोभा पाहता येते, तर ‘ब्लो रॉक’ या पॉइंटवर लाट परतली की एका खडकातून कारंजासारखे उडणारे पाणी दिसते. ज्वालामुखीच्या राखेत राहून गेलेल्या भेगेतून हे पाणी येते. त्या पुढच्या ‘मकापू लुकआऊट’च्या पॉइंटवर नजर डावीकडून उजवीकडे ३६० अंशात वळविली, की उंच डोंगराच्या लगतचा रस्ता, त्या खालील रौद्र रूपातला समुद्र, त्यापुढे पुन्हा डोंगर व पुन्हा दूरवरचा समुद्र किनारा असा अप्रतिम नजारा पाहायला मिळतो. त्याही पलीकडे जाऊन ‘मकापू बीच’वर सर्फिंग करणारी मंडळी रौद्र लाटांनंतर झूमकन पुढे जातात व तीच लाट वेगाने त्यांना पुन्हा किनाऱ्यावर आणून टाकते. ते धडपडत, सावरत पुन्हा लाटेवर स्वार होत समुद्रात शिरतात, तोच थरार अनुभवायला. 

सर्फिंगच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेला ‘सनसेट बीच’ होनोलुलुच्या उत्तरेस आहे. हिवाळ्याच्या दिवसात इथे पन्नास साठ फूट उसळलेल्या लाटा पाहायला मिळतात. इथे सर्फिंगच्या जागतिक स्पर्धाही होत असतात. इथल्या उतरत्या वाळूच्या किनाऱ्यावर बीच चेअर टाकून सूर्यास्ताचा क्षितिजावरील रंग उधळलेला सोहोळा पाहायला आम्हीही दोन तीन वेळा गेलो होतो. तिथे जाताना वाटेत ‘हलैवा’ हे ऐतिहासिक गाव पाहता येते. हे सर्फिंग व फिशिंग करणाऱ्यांचे आवडते गाव. ‘लानाकाई’ हाही इथला सुंदर बीच. श्रीमंतांच्या सुंदर घरांच्या बाजूला असलेल्या अरुंद पायवाटेने तुम्ही तिथे पोहोचता, तेव्हा तिथल्या निळ्या मोरपंखी पाण्यात शिरून तळाशी असलेले पांढरे रंगीत प्रवाळांचे दगड व सुळकन पळणारे मासे पाहणे, ही मजा काही औरच. पोहता येत नसले, तरी तिथल्या पांढऱ्या वाळूत पाय पसरून बसण्याचा आनंद वेगळाच.

‘को ओलीना’ या समुद्र किनाऱ्यालगतच्या डिस्ने रिसॉर्ट व अन्य चार उंची हॉटेलसमोर चार सुंदर लगून आहेत. पर्यटकांना केव्हाही त्यात डुंबण्याचा आनंद घेता येतो. हवाईची खासियत म्हणजे, येथील सर्व समुद्र किनारे सार्वजनिक आहेत. कुठेही खासगी समुद्र किनारा नाही. 

डाऊन टाऊनचा ‘वायकीकी बीच’ जगप्रसिद्ध आहे. तेथील ‘कालाकौआ’ मार्ग नेहमीच प्रवाशांनी फुललेला. असे सर्वच समुद्र किनाऱ्यांवर बिकीनीमधील स्त्रिया व उघड्या अंगाचे पुरुष दिसतात. अला मुआना बीच हाही डाऊन टाऊनच्या जवळचा. तिथला समुद्र तसा संथ व फार खोल नसलेला. त्यामुळे, त्या ठिकाणी आम्ही तिथल्या वाळूत बसून कॉफीचा आस्वाद घेत कधी सूर्यास्त पाहत, तर कधी पाण्यात शिरून पोहण्याचा आनंद घेत तासन् तास घालविले.

नव्या वर्षाचे स्वागत करायलाही आम्ही ‘अला मुआना बीच’ पार्कवर गेलो होतो. त्या रात्री दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने काही तासांची विश्रांती घेतली होती. हौशी पर्यटक छत्र्या घेऊन तिथली आतषबाजी पाहायला आले होते, तर काही पाण्यावर तरंगणाऱ्या बोटींवरून जल्लोष करीत समुद्रावर होणाऱ्या आतषबाजीतील चांदण्यांचा वर्षाव पाहात होते. 

‘कुआलुआ बीच’ व त्या लगतच्या चार हजार एकरात पसरलेला ‘कुआलुआ रँच’ आहे. घनदाट झाडी असलेल्या या पर्वतराजीत ज्युरासिक पार्क, ज्युरासिक वर्ल्ड व इतर जवळजवळ साठ चित्रपटांचे चित्रण झाले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना त्या त्या चित्रपटांच्या जागा पाहायला खास बसमधून जाता येते. या पर्वतराजींसमोरच पसरलेल्या बीचच्या टोकाशी ‘कुआलुआ पार्क’ आहे. तेथे अगदी समोरच तीन मैलावर ‘चायनीज हॅट’च्या आकाराचा सुळका वर आला आहे. त्याला ‘चायना हॅट’ असे नाव आहे. या सोनेरी वाळूच्या किनाऱ्यावर कॅम्पिंगला, वाढदिवस साजरे करायला व खेळायला येणाऱ्यांची गर्दी असते. घराजवळील ‘केहाई’ या छोट्या बंदरावर गळ टाकून मासे पकडणारे हवाईयन, त्यात विहरणाऱ्या नौका व विमानांचे जवळून होणारे लँडिंग व टेकऑफ हे पाहण्यातही आम्ही अनेक संध्याकाळी घालविल्या.

समुद्र किनाऱ्यांव्यतिरिक्त इथली आकर्षणे म्हणजे ऐतिहासिक ‘पर्ल हार्बर,’ ‘डोल प्लान्टेशन’ व अनेक सुंदर बोटॅनिकल गार्डन. ७ डिसेंबर १९४१ रोजी जपानने अमेरिकेच्या या तळावर अनपेक्षित, परंतु अचूक हल्ला करून तळ उद्‍ध्वस्त केला होता. तेथे उभ्या असलेल्या ‘यूएस ॲरिझोना’ या युद्धनौकेसह त्यातील ११७० सैनिकांना जलसमाधी मिळाली. २० मिनिटांचा लाँचचा प्रवास करून पांढऱ्या ‍रंगातील हे स्मारक पाहायला जाता येते. बुडालेल्या जहाजाचे अवशेषही पाहता येतात. या हल्ल्यानंतर अमेरिका युद्धात उतरली व त्याची परिणिती जपानमधील हिरोशिमा व नागासाकीवरील अणुबाँब हल्ल्यात झाली. सध्या इथे अमेरिकेचा पॅसिफिक महासागरातील ‘वेस्टर्न कमांड’चा मोठा तळ आहे.  

अननस हे हवाईत होणाऱ्या महत्त्वाच्या फळांपैकी एक. मूळ ब्राझीलहून येथे आलेल्या या फळाला अमेरिकेत व जगभर लोकप्रिय करण्याचे श्रेय जेम्स डोल या व्यक्तीला जाते. त्याने १८९९मध्ये इथे येऊन ऊस, कॉफी, अननस यांची लागवड केली. ‘डोल प्लान्टेशन’ हे आता पर्यटकांचे महत्त्वाचे आकर्षण झाले आहे. या उद्यानातील रंगीबेरंगी टॉयट्रेनमधील अर्ध्या तासाच्या प्रवासात दोन मैलाच्या फेरफटक्यात रसरशीत अननसांची झुडुपे, ऊस, कॉफी, केळी, मॅकॅडेमिया या फक्त हवाईत होणाऱ्या हेझलनटसारख्या फळांची शेते पाहिली व अननसापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला. तेथील ‘पाईनॲपल मेझ’ (भूलभुलैया अथवा नागमोडी वाटांचे जाळे) हे जगातील सर्वात मोठे असून, त्याबाजूचे ‘पॉलिनेशियन’ गार्डनही आकर्षक आहे. तसेच, या बेटावरील बारमाही पावसाच्या आठ ते दहा बोटॅनिकल गार्डनपैकी ‘कोको क्रेटर’ हे ज्वालामुखीच्या मधोमध असलेल्या गोलाकार भागातील गार्डन वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर, ‘वायेमिया व्हॅली’ पार्कमधील गार्डन पॉलिनेशियन संस्कृतीचे दर्शन घडविते. 
ही आहे हवाईतील फक्त ओआहू बेटाची झलक.

संबंधित बातम्या