एका युद्धाची जिवंत कहाणी!

डॉ. सुमंगल फडणीस
सोमवार, 31 जानेवारी 2022

भ्रमंती

सन १९६२मध्ये भारतीय जवानांनी चिनी सैन्याचा प्रतिकार करून तोडीस तोड उत्तर दिले. अतुलनीय पराक्रम केला. प्रयत्नांची पराकाष्ठा करून अनेकांनी आपला देह धारातीर्थी ठेवला. या हरलेल्या युद्धाची, पण जिवंत कहाणी, आपल्याला तवांगच्या ‘वॉर मेमोरियल’मध्ये पाहायला मिळते.

ता. २२ ऑक्टोबर १९६२- आपल्या देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील एक काळा दिवस! या दिवशी   चीनच्या सैनिकांनी पूर्वीच्या नेफा म्हणजेच नॉर्थ ईस्ट फ्रन्टियर एजन्सी व सध्याच्या अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण केले. सुमारे एक महिनाभर चाललेल्या या युद्धात आपल्या सैन्याचा पराभव झाला. अंदाजे ३५ हजार चौ.मैलाचा आपला प्रदेश चिनी सैन्याने गिळंकृत केला. आपले २,२४० अधिकारी व जवान या युद्धात धारातीर्थी पडले. अपुरी अत्याधुनिक शस्त्रसामग्री, अति उंच बर्फाच्छादित डोंगरावर लढण्याचा प्रशिक्षणाचा अभाव, कडाक्याची थंडी, बर्फ यापासून बचाव करण्यासाठी लागणारी उपकरणे, पोषाख, शूज, स्वेटर्स यांची कमतरता आणि अपुरी तयारी, गाफीलपणा वगैरे अनेक कारणे  या पराभवासाठी कारणीभूत ठरली. अत्यंत मानहानिकारक अशा या पराभवाचे राजकीय पडसाद उठले. तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांना राजीनामा द्यावा लागला व यशवंतराव चव्हाण यांची त्यांच्या जागी नियुक्ती झाली, हा सर्व इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहेच. परंतु, या पराभवातही दिसून आले आपल्या सैनिकांचे देशप्रेम, शौर्य आणि नीतिधैर्य! चिनी सैन्यास प्रतिकार करून त्यांनी तोडीस तोड उत्तर दिले. अतुलनीय पराक्रम केला. प्रयत्नांची पराकाष्ठा करून अनेकांनी आपला देह धारातीर्थी ठेवला. या हरलेल्या युद्धाची, पण जिवंत कहाणी, आपल्याला तवांगच्या ‘वॉर मेमोरियल’मध्ये पाहायला मिळते.

जवळजवळ सर्वच अरुणाचल प्रदेश हा डोंगरदऱ्यांनी व्याप्त आहे. भारत व चीन यांची मुख्य सरहद्द आहे अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथील १६,५०० फुटांवरील उंचीच्या बुमला पास येथे! १९६२च्या युद्धात चिनी सैन्य या ठिकाणापासून १३,५०० फुटावरील सेला पास येथपर्यंत आले होते. तवांग (१३,५०० फूट)पासून अंदाजे १० किलोमीटर अंतरावर हे वॉर मेमोरियल स्थापन केले आहे. एका उंच टेकडीवर, सभोताली विस्तीर्ण उताराचा प्रदेश, दूरवर दिसणारी मॉनेस्ट्री, दूरवर डोंगरावर उतरलेले ढग, थंड वारा आणि भुरभूर पावसाचा शिडकावा... अशा नयनरम्य वातावरणात हे मेमोरियल पाहता आले. प्रत्येक ठिकाणी सैन्याची शिस्त आणि स्वच्छता दिसून येते. स्मृतीस्थळाच्या चित्र प्रदर्शनाच्या भिंतीवर धारातीर्थी पडलेल्या २,२४० अधिकारी व जवानांची नावे सोनेरी अक्षरात कोरलेली आहेत. तेथील जवान हेच तिथले गाइड आहेत. नेहमीच्या गाइडप्रमाणे केवळ पाठ केलेली पोपटपंची न करता तेथील गाइड न कंटाळता प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचे असे रसभरीत वर्णन करतात की जणू तो युद्धाचा प्रसंग आपल्यासमोर घडत आहे असा भास व्हावा. त्यांच्या वर्णनातून ओतप्रोत आपुलकी, देशप्रेम आणि निष्ठा दिसून येते. 

मेमोरियलमध्ये मुख्य ठिकाणी सुभेदार जोगिंदर सिंग याचा पितळी धातूचा अर्ध पुतळा आहे. त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले. याठिकाणी त्यांचे कुटुंबीयासोबतचे फोटो, परमवीर चक्र व त्याचे सायटेशन ठेवलेले आहे. याविषयी कहाणी अशी आहे - सुभेदार जोगिंदर सिंग हे २३ ऑक्टोबर १९६२ रोजी, म्हणजे जेव्हा युद्ध सुरू झाले त्या दिवशी बुमला पास येथे एका प्लाटूनचे कमांडर होते. अंदाजे २०० चिनी सैनिकांचा हल्ला त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परतवून लावला. दुसऱ्या वेळी चिनी सैन्य आणखी कुमक घेऊन आले, त्यापैकी अनेकांना जोगिंदर सिंग यांनी यमसदनी पाठवले. पुन्हा तिसऱ्या वेळेस चिनी सैन्य आणखी कुमक घेऊन आल्यावर शर्थीने जोगिंदर सिंग व त्यांच्या सैनिकांनी प्रतिकार केला. दारूगोळा संपल्यावर रायफलच्या बोनेटच्या साहाय्याने अनेकांना यमसदनास पाठवले. त्यांच्या मांडीवर व इतर अनेक ठिकाणी गोळ्या लागल्या. अखेर चिनी सैन्याने त्यांना कैद केले. कैदेत असतानाच अनेक जखमा व फ्रॉस्ट बाइटमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी शौर्य, धैर्य, नेतृत्व दाखवून व जिवाची पर्वा न करता शत्रू सैन्याला थोपविण्याची शर्थ केली. या अतुलनीय पराक्रमासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा बहुमान देण्यात आला.

या मेमोरियलच्या भेटीबरोबरच लाइट व साउंड शोलाही उपस्थित राहिलो. ओपन स्टेडिअममध्ये साधारणतः ३०० ते ४०० लोक एकावेळी बसू शकतील अशी योजना केलेली आहे. आलेल्या अतिथींचा थंड वातावरणापासून बचाव करण्यासाठी जागोजागी हिटर ठेवलेले आहेत.  

समोर मोठ्या पडद्यावर त्यावेळच्या युद्धातील प्रसंगाचे चित्रीकरण दाखवले जाते व त्याबरोबरच देशभक्तिपर गाणी ऐकविली जातात. सर्वच वातावरण उल्हसित करणारे, देशप्रेमाने भारीत व अंगावर रोमांच आणणारे असे असते. बाहेरील थंड हवा, पाच डिग्रीच्या आसपास असलेले तापमान, पावसाची बारीकशी भुरभूर, वातावरणात पसरलेले धुके, खाली आलेले ढग... ‘युद्धस्य कथा रम्य:’ या वचनाप्रमाणे एकेक जवानाच्या शौर्याच्या कहाण्या ऐकताना चालू असणारे समालोचन कधी संपूच नये असे वाटते! लाइट  व साउंड शो संपल्यानंतर एका वेगळ्याच विचारांनी, प्रेरणेने भारीत होऊन पर्यटक बाहेर पडतो.

अशाच तऱ्हेचे आणखी एक छोटेसे  मेमोरियल सेलापासून काही अंतरावर जसवंतगड येथे आहे. या ठिकाणी डोग्रा रेजिमेंटचे रायफलमन जसवंत सिंग यांचे मेमोरियल आहे. चिनी सैनिकांकडे आधुनिक रायफल, मशिनगन होत्या, तर आपल्या जवानांकडे खटका पुढे मागे ओढून गोळ्या उडविणाऱ्या ३.३ रायफल! ऐन युद्धात मशिनगनपुढे टिकाव धरण्यासाठी त्यांच्या मशिनगन हस्तगत करणे भाग होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यावेळी हवालदार जसवंत सिंग व इतर एक-दोनजण चिनी सैनिकांच्या मागच्या बाजूने जाऊन नमवून त्यांच्या मशिनगन आणण्यासाठी गेले. त्यांनी अनेक चिनी सैनिकांना कंठस्नान घालून त्यांच्या मशिनगन हस्तगत केल्या. परंतु परत येत असताना हवालदार जसवंत सिंग यांना डोक्यावर गोळी लागली व त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले. या मेमोरियलच्या ठिकाणी त्यांचा पुतळा, त्यांचा गणवेश, त्यांची रायफल व इतर वापराच्या वस्तू ठेवल्या आहेत. ते ज्या झाडाखाली मरण पावले, त्या झाडाचा बुंधाही तिथे ठेवला आहे. त्या झाडाला अजूनही पालवी फुटते. यामुळेच जसवंत सिंग जिवंत नसले तरी ते अजूनही आपल्यातच आहेत अशी इतर सैनिकांची भावना आहे. जेवणाचे ताट रोज आधी तेथे त्यांच्या पुतळ्यापुढे ठेवले जाते आणि नंतरच इतर जेवायला घेतात. त्यांच्या स्मृतीस आदरांजली म्हणून त्या जागेला ‘जसवंत गड’ असे नावे दिले आहे.  या मेमोरियलजवळच एका ठिकाणी युद्धात मारल्या गेलेल्या अंदाजे ३०० चिनी सैनिकांचे मृतदेह दफन केले आहेत. तेथे कुंपण घातले आहे. त्या सैनिकांची कोणतीही अवहेलना न करता, ‘दे फॉट फॉर देअर कंट्री!’ असा फलक लावला आहे. यातच आपल्या देशाचा मानवतावादी दृष्टिकोन दिसून येतो.

ईशान्येकडील सर्वच प्रदेश हा अलौकिक अशा सृष्टीसौंदर्यानी नटलेला आहे. या प्रदेशाची भटकंती केल्यास अरुणाचल प्रदेशाला अवश्य भेट द्या,  आणि अरुणाचल प्रदेशात गेल्यास तवांगचे हे वॉर  मेमोरियल पाहण्यास विसरू नका. आपण भारतीय असल्याचा तुमचा अभिमान नक्कीच द्विगुणित होईल!

संबंधित बातम्या