सूर्यमंदिर-उत्कृष्ट कलेचा नमुना 

डॉ. राधिका टिपरे
सोमवार, 16 मार्च 2020

भ्रमंती
 

सातव्या शतकानंतरच्या पाचशे वर्षांत ओरिया वास्तुकलेच्या अंतर्गत अनेकोत्तम मंदिरांची निर्मिती ओडिशाच्या भूप्रदेशात होत राहिली. यामध्ये पुरीचे जगन्नाथ मंदिर, भुवनेश्‍वर येथील लिंगराज मंदिर, मुक्तेश्‍वर मंदिर, राजाराणी मंदिर, रामेश्‍वर मंदिर ही व अशी लहानमोठी अनेक मंदिरे निर्माण केली गेली. आपल्याला इथे असेही म्हणता येईल, की सातव्या शतकात सुरू झालेल्या ओरिया स्थापत्य कलाशैलीच्या परंपरेत, शतकानुशतके संचयित होत गेलेल्या कलानुभवाचा उत्कृष्ट परिपाक म्हणजेच तेराव्या शतकात निर्माण झालेले कोनार्कचे सूर्यमंदिर होय! 

आज या मंदिराचे उर्वरित अवशेष पाहूनही आपण चकित होऊन जातो. कारण स्थापत्यशैली, वास्तुकला आणि शिल्पकला यांचे इतके प्रमाणबद्ध वास्तव रूप मंदिराच्या रूपात नजरेसमोर पाहून भोवंडून जायलाच होते. सूर्यमंदिराच्या संपूर्ण वास्तूचे स्थापत्य हे एका भव्य आकाराच्या रथाप्रमाणे रचलेले आहे. या रथाला चोवीस चाके असून सात घोडे हा रथ ओढताहेत अशी प्रमुख वास्तुरचना आहे. हे संपूर्ण मंदिर म्हणजेच ‘सहस्त्ररश्मी भगवान सूर्यदेव आपल्या सात घोड्यांच्या रथामध्ये बसून आकाशाच्या पार्श्‍वभूमीवर उदयास्ताच्या दिवसभराच्या प्रवासाला निघाले आहेत,’ या पौराणिक कथेचा सौंदर्याविष्कार आहे असेच म्हणता येईल. ज्या उंच चौथऱ्‍यावर हा भव्यदिव्य रथ उभा आहे, त्या चौथऱ्‍याच्या भिंतीवर अपूर्व अशी शिल्पकला पाहायला मिळते. या चौथऱ्‍याच्या उत्तर दक्षिण आणि पश्‍चिम बाजूच्या भिंतीवर, तसेच पूर्वेकडील पायऱ्‍यांच्या बाजूला असणाऱ्‍या भिंतीवर मिळून बारा जोड्या चक्रे कोरलेली आहेत. वर्षांच्या बारा महिन्यांचे प्रतिकात्मक रूप म्हणून कोरलेली ही चाके (चोवीस चक्रे) अप्रतिम कोरीवकामाने नटलेली आहेत. चक्रांच्या आतमध्ये आठ नाजूक तर आठ जाड आकाराच्या आऱ्‍या कोरलेल्या आहेत. हे आठ आठ विभाग म्हणजे दिवसाचे आणि रात्रीचे आठ आठ प्रहर आहेत. सूर्यदेवाच्या रथाला जोडलेले सात अश्‍व म्हणजे आठवड्याचे सात दिवस असून वर्षाचे बारा महिने आणि सातही दिवस अष्टौप्रहर सहस्ररश्मी आपल्या रथातून आकाशाच्या निळाईमध्ये संचार करीत असतो. अगदी खऱ्‍याखुऱ्‍या रथचक्राप्रमाणे वाटणाऱ्‍या रथाला चाकांशी जोडणारी आंख (अ‍ॅक्सल) आणि त्यावर बसवलेली कानखीळसुद्धा कोरण्यात आलेली आहे. अर्थातच सूर्यमंदिराचा रथाशी असलेला संबंध आणि साम्य, घोडे आणि रथाची चाके इथपर्यंतच आहे. बाकी पूर्ण मंदिराचे स्थापत्य मात्र ठराविक ओरियापद्धतीचे आहे.

या सूर्यमंदिराचे तीन प्रमुख विभाग आहेत. ओरिया पद्धतीच्या स्थापत्यशैलीनुसार इतर अनेक मंदिरांमध्ये असते त्याप्रमाणे इथेही मुख्य मंदिर किंवा रेखादेऊळ होते, ज्यामध्ये गर्भगृह होते. या मुख्य मंदिरामध्ये सूर्यदेवतेची प्रतिमा स्थापित करण्यात आली होती. रेखादेवळाच्या पुढे असते ते भद्रदेऊळ किंवा पिधादेऊळ म्हणजेच सभागृह. या सभागृहाला जगमोहना असेही म्हणतात. जगमोहनाच्या वास्तूला मंदिराचे प्रवेशद्वार असते. आज कोनार्क येथे जगमोहनाचीच भव्य इमारत उभी आहे आणि या जगमोहनाला तीन प्रवेशद्वारे आहेत. सूर्यमंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेस आहे. त्याच्या जोडीला उत्तर आणि दक्षिण दिशेसही प्रचंड आकाराची प्रवेशद्वारे आहेत. (आता ही सर्व द्वारे बंद करण्यात आली आहेत.) या तीनही प्रवेशद्वारांच्या द्वारशाखा अप्रतिम अशा कोरीवकामाने नटलेल्या आहेत. अर्थातच पूर्व प्रवेशद्वार आणि त्याच्या आठ द्वारशाखा यावरील कोरीवकाम अतिउत्तम आहे. आज पूर्णावस्थेत उभे असणाऱ्‍या जगमोहनाच्या पश्‍चिम बाजूस कोसळलेल्या रेखा देवळाच्या दगडमातीच्या ढीग तसाच पडून आहे. त्या काळातही या मंदिराच्या स्थापत्यामध्ये मोठमोठ्या लोखंडी तुळ्यांचा वापर झाल्याचे पाहायला मिळते. या सूर्यमंदिराशी अनेक दंतकथा जडलेल्या आहेत. 

आज उभ्या असलेल्या जगमोहनाची उंची ३९ मीटर आहे. यावरूनच त्याच्या पाठीमागे असणाऱ्‍या रेखादेवळाची उंची किमान ६१ मीटर तरी असावी असा अंदाज आर्कियॉलॉजिस्ट वर्तवतात. भद्रमंदिराच्या समोर असणारा नृत्यमंडप किंवा भोगमंडप मात्र आज छताविनाच उभा आहे. जगमोहनाची वास्तुरचना केवळ अद्वितियच आहे. सूर्यदेवतेच्या दर्शनाला येणारे भक्तगण या सभागृहाच्या आतमध्ये जमा होत असत. ज्या चौथऱ्‍यावर रेखादेऊळ आणि आत्ताचे जगमोहना उभे होते तो चौथरा पंचकोनी आकाराचा आहे. तसेच ही दोन्ही देवळेही बाहेरून पंचरथ आकाराची होती. मात्र, अंतर्भागात ही दोन्ही मंदिरे चौकोनी आकारात आहेत. सूर्यमंदिराच्या बाह्यभिंती, ओरिया वास्तुशैलीनुसार अनेक कोनात बांधण्यात आलेल्या आहेत. या प्रकारे एकापेक्षा अनेक कोनात बांधलेल्या भिंतींना रथ किंवा पागा असे म्हणतात. यातील मधल्या कोनाला राहा म्हणतात, पंचरथाच्या आकारात अनेक रथ किंवा पागा, कनिका यांच्या साहाय्याने उभारलेल्या मंदिराच्या भिंतींना प्रकाशयोजनेचा अत्याधिक फायदा होतो. शिवाय भिंतीच्या एकाच बाजूवर, अनेक शिल्पाकृतींनी सजवण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकते. एकच बाजू अनेक मितींमधून शिल्पांकित करण्यासही मदत होऊ शकते.

रेखादेऊळ आणि भद्रादेऊळ यांचे ओरिया वास्तुकलाशास्त्रानुसार चार भागात विभाजन केले जाते. तळापासून सुरू करता, पहिले पिश्ट किंवा पाया म्हणजेच चौथरा. दुसरा विभाग म्हणजे वाडा (बाडा), त्यावरती येणारा विभाग म्हणजे गंडी आणि शिखराचा शेवटचा भाग म्हणजेच मस्तक. या वास्तूचा आडवा छेद घेतला असता, वाडा आणि गंडी हे भाग आतल्या बाजूने चौरस असतात, तर मस्तक नेहमीच गोलाकार असते. मंदिराच्या वास्तूचे चार भाग हे मनुष्य देहाच्या चार अंगाशी मिळते जुळते मानून त्यांचे नामकरण केलेले आहे. कारण देऊळ हेसुद्धा मनुष्यदेहाचे प्रतीकात्मक स्वरूपच असते असे मानले जाते. ओरिया वास्तुकलाशास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे, रेखादेऊळ हे पुरुष प्रतीक असून पिधादेऊळ अर्थात जगमोहना हे स्त्री प्रतीक आहे. पिश्ट (पाया) आणि वाडा हे भाग दोन्ही मंदिरांच्या बाबतीत जवळजवळ सारखेच असतात. मात्र गंडी भागात दोन्ही वास्तूंच्या स्थापत्यशैलीमध्ये फरक असतो. सूर्यमंदिराच्या रेखादेवळाचा गंडी भाग गोलाकार पद्धतीने उंच होत गेला होता. परंतु भद्रादेवळाच्या बाबतीत मात्र पिधा पद्धतीचे छत आहे. पिधा पद्धतीचे छत म्हणजे पिरॅमिड अथवा शंकूच्या आकाराचे छत असलेली वास्तू होय. एकमेकाला लागून बांधल्या जाणाऱ्‍या या दोन्ही वास्तूंच्या उभारणीमध्ये अत्यंत कौशल्यपूर्ण समन्वय असल्याशिवाय संपूर्ण वास्तूला पूर्णत्वाचा आकार मिळणे अशक्यच असते. कोनार्क सूर्यमंदिराच्या अतिभव्य वास्तूच्या प्रत्येक थरांच्या बांधणीमध्ये आणि त्यावरील शिल्पकामामध्ये सुंदर परिपूर्णता आहे. एकावर एक चिरा ठेवून केलेले हे भव्य बांधकाम कुशलतेने आणि प्रमाणबद्धतेने केलेले. गंडीपासूनच मुख्य देऊळ आणि भद्रदेऊळ यातील फरक लक्षात यायला लागतो. हा फरक पुढे मस्तक बांधणीतही सुस्पष्ट होत जातो. श्री, बेकी, आमलक पद्धतीची गोलाकार उशी, त्यावर घंटीच्या आकाराचे दगडी चिरे, कधी कधी आयुधे, कधी राज्याचे राजप्रतिक यांना स्थान दिले जाते. सर्वात शेवटी शिखराच्या मध्यबिंदूवर, सोने, चांदी, तांबे किंवा मिश्रधातू यांचा कलश आणि राज्याचा पद्मध्वज यांचे स्थान असते. शिखराचा कळस आणि त्यावर असणारा ध्वज अथवा राज्यप्रतिक यांचे स्थापत्य अत्यंत प्रमाणबद्धरीतीने केले जाते. 

मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारासमोरच भोगमंडप अथवा नटमंडप किंवा नृत्यमंडप या नावाने ओळखली जाणारी अप्रतिम कोरीवकामाने नटलेली वास्तू आहे. अनेक स्तंभांच्या विशिष्ट रचनेतून या सुरेख मंडपाची रचना करण्यात आलेली आहे. या नृत्यमंडपावरील छत कधी कोसळले असावे याची माहिती उपलब्ध नाही. मात्र मंदिराच्या आवाराची साफसफाई करताना मंडपाच्या जवळच अतिशय सुंदर कोरीवकाम केलेला गोल आकाराचा दगड सापडला होता. तो बहुधा नृत्यमंडपाच्या छतावरील शिरोभागाचा असावा असे काही संशोधकांना वाटते. हा नृत्यमंडपसुद्धा एका उंच चौथऱ्‍यावर बांधलेला आहे. या मंडपाचे छतही पिधा पद्धतीचे असावे असे मानले जाते. चौथऱ्‍याच्या चारही बाजूस पायऱ्‍या आहेत. चौथऱ्‍याच्या सर्व भिंतींवर अप्रतिम अशी शिल्पकला पाहायला मिळते. या भिंतींवर असणाऱ्‍या बहुतेक शिल्पाकृती अप्रतिम देखण्या सौंदर्यवतींच्या आहेत. स्त्री प्रतिमा, नृत्यांगना, वादक, विविध पेहरावातील पुरुष प्रतिमा, अर्धस्तंभ, लहान आणि मोठ्या आकाराचे देवकोष्ठ, या कोष्ठांमध्ये कोरण्यात आलेल्या विविध प्रतिमा, अष्टदिक्पाल, अशा व इतर अनेक प्रकारच्या मूर्ती पाहून शिल्पकारांचा कल्पनाविलास तसेच उत्कृष्ट कारागिरी यामुळे दिपून जायला होते. स्त्रीप्रतीमांमध्ये इतके वैविध्य आहे, की कळतच नाही, काय पाहावे आणि किती पाहावे... तारुण्याने मुसमुसलेल्या नवयौवनांचे मनमोहक भावविभ्रम, वेगवेगळ्या मोहक मुद्रा, अंगविक्षेप, विविध केशरचना, अलंकारातील वैविध्य, हस्तमुद्रा, पदन्यास तथा नृत्यमुद्रा आणि अगणित प्रकारची तालवाद्ये, तंतुवाद्ये... काय सांगावे आणि किती सांगावे! दागदागिन्यांनी नटलेल्या अभिसारिका, नृत्यांगना, राजस्त्रिया यांच्याबरोबर केशवपन केलेल्या साध्वी स्त्रियाही शिल्पप्रतिमांच्या रूपांमध्ये आपण पाहतो. काही पुरुष प्रतिमा इतक्या वेगळ्या आहेत, की त्यांचा पेहराव आणि आविर्भाव पाहून वाटते ही मंडळी परकीय दर्यावर्दी लोक आहेत. त्यांच्या केसांची रचना, चेहऱ्‍यावरील हावभाव, विकृत हास्य, हसणे, यातील वेगळेपणा पाहून चकित व्हायला होते. नृत्यकलेशी आणि संगीत कलेशी संबंधित हरतऱ्‍हेची वाद्ये इथे आहेत. नृत्यशैली आणि नृत्यमुद्रा यामध्येही वैविध्य पाहायला मिळते. 

उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशेला असणाऱ्‍या पायऱ्‍यांना लागून भव्य आकाराचे साजशृंगाराने नटलेले, अप्रतिम कोरीवकाम असलेले हत्तींचे शिल्प, युद्धासाठी सजलेले अश्‍व, खाली बसलेल्या गजराजावर पंजा ठेवून गुरकावणारे शार्दूल अशी मोठ्या आकाराची शिल्पे भोगमंडपाच्या तीनही बाजूस होती, मात्र ही सर्व शिल्पे मूळ जागेपासून निखळलेली आहेत. आता हत्ती आणि घोडे यांना उत्तर आणि दक्षिण दिशेला नव्याने बांधलेल्या चौथऱ्‍यांवर पुन:प्रस्थापित केले आहे. गजराजावर पंजा रोवून गुरकावणाऱ्‍या शार्दूलांच्या प्रतिमा भोगमंडपाच्या पूर्व प्रवेशद्वाराजवळील पायऱ्‍यांजवळ नव्याने मांडलेल्या आहेत. भोगमंडपाच्या दक्षिणेस स्वयंपाकघराचे अवशेष आहेत. तेथे तयार झालेल्या प्रसादाचा भोग, सूर्यदेवाला भोगमंडपातून चढवला जात असावा. विशेष म्हणजे भोगमंडपाच्या छतावर जमा झालेले पावसाचे पाणी खाली उतरण्यासाठी ज्या पन्हाळी आहेत, त्यामध्येसुद्धा इतकी कल्पकता दाखवलेली आहे, की मन थक्क होऊन जाते. अर्थात या गोष्टीचे वर्णन करण्यापेक्षा त्या समक्ष पाहणेच सयुक्तिक ठरेल असे या ठिकाणी सांगावेसे वाटते.

कोनार्कच्या सूर्यमंदिराच्या बहिर्भागावर अगदी तळाच्या पट्टिकांपासून ते शिखराच्या गंडीपर्यंत अप्रतिम शिल्पकाम केलेले पाहायला मिळते. अगदी नाजूक कलाकुसरीपासून ते भव्य आकाराच्या कलोझल मूर्तींपर्यंत सर्व काही या ठिकाणी आहे. हे सर्व शिल्पकाम अचेतन दगडाला चैतन्य देऊन संपूर्ण वास्तूला एक दैवी परिमाण देऊन जाते. प्रत्येक गोष्टीचे वैशिष्ट्य इतके परिपूर्ण आहे, की वास्तुकला आणि शिल्पकला यामध्ये डावे उजवे करता येत नाही. वास्तुकला आणि शिल्पकला या दोन्ही कला परिपूर्णतेने एकमेकींच्या सौंदर्यात इतकी भर टाकतात, की कोनार्कचे हे सूर्यमंदिर उत्कृष्टतेच्या बिंदूपाशी पोचते. 

हरतऱ्‍हेची शिल्पकला या मंदिराच्या निर्मितीमध्ये पाहायला मिळते आणि ती इतकी अजोड आहे, की त्याची अनुभूती कलाकाराच्या अभिव्यक्तीचे, कल्पनाशैलीचे श्रेष्ठत्व पाहणाऱ्‍याच्या मनावर गारुड करत राहते. या ठिकाणी देवदेवतांच्या मूर्ती आहेत. सौंदर्यवती, तरुण कन्यका, वाद्य वाजवणारे स्त्रीपुरुष, धार्मिक मूर्ती, पशू-पक्षी, पाणपक्षी, पौराणिक व्यक्तिरेखा अशा अगणित संकल्पना आहेत. या सर्वांच्या जोडीला वास्तुकलाशास्त्राशी संबंधित अर्धस्तंभ, कोष्ठ, देवकोष्ठ, पानाफुलांची वेलबुट्टी, हत्ती, घोडे, लढणारे योद्धे, पायदळ, घोडेस्वार, भौमितिक नक्षी यांचे प्रत्येक स्तरावर दिसणारे शिल्पपट्ट पाहताना मन अगदी संतृप्त होऊन जाते. पूर्णाकारातील सौंदर्यवती कन्यकांची स्वतंत्र उभी शिल्पे पाहून तर जीव थक्क होऊन जातो. वेगवेगळी वाद्ये वाजवणाऱ्‍या कलावंतिणी, त्यांच्या चेहऱ्‍यावरील सौम्य भाव, त्याचे स्मितहास्य हे पाहिल्यानंतर आपण जागच्या जागी खिळून उभे राहतो. शिल्पकारांना अभिप्रेत गोष्टी जाणून तरी कशा घ्यायच्या असा प्रश्‍न पडून आपण नकळत भान हरपून जातो. 

राजा, त्याची दिनचर्या, राजस्त्रिया, आम्रपालिका, शालभंजिका, सुरसुंदरी, नृत्यांगना, नाग-नागीण, त्यांच्या मैथुनाची अगणित शिल्पे हे व असे इतके वैविध्य इतरत्र कुठे क्वचितच पाहायला मिळते. तत्कालीन कलाकारांनी शिल्पकलेला बटीक करून कोनार्क मंदिराच्या भिंतींवर तिला बंदिवान करून टाकले आहे. मात्र, यापलीकडे जाऊन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी अगणित कामशिल्पे सूर्यमंदिराच्या भिंतींवर मोठ्या संख्येने कोरलेली आहेत. कामजीवनाचे संयत मर्म आणि सुखदर्शक स्वरूप सांगणारी मिथुन शिल्पे भारतातील अनेक शिवमंदिरांच्या बाह्य भिंतींवर अग्रक्रमाने कोरल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, कोनार्क मंदिराच्या भिंतीवर कोरण्यात आलेल्या कामशिल्पांचे शिल्पांकन अत्यंत भडक आणि स्त्रीपुरुष शरीरसंबंधाविषयीच्या अत्यंत विकृत आणि असांस्कृतिक पद्धतींना ठळकपणे मांडणारे आहे असे ठामपणे सांगावेसे वाटते. कोनार्क मंदिरामध्ये अशी कामशिल्पे का कोरली गेली असावीत हे एक मोठे प्रश्‍नचिन्हच आहे. कोनार्क मंदिराच्या भिंतीवर असणारी अनेक कामशिल्पे सामाजिक नीतिमूल्यांचे उल्लंघन करणारी आहेत असे प्रखरपणे जाणवते. या शिल्पकलेच्या निर्मितीमागचे कारण काय असावे या संदर्भात कितीही विचार केला तरी त्याचे योग्य उत्तर मिळत नाही. कारणे काहीही असोत, कोनार्क मंदिराच्या बाह्यभिंतीवरील उच्च दर्जाच्या शिल्पकलेने आपण जेवढे भारावून जातो तेवढेच या विकृतीकडे झुकणाऱ्‍या कामशिल्पांमुळे संभ्रमित होऊन जातो, आश्‍चर्यचकित होऊन जातो. 

भारतीय संस्कृतीची मुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. हे खरे असले, तरी कधी कधी या खोलीचा अंदाज येत नाही हेच खरे! मात्र अजोड शिल्पकला आणि अप्रतिम स्थापत्यकला यांनी अजरामर झालेले सूर्यमंदिर पाहिल्यानंतर अशी कारागिरी पुन्हा होणे संभव नाही, हे सत्य मनात आल्यावाचून राहत नाही. आयुष्यात एकदा तरी हे भव्य मंदिर पाहिले पाहिजे असे आवर्जून सांगावेसे वाटते हे मात्र नक्कीच!

संबंधित बातम्या