शांतिप्रासाद

प्रसाद फाटक
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

भ्रमंती

नेदरलँड्समधला ‘पीस पॅलेस’ ऊर्फ ‘शांतिप्रासाद’... याच्या नावात ‘पॅलेस’ असलं तरी इथं राजा किंवा राजघराण्यातील कुणीही राहत नाही. या प्रासादाचा उद्देश आहे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या प्रयत्नांना व्यासपीठ मिळवून देणं!

दूधदुभत्याचा आणि सायकलींचा देश अशी ख्याती असणाऱ्या नेदरलँड्समधल्या ‘हेग’ या शहरामध्ये कामानिमित्त काही महिने वास्तव्य करण्याची मला संधी मिळाली. वीकएंडला सायकलवरून हेगमध्ये मनमुराद भटकंती करायचो, तेव्हा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या, आणि मुख्य म्हणजे सुस्थितीत असलेल्या अनेक वास्तू दिसायच्या. असंच एकदा फिरत असताना एका भव्य प्रासादाने लक्ष वेधून घेतले होते. पण तेव्हा ती कोणती वास्तू आहे याची मला कल्पना नव्हती. काही दिवसांनी वेगळ्या संदर्भात इंटरनेटवर शोध घेत असताना या प्रासादाचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात आलं आणि मग मात्र मी तो बघायला गेलो. ती वास्तू म्हणजे ‘पीस पॅलेस’ ऊर्फ ‘शांतिप्रासाद’. याच्या नावात ‘पॅलेस’ असलं तरी इथं राजा किंवा राजघराण्यातील कुणीही राहत नाही. या प्रासादाचा उद्देश आहे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या प्रयत्नांना व्यासपीठ मिळवून देणं!

 एकूण ३,३०० चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला हा भव्य प्रासाद म्हणजे, ‘रेनेसाँ रिव्हायव्हल आर्किटेक्चर’ या संज्ञेनं ओळखल्या जात असलेल्या स्थापत्यशैलीमध्ये बांधलेली, दुरूनही लक्ष वेधून घेणारी अशी देखणी वास्तू आहे. प्रासादाच्या आवाराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला एक माहिती दालन उभं केलेलं आहे. या दालनामध्ये शतकभराहून अधिक काळ सुरू असलेल्या शांततेसाठीच्या प्रयत्नांचा इतिहास मांडला आहे. अनेक ऐतिहासिक वस्तू, छायाचित्रे, माहितीफलक यांच्यासोबतच ध्वनिफिती, चित्रफिती या माध्यमांमधून हा इतिहास उलगडत जातो. माहिती दालनात प्रवेश केल्याबरोबर आपल्याला ‘ऑडिओ गाइड’ यंत्र, हेडफोन आणि सोबतच एक लेझर पेन दिलं जातं. हेडफोनचं टोक ‘ऑडिओ गाइड’ला जोडायचं. आपण दालनामधल्या माहितीफलकांच्या/छायाचित्रांच्या वर असणाऱ्या सेन्सरच्या दिशेनं लेझर पेनमधून किरण सोडला, की आपल्या कानातल्या हेडफोन्समध्ये माहितीची ध्वनिफीत सुरू होते. 

दालनाची सुरुवातच रशियन लेखक लिओ टॉल्स्टॉयची जगप्रसिद्ध कादंबरी ‘वॉर अँड पीस’च्या जुन्या आवृत्तीनं होते. यापुढे आपल्याला माहिती मिळते ती जागतिक शांतता परिषदांची. ‘युद्ध ही चांगली गोष्ट नाही, ते टाळण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नांची गरज आहे,’ ही जाणीव असणाऱ्या काही व्यक्ती त्याही काळात होत्या. याच भावनेतून रशियाचा झार निकोलस (द्वितीय) याच्या पुढाकाराने १८९९ साली पहिली ‘हेग शांतता परिषद’ आयोजित केली गेली. या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय तंटे सोडवण्यासाठी ‘पर्मनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन’ (Permanent Court of Arbitration -PCA) हा लवाद स्थापन केला गेला. यानंतर दुसरी ‘हेग शांतता परिषद’ १९०७ साली हेग शहरामध्ये पार पडली. या परिषदांची छायाचित्रं, त्या संदर्भातली ऐतिहासिक कागदपत्रं आपल्याला या दालनात पाहायला मिळतात.

आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी कायमस्वरूपी अशी वास्तू असावी या विचारानं १९०७च्या शांतता परिषदेदरम्यानच शांतिप्रासादाची पायाभरणी झाली आणि १९१३ साली त्याचं उद्‍घाटन झालं. शांतिप्रासादासाठी नेदरलँड्सची निवड करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे पूर्वीपासून या देशाची प्रतिमा शांत आणि तटस्थ अशी आहे (पुढे दुसऱ्या महायुद्धादरम्यान नेदरलँड्स देश युद्धाचा हिस्सा बनल्यानं इथले न्यायालय हेगमधून जिनीव्हा शहरात हलवण्यात आलं होतं. महायुद्धानंतर हे न्यायालय पुन्हा हेगमध्ये परतलं).

 स्कॉटिश-अमेरिकी उद्योगपती अँड्रयू कारनेजी यानं शांतिप्रासाद उभा करण्यासाठी तब्बल १५ लाख डॉलर देणगी दिली होती! आजही शांतिप्रासादाचं व्यवस्थापन ‘कारनेजी फाउंडेशन’तर्फे बघितलं जातं. माहिती दालनामध्ये अँड्रयू कारनेजीबद्दलची माहिती आणि त्यानं दिलेल्या आर्थिक मदतीची आठवण असणाऱ्या धनादेश/पावतीची प्रतिकृती या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. शांतिप्रासादाच्या उभारणीसाठी अनेक देशांनी मदत केली होती. या प्रासादाचे भव्य प्रवेशद्वार जर्मनीनं तयार करून दिलेलं आहे. माहिती दालनात प्रवेशद्वाराची मूळ किल्लीदेखील ठेवलेली आहे. 

 आज शांतिप्रासादामध्ये पीसीए या लवादाबरोबरच संयुक्त राष्ट्रांच्या ‘आंतरराष्ट्रीय न्यायालया’चं (International Court of Justice – ICJ) मुख्यालयही आहे. याच न्यायालयात पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा टाळण्यासाठी खटला चालला आणि जाधव यांची फाशी स्थगित झाली. खटल्याची सुनावणी ऐकायला सर्वसामान्य माणूस उपस्थित राहू शकतो, याची मला कल्पना नव्हती. सुनावणी झाल्यानंतर मला कळले, की आधी नोंदणी करून काही निवडक लोकांना सुनावणीसाठी उपस्थित राहता येऊ शकते! सुनावणी चालू असताना हेगमध्येच असूनही हा ऐतिहासिक खटला अनुभवण्याची संधी मी दवडली, याची मला प्रचंड हळहळ वाटली. 

शतकभरापूर्वीही भारतीयांच्या जिव्हाळ्याचा एक खटला या हेग शहरातच चालला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांच्या ताब्यातून सुटण्यासाठी मार्सेलिस (Marseilles) बंदराजवळच्या समुद्रात जहाजातून उडी मारून फ्रान्सचा किनारा गाठला होता आणि फ्रेंचांची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात सावरकरांचा ताबा मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने फ्रेंच सरकारविरुद्ध खटला लढला आणि सावरकरांना पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं.

माहिती दालनामध्ये ‘आयसीजे’ आणि ‘पीसीए’ या दोन्हीतील फरक उलगडून दाखवणारे तांत्रिक तपशील दिलेले आहेत. ‘आयसीजे’मध्ये विविध देशांमधून नेमले गेलेले पंधरा न्यायाधीश असतात. कामकाजाची भाषा इंग्रजी आणि फ्रेंच असते. याचं कामकाज सार्वजनिक आणि खुलं असतं. ही संयुक्त राष्ट्रांची प्राथमिक न्यायालयीन शाखा (Primary Judicial Branch) आहे. ‘पीसीए’ ही संयुक्त राष्ट्रांशी संबंधित नाही. इथं लवादाची नेमणूक संबंधित पक्षकार करतात. सुनावणीची भाषाही पक्षकार ठरवू शकतात. हे कामकाज खासगी आणि गोपनीय असतं. देशांनी आपापसातले मतभेद युद्धभूमीवर न सोडवता न्यायालयात सोडवावेत या हेतूनं सुरू झालेल्या प्रयत्नांमुळे आत्तापर्यंत अनेक देशांमधील वादावर तोडगा काढला गेला आहे. माहिती दालनात काही गाजलेल्या खटल्यांची माहितीही दिलेली आहे. 

शांतिप्रासादामध्ये आंतराष्ट्रीय कायद्याशी संबंधित पुस्तकांचं हे जगातलं सर्वात जुनं आणि सर्वात मोठं ग्रंथालय आहे. ‘द हेग ॲकॅडमी ऑफ इंटरनॅशनल लॉ’ ही आंतराष्ट्रीय कायद्यामधलं उच्चशिक्षण देणारी संस्थाही याच वास्तूमध्ये कार्यरत आहे. प्रत्यक्ष शांतिप्रासादाचं आतून दर्शन घेण्याची संधी मात्र आधी नोंदणी करून आणि वर्षातले मोजकेच दिवस उपलब्ध असते. माहिती दालनामधला एक भाग माझ्या विशेष स्मरणात राहिलेला आहे. एका काचपेटीत सैनिकाचं शिरस्त्राण, काडतुसं आणि एका फ्रेंच सैनिकानं युद्धादरम्यान लिहिलेल्या पत्रांचा संग्रह दिसतो. या पत्रांमधून युद्धाची भीषणता कळून येते. हे बघत असतानाच दालनाच्या काचेच्या भिंतीतून आपल्याला शांतिप्रासाद दिसत असतो. सैनिकाच्या आठवणींच्या पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या त्या शांतिप्रासादाला एक वेगळेच परिमाण प्राप्त होते. हे दृश्य विचारमग्न होण्यास भाग पाडतं. 

माहिती दालनाच्या शेवटच्या भागामध्ये जागतिक स्तरावरच्या शांतीच्या प्रयत्नांच्या इतिहासावरची  पुस्तकं ठेवलेली दिसतात. त्यात भारतीयांचं लक्ष वेधून घेणारी पुस्तकं आहेत, ती महात्मा गांधीजींवरची! गांधीजींचं जगभरच्या जनमानसातलं स्थान काय आहे, हे अशा ठिकाणी कळतं. गांधीजींकडून प्रेरणा घेतलेल्या नेल्सन मंडेला आणि अन्य नेत्यांवरची अनेक पुस्तकंही आपल्याला या विभागात बघायला मिळतात. 

माहिती दालनाच्या बाहेर एक झाड आहे, जे फळांनी नव्हे तर चिठ्ठ्यांनी लगडलेलं आहे! कुणालाही कागदाच्या तुकड्यावर आपला शांतीसंदेश लिहून ती चिठ्ठी या झाडाला अडकवता येते. देशोदेशीच्या पर्यटकांनी लिहिलेल्या असंख्य भाषांमधल्या चिठ्ठ्यांनी हे झाड बहरून गेलं आहे. आपल्याला त्यांच्यावरचं अक्षर कळलं नाही, तरी त्यामागचा भाव नक्की कळतो! जवळच एक कट्टा आहे, ज्यावर जगातील विविध भाषांमध्ये ‘शांती’ हा शब्द लिहिलेला आहे. 

कट्ट्याच्या बाजूलाच एक दगडांची वेगळीच रचना लक्ष वेधून घेते. मध्यभागी एका ग्रॅनाईटच्या छोट्याशा मनोऱ्याच्या कोंदणात २००४पासून सतत तेवत असणारी पीस फ्लेम अर्थात शांतिज्योत आहे. १९६ देशांनी या ज्योतीच्या संकल्पनेला आपला पाठिंबा दर्शवला अन् त्यातून ही साकार झाली आहे. ज्योतीभोवतीचा प्रत्येक दगड हा त्यातल्या एकेका देशाचं प्रतिनिधित्व करतो. ही शांतिज्योत म्हणजे हिंसक संघर्षाच्या अंधःकारातला छोटासा का होईना, पण आश्वासक किरण आहे!

संबंधित बातम्या