मला भेटलेला चार फुटी अश्वत्थामा

राजन पेंढारकर 
सोमवार, 9 मे 2022

भ्रमंती

असे म्हणतात की नर्मदा परिक्रमा मार्गावर अश्वत्थाम्याचा वास आहे. तो या ना त्या रूपाने दर्शन देतो व अवघड प्रसंगी येऊन त्यातून निघण्याचा मार्च दाखवतो म्हणे. मग आमची त्याची भेट झाली का? कसा होता तो दिसायला? होय, मी म्हणेन भेटला आम्हाला अश्वत्थामा. एकदाच नाही तर अनेकदा. निरनिराळ्या रूपात. प्रत्येकाचे वर्णन करत बसलो, तर कागद आणि वेळ दोन्ही कमी पडतील असे वाटते. म्हणून आज इथे आम्हाला भेटलेल्यांपैकी एका अश्वत्थाम्याच्या भेटीचा अनुभव मी मांडणार आहे.

मी  आणि शेखर दामले, आम्ही दोघेही महाराष्ट्र मंडळ शाळेचे अगदी बालपणापासूनचे वर्गमित्र. हायस्कूल गुलटेकडीला असल्याने मग आम्ही सगळी गावातली मुले शाळेत सायकलवरून जाऊ लागलो. थोडक्यात काय, तर आमचे नि सायकलचे नाते आमच्या इतकेच जुने आहे. पुढे काही कारणाने ही दुचाकी आमच्यापासून थोडी दुरावली खरी. परंतु आता वयाच्या साठीला मुलेबाळे मार्गी लागली म्हणून मग व्यवसायातून स्वेच्छेने निवृत्त झालो आणि ‘तिने’ पुन्हा आम्हाला जवळ केले. व्यायामाची आवड होतीच त्यामुळे फारसा सराव न करता आम्ही हा व्यासंग नित्यनियमाने करायचे ठरवले.

‘नर्मदा परिक्रमे’बद्दल बरेच ऐकले होते, वाचले होते. बहुतांश लोक ही परिक्रमा पायी करतात. मग आपण सायकलवरून करावी असा विचार आला. याआधी पुण्यातल्या ज्यांनी ज्यांनी सायकलीवरून परिक्रमा केली आहे, त्यांना भेटलो, त्यांचे मार्गदर्शन घेतले. निश्चय केला आणि शेवटी २८ डिसेंबर रोजी सायकली इंदोरच्या ट्रेनमध्ये चढवून आम्ही निघालो. पुढे सायकली बसच्या टपावर चढवून आम्ही ओंकारेश्वर गाठले. दुसऱ्या दिवशी आम्ही नर्मदा किनारीस्थित ओंकारेश्वराच्या मंदिरात यथासांग परिक्रमेचा संकल्प सोडला व सायकलीवर स्वार होऊन पायडल मारायला सुरुवात केली.

रोज सुमारे १०० कि.मी. परिक्रमण करायचे, हा एकच अलिखित नियम. त्यामुळे तारीख/वार कशाचेच भान नव्हते. कधी संपेल? काय अडचणी येतील? असल्या प्रश्नांना नर्मदा परिक्रमेत वाव नाही, हे पहिल्या काही दिवसांतच लक्षात आले. अडचणी आल्याच नाहीत असे झाले का? तर नाही. वेळोवेळी निरनिराळ्या प्रकारच्या अडचणी येत गेल्या व त्या त्या वेळी त्यावर मार्ग निघत गेले. 

या परिक्रमा मार्गावर अश्वत्थाम्याचा वास आहे; तो या ना त्या रूपाने दर्शन देतो व अवघड प्रसंगी येऊन त्यातून निघण्याचा मार्ग दाखवतो, असे ऐकून होतो. काहींना तो पीळदार अंगयष्टीचा चांगला धिप्पाड साडेसहा-सात फुटी तेजस्वी पुरुषाच्या रूपात भेटल्याचे ऐकले होते. मग आमची त्याची भेट झाली का? कसा होता तो दिसायला? मी म्हणेन, होय, भेटला आम्हाला अश्वत्थामा. एकदाच नाही तर अनेकदा. निरनिराळ्या रूपात. कधी अगदी ८-१० वर्षांच्या मुलाच्या रूपात, तर कधी ७०-७५च्या वयस्कर वृद्धाच्या रूपात. प्रत्येकाचे वर्णन करत बसलो, तर कागद आणि वेळ दोन्ही कमी पडतील असे वाटते. म्हणून आज इथे आम्हाला भेटलेल्यांपैकी एका अश्वत्थाम्याच्या भेटीचा अनुभव मी मांडणार आहे.

तो आमच्या परिक्रमेचा तेवीसावा दिवस होता. काय काय अडचणी येऊ शकतात याची चांगलीच कल्पना एव्हाना आम्हा दोघांनाही आली होती. त्या दिवशी पहाटे आम्ही डिंडोरीवरून पुढे निघालो व दिवसाअखेर मंडला येथे मुक्काम करायचा असा विचार होता. अमरकंटकला तट-परिवर्तन करून एक दिवस झाला होता. आता आमचा प्रवास दक्षिणतटावरून ओंकारेश्वराच्या दिशेने सुरू झाला होता. वाटेत देवगांव लागते, रस्ता सरळ नर्मदेवरील पुलावरून जातो. परंतु तसे गेले असता परिक्रमा खंडित होते. तशी चेतावणी देणारी पाटी परिक्रमावासीयांसाठी अलीकडे डाव्या हाताला वळणाऱ्या फाट्यावर आहेच. आम्ही ती वाचली व खात्री करण्याकरिता थोडे पुढे गेलो. तेवढ्यात एका स्थानिकाने वाट अडवली, जेवणाचा आग्रह केला व डावीकडल्या त्या कच्च्या रस्त्याने नर्मदा संगमाकडे जायचा सल्ला दिला. देवगांव येथे हा संगम नर्मदा मैय्या व बूढ़ी मैय्या (बाडनेर नदी) यांचा आहे.

परिक्रमावासी या संगमाच्या घाटावर येतात. उजव्या बाजूने नर्मदा येते व डावीकडून येणाऱ्या बूढ़ी मैय्येला हाताला धरून पुढे घेऊन जाते. हे  दृश्य अतिशय सुंदर आहे. नर्मदेचे पात्र विस्तीर्ण आहे. घाटदेखील खूप मोठा आहे. परिक्रमावासीयांना या बूढ़ी मैय्येच्या प्रवाहातून पायी पलीकडे जावे लागते. आमच्याकडे असलेले सामान, सायकली हे सगळे घेऊन समोर दिसणाऱ्या त्या खळखळणाऱ्या नदीचे पात्र पार करायचे आहे, या कल्पनेनेच धडकी भरली. अनेक प्रश्न अचानक समोर कमरेवर हात ठेवून उभे ठाकले. तेवढ्यात नर्मदेच्या पात्रात पोहत एकमेकांवर पाणी उडवून खेळणाऱ्या स्थानिक मुलांपैकी एकाची नजर बहुधा आमच्या डोळ्यांसमोर तरळणाऱ्या प्रश्नचिन्हावर पडली. तो धावत आमच्यापाशी आला आणि ‘बाबा, मैं आपको नदी पार करा देता हूँ।’ असे मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला. मी मनात म्हटले एवढासा पोर हा, हे कसे काय करणार? माझ्या मनातला आवाज त्याने कसा काय ऐकला कोण जाणे. तो चटकन म्हणाला, ‘आप चिंता मत करो बाबा’ व त्याने त्याच्या सोबत खेळणाऱ्या तीन मित्रांना बोलावले, त्यातली दोघे त्याच्याएवढीच होती. मी त्याला म्हटले ‘मुन्ना, सामान बहुत भारी है, उपर से साईकिले और हम दोनों, कैसे करोगे?’ त्याने आम्हाला सायकली घाटाच्या पायऱ्यांवरून खाली उतरवायला सांगितल्या. त्या मुलाचे नाव - विकास, त्याने आम्हाला सायकलीवर लादलेले सर्व सामान खाली उतरवून ठेवायला सांगितले व प्रथम सायकली व शेखरला पलीकडे घेऊन जाऊ असे सांगितले. नंतर मला व सामान घेऊन जाऊ, अशी त्याची योजना होती. मी त्या बारीक देहाच्या सुमारे ८-१० वर्षांच्या मुलाकडे पाहिले आणि म्हटले, ‘अरे सामान फार जड आहे, प्रत्येकी किमान पंधरा किलो असेल, तुम्हाला उचलता येणार नाही.’ माझे हे वाक्य संपेतोवर मला जाणवले की मी बहुधा त्या छोट्याला अंडरएस्टिमेट केले, ज्याने कुठेतरी त्याचा इगो दुखावला. त्याने पटदिशी त्यातले एक पॅनिअर (सायकलवर लादायच्या बॅगा) खांद्यावर घेतले, कमरेवर हात ठेवून बारक्या चड्डीतला चिंब भिजलेला तो साडेतीन फुटी चिमुरडा माझ्यासमोर उभा राहिला. मी हसलो आणि माझे शब्द मागे घेतले. 

ही मुले सायकली आणि शेखरला घेऊन पुढे गेली, तेव्हा माझ्या मनात विचार आला की खरे तर मी या मुलापेक्षा अनेक पावसाळे अधिक बघितलेत, परंतु त्या क्षणी माझा तो सर्व अनुभव ‘शून्य’ होता... या मुलाने मला फक्त सामानच उतरवून ठेवायला सांगितले नव्हते, तर माझ्या डोक्यावर लादलेले माझ्या ‘मीपणा’चे ओझे तसेच माझा आजवरचा सर्व अनुभव बाजूला काढून ठेवायला सांगितला होता. त्या क्षणी मला आठवला श्रीमद्‍भगवतगीतेतल्या १८व्या अध्यायातला ६६वा श्लोक. त्यात श्रीकृष्णाने अर्जुनाला सर्वपरित्याग करून समर्पणाचा उपदेश दिलाय. विकासच्या त्या आत्मविश्वासात मला श्रीकृष्णाच्या त्या ‘संपूर्ण समर्पणा’च्या भावनेचा भास झाला. जणू तो मला सांगून गेला - तुमच्या डोक्यातल्या सर्व चिंता, प्रश्न, तुमचे अनुभव, क्षमता, कर्तृत्व, उपलब्धी याचा सर्व परित्याग करा आणि मला शरण या, चिंता करू नका, मी तुम्हाला त्या सर्वातून पार घेऊन जाईन. 

मी अलीकडल्या तीरावर उभा राहून त्या चिमुरड्याचा तो पराक्रम बघून थक्क झालो होतो. शेखरला पलीकडे सुखरूप पोहोचवून विकास मला घ्यायला परतला. जेमतेम चार फूट उंचीच्या बारीक देहयष्टीच्या विकासने माझा हात आपल्या लहानशा हातात घट्ट पकडला आणि म्हणाला ‘चलो बाबा’. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी तरळले, अत्यंत आत्मीयतेने व विश्वासाने तो एक एक पाऊल टाकत, मला जपत, हळूहळू पात्रातून घेऊन पुढे निघाला. पदोपदी कुठे पाय ठेवायचा, कुठे नाही अशा अत्यंत पोक्त अनुभवी वाटाड्याप्रमाणे सूचना देत होता. एके ठिकाणी पाणी खोल होते व प्रवाहाला जोरदेखील जास्त होता. मी ज्या दोन दगडांवर पाय ठेवले होते ते निसरडे होते हे मला जाणवले, मी थबकलो आणि त्याला म्हटले ‘विकास क्या तुम जानते हो? मुझे तैरना नहीं आता। तुम मुझसे साइज़ में इतने छोटे हो, के मैं अगर गिर गया, तो मैं अपने साथ तुम्हें भी साथ बहा ले जाऊंगा।’ विकासने मान वर करून माझ्याकडे बघितले, हसला आणि म्हणाला - ‘पर मैं आपको गिरने ही नहीं दूँगा बाबा, आप चिंता मत करो।’ आणि त्याच क्षणी अनायास त्याच्या त्या चिमुकल्या हाताची पकड आणखी घट्ट झाल्याचे मला जाणवले. जणू दिव्य रूपातला श्रीकृष्ण मला सांगत होता - मी सांगेन तसेच कर, माझ्यावर विश्वास ठेव. कोणाचा हा कोण पोर... मी ज्या जगातून तिथे गेलो होतो, तिथे जर एखाद्या म्हाताऱ्या बापाला रस्त्यापलीकडल्या दुकानातून जर एखादी वस्तू हवी असेल, तर प्रथम त्याचा सख्खा मुलगादेखील म्हणेल - काय नडलंय का? अगदी आत्ताच तिकडे जाऊन आणायचं...? (आम्ही देऊ आणून नंतर) परंतु त्यापेक्षा त्यांचा हात धरून, तो रस्ता क्रॉस करून त्यांना हव्या त्या दुकानातून ती वस्तू आणायला मदत केली, तर त्या वृद्धाला अधिक आनंद होईल. हे आणि असे असंख्य विचार माझ्या डोक्यात येत होते आणि बघता बघता त्या १५ मिनिटांच्या आमच्या प्रवासात, नव्हे सहवासात, माझा हात धरणाऱ्या या वामन मूर्तीने मला माणुसकी, निःस्वार्थ सेवाभाव, स्नेह अशा अनेकविध छटांचे विराटरूप दर्शन घडवले.

मी आपसूक विकासच्या सूचनेनुसार त्याच्या मागोमाग त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत पुढे जात होतो. मी पलीकडल्या किनाऱ्यावर सुखरूप पोहोचलो. तोपर्यंत विकासने त्याच्या त्या छोट्याशा पंजाची मजबूत पकड एक क्षणही ढिली पडू दिली नव्हती. आम्हाला विकास घाटावर भेटला तेव्हापासून ते या तीरावर आमचा निरोप घेईपर्यंत त्यांच्यापैकी एकानेही कुठल्याही तऱ्हेच्या मोबदल्याचा उल्लेखही केला नव्हता. आम्हाला त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्याची आमची योग्यता नव्हती, तरीही त्यांचे कौतुक म्हणून शेखरने त्यांना काही पैसे व आमच्याकडे असलेला थोडा खाऊ दिला. आम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढला आणि मी बूट घालायला खाली बसलो. उठून बघतो तोवर ही मुले तिथून कुठेतरी दूर दृष्टीआड कदाचित नदीच्या पलीकडे गायब झाली होती, जणू त्यांनी आपले कर्म केले आणि आपापल्या विश्वात अदृश्य झाली.

एवढ्या कमी वयात हे अवसान, हा आत्मविश्वास?

कोण होता हा विकास?

होय, त्या दिवशी आम्हाला मदत करणारा, मार्ग दाखवणारा, माझ्यासाठी दुसरा तिसरा कोणी नसून मला भेटलेला तो चार फुटी अश्वत्थामाच होता.

संबंधित बातम्या