‘माचीवरला बुधा’ आणि आम्हीसुद्धा..!

अंजली काळे
सोमवार, 20 जून 2022

राजमाची दुर्गप्रेमींचा आणि अर्थातच माझाही लाडका किल्ला आहे. ‘गोनीदां’चा ‘बुधा’ राजमाची परिसराशी एकरूप झाला आहे. तिथला बहिरोबा, बालेकिल्ला, टेमलाईचं पठार, तिथली झाडंझुडं उंबर, नांदुरकी, ओढा, तळी, रान, वेड्यासारखा कोसळणारा पाऊस साऱ्यासाऱ्याशी त्याचं नातं जडलं आहे. राजमाची म्हटलं की बुधा आठवणारच! 

गडकिल्ल्यांची जर एकदा बाधा झाली ना, तर ती आयुष्यभर पुरून उरते. ‘गडप्रेमी’ म्हणून ओळखलं जाण्यासाठी तीन ‘रा’, म्हणजेच राजगड - रायगड - राजमाची यांच्या वाऱ्या करणं गरजेचं आहे. त्यांचं खरोखरंच असं वेड लागतं की ‘अखंड येरझाऱ्या’ सुरू राहतात. त्यामुळे राजमाचीला बरेच वेळा जाणं झालं होतं. कोणीही साधं म्हटलं, ‘चढायला त्रास होतो, चालण्याचं काही वाटत नाही. कितीही चालू शकतो,’ की डॅम्बिसपणे लगेच राजमाचीचा बेत ठरवायचा आणि लोणावळा लोकलला बसायचं. लोणावळा स्टेशनाच्या बाहेर पडून चालायला लागायचं. शहरात चालायची सवय असणं वेगळं आणि हे रानातले १०-१२ मैल एका दमात तुडवणं वेगळं! हैराण व्हायचं बरोबरचं माणूस! पायवाटेनं तुंगार्ली गाठायची आणि पुढं झपझप चालत जंगलाच्या सोबतीनं साडेतीन-चार तासांत राजमाची! हे चालणं खरंतर फार सुखावह असतं. शिवाय आपला स्टॅमिनाही आपोआप तपासला जातो, ही आणखी जमेची बाब. ‘राह बनी खुद मंजिल,’ याप्रमाणे राजमाचीसाठीची चाल, हीच राजमाचीची मजा आहे. पावसाळ्यात राजमाची म्हणजे निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असते.

मागच्यावेळी गेले तेव्हा तिथं रस्त्याचं काम सुरू झालेलं दिसलं. पोटात गोळा आला; तिथली झाडी, जंगल, ओढे यांचं काय होईल म्हणून. नंतर काही वर्षं राजमाचीला जाणं झालं नाही. म्हणूनच जेव्हा अनुराग वैद्यनं राजमाची ट्रेकचं सूतोवाच केलं, तेव्हा मी ताबडतोब जाण्याचं नक्की करून टाकलं. राजमाची दुर्गप्रेमींचा आणि अर्थातच माझाही लाडका किल्ला आहे. ‘गोनीदां’ची सगळीच पुस्तकं माझी आवडती आहेत. त्यांच्या भाषेचा एक निराळाच लहेजा आहे, गोडवा आहे. त्यांचा ‘बुधा’ राजमाची परिसराशी एकरूप झाला आहे. तिथला बहिरोबा, बालेकिल्ला, टेमलाईचं पठार, तिथली झाडंझुडं उंबर, नांदुरकी, ओढा, तळी, रान, वेड्यासारखा कोसळणारा पाऊस साऱ्यासाऱ्याशी त्याचं नातं जडलं आहे. राजमाची म्हटलं की बुधा आठवणारच. 

आम्ही गेलो तेव्हा खरंतर एप्रिलचा उकाडा भाजून काढत होता. तरीदेखील दुपारच्या लोकलनं जाऊन, संध्याकाळी चालत जाऊया असं ठरवलं. पंधरा वेडे एकत्र झाले. त्यात सगळ्यात ज्येष्ठ डॉ. सुधीर फडके, तर सगळ्यात लहान महाविद्यालयीन मुग्धा होती. माझा नवरा राजेंद्रनं ऐनवेळी यायचं ठरवले. तोपण राजमाचीप्रेमी आहे. दुपारी तीनच्या गच्च भरलेल्या लोकलमध्ये घुसलो .कोविडनंतर अजून लोकल पूर्ववत सुरू झाल्या नव्हत्या, कमीच होत्या. साडेचारला लोणावळा स्टेशनला उतरलो. भूलोकीचं अमृत, ज्याला सामान्य भाषेत ‘चहा’ म्हणतात, त्याचा आस्वाद घेऊन मस्त तरतरी आली. चालायला सुरुवात केली. तुंगार्लीपर्यंत दोन अडीच किमीचा पक्का रस्ता आहे. दोहोंबाजूस झाडं लावल्यामुळं सावलीचाही आहे. सुरुवातीला चढण आहे. राजमाचीच्या वाटेला लागलो, तेव्हा ऊन होतं, पण मावळतीचं; जास्त जाणवत नव्हतं.

राजमाचीची वाट चांगलीच रुंद झाली आहे. जीप जाईल, असा कच्चा रस्ता आहे. पूर्वी राजमाचीत कोणाला साप चावला, बाळंतीण अडली किंवा कोणी खूप आजारी असलं, तर झोळी करून दहा मैल चालतच यावं लागे. तसं मी पूर्वी पाहिलेलंही आहे. मुंबईचे मुकुंद गोंधळेकर यांनी ‘राजमाची ग्राम सहायक समिती’च्या माध्यमातून तिथल्या मुलांसाठी शिक्षण, मूलभूत आरोग्य सुविधा, झाडे लावणं अशी अनेक कामं केली. जीप रस्ता झाल्यानं तिथल्या ग्रामस्थांची सोय झाली. चालताना आमच्या कंपूखेरीज बाकी कोणी नव्हतं. उजेड असेतो भराभर चालत राहिलो. दोन्ही बाजूंना झाडी होती. चढ उताराची वाट होती. हळूहळू उजेड कमी होऊ लागला. अगदीच अंधार झाल्यावर टॉर्च निघाले. वेग थोडा कमी झाला. वाट  अधूनमधून खडकाळ आणि दगडांची होती. अंधारात चालायला स्फूर्ती यावी म्हणून पोवाडा लावला. नंतर वीरश्रीयुक्त गाणी लावली. पावलं भरभर पडू लागली. साडेसात-पावणेआठ झाले होते. राजमाचीच्या फाट्यावर येऊन पोहोचलो. डावीकडे राजमाचीचा बाण असूनही उढेवाडीत राहायचंय म्हणून उजवीकडची वाट पकडली. एक किमी गेल्यावर वाट चुकल्याचं ध्यानात आलं आणि गुपचूप परत फिरलो. फाट्यापाशी येऊन ‘राजमाची - ५ किमी’च्या दिशेने चालू लागलो. चालून एकदोघांचे जीव टांगणीस लागले होते. ते जाम वैतागले. पण करतात काय? पाय ओढत ढकलगाडी चालू लागली. बरंच पुढं गेल्यावर मारुतीचं देऊळ आलं. मागचे सगळे येईपर्यंत तिथं थांबलो. मिट्ट काळोखात फारच भारी वाटत होतं. आजूबाजूला कोणत्याही प्रकारचा उजेड नव्हता. आकाशात चंद्र चांदण्यांची मांदियाळी जमली होती.. नक्षत्रमाला चमचमत होत्या. सप्तर्षी, व्याधाचा तारा वगैरे सोपे तारे ओळखता आले. असंच पुढं चालत राहिल्यावर बऱ्याच लांबवर उजेड दिसल्यामुळे उत्साह वाढला. गाव उढेवाडी. तिथं उंबरेंची वस्ती आहे. अखेर साडेनऊ वाजता मुक्कामी पोचलो. तुकाराम उंबरेंच्या घरात जेवायची आणि झोपायची सोय केली होती. तिथं सौरऊर्जेवर चालणारे दिवे होते. पंखे अर्थातच नव्हते. ‘चार्जिंगची सोय आहे का?’ या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्याला टप्पल खाऊन मिळालं. गरमागरम पिठलंभाकरीवर ताव मारून सगळे गुडुप झाले.

उढेवाडी गाव प्रत्यक्षात राजमाची किल्ल्याच्या माचीवर आहे आणि मनरंजन व श्रीवर्धन हे त्याचे बालेकिल्ले आहेत, असं म्हटलं जातं. पण आता मनरंजन आणि श्रीवर्धन हे स्वतंत्र किल्ले आहेत, असंही म्हणतात. लोहगड-विसापूर, चंदन-वंदन यांसारखे! असो. पहाटे लवकर उठून गड फिरायला निघालो. दोन बालेकिल्ल्यांच्या मधल्या सपाटीवर भैरोबा मंदिर आहे. समोर दीपमाळ व घोडा, हत्ती यांची शिल्पं आणि दोन तोफा आहेत. डाव्या बाजूनं श्रीवर्धनची वाट जाते. तो जास्त उंच असल्यानं आधी तिकडे गेलो. बांधीव पायऱ्यांची वाट आहे. पुढं थोडी खडकाळ चढणीची पायवाट आहे. प्रवेशद्वाराचा भाग प्रशस्त, नागमोडी आहे. आत गेल्यावर डावीकडं धान्यकोठार आणि जवळच पाण्याचं टाकं आहे. माथ्यापर्यंत पायवाट जाते. तिथं ध्जजस्तंभाचा बुरूज आहे. तिथून सभोवतालचा नजारा सुरम्य दिसतो. आल्या वाटेनं उतरून मनरंजनची वाट चालू लागलो. सोप्या पायवाटेनं प्रवेशद्वार गाठलं. सुस्थितीतले प्रवेशद्वार पाहून फार बरं वाटलं. प्रवेशद्वार विजापुरी कमान या प्रकारात मोडणारे; एकाभोवती एक अशा तीन कमानी असून त्यावर शुभचिन्ह कमळ कोरलेलं आहे. खणखणीत तटबंदी पाहून समाधान वाटलं. मनरंजनवर किल्लेदाराच्या वाड्याचे जोते, सदर, अष्टकोनी पाण्याचं टाकं, दगडी बांधकाम असे बरेच अवशेष आहेत. इथून उल्हास नदीचं पात्र, ढाकचा किल्ला फार भारी दिसतो. बोरघाटातून जाणारी ट्रेन पाहायला मजा आली. बोरघाटावर नजर ठेवण्यासाठी ‘टेहळणीचा किल्ला’ म्हणून या किल्ल्याची निर्मिती झाली, याला मनातल्या मनातच पुन्हा पुष्टी मिळाली. आल्या वाटेनं उतरून खाली आलो. तिथं मंद दरवळ पसरला होता. पाहिलं तर बकुळीची झाडं होती. गंध श्वासात भरून घेतला. एव्हाना ऊन वाढायला लागलं होतं. पण झाडीमुळे जास्त जाणवत नव्हतं.

आता सतराव्या शतकातील गोधनेश्वर मंदिर पाहायला जायचं होतं. एक दीड किमी अंतर असेल. पूर्ण पायवाट आणि नंतर बांधीव पायऱ्या. काळ्या पाषाणातील दुर्लक्षित, पण छानसं देऊळ. अशी आडवाटेवरची, भग्न, काही सांगू पाहणारी देवळं मनाला हात घालतात. बाजूला उदयसागर तलाव. मंदिरासमोर भग्न दीपमाळ व सुबकसा घडीव नंदी. देवळातल्या कातळ थंडाव्यात शांत बसलो. बाहेर एप्रिलच्या उन्हाची रणरण होती. इथून जाऊन जेवण करून परतीच्या प्रवासाला लागायचं होतं. जाताना गाडीतून जायचं असल्यानं सगळे निश्चिंत होते. जीपनं तास-सव्वातासात लोणावळा स्टेशनला सोडलं. तीनची लोकल मिळाली. अति उन्हाळ्यात येऊनही ट्रेक सुंदर झाला. पाऊस सुरू झाल्यावर परत राजमाचीला येण्याचं परतीच्या प्रवासात ठरवूनच टाकलं. पुढंही खंडित झालेल्या वाऱ्या सुरू ठेवणं, ओघानं आलंच!

संबंधित बातम्या