मनात घर करणारं पाके अभयारण्य

डॉ. राधिका टिपरे
सोमवार, 11 जुलै 2022

पाकेचं जंगल इतकं घनदाट आहे की काही फुटांच्या अंतरावर झाडीत कुठलं जनावर उभं असलं तरी ते दिसणं दुरापास्तच होतं. मला मात्र मनातून खात्री वाटत होती; आम्ही कुणा प्राण्याला पाहिलं नव्हतं हे जितकं खरं होतं तितकंच हेही खरं होतं, की अनेक प्राण्यांनी आम्हाला नक्कीच पाहिलं होतं. फक्त ते त्यांच्या सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून दोन पायाच्या प्राण्याला बघायला उत्साहानं पुढं आले नव्हते... 

उत्तरपूर्वेच्या जंगलांमधील भटकंती प्रचंड ऊर्जा देऊन जाते. याचं कारण म्हणजे आपल्या देशाच्या या भागातील आगळावेगळा निसर्ग! हिरवा... हिरवा आणि हिरवा... मनाला मोहवणारा...! शहरी वातावरणात राहून मन कोंदून गेलेलं असतं, तेव्हा हिरव्याकंच जंगलात गेल्यानंतर नजर शांत होऊन जाते... मन संतृप्त होतं आणि जिवाची तगमग अक्षरशः शांत होते... हा सर्वस्वी माझा व्यक्तिगत अनुभव आहे हं! त्यात छान फोटोही काढायला मिळतात, हा म्हणजे माझ्यासाठी बोनस असतो.

खरंतर बरेच दिवसांपासून पाकेचं जंगल माझ्या जंगलांच्या यादीत होतं. या टायगर रिझर्वबद्दल बरंच ऐकून होते, पण जायला जमलं नव्हतं. अखेरीस मध्यंतरी तेथे जाण्याचा योग जुळवून आणला. नामेरी जंगलाची भटकंती संपवून आम्ही ठरल्याप्रमाणे पाके या अरुणाचल प्रदेशमधील टायगर रिझर्वकडे जाण्यास निघालो. अंतर फारसं नव्हतं. त्यामुळे दोन तासांत आम्ही टॅक्सीने पाके टायगर रिझर्वच्या गेटजवळ पोहोचलो. या अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ग्रेट इंडियन हॉर्नबील पाहायला मिळणार होते. शिवाय जंगली हत्तींसाठीही पाके प्रसिद्ध असल्यामुळे हत्तींचे कळप पाहायला मिळण्याची आशा मनात होती. 

दुपारी बारा-एकच्या सुमारास पाके टायगर रिझर्व प्रोजेक्टच्या सिजोसा येथील ऑफिसमध्ये पोहोचलो. तेथील क्लार्कने सांगितलेल्या वाटेने आम्ही जंगलाच्या दिशेने निघालो. वाटेत पाके नदीवर असलेला पूल ओलांडावा लागतो. जंगलाच्या प्रवेशद्वाराजवळच फॉरेस्टचे प्रशस्त गेस्ट हाऊस आहे. पण त्यांच्या जंगलाच्या आत तेरा किमी अंतरावर असलेल्या ‘खारी’ नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये राहायला मिळावे अशी माझी मनापासून इच्छा होती आणि मी त्यासाठी आरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. पण गेटजवळ पोहोचल्यानंतर कळून चुकले, की रस्ते खराब असल्यामुळे आम्ही भाड्याने घेतलेली डिझायर ही टॅक्सी जंगलाच्या मध्यावर असलेल्या खारी गेस्ट हाऊसपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे मन कितीही खट्टू झाले तरी आम्हाला मुकाट्याने जंगलाच्या बाहेर, गेटजवळच्या गेस्ट हाऊसमध्येच मुक्काम करावा लागला. आत जाण्यासाठी जीपसारखे वाहन असणे अत्यावश्यक होते. पण सिजोसा गावातील जीप उपलब्ध नव्हती. त्यामुळे तो दिवस वाया गेला. 

दुसरे दिवशीसुद्धा जीप मिळाली नाही. मात्र पाके टायगर रिझर्वचे तत्कालीन रेंजर राणा हे त्यांच्या कामासाठी जंगलाच्या अंतर्भागात जाणार होते. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते आम्हा उभयतांना खारी गेस्ट हाऊसवर सोडायला तयार झाले. प्रश्न दुसरे दिवशी परत येण्याचा होता. त्या रेंजर साहेबांना विचारले, ‘आम्हाला जंगलातून चालत यायचे असेल तर परवानगी मिळेल का?’ यावर त्यांनी होकार दिला. पाकेच्या घनगर्द जंगलातून ट्रेक करायला मिळणार होता या विचारांनीच मी हरखून गेले होते. त्यामुळे, कॅमेरा, टॉर्च, कपड्यांचा एक सेट आणि इतर अत्यावश्यक जुजबी वस्तू असे मोजके सामान पाठीवरच्या सॅकमध्ये घेऊन आम्ही तयार झालो. रेंजर राणाजी येताच त्यांच्यासह जीपमध्ये जाऊन बसलो. आमची टॅक्सी आणि ड्रायव्हर तसेच बाकीचे सामान गेस्ट हाऊसवर सोडले होते. एका आगळ्या वेगळ्या जंगल अनुभवाची ती सुरुवात होती. त्यामुळे मी मनातून अतिशय खूश होते. आपल्याकडे जंगलातून चालण्याचा अनुभव घेणे सहज शक्य नसते. त्यामुळेच पूर्वांचलातील या घनदाट जंगलातून पायी चालत भटकंती करायला मिळणार होती याचाच मला मनस्वी आनंद झाला होता.

पाके हे हिमालयाच्या उत्तरपूर्व पर्वत रांगांच्या पायथ्याशी पसरलेले अतिशय घनदाट जंगल आहे. हे अभयारण्य अरुणाचल प्रदेशमधील  पूर्व कामेंग या जिल्ह्यात समाविष्ट झालेले आहे. अतिशय देखणे, डोंगर रांगाच्या उतरणीवर, लहान मोठ्या नद्यांच्या दऱ्याखोऱ्यांतून वाढलेलं हे जंगल घनदाट उष्णकटीबंधीय, अर्ध सदाहरित जंगल आहे. पाके अभयारण्याच्या सभोवती जंगलाला जोडून जंगलांचाच परिसर आहे. शिवाय पूर्व,पश्चिम आणि उत्तर या तीनही दिशांना तीन नद्या आहेत. जंगलाच्या उंच सखल भागातून वाहणारे अगणित ओढे आणि नाले भोरेली आणि पाके या नद्यांना जाऊन मिळतात. त्यांच्या जोडीला खारी, नामेरी आणि डिकोराई या लहान नद्या जंगलाच्या अंतर्भागातून खळाळत वाहतात आणि जंगलाच्या सौंदर्यात भर टाकतात. कामेंग नदीच्या पल्याड ईगल नेस्ट अभयारण्य आणि सेसा ऑर्किड अभयारण्य आहे.

पाकेच्या जंगलात आपण तीन ठिकाणांकडून प्रवेश करू शकतो. एक प्रवेशद्वार सिजोसा येथे आहे, जेथून आम्ही पाके नदीवरील पूल ओलांडून  जंगलाच्या गेटजवळ पोहोचलो होतो. दुसरे भालूकपाँग येथे आहे. या ठिकाणी आपल्याला कामेंग म्हणजेच जीया भोरेली नदी ओलांडून जंगलात येता येते. तिसरे प्रवेशद्वार सेप्पा येथून आहे आणि त्यासाठी आपल्याला इटानगरपर्यंत जावे लागते. पाकेचे जंगल उष्णकटीबंधीय, सदाहरित, उपउष्णकटीबंधीय आणि नदीकाठावरील मोठ्या पानांच्या वृक्षांनी नटलेले असे मिश्र प्रकारचे आहे. शिवाय या जंगलात बांबूच्या विविध जातीसुद्धा आहेत. त्यामुळे एकूणच घनदाट जंगलाचा सुरेख अनुभव आपल्याला पाकेच्या जंगलातून भटकताना घेता येतो. प्रामुख्याने हत्तींची संख्या भरपूर असल्यामुळे जंगली हत्तींचे कळप पाहायला मिळणे सहज शक्य होते. 

बेंगॉल टायगर, क्लाऊडेड लेपर्ड, गवे, सांबर हरणे, भेकर (बार्किंग डिअर) याचबरोबर किंग कोब्रा आणि ग्रेट इंडियन पाइड हॉर्नबील ही या जंगलाची वैशिष्ट्ये आहेत. या जंगलात वाघांची संख्याही भरपूर आहे. मात्र या जंगलात गेल्यानंतर आपल्याला वाघ पाहायला मिळेल अशी आशा करणे फारसे योग्य ठरत नाही. कारण हे जंगल इतके घनदाट आहे, की हत्तींशिवाय इतर प्राणी दिसणे दुरापास्तच असते. रेंजर राणा यांनी बोलता बोलता सांगितले की त्यांच्या वीस वर्षांच्या नोकरीत या जंगलात त्यांनी फक्त दोन वेळा वाघ पाहिलेला आहे. परंतु कॅमेरा ट्रॅपमध्ये बऱ्याच वेळा वाघांचे चित्रण पाहायला मिळते. पक्ष्यांसाठी तर पाकेचे हे घनगर्द जंगल म्हणजे नंदनवनच आहे. पण येथे कॅमेऱ्याने पक्षी टिपणे हे काम तसे अवघडच असते. घनदाट वृक्षांचे जंगल असल्यामुळे दुर्मीळ पक्ष्यांच्या प्रजाती येथे आहेत, परंतु सर्व वृक्ष इतके उंच आहेत की त्यांच्या शेंड्यावर बसलेले पक्षी नजरेला पडले तरी कॅमेऱ्याने टिपायला थोडे अवघडच जाते. सर्वात सुंदर आहेत ती येथील फुलपाखरे. पावसाळ्यात या जंगलात अगणित फुलपाखरे असतात. पण पावसाळ्याच्या दिवसात पाकेच्या जंगलात यायचं म्हणजे जय्यत तयारीनिशीच यावं लागतं. कारण धोधो पडणारा पाऊस, जिकडे तिकडे वाहणारे पाण्याचे लोंढे आणि सोबतीला असंख्य जळवा. यातून जंगल भटकंती करायची म्हणजे तुमच्याकडे सॉलिड धाडस पाहिजेच...! पण या दिवसात पाकेमध्ये येणाऱ्या भटक्यांची संख्या भरपूर असते असं रेंजर राणाजींनी सांगितलं.

रेंजर राणा यांच्याबरोबर केलेला तो तेरा किमी जीपचा प्रवास खरंतर त्यांच्या बरोबर झालेल्या गप्पांमुळेच स्मरणात राहिला. माझ्या असंख्य प्रश्नांना त्यांनी न कंटाळता उत्तरे दिली हे खरं तर त्यांच्या सुस्वभावाचे द्योतकच होते. खारीला पोहोचल्यावर आम्ही उभयता तेथून दोन-तीन किमी अंतरावरील ‘नमक पुंग’ पाहायला आम्ही हत्तीवरून जावे असे त्यांनीच सुचवले. त्यांच्या चांगुलपणाचा अनुभव आम्हाला पाकेच्या सुंदर जंगलाइतकाच मनोहारी वाटला होता. 

आमच्या सोबत संजीद नावाचा बंदूकधारी वनरक्षक होता. अतिशय शांत स्वभावाचा हा तरुण मुलगा निशी जमातीचा होता. अरुणाचल प्रदेशमध्ये अगणित जाती जमाती एकोप्याने राहातात. पाके जंगलाच्या परिसरात निशी या जमातीचे वर्चस्व असल्यामुळे त्या भागात वनखात्यातील बरेच वनरक्षक याच आदिवासी जमातीचे होते. ही मंडळी त्यांचे खास शस्त्र म्हणून लांब कोयता म्यान करून छातीवर आडवा अडकवतात. संजीद अतिशय अबोल स्वभावाचा होता, पण आम्ही जंगलातून बाहेर पडेपर्यंत सावलीसारखा तो आमच्या बरोबर होता.

 ‘खारी’ या फॉरेस्टच्या गेस्ट हाऊस बद्दल काय सांगू! एकतर जंगलाच्या मध्यभागी, खारी नदीच्या काठावर, थोडे उंचावर असलेले हे गेस्ट हाऊस त्याक्षणी तरी स्वर्गाइतके सुंदरच वाटले होते. माझ्या हातात असते, तर मी त्या ठिकाणी अजून चार दिवस निवांत राहिले असते. चारच्या सुमारास आम्ही हत्तीवर स्वार होऊन दोन अडीच किमी अंतरावर असलेले ‘नमक पुंग’ पाहण्यासाठी बाहेर पडलो. निरामय शांतता होती त्या जंगलात. खारी गेस्ट हाऊसच्या समोरच विस्तीर्ण पात्रात खारी या लहानशा नदीचा प्रवाह झुळुझुळु वाहत होता. आम्ही एका देखण्या नर हत्तीवर स्वार झालो होतो. त्याच्यावर चढताना बऱ्यापैकी कसरत करावी लागली. मग आम्ही तिघे आणि पोरगेलासा माहूत अशी आमची हत्तीवरून निघालेली ‘वरात’ पाकेच्या त्या जंगलातून मिरवत गेली. हत्ती आणि त्याचा माहूत यांच्यातील आगळेवेगळे अनुबंध पाहून फार गंमत येत होती. हत्तीशी बोलताना हा गडी काय काय बोलायचा ते जाणून घेतल्यानंतर माझी हसून मुरकुंडी वळली. हा तरुण हत्ती नर असल्यामुळे सारखा थांबायचा. कारण काय तर जंगली हत्तिणींनी जागोजागी केलेल्या मूत्र विसर्जनामुळे त्याची गात्रे चाळवली जायची. मग हे हत्ती महाशय त्या जागी उभे राहून जमीन हुंगत राहायचे. उजव्या पायाच्या अंगठ्याने माहूत त्याला ढोसत राहायचा. पण हत्ती ढिम्मपणे उभा राहायचा. अशावेळी हा माहूत काही बाही बडबडत राहायचा, ‘अरे तू माझी लाज काढतो आहेस रे. जरा माझ्या इभ्रतीचा विचार कर ना,’ असं जेव्हा हा म्हणाला तेव्हा मात्र मला हसू आवरेना.

खरं तर हत्तीवरची ही राईड म्हणजे एक मस्त अनुभव होता. सायंकाळच्या तिरप्या सोनेरी उन्हामध्ये झळाळून निघालेलं पाकेचं ते सुंदर जंगल आम्हाला एका वेगळ्याच जगात असल्याचा अनुभव देत होते. एक अद्‍भुत वाटणारी निरामय शांतता अवघ्या आसमंताला व्यापून राहिली होती. आम्हाला नमक पुंगकडे जायचं होतं. नमक पुंग म्हणजे मिठाचे किंवा क्षारयुक्त मातीचे स्रोत असलेली जागा. जंगलामध्ये काही ठिकाणच्या मातीमध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असते. जनावरांना या क्षारांची आणि मिठाची गरज असते. अशा नैसर्गिक जागा त्यांना बरोबर ठाऊक असतात. त्यामुळे पाणी पिण्यासाठी आलेली जनावरे ही क्षारयुक्त माती चाटून आपली क्षारांची गरज भागवतात. या ठरावीक जागांवर काही झालं तरी जनावरं येतातच. बऱ्याच वेळा वनखात्याची मंडळी अशा नैसर्गिक जागेच्या ठिकाणी मीठाचे ढीग पेरून ठेवतात. हत्तींनासुद्धा या अशा मिठाची गरज असते. त्यामुळे अशा ठिकाणी झुंडीने हत्ती येतात. हरणं, गवे यांच्या जोडीला वाघ, बिबट ही जनावरंपण येतात. या नमक पुंग जवळ संध्याकाळी पाण्यावर आलेली जनावरं बघायला मिळतील अशी आशा होती. वाटेत आम्हाला सांबर दिसली. त्यानंतर जंगली हत्तींचा एक मोठा कळपही डाव्या बाजूला गवत खाताना दिसला. या कळपामध्ये बरीच लहान पिल्लं होती. आमची चाहूल लागताच अख्खा कळप उंच वाढलेल्या हत्ती गवतामध्ये अदृश्य झाला. 

नमक पुंग ही जागा पाणवठ्यासारखी होती. पण दुर्दैवानं कुणी प्राणी मात्र मीठ चाटायला किंवा पाणी प्यायला त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. ज्या वाटेने गेलो त्याच वाटेने आम्ही परत आलो. जरी प्राणी दिसले नाहीत तरी सुरेख अशा जंगलाचा अनोखा आनंद उपभोगता आला याचे मनस्वी समाधान मनात होते. अतिशय शांत आणि निरामय अशा जंगलाचा तो अनुभव माझ्यासाठी अतिशय अनमोल होता. विशेष म्हणजे परतीच्या वाटेवर पुन्हा एकदा तो हत्तींचा कळप तेथेच भेटला. 

खारी गेस्ट हाऊसच्या समोर वाहणाऱ्या नदी पात्रात एका ठिकाणी लहानसे नमक पुंग असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी बहुतेक वेळेस वनखात्यातर्फेही मीठ ठेवले जात असल्यामुळे रात्री भरपूर हत्ती येतात असं सांगण्यात आलं होतं. अंधारी रात्र होती. त्यामुळे नजरेला काही दिसत नव्हतं. पण रात्री नऊनंतर बराच वेळ हत्तींच्या ट्रंपेटींगचा आवाज चालू होता. सकाळी आमच्याजवळ असलेलं काही बाही खाऊन लवकरच गेस्ट हाऊस मधून बाहेर पडलो. सुदैवाने संजीद आमची सॅक घ्यायला तयार झाला. माझ्याकडे माझी कॅमेरा बॅग आणि ट्रायपॉड होते. शिवाय हातात कॅमेरा आणि पाचशे एमएम मोठी टेली होती. त्यामुळे ओझं होतं. सुरुवातीच्या पाच किमी भागात हत्तींचे कळप आडवे येण्याचे भय होते. तेवढे अंतर आमची सोबत करण्यासाठी, काल आमच्या बरोबर आलेला माहूत आणि त्याची तरुण बायको आमच्याबरोबर चालत आले. त्यानंतर मात्र संजीदच्या साथीनं आम्ही दोघे रमतगमत पाकेच्या जंगलातील उरलेले अंतर काटू लागलो. मधेच एका उंचवट्यावर थोडावेळ थांबून बरोबर असलेली फळं, ब्रेड असं खाण्याचं जे काही होतं ते खाऊन संपवलं. संजीदनं आम्हाला सूचना केली होती. यदाकदाचित जर हत्तींचा कळप आडवा आला, तर शांतपणे एका जागी उभं राहायचं. बिलकूल हालचाल करावयाची नाही. इतरही कुणी प्राणी आडवा आला तरी घाबरून गोंधळून जायचं नाही. सुदैवानं तशी वेळ आलीच नाही. मात्र आम्ही जंगलातील ज्या पायवाटेने चालत होतो; त्या पायवाटेवरून  आलेल्या-गेलेल्या अनेक जंगली प्राण्यांचे ठसे मात्र अभ्यासायला मिळाले. आम्ही चालायला सुरुवात केल्यानंतर काही वेळातच समोरून बिबट्या चालत आल्याचे ठसे पाहायला मिळाले. हा बिबट्या त्याच वाटेनं पण उलट्या दिशेनं जवळ जवळ सहा किमी अंतर चालून आला होता हे आमच्या लक्षात आले. अस्वल, साळींदर यांच्या पायाचे ठसेही पाहायला मिळाले. एक मात्र झाले, एक दीड दिवसाच्या पाकेच्या भटकंतीत मला हॉर्नबील काही पाहायला मिळाले नाहीत. 

खरं सांगायचं तर हे जंगल इतकं घनदाट आहे की काही फुटांच्या अंतरावर झाडीत कुठलं जनावर उभं असलं तरी ते दिसणं दुरापास्तच होतं. मला मात्र मनातून खात्री वाटत होती. आम्ही कुणा प्राण्याला पाहिलं नव्हतं हे जितकं खरं होतं तितकंच हेही खरे होते, की अनेक प्राण्यांनी आम्हाला नक्कीच पाहिलं होतं. फक्त ते त्यांच्या सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून दोन पायाच्या प्राण्याला बघायला उत्साहानं पुढं आले नव्हते. असो, सुखरूपपणे जंगलाच्या बाहेर पडलो. 

गाडीत सामान टाकलं आणि पाके टायगर रिझर्वच्या परिसरातून बाहेर पडलो. पाकेचं जंगल, खारी येथील वास्तव्याचा भन्नाट अनुभव सोबतीला होता. अरुणाचल प्रदेशमधील हे पाकेचं जंगल माझ्या मनात घर करून राहिलं आहे. परत एकदा तिथं जायची मनस्वी इच्छा आहे. पाहूयात... भविष्यात योग असेल तर जाणं होईलच...!

संबंधित बातम्या