नागझिऱ्याच्या कुशीतील संस्मरणीय दिवस

रमाकांत कुलकर्णी
सोमवार, 18 जुलै 2022

शरीराला व मनाला उभारी आणणारे, गंधित वाऱ्याने उल्हसित करणारे, विपुल प्रमाणात प्राणवायू पुरवणारे, आपल्या ज्ञानेंद्रियांची क्षमता द्विगुणित करणारे नागझिरा पुन्हा पुन्हा अनुभवावे असेच वाटते. साधारणपणे सगळ्यांना जंगलात वाघ दिसला की धन्य वाटते. या जंगलात वाघ कमी; परंतु या जंगलातला ठेवा एवढा अमूल्य आहे की अशी अद्वितीय अनुभूती विरळाच! 

मी  माझ्या तीन नातेवाइकांसह नागझिरा सहलीमध्ये सहभागी झालो होतो. आमचा हा सर्व मिळून अठरा जणांचा चमू होता व यात पाच ते पंचाहत्तर वर्षे वयाचे निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. या अद्वितीय अभयारण्याविषयी काय सांगू! आम्ही तीन रात्री गाभा (Core Forest) जंगलात राहिलो. १९ तारखेला सकाळी आठ वाजता पोहोचल्यानंतर पिटेझरी गेटमधून अकरा किलोमीटर आत गाभा जंगलात राहण्याची व्यवस्था होती. या रस्त्यावरही भरपूर वनसंपदा, तसेच प्राणी दिसतात. येथील सर्वसाधारण दिनक्रम ठरलेला होता. 

सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत मारुती जिप्सीतून (उघडी, वरून छत नसलेली) साधारणतः चार तासांची जंगल सफारी असे. या जिप्सीत ड्रायव्हरसह एकूण आठजण बसतात; ड्रायव्हर, एक प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शक (गाइड) व सहा पर्यटक. स्थानिक गाइडची (ज्यांचे आयुष्य जंगलातच गेलेय) निरीक्षणक्षमता इतकी अफलातून होती की ते जंगलपुत्रच वाटतात. या जिप्सीचा वेग ताशी वीस किलोमीटरपेक्षा जास्त नसतो व वाटेत जंगलात कोणालाही गाडीतून उतरण्याची परवानगी नसते; अगदी गाइडलादेखील.

यानंतर साडेदहाला नाश्ता संपवून गेस्ट हाऊसजवळ असलेल्या प्रसिद्ध व अतिशय निसर्गरम्य नागझिरा तलावापाशी जमायचो. तेथे आमच्याबरोबर असलेले अनुभवी गिर्यारोहक/अरण्यवाचक मिलिंद देशपांडे आम्हाला पक्षी हेरून दाखवत व माहिती देत, तसेच त्यांच्या मोठ्या कॅमेऱ्यात पक्ष्यांना बंदिस्तही करून ठेवत. पलीकडच्या तीरावर दिसणारे चितळ, रानडुकरे यांसारखे काही प्राणी दुर्बिणीतून बघत असू. हा अनुभव खूपच हवाहवासा वाटे.

जेवणानंतर परत दोन वाजता सफारीतून संध्याकाळी सहापर्यंत जंगलात फेरी असे. आपल्याला एकूण जंगलाच्या वीस टक्केच परिसरात जाण्यास परवानगी असते. मात्र एवढ्याही सफारीत अनेक प्रकारचे पक्षी व प्राणी दिसतात. पहिल्या दिवशी आमची सफारी दुपारी दोन वाजता सुरू झाली. सकाळच्या फेरीत पक्ष्यांची लगबग व त्यांचे कर्णमधुर आवाज ऐकले. आमचा गाइड राधेश्याम त्या आवाजावरून तो पक्षी बरोबर ओळखून आम्हाला त्याचे सवयीने इंग्रजी व मराठी नाव सांगे. सूर्योदय झाल्यावर हळूहळू जंगलातील झाडांच्या खोडांवरून ऊन खाली सरकू लागे. हे दृश्य अगदी डोळ्यात साठवून ठेवावे असेच! जंगल वेगवेगळ्या भागात वेगवेगळे आहे; काही भागात आतपर्यंत नजर जात असे, तर काही भागात अनेकविध वेली, बांबूंच्या दाट बनातून रस्त्याच्या जवळचा भागच दृष्टीस पडे. गेस्ट हाऊसजवळील चितळ मैदानावर कोवळ्या उन्हात चरणारे हरणांचे कळप बघून थेट कालिदासाच्या मेघदूतातील वर्णनाची आठवण होत असे. निसर्गाचे वरदान!

आम्हाला तीन दिवसांत एकूण पाच सफारींमध्ये विविध पक्षी, प्राणी, फुलपाखरे, झाडे, उंच सखल मैदाने, टेकड्या, कीटक असे सर्व काही दिसले. आम्हाला असंख्य वानरे, चितळ, सांबरही दिसले. आमच्यातील दुसऱ्या सफारीतील गटाला तीन अस्वले, तसेच दोन बिबटे दिसले. थोड्या नीलगायी दिसल्या. विशेष म्हणजे आम्हाला गव्यांचा एक मोठा कळप चरत असताना दोन वेळा अगदी जवळून निरखता आला. जेव्हा पिल्लू पळत जाऊन आईला बिलगून दूध पिऊ लागले, तेव्हा अशा मोठ्या रानटी मस्तवाल प्राण्यातसुद्धा छान वात्सल्याची पूर्ण भावना दिसली. 

याशिवाय असंख्य विविधरंगी फुलपाखरे, घोरपड, मुंगूस; राखी रानकोंबडा, वेडा राघू, सोनपाठी सुतार, टोई पोपट, पोपट, शिक्रा, कंठेरी शिंगळा किंवा घुबड, खंड्या किंवा पांढऱ्या छातीचा धीवर, तुरेवाला सर्प गरुड, राखी डोक्याचा मस्त्यगरुड, मधुबाज, भृंगराज, भारतीय नीलपंख, तिसा अशा अनेक पक्ष्यांचे दुर्बिणीतून छान सूक्ष्मपणे निरीक्षण करता आले. मोर तर भरपूर संख्येने व जवळजवळ प्रत्येक सफारीत दिसले.

येथे वीज नाही, मात्र उजेडासाठी गेस्ट हाऊस व उपाहारगृहात सौरऊर्जेवर चालणारे दिवे आहेत. रात्री कुठलेही कृत्रिम दिवे गेस्ट हाऊसच्या बाहेर लावले जात नाही. त्यामुळे खोलीच्या दारातून बाहेर पडल्यावर सगळीकडे पूर्ण अंधार असतो. यामुळे आम्हाला रात्री अतिशय निरभ्र आकाशात अगदी स्पष्टपणे विपुल चांदणे, असंख्य तारे, तारका व ग्रह दर्शन झाले (शहरांमधून प्रदूषणामुळे याच तारका खूपच विरळ दिसतात हे चांगलेच जाणवले). त्याचप्रमाणे जंगलातील घनघोर अंधारात काजवे बघण्याची मजा औरच होती. 

हिंस्र प्राणी सहसा रात्री संचार करतात व आपली शिकार साधतात. अनेक वेळा ते सोईस्कर असल्याने सफारीच्या मार्गावरून चालतात, असे गाइड सांगत होता. गाइडची चाणाक्ष नजर अशी चौफेर होती की तो चालत्या गाडीतून वाघांच्या पायाचे ठसे - पग मार्क बरोबर हेरायचा. अशा प्राण्यांच्या हालचालींची इतर प्राणी, पक्षी अगदी अभावितपणे दखल घेऊन इतर प्राण्यांना विशिष्ट आवाजाद्वारे त्वरित इशारे देतात, ज्याला ‘कॉल’ म्हणतात. या आवाजात आणि जोडीदारांना मिलनासाठी घातलेली साद यामध्ये फरक असतो. त्यामुळे त्यांच्या आवाजाच्या दिशेने आमचे अनुभवी मार्गदर्शक रात्रीच कानोसा/नोंद घेऊन त्यानुसार सकाळी त्या दिशेला आम्हाला घेऊन जात. यामुळे असे प्राणी दिसण्याची संधी जास्त असे. मात्र असे असूनही ते प्राणी दिसतीलच याची खात्री नसते. अर्थात या सर्व प्रयत्नांमुळे आम्हाला जंगलवाचनाचे छान धडे मिळाले. एके ठिकाणी मोरांचा थवा व हरणांचा कळप एकत्रच दिसले. झाडांवर वानरे आपले हिरव्या पानांचे भोजन करता करता काही कोवळी पाने खाली टाकत होती, जे हरणांचे आवडते खाद्य होते. हे सहजीवन खूप काही शिकवणारे होते. अस्वल सोडून कुठलाच प्राणी स्वतःहून माणसावर चालून येत नाही, असेही या अभ्यासादरम्‍यान समजले. एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला अगदी जवळ हरणांचा कळप चरत होता. आमची जिप्सी जवळ येताच ती पळू लागली. मात्र एकाच बाजूला चार पाच शिंगे असलेल्या एका हरणाला तेथून लवकर निसटता येईना, कारण त्याची शिंगे खाली आलेल्या एका झाडाच्या फांदीत कुठेना कुठे अडकू लागली. हे फारच दुर्मीळ दृश्य होते. 

आम्ही ज्या उपाहारगृहात नाश्ता, जेवण घ्यायचो तेथे वानरांचा (काळे तोंड व लांब शेपूट) एक कळप आमच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून असे व संधी मिळताच अत्यंत चपळाईने व निर्भयपणे आमच्या हातातील/पिशवीतील खाद्यपदार्थ पळवून नेत असे. मग आम्ही प्रवेशद्वार कायम बंद ठेवू लागलो. मात्र याउलट दूर जंगलातील वानर टोळ्या आमच्या जिप्सीपासून चपळतेने दूर जात.

तेथील तापमान सकाळच्यावेळी अतिशय थंड होते व आम्ही सकाळच्या फेरीत पूर्ण बाह्यांचे स्वेटर, कानटोपी, हातमोजे, ओव्हरकोट घालून जात असू. मी एक चांगल्या प्रकारची दुर्बीण बरोबर नेली होती. जेव्हा आमचा गाइड राधेश्याम झाडावरील पक्षी बघून आम्हाला सांगत असे, तेव्हा तो पक्षी नेमका कुठे आहे हे हेरल्यानंतर दुर्बिणीतून तो पक्षी जास्त स्पष्टपणे बघणे शक्य होते. यात विशेषतः गरुडाच्या डोळ्याभोवतीचे रंग व त्याची बाकदार चोच दृष्टीस येत असे. मयूरपंखी उडे तेव्हा त्याचे निळसर पंख बघून दृष्टीचे पारणे फिटे. जंगलात वावरताना फक्त डोळे व कान उघडे ठेवले, तर बराच आनंद घेता येतो. निरव शांततेत एखाद्या पक्ष्याची ललकारी किंवा निळ्या नभातून खूप उंचावरून उड्डाण भरणारा गरुड हे दृश्य विलोभनीय असे. याबरोबरच जंगलाचा एक विशिष्ट गंध व वारा हवाहवासा वाटे.

वनखात्याने नागझिऱ्यात जागोजागी प्राणी, पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. तेथे कूपनलिकांद्वारे पाणी भरले जाते. विशेष म्हणजे येथील पंप सौरऊर्जेवर चालणारे आणि आपोआप सुरू व बंद होणारे आहेत. 

वनखात्याने सुरक्षारक्षकांची वेगवेगळ्या विभागात नेमणूक केलेली असते, ते त्या विभागात राहतात. अशा दोन दोन रक्षकांना जोडीने रोज पंधरा किलोमीटर दाट जंगलात सर्व ३६५ दिवस फेरी मारून निरीक्षण करणे अनिवार्य असते. यात जंगलात दिसणाऱ्या काही विशिष्ट गोष्टींची नोंद घेऊन ते एका चार्टमध्ये वनाधिकाऱ्यांना दर आठवड्याला सुपूर्द करावे 

लागतात. यात मेलेले/मारलेले प्राणी, झाडपड/तोड, वनउपजांच्या चोऱ्या इ. अनेक तपशील असतात व या वनरक्षकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एक जीपीएससारखे आधुनिक उपकरण दिलेले असते. या वनरक्षकांच्या जीविताला कायमच धोका असू शकतो. असा हा शरीराला व मनाला उभारी आणणारे, गंधित वाऱ्याने उल्हसित करणारे, विपुल प्रमाणात प्राणवायू पुरवणारे, आपल्या ज्ञानेंद्रियांची क्षमता द्विगुणित करणारे नागझिरा पुन्हा पुन्हा अनुभवावे असेच वाटते. साधारणपणे सगळ्यांना जंगलात वाघ दिसला की धन्य वाटते. या जंगलात वाघ कमी; परंतु या जंगलातला ठेवा एवढा अमूल्य आहे की अशी अद्वितीय अनुभूती विरळाच! म्हणून मित्रांनो किमान एकदा तरी हा ठेवा अनुभवाच.

 

 

संबंधित बातम्या