सायप्रस - स्वर्ग सुंदर बेट!

सुमेधा कुलकर्णी
सोमवार, 18 एप्रिल 2022

भ्रमंती

सायप्रसच्या सहलीत ग्रीक, ओटोमन आणि रोमन संस्कृतीचा इतिहास सांगणाऱ्या वास्तू आपल्या मनात घर करून राहतात. एवढ्या छोट्या देशाने बरीच सत्तांतरे पाहूनदेखील त्यातून झालेल्या पडझडीतूनही आपली शान टिकवून ठेवली आहे. सायप्रसचे निळ्या रंगांचे भुरळ पडणारे समुद्रकिनारे, ॲफ्रोडाइटी आणि अडोनीस यांच्या प्रेमकथा आपल्याला स्वर्गलोकाची सफर केल्याचा आनंद देतात.

सायप्रस हा भूमध्य समुद्रातील बेटावर वसलेला देश त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. भौगोलिकदृष्ट्या सायप्रस आशियाच्या जवळ आहे, परंतु ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक युरोपियन देश आहे. सायप्रिओट संस्कृती भूमध्य सागरातील सर्वात जुनी संस्कृती आहे. हे बेट एकापाठोपाठ अश्शूर, इजिप्शियन, पर्शियन, ग्रीक, रोमन आणि ब्रिटिश वर्चस्वाखाली आले. निसर्गरम्य समुद्र किनारे, ग्रीक, तुर्की आणि रोमन संस्कृतींचा श्रीमंत वारसा आणि आर्थिक सुबत्ता यामुळे सायप्रस १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात पर्यटकांमध्ये आवडते पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आला. अशा सायप्रसला जाण्याची संधी मला एका  ट्रेनिंगच्या निमित्ताने मिळाली, त्यामुळे मी भलतीच खूश होते. वेळात वेळ काढून एका शनिवार-रविवारी मी स्थानिक टूर कंपनीबरोबर सायप्रस बघायला निघाले.

सायप्रसमध्ये निकोशिया, लिमासोल आणि पाफोस ही तीन मुख्य शहरे आहेत. निकोशिया ही सायप्रसची राजधानी आहे. निकोशियामध्ये बरीच प्राचीन आणि ऐतिहासिक इमारती आणि स्मारके बघावयास मिळतात. शहराच्या मध्यभागी आर्चबिशप सायप्रियन स्क्वेअर आहे. या ठिकाणी सायप्रसचे पहिले अध्यक्ष आर्चबिशप मकारिओस यांचा पुतळा आपल्याला बघायला मिळतो. मकारिओस सायप्रियट धर्मगुरू आणि राजकारणीही होते. या पुतळ्याच्या मागे आर्चबिशप पॅलेस आहे. हे अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय आहे. हे अलीकडेच म्हणजे १९व्या शतकात बांधलेले आहे.

याच भागात १५व्या शतकात गॉथिक शैलीत बांधलेला जुना राजवाडा आणि सेंट जॉन द इव्हँजेलिस्टचे कॅथेड्रल आहे. हे चर्च सायप्रसचे मुख्य चर्च आहे. १४व्या शतकात या चर्चची स्थापना हाऊस ऑफ लुसिग्ननने केली होती. पुढे आर्चबिशप निकिफोरोसने सतराव्या शतकात चर्चची पुनर्बांधणी केली. पुनर्रचनेनंतर, चर्च १७२०मध्ये सायप्रसच्या आर्चबिशपांचे निवासस्थान झाले आणि सायप्रसच्या आर्चबिशपांचे सिंहासन तेथे ठेवले गेले. पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी चर्चवर घंटा बांधण्यास प्रतिबंधित केले होते, परंतु १८७८मध्ये ब्रिटिशांनी सायप्रस खरेदी केल्यानंतर त्यांनी धार्मिक प्रथांमध्ये अधिक स्वातंत्र्य दिले. त्यानंतर या चर्चवर १८व्या शतकात घंटा बसवण्यात आली, अशी माहिती मला तिथे मिळाली.

निकोशियामध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक आहे. त्याला ‘लिबर्टी स्मारक’ या नावाने ओळखले जाते. इथे ग्रीक देशभक्तांचे अनेक पुतळे एका ओळीने उभे केलेले आपण पाहतो. त्यातील एके ठिकाणी दोन पुतळ्यांत थोडी मोकळी जागा ठेवलेली  आहे. अनेक पर्यटक या मोकळ्या जागेत उभे राहून पुतळ्यांसह फोटो काढतात. मीदेखील एक स्मृती छायाचित्र काढले.

निकोसियाला भिंतींचे शहर म्हणून ओळखले जाते. वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांनी आक्रमकांपासून शहराचे संरक्षण करण्यासाठी किंवा त्यांच्या निवासस्थानांभोवती बांधलेल्या अनेक भिंती शहरात पाहायला मिळतात. नवीन तुर्की लोक सायप्रसमध्ये आले, तेव्हा ते साधारणपणे निकोसियाच्या उत्तर भागात राहत होते; त्या लोकांनी ‘तुर्की भिंत’ बांधली. भिंतीच्या आत आधुनिक वास्तुकलांसह अलीकडच्या काळात बांधलेल्या इमारती आपल्याला दिसतात. भूमध्य समुद्रातील अनेक ख्रिश्चन राज्यांनी ओटोमन आक्रमक झाल्यानंतर त्यांची तटबंदी मजबूत करण्यास सुरुवात केली. १४८९मध्ये जेव्हा सायप्रस व्हेनिसच्या आधिपत्याखाली होता तेव्हा ‘व्हेनेटियन भिंत’ बांधली गेली होती. सायप्रसला १९६०मध्ये  स्वातंत्र्य मिळाले. सायप्रसमध्ये तुर्की सायप्रिओट्सची लोकसंख्या अठरा टक्क्यांपेक्षा जास्त होती आणि त्यांना सायप्रस ग्रीक नव्हे तर तुर्कीचा भाग व्हावा असे वाटत होते, म्हणून ग्रीक सायप्रिओट्स आणि तुर्की सायप्रिओट्स यांच्यात वाद सुरू झाला. परिणामी, संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप केला आणि दोन्ही देशांमध्ये बफर झोन तयार केला, जेणेकरून पुढील तणाव आणि शत्रुत्व टाळता येईल. या बफर झोनला ‘ग्रीन लाईन-भिंत’ म्हणून ओळखले जाते. या ग्रीन लाईनच्या एका बाजूला सायप्रसचा ध्वज आहे आणि दुसऱ्या बाजूस तुर्की ध्वज आहे.

आम्हाला निकोशियात तुर्कांनी बांधलेली ‘बुयुक हान’ या नावाने प्रसिद्ध असलेली 'कारवांसराय' म्हणजेच व्यापाऱ्यांसाठी राहण्याची सोय आणि सामान ठेवण्यासाठी गोदामे असलेली जागा बघावयास मिळाली. १५७२मध्ये ऑटोमन राज्यात ही इमारत बांधली गेली. व्यापारी  उंटांवरून मालाची ने-आण करत असत. त्यामुळे प्रवासातील थांब्याच्या ठिकाणी, ज्यातून उंट सामान उतरवण्यासाठी गोदामात प्रवेश करू शकतील अशी उंच दरवाजे असलेली गोदामे बांधली गेली. त्यासोबत व्यापाऱ्यांच्या राहण्याची सोय असलेल्या लहान दरवाजांच्या खोल्याही दिसतात. मध्यभागी मशीद असून स्नान करण्यासाठी कारंजे आहेत. ब्रिटिशांच्या काळात या इमारतीचा उपयोग तुरुंग म्हणून केला गेला. आता येथे आपल्याला कलादालन, हॉटेल वगैरे दिसतात.

निकोशियात हिंडून झाल्यावर नंतर आम्ही लिमासोलला गेलो. लिमासोल हे सायप्रसमधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. सायप्रसमधील तुर्की हस्तक्षेप आणि फामागुस्टा बेटाचे मुख्य बंदर बंद केल्याने लिमासोल हे सायप्रस प्रजासत्ताकाचे मुख्य बंदर झाले आहे. या बंदरातून मोठ्या प्रमाणावर आंतरदेशीय व्यापार होतो. येथील समुद्रकिनारा खूपच सुंदर आहे. समुद्र किनाऱ्यालगत बरीच दुकाने, हॉटेल आणि रेस्टॉरंट आहेत. त्यामुळे या शहरात बरेच पर्यटक दिसतात. 

लिमासोलजवळच १३व्या शतकात बांधण्यात आलेला कोलोसी कॅसल आहे. मूळ किल्ला १२व्या शतकात बांधला होता, त्यानंतर किल्ल्याचे पुनरुजीवन झाले. किल्ल्यामध्ये आज तीन मजली इमारत आहे.  

सायप्रसमध्ये हिंडताना बऱ्याच भागात रस्त्याच्या बाजूला चुनखडीचे दगड असलेल्या पर्वतांच्या रांगा दिसतात. चुनखडीचे दगड आणि समुद्राचे खारे पाणी असूनही सायप्रसने डिस्टिल्ड पाईप वॉटर तंत्रज्ञानाच्या मदतीने जागोजागी ग्रीन झोन केले आहेत. 

लिमासोल बघून झाल्यावर आम्ही सायप्रसमधील तिसऱ्या प्रसिद्ध शहराकडे म्हणजेच पाफोसला निघालो आणि पाफोसजवळील समुद्रकिनाऱ्यावरील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळापाशी येऊन पोहचलो. या ठिकाणाला ‘ॲफ्रोडाइटीज् रॉक’ म्हणतात. हे ठिकाण ‘पेट्रा टौ रोमियो’ म्हणूनही ओळखले जाते. ग्रीक पुराणकथांतील एका कथेनुसार हे ग्रीक देवता - ॲफ्रोडाइटीचे जन्मस्थान आहे. ग्रीक पौराणिक कथांमध्ये क्रोनस हा युरेनस (स्वर्ग) आणि गिया (पृथ्वी) यांचा मुलगा होता. त्याने स्वतःच्या वडिलांचा, युरेनसचा तुकडा कापला आणि तो समुद्रात फेकला. जेव्हा तो तुकडा समुद्रात पडला, तेव्हा पाण्याला फेस येऊ लागला आणि लाटांमधून ॲफ्रोडाइटी ही सौंदर्य आणि प्रेमाची देवता उदयास आली. म्हणूनच जर स्त्रीने पौर्णिमेच्या दिवशी या किनाऱ्यावर स्नान केले, तर ती आयुष्यभर सुंदर राहते अशी अशी स्थानिक लोकांची भावना आहे.

 या समुद्र किनाऱ्यावर वाळू नसून गोटे, छोटे छोटे दगड (पेबल्स) आहेत. त्यात बरेच दगड बदामाच्या आकाराचे आहेत. बदामाच्या आकाराचे हे दगड गोळा करून घरी ठेवल्यास तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती भेटते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे सगळेच टुरिस्ट येथे ‘प्रेमाचे पेबल्स’ शोधताना दिसतात. समुद्राचे निळेशार, स्वच्छ पाणी आणि आजूबाजूचा शांत परिसर बघून ॲफ्रोडाइटीचे जन्मस्थान इतके सुंदर आणि अद्‍भुत आहे, तर ती किती सुंदर असावी असे विचार मनात येऊन जातात. पौर्णिमेच्या रात्री तिची छाया तिथल्या तीन दगडांपाशी दिसते असे लोक सांगतात. असेलही खरे!

दुसऱ्या दिवशी आम्ही ‘बाथ’ या ठिकाणी गेलो. हे एक हिरव्यागार निसर्गाने नटलेले सुंदर ठिकाण आहे. खडकांवरून वाहणारा पाण्याचा नैसर्गिक झरा आणि त्यातून तयार झालेला नैसर्गिक तलाव, तलावाच्या आजूबाजूची हिरवळ, थंडगार हळुवार वारा आणि फुलांचा ओला सुगंध रोमांचित वातावरणाचा अनुभव देतात. ग्रीक पौराणिक कथेनुसार, याच ठिकाणी ॲफ्रोडाइटीला तिचा प्रियकर अडोनीस भेटला. तलावात अडोनीस आणि ॲफ्रोडाइटीचा पुतळा आहे. या तलावाच्या आजूबाजूला सुंदर पायवाटा केल्या आहेत. ताज्या हवेचा आनंद लुटण्यासाठी, ट्रेकिंग करणारे बरेच शौकीन या उंचसखल पाऊलवाटांवरून चालताना दिसतात.

या ठिकाणी एक रेस्टॉरंट होते. या रेस्टॉरंटमध्ये कौपेपिया हा सायप्रसमधला प्रसिद्ध पदार्थ खायला मिळाला. हा पदार्थ तपकिरी तांदूळ, ताज्या औषधी वनस्पती, मसाला आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण द्राक्षाच्या पानात भरून ते उकडून करतात. हे कौपेपिया खूपच चवदार होते, अजूनही चव माझ्या जिभेवर रेंगाळत आहे.

‘बाथ’मध्ये थोडी विश्रांती घेऊन आम्ही ‘कोरल बे’ या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्याकडे निघालो. वाटेत सायप्रस वाईनरी पाहावयास मिळाल्या. सायप्रस वाईनसाठी प्रसिद्ध आहे. येथे सहसा डोंगराळ भागात द्राक्षे पिकवतात. सायप्रसमधील द्राक्षांच्या बागा प्रामुख्याने पाफोस आणि टूडोस पर्वताच्या दक्षिणेकडील उतारावर आहेत. कमांडारिया ह्या गोड स्वादिष्ट वाईनचा सर्वात जुना, जगप्रसिद्ध ब्रँड सायप्रसमधलाच आहे.

कोरल बे बीचवर पर्यटकांची बरीच वर्दळ पाहावयास मिळते. निळ्या पाण्याचा, सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारा मनाला भावतो. तरुण आणि वृद्ध दोघेही समुद्रकिनारी पोहण्याचा आनंद घेताना दिसतात. येथे काही वॉटर स्पोर्ट्सदेखील पाहावयास मिळाले. 

सायप्रसच्या सहलीत ग्रीक, ओटोमन आणि रोमन संस्कृतीचा इतिहास सांगणाऱ्या वास्तू आपल्या मनात घर करून राहतात. एवढ्या छोट्या देशाने बरीच सत्तांची स्थित्यंतरे पाहूनदेखील त्यातून झालेल्या पडझडीतूनही आपली शान टिकवून ठेवली आहे. सायप्रसचे निळ्या रंगांचे भुरळ पडणारे समुद्रकिनारे, ॲफ्रोडाइटी आणि अडोनीस यांच्या प्रेमकथा आपल्याला स्वर्गलोकाची सफर केल्याचा आनंद देतात. संधी मिळाल्यास पाच-सहा दिवसांची सायप्रसची ट्रिप  जरूर करा.
 

संबंधित बातम्या