अवघा रंग एक झाला...   

सुयोग बेंद्रे, कोरेगाव, जि. सातारा
सोमवार, 19 सप्टेंबर 2022

सकाळी सहा वाजल्यापासून एकमेकांच्या सहवासात असलेले आम्ही परतीच्या वाटेला लागलो तेव्हा दुपारचे चार वाजून गेले होते. पाऊस थांबला होता. भारावलेल्या-मंतरलेल्या अवस्थेत आम्ही सर्वच जण नि:शब्द झालो होतो. ‘मी-तू पण गेले वाया’ या अवस्थेत पोहोचून ‘अवघा रंग एक झाला’ या भावनेचा परिपोष आम्हा सर्वांमध्ये होऊन जरंडेश्वरच्या ट्रेकचा मेघमल्हार कायमच मनात रुंजी घालत राहणार आहे. 

कॉलेजचे स्वप्नाळू दिवस संपल्यानंतर भाकरीचा चंद्र आणि आयुष्याचा जोडीदार शोधण्याचा संघर्ष सर्वांचाच सुरू होतो. कॉलेजच्या कॅम्पसमध्येच भाकरीचा चंद्र आणि नशीब जोरावर असेल तर आयुष्याचा जोडीदार मिळवणारे भाग्यवान मोजकेच! अशा शोधाशोधीमध्ये लोकसेवा आयोगामार्फत झालेली परीक्षा उत्तीर्ण होऊन महसूल विभागात नायब तहसीलदार या पदावर नेमणूक मिळाली. कॉलेजपासून नेमणुकीपर्यंतच्या प्रवासात जमेल तसे ट्रेक केले... पुरंदर, देवगिरी किल्ला आणि वेरूळच्या, राजमाची, राजगड, कळसूबाई शिखर अन् हरिश्चंद्र गड!

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात नेमणूक झाल्यानंतर कोरेगाव तालुक्यातील चंदन-वंदन व खेड-नांदगिरी या किल्ल्यांवर अधूनमधून जाणे-येणे होतेच. कोरेगाव-खटावच्या हद्दीवरील वर्धनगडावरही जाणे-येणे होते. पण सर्वात संस्मरणीय आणि उल्लेखनीय असा ट्रेक म्हणजे कोरेगाव तालुक्यातील ‘जरंडेश्वर’ या डोंगरावर कोरेगाव उपविभागातील महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबर केलेला ट्रेक!

तसा मी आणि आमच्यातील सगळेच अधिकारी-कर्मचारी रूढार्थाने ‘हाडाचे ट्रेकर’ नाहीत. निदान ट्रेकिंगच्या दिवशी तरी तसे कोणी हाडाचे ट्रेकर वाटला/ वाटली नाही. पायात साधी चप्पल घालून ट्रेक करणारा कपाळ करंटा मी! तसा स्वभावाने अंतर्मुख असल्यामुळे पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात असताना ट्रेकरच्या गोतावळ्यात कधी जाणे झालेच नाही. घरामध्ये आणि नातेवाइकांमध्येही, ‘चला रे पोरांनो! गड-किल्ले पाहूया!’ असे उत्साहाने म्हणणारा कोणी नाही. अशा वातावरणात संधी मिळेल तेव्हा प्रवाहासोबत ट्रेकमध्ये वाहवत जायचे असे माझे ट्रेकबाबतचे एकंदर धोरण! वाचनाची आवड असल्यामुळे गड किल्ले आणि शिवकाळाबद्दल भरपूर वाचन केले आहे. पण हाडाच्या ट्रेकरकडे असणाऱ्या ‘ट्रेकस्य कथा रम्या’ माझ्याकडे नाहीत. आहेत त्या अगदी तुटपुंज्या आणि सांगायला गेलो तर आत्मप्रौढी कथनाचा दोष यायचा. तरीदेखील ‘माझी ट्रेककथा’ सांगण्यापेक्षा ‘आमची ट्रेककथा’   सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच करावासा वाटतो. 

सातारा जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहेच. पण सातारा जिल्ह्यामध्ये घनदाट वनराईने नटलेले छोटे-मोठे डोंगर ट्रेकिंगसाठी उपलब्ध आहेत. किन्हईचा साखरगड, औंधमधील यमाई देवीचा डोंगर, वरच्या अम्भेरीमधील कार्तिक स्वामीचे मंदिर, भाडळे-हासेवाडी-हिवरे भागातील महादेव डोंगर आणि भाविक पर्यटकांचा लाडका जरंडेश्वर कोरेगाव तालुक्यामध्ये आहे. लोककथेनुसार मारुतीरायाने संजीवनी मिळवण्यासाठी द्रोणागिरी पर्वत घेऊन जाताना त्याचा एक भाग इथे पडला व     ‘जरंडेश्वर’ म्हणून हा डोंगर प्रसिद्धीस आला. 

दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रामध्ये महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. १ ऑगस्ट ते ३१ जुलै असे महसुली वर्ष गणले जाते. या दिवशी उल्लेखनीय काम केलेल्या कर्मचारी व अधिकारी यांचा सन्मान केला जातो. पुढील महसुली वर्षातील कामकाजाचा नव्याने संकल्प केला जातो. तर यावर्षीचा महसूल दिन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करूया असा विचार मांडून सर्वांच्या सहमतीने १ ऑगस्टला पहाटे सहा वाजता जरंडेश्वराच्या पायथ्याला सर्वांनी जमायचे आणि ट्रेकिंग करायचे असे ठरले. तसा निरोप सर्वांना दिला गेला. ‘अनुपस्थितीची नोंद गांभीर्याने घेतली जाईल,’ असे आमच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील आणि तहसीलदार अमोल कदम  यांनी खास ‘प्रशासकीय भाषेत’ सर्वाना सांगितल्यावर ‘राजा बोले आणि दळ हाले’ या म्हणीनुसार अगदी कराड, फलटण, खंडाळा येथे राहणारे आमचे सहकारी भल्या पहाटेचा प्रवास करून जरंडेश्वरच्या पायथ्याला जमू लागले. ज्यांना आरोग्य समस्या होत्या त्यांनीदेखील किमान पायथ्याला येऊन थांबायचे होते. पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. जरंडेश्वरचे जंगल आणि जंगलाला पोसणारी धरतीमाय भिजून चिंब झाली होती. प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडल अधिकारी, तलाठी, महसूल सहायक, वाहनचालक, शिपाई आणि कोतवाल असे सगळे जण महसूल दिनाच्या भल्या पहाटे जरंडेश्वरच्या पायथ्याशी जमलेले पाहून साक्षात जरंडेश्वर डोंगरसुद्धा अचंबित झाला असेल.  

मी आणि अमोल सरांनी जरंड्याचा पायथा सायकलवर गाठायचा असे ऐनवेळी नियोजन केले. अंतर साधारण १५ ते १७ किमी! अधूनमधून कार्यालयात सायकलवरून जायचा शिरस्ता मी सुरू केलाय. पण जरंडेश्वरला सायकलवर जायचे ही कल्पना भन्नाट होती. रस्ता घसरडा झाला होता. इथून तिथून चढ होता. पण धाडस केले. पायथा गाठायला साडेसहा वाजले. आम्ही येण्यापूर्वी पाटील मॅडमच्या नेतृत्वाखाली एक तुकडी डोंगराच्या मध्यातून पुढे निघाली होती. त्यामुळे मोठ्या समूहासोबत गप्पा-टप्पा करत चढाई करायची आमची दोघांची संधी हुकली.

हा ट्रेक करण्यापूर्वी आम्ही दोघे पाटण तालुक्यात तीन दिवस नैसर्गिक आपत्ती निवारण कामकाजासाठी जाऊन आलो होतो. सोबत आमचे मंडल अधिकारी धुमाळ आणि तलाठी सागर आणि आमचे वाहनचालक शिंदेमामा होतेच. 

जुलै २०२१मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या बातम्या कोरेगावमध्ये बसून वाचताना नुकसान खूप होतेय, वातावरण बदलाचा हा परिणाम आहे अशा ‘अभ्यासू’ गप्पा होत होत्या. परंतु पाटण तालुक्यात झालेले नुकसान समक्ष बघून मान गोठून गेले. पाटणमधील अनुभव आम्हाला तळातून हादरवून टाकणारा होता. स्वतःभोवती विणलेले कोश कुरवाळत जगण्याची मध्यमवर्गीय सवय लागलेल्या आम्हा सर्वांनाच पाटणमधील निसर्गाच्या रौद्र रूपाने अंतर्मुख व्हायला लावले. आपल्या रोजच्या जगण्याचे ठोके कायमच सुरळीत पडतील याची शाश्वती नाही, याची बोचरी जाणीव शहारा आणणारी होती. निसर्गाचे मनमोहक रूप पाहून डोळे सुखावून घेणारे आम्ही पाटणवरून माघारी येताना निःशब्द होतो. या पार्श्वभूमीवर जरंडेश्वरची चढण करताना नेहमीचा ट्रेकिंग मूड नव्हता. एका सखोल विचारात मग्न झालेल्या भावावस्थेत मी आणि अमोल सर होतो. 

जरंडेश्वर डोंगराचा परीघ कोरेगाव व सातारा तालुक्यात विस्तारला आहे. त्यामुळे दर शनिवारी सातारा-कोरेगाव परिसरातील ट्रेकर व मारुतीरायाचे भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने जमतात. चढण खडी असल्याने शारीरिक क्षमतेचा कस लागतो. वनविभागाने मूळ निसर्ग सौंदर्याला धक्का न लावता उत्तम दर्जाच्या पायऱ्या घडविल्या आहेत. विश्रांतीसाठी अधूनमधून बाकडी बसवली आहेत. येथील मारुतीची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी केली आहे, अशी कथा आहे. पायथ्यापासून माथ्यापर्यंत घनदाट वनराई असल्याने विविध पक्ष्यांचा वास इथे आहे. त्यामुळे पाऊण ते एक तासात चढण संपली तरी अजिबात शिणवटा जाणवत नाही. 

वनविभागाने बांधलेला पायऱ्यांचा रस्ता निम्म्यापर्यंतच आहे. त्यानंतर मात्र पायवाटेने जावे लागते. या पायवाटांच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी आहे. पाऊस चालू असेल, तर डोंगरावरून सतत वाहणाऱ्या पाण्यातूनच जावे लागते. पाडळी स्टेशन या गावातूनदेखील डोंगरावर यायला रस्ता आहे. मात्र या रस्त्याची चढण खडी असल्यामुळे शक्यतो ट्रेकर व भाविक जांब बु. या गावातूनच जाणारा मार्ग पसंत करतात. 

पाटील मॅडम आणि बरेचसे महसूल कर्मचारी आमच्या अगोदर पोहोचले होते. आम्ही कधी पोहोचणार यासाठी आता फोन सुरू झाले होते. त्यामुळे आमची गती वाढली. मंदिराजवळ पोहोचत नाही, तोच आमच्या दोघांच्या सुविद्य पत्नी आमच्या लेकरांना घेऊन जरंडेश्वरच्या पायथ्याशी येऊन थांबल्या होत्या. ‘आम्ही थांबलोय! तुम्ही कधीपर्यंत माघारी येताय?’ असे खालून फोन सुरू झाले. वर कधी पोहोचताय म्हणून पाटील मॅडमचे निरोप आणि खाली कधी येताय असा हमीद आणि ओवीदीदीचा फोन... या फोनाफोनीत आम्ही पाटील मॅडमना, ‘येस बॉस’ म्हणत अखेर जरंडेश्वरवरील मारुती मंदिराच्या समोर पोहोचलो. पाऊस संथ होता, पण अखंड चालू होता. मंदिरासमोर दुतर्फा असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही सगळे थांबलो. आम्ही सायकलवर आल्यामुळे आमच्या दोघांचे सर्वांनी जरा जास्तच कौतुक केले. पण माघारी जाताना पुन्हा सायकलवर कोरेगावला जायचे आहे, ही भावना मात्र कौतुकामुळे सुखावणाऱ्या मनाला उगीचच चिडवत होती. 

सगळा आसमंत ढगांनी व्यापल्यामुळे खालचे काहीच दिसत नव्हते. आकाश निरभ्र असेल तर जरंडेश्वर रेल्वे थांबा दिसतो. नजरेच्या एका कटाक्षात मालवाहतूक करणारी रेल्वे दौडताना दिसते. सातारा रोड - पळशी - अंबवडे या भागातील सुजलाम् सुफलाम् शेती नजरेस पडते. जळगावमधील एफसीआयचे गोडाऊनदेखील या डोंगरावरून पाहता येते. मुख्य म्हणजे घामाघूम होत डोंगर चढल्यावर पाडळीच्या बाजूने उलट्या दिशेने घोंगावत येणारा वारा अंगावर घेण्याचे सुख काही औरच! 

शत्रूवर नजर ठेवायला हा डोंगर तसा मोक्याचा असावा, मात्र यावर तटबंदीचे पागोटे मात्र काही चढवले गेले नाही. शेजारचा चंदन वंदन, खेड नांदगिरी किल्ल्याची तटबंदी पाहून जरंडेश्वर डोंगर नक्कीच हळहळत असेल. मात्र समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुतीरायाचा वास या डोंगरावर असल्याने ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून हा डोंगर तितका पारखा नाही ही बाब सुखावणारी!  

मारुतीच्या मंदिरासमोर जुनी दीपमाळ आहे. तसेच शेजारच्या इमारतीत अजस्र असे सीतामाईचे जाते पाहून डोळे विस्फारतात. मंदिराचा सभामंडप पौराणिक चित्रांनी सजलेला आहे. गाभाऱ्यात मारुतीरायाची प्रसन्न मूर्ती विराजमान झालेली आहे. विशेषतः शनिवारी होणाऱ्या महाप्रसादरूपी खिचडीसाठी व आरतीसाठी अनेक भाविक येथे येत असतात. 

सर्वजण गटागटाने जमून कार्यालयीन औपचारिकता बाजूला ठेवून अगदी मोकळेपणाने हास्य विनोदात रमले होते. गप्पांचा फड चांगलाच रंगला होता. फोटो सेशनला तोटा नव्हता. कोसळणाऱ्या पावसाच्या सरींपासून एरवी स्वतःचा बचाव करणारे आम्ही ‘पावसाने थिजायचे नाही तर चिंब भिजायचे’ असा निर्धार करत, पाऊस अंगावर झेलत झेलत गप्पांमध्ये दंग झालो होतो. आमच्यातले काहीजण मात्र प्रकृतीमुळे पायथ्याशीच थांबून होते. काहीजण कडक इस्त्रीचे कपडे घालून आले होते, तर काहीजणी अगदी सणावाराच्या साड्या नेसून आलेल्या होत्या. जो तो आपापला आनंद आपापल्या परीने शोधताना दिसत होता, ही खरेच सुखावणारी बाब होती. आम्ही लवकर खाली येत नाही असे बघून ओवी, हमीद आणि श्री यांनी भाग्यश्रीसोबत डोंगर चढायला सुरुवात केली, ही वार्ता ऐकून आम्ही फोटो सेशन आवरते घेऊन उतरायला सुरुवात केली. 

अद्वैतावर भाष्य करताना कवयित्री बहिणाबाई म्हणतात, ‘उतरणी चढणीचे, दोन्हीमधी गती एक’... आमच्या चढणीच्या आणि उतरणीच्या गतीमध्ये जरी द्वैत असले, म्हणजेच चढण आणि उतरण करताना गती जरी भिन्न असली तरी आनंदाची भावना सर्वांमध्ये समान होती; हे आमच्या सर्वांमधील ‘अद्वैत’च नाही का?

पायथ्याला आल्यावर सर्वांनी वृक्षारोपण करून शेजारील सुरभी कृषी केंद्रात पेटपूजा केली आणि महसूल दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे सत्काराचे कार्यक्रम झाल्यावर मनोगते व्यक्त करण्यासाठी आवाहन करण्यात आले. नेहमीप्रमाणे नेहमीचे दोन-चार वक्ते बोलण्याची औपचारिकता पूर्ण करून कार्यक्रम संपेल, हा माझा अंदाज चुकला. तब्बल तीन तासांहून अधिक वेळ मनोगते व्यक्त होत होती. खुल्या सभामंडपातून समोर धुक्यात लपेटलेला जरंडेश्वर दिसत होता. आकाशात काळे मेघ दाटले होते. आम्हा सर्वांच्या मनात भावनांनी फेर धरला होता. बोलणारा प्रत्येक कर्मचारी एका वेगळ्याच जाणिवेच्या स्तरावरून व्यक्त होत होता. यापूर्वी कधीही अनुभवला नसेल अशा विलक्षण अनुभवस्थितीमधून आम्ही सर्वच जण जात होतो. 

सकाळी सहा वाजल्यापासून एकमेकांच्या सहवासात असलेले आम्ही परतीच्या वाटेला लागलो तेव्हा दुपारचे चार वाजून गेले होते. पाऊस थांबला होता. भारावलेल्या-मंतरलेल्या अवस्थेत आम्ही सर्वच जण नि:शब्द झालो होतो. ‘मी-तू पण गेले वाया’ या अवस्थेत पोहोचून ‘अवघा रंग एक झाला’ या भावनेचा परिपोष आम्हा सर्वांमध्ये होऊन जरंडेश्वरच्या ट्रेकचा मेघमल्हार कायमच मनात रुंजी घालत राहणार आहे. 

संबंधित बातम्या