हत्ती, वाघ आणि बरेच काही!

सुजाता लेले
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022

भ्रमंती

गुगलवर सर्च केले की काझीरंगाबद्दलची आणि कान्हाची सर्व माहिती मिळतेच, पण अनुभव मात्र वेगवेगळे असतात... आणि ते शेअरच करावे लागतात. आम्हीही काझीरंगाला फोलिएज ग्रुपबरोबर एकोणीसजण (पुणे, मुंबई, नाशिकचे मिळून) गेलो होतो. काझीरंगाला जायच्या आदल्या दिवशी आवश्यक असलेली आरटीपीसीआर चाचणी केली. त्याचा रिपोर्ट येण्याआधी उगाचच धाकधूक होत होती. पण त्या रिपोर्टनी आम्हाला काझीरंगाला जायची परवानगी दिली. हुश्श झाले!

अनेक सोपस्कार पार पाडून अखेरीस आम्ही  एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आसाम राज्यातील नामेरी जंगलात पोचलो. युनेस्कोने या राष्ट्रीय उद्यानाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. 

ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याचा आवाकाच प्रचंड असल्याने इथे दलदलीच्या जागा खूप आहेत, ओलसर रुंद पानांचे जंगल आहे. त्यामुळे पक्षी दिसणार नाहीत असे कसे होईल? आम्हाला ऑटरही दिसले... आणि केवळ फक्त फोटोसेशनसाठीच ओळीने बसल्यासारखी आठ-नऊ कासवेसुद्धा दिसली. राफ्टिंगचा (आम्ही नाही केले, वल्हवणारे तिथले स्थानिकच होते) मनमुराद आनंद लुटला, तेव्हा फारसे पक्षी दिसले नाहीत. पण काही ठिकाणी नदीचा प्रवाह इतका जोरदार होता की आमच्या बोटीला चांगलेच दणके बसत होते. त्यामुळे पाण्याचे तुषार आमच्यावर येत होते. त्या गार पाण्याचा आणि गार हवेच्या झुळकीचा स्पर्श आम्हाला सुखावत होता. जिथे बसलो होतो तिथून पुढे जवळजवळ दोन तास बोटीतून आमचा प्रवास सुरू होता. उतरण्याचे ठिकाण वेगळे होते. ते ठिकाण दिसू लागले.. त्या ठिकाणच्या अगदी थोडेसे पुढे एक जंगली हत्ती आलेला दिसला. धाकधूक सुरू झाली होती, पण अलीकडेच उतरायचे होते त्यामुळे जीव भांड्यात पडला. या जंगलातले गवत खूप उंच वाढते म्हणूनच त्याला एलिफंट ग्रास नाव पडले असावे.

दुसऱ्या दिवशी चालत चालत पाणवठ्यापर्यंत निसर्ग भ्रमंती होती. तिथे जंगलातील प्राणी पाणी प्यायला येऊ शकतात त्यामुळे त्यांचे दर्शन होऊ शकते, अगदी चालतानासुद्धा, असे आम्हाला सांगण्यात आले होते. त्यामुळेच एखादा प्राणी बिथरला तर आमच्याबरोबर एक बंदूकधारी गार्ड होता‌. तिथे विविध प्रकारचे पाणपक्षी दिसले. खरेतर पक्षी बघतानासुद्धा आदल्या दिवशी राफ्टिंग करताना पाण्यापाशी दिसलेला रानटी हत्तीच आठवत होता. त्यामुळे निम्मे लक्ष हत्ती नाही ना, हेच पाहण्यात होते. कारण त्याच रात्री ग्रुपमधल्या एकाने हत्तींनी सफारी गाड्या उलट्या केल्या होत्या त्याचे व्हिडिओ पाठवले होते. त्यामुळे जरा भीती वाटत होती. 

दुसऱ्या दिवशी जीपमधून सफारी करताना हत्तिणींचा कळप पाणवठ्याकडून निघून जंगल वाटेने (त्याच वाटेनी आमची जीप जाणार होती) झाडीत शिरत होते. तेवढ्यात आपले पिल्लू पाणवठ्यावर राहिले आहे, हे लक्षात आल्यावर त्यातल्या एका हत्तिणीने जोरात चित्कार केला आणि पिल्लाला आणायला पाणवठ्याच्या दिशेला फिरली. तिथे काही हत्ती होते. त्यांनी पण जोराचा चित्कार केला, माकडांनीही धोक्याची सूचना दिली आणि त्याचवेळी लांबच्या झाडीत काहीतरी हालचाल झाली. वाघ होता. पण दुर्बिणीतून बघेपर्यंत झाडीतली हालचाल थांबली होती. हत्तीण आपले पिल्लू घेऊन जोरात चित्कार करत पिल्लाबरोबर आपल्या कळपात सुखरूप आली. पण तोपर्यंत तिच्यासाठी थांबलेल्या हत्तिणी आमच्या चार जीपवर लक्ष ठेवून होत्या.. आम्ही खूप दूर नव्हतो.. त्यामुळे धडधड होत होती. तर आमच्या ग्रुपमधली एकजण तर, समजा हत्ती उधळले तर कोणकोणत्या झाडांवर चढता येईल? तशी झाडे शोधण्यात गर्क होती. 

थोडेसे पुढे काही जंगली म्हशी पाण्यात बसल्या होत्या. अचानक त्या उठल्या आणि सैरावैरा पळू लागल्या, हरणेही कावरीबावरी होऊन इकडे तिकडे बघत होती. त्यामुळे आम्हाला खात्रीच पटली होती की जवळपासच्या एलिफंट ग्रासमध्ये वाघोबा असणार. पण गवताचा रंग त्याच्या रंगासारखाच असल्याने तो दिसत नव्हता. त्याच दिवशी दुपारच्या सफारीला दुसऱ्या बाजूने गेलो तर पुन्हा हत्तींचा कळप फक्त आमच्याच जीपला दिसला. त्यावेळी काही हत्तिणी जंगल वाटेच्या झाडांपाशी होत्या. आमच्या जीपमागे आणखीन एक जीप होती. त्यातील सर्वजण हत्ती दिसल्यावर खूप आरडाओरडा करायला लागले. त्यामुळे दुसऱ्या बाजूने येणारी हत्तीण संथ चालू लागली आणि समोरचे हत्तीही सावध झाले... दोन्ही बाजूंनी हत्ती आमच्या दोन्ही जीपकडे पाहू लागले. त्याचवेळी आणखीन एक हत्तीण तिच्या पिल्लाला घेऊन आली आणि ते तिघेही समोरच्या कळपात सामील झाले. मग कळप झाडीत शिरल्याचे  पाहून आमच्या जीप जंगलवाटेवरून पुढे जाणार तेवढ्यात तोच कळप अचानक झाडीतून बाहेर आला आणि आम्ही जाणार होतो त्या वाटेवरून जाऊ लागल्या. त्यामुळे साहजिकच आम्ही थांबलो. काय त्यांच्या मनात आले कुणास ठाऊक. पण ते पुन्हा उलटे फिरले आणि झाडीत गेले. हे सगळे घडत असताना मी मात्र खूप घाबरले होते. आपण उलटे फिरूयात असे मी गाइडला सांगत होते. पण तो म्हणाला, ‘दीदी घबाराओ मत, कुछ नहीं करेंगे। आप जोरजोरसे बातें मत करो। वो निकल जायेंगे..’ हे ऐकून मी गप्प बसले. मनातल्या मनात मात्र, ‘देवा..देवा.. या कळपाला लवकरात लवकर झाडीत शिरायची बुद्धी दे..’ अशी प्रार्थना करत होते. याला कारण घाबरवणारे व्हिडिओ आणि कॉर्बेटला आलेला अनुभव.. यामुळे हत्ती दिसले की भीती वाटते... पण जंगलात तर जायचे असते.. असो! 

हे जंगल ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते एकशिंगी गेंडे कधी दिसताहेत असे झाले होते. अखेर माय-लेकराची जोडी दिसली. दोघांनी थोडावेळ आमच्याकडे बघितले, मग निघून गेले. एका ठिकाणी जंगली म्हशी पाण्यात डुंबत होत्या. त्याच ठिकाणी डुकरे, हरणे, चार गेंडे होते. ती सूर्यास्ताची वेळ होती. सूर्याची पाण्यात पडलेली किरणे म्हणजे जणू रत्ने चमचमत आहेत असेच सुंदर दृश्य दिसत होते. ते बघताना फोटो काढायचेही भान राहिले नव्हते. ही निसर्ग सौंदर्याची जादू फक्त डोळ्यांच्या कॅमेरात आणि मेंदूच्या आठवणींच्या पेटीत बंद करून ठेवली होती. 

शाकाहारी प्राणी-पक्ष्यांना वृक्षवेलींशिवाय जगणे कठीण, तर शाकाहारी प्राणी-पक्ष्यांशिवाय मांसाहारी प्राणी-पक्ष्यांचे जगणे कठीण आहे. म्हणूनच भारतीय जंगलात फक्त वाघच बघायला जायचे नसते, तर सर्व जंगल बघावे. कारण या सर्वांशिवाय जंगल अपूर्ण आहे. हे सगळे जरी मी लिहिलेले असले तरीसुद्धा काझीरंगाच्या जंगलात वाघाचे दर्शन झाले नाही, याचे थोडेसे मलाही वाईट वाटलेच. हे मनापासून कबूल करावेसे वाटते.

...पण म्हणूनच की काय कान्हाच्या जंगलात पहिल्याच दिवशीच्या नाईट सफारीला वाघाची जोडी दिसली. भयाण अंधारात त्यांचे चमकलेले डोळे पाहून थोडेसे धस्स झाले खरे! कारण अंधारातल्या जंगल सफारीचा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होते. अंधारामुळे त्यांचे आकारमान मोठे दिसत होते. थोडे पुढे गेल्यावर खूप सारे चितळ (स्पॉटेड डिअर) घोळक्याने बसलेले दिसले. खूप डोळे चमकत होते. आणखीन पुढे गेल्यावर अगदी वाटेच्या कडेला धष्टपुष्ट गौर बसला होता. अंधारात तर भीतीच वाटेल असा तो सफारी जीपकडे बघत होता. एक वेगळा अनुभव मिळत होता. नाईट सफारी फक्त बफर झोनमध्येच करता येते. आणखी पुढे गेल्यावर ड्रायव्हरने जीपचे दिवे बंद केले आणि आम्हाला अंधार अनुभवायला सांगितले. एक विचित्र पण भयाण शांतता अनुभवत होतो. कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता येत नव्हते. जेव्हा वर बघितले तेव्हा प्रदूषणमुक्त आकाश ताऱ्यांनी चमचमताना  दिसले, हे सुंदर दृश्य आपणा शहरवासीयांना अनुभवायचे भाग्य मिळत नाही..हे आपले दुर्दैव! जंगलातील रात्र अनुभवायला नक्कीच हवीहवीशी वाटत होती. हळूहळू नाईट सफारीची वेळ संपत आली होती आणि जाता जाता सांबर नर-मादी दिसले. जंगलातून बाहेर पडलो, हुश्श झाले खरे..! 

आम्ही जिथे उतरलो होतो ते ठिकाण बफर झोनमध्ये होते. ठिकाण यायला अक्षरशः एक ते दीड किलोमीटरचे अंतर बाकी होते आणि त्या अंधारात काहीतरी चमकलेले आमच्या गाइडने बघितले, तर चक्क एक वाघीण चालत येताना दिसली. रात्री साडेदहा- पावणे अकराच्या सुमारास दिसलेली वाघीण पाहून स्तब्धच झालो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलातच न्याहारी घेताना आमचा ड्रायव्हर म्हणाला, लवकर निघूयात.. वानरांचे आणि स्पॉटेड डिअरचे कॉल येत आहेत. आम्ही निघालो, पाहतो तर मोकळ्या जागेतून वाघ चालला होता. शाही थाटात आला आणि त्याच जोशात झाडीत शिरला पण! व्याघ्रदर्शन झाले! पाठोपाठ दीड दिवस वाघोबांचे दर्शन म्हणजे दीड दिवसाच्या गणपतीबाप्पाची आठवण झाली. त्या दिवशी दुपारच्या आणि त्याच्या नंतरच्या दोन्ही सफारीला वाघ दिसला नाही, पण त्या सफारीला अस्वल अगदी जवळून बघितले, काळविटे दिसली. बार्किंग डिअरचा कॉल येत होता. त्याचवेळी नीलिमा पक्ष्याची जोडी दिसली, दोन कोल्हे शिकारीच्या शोधात दिसले आणि दुसरीकडे बारसिंगाचा प्रियकर आपल्या प्रेयसीला साद देतानाचा आवाज ऐकला, त्यामुळेच ‘धोका आहे’ यातला आणि ‘भेटण्यासाठी’च्या आवाजातला फरक कळला. 

गवतांवर कोळ्यांची जाळी दिसली, ठिकठिकाणी वाळवींनी केलेली वारुळे पाहण्यात आली, दगडांवर पांढरे डाग बघितले. हे सर्व पाहिल्यावर असे कळाले की असे दिसणे म्हणजे येथील हवा शुद्ध आहे. साग, साल, बांबू, बेहडा, बहावा, डोंगरी आवळा, चिंच असे तगडे वृक्ष बघितले. जंगल कॅट, कोंबड्या, मोर, डुकरे दिसली. सुंदर रंगसंगती असलेली फुलपाखरे बघितली. वाघ शोधण्याच्या मागे लागलो नाही म्हणून ही रानशोभा बघण्याचे भाग्य आम्हाला लाभले. रानातल्या वनस्पतींचा सुगंध साठवून ठेवला. एका वारुळावर माझा आवडता निळकंठ (इंडियन रोलर) पक्षी बसला होता. त्याचा फोटो काढायचा म्हणून जीप जवळ नेली तरीही तो उडाला नाही. उलट फोटोसाठी लुक्स मात्र भारी देत होता. त्याला सहज हात लावता आला असता इतक्या जवळ आम्ही होतो.

निघायच्या दिवशी फक्त सकाळचीच सफारी करायला मिळणार होती, त्यामुळे कशाला जायचे एवढ्या गारठ्यात, तेसुद्धा पहाटे पाचला उठून.. असा विचार आला. पण तरी निघालो. ‘अजून फटफटलेही नाही, तर आली ही माणसे आमच्या जंगलात,’ असेच त्यादिवशी दिसलेल्या तरुण वाघाने आमच्याकडे बघून म्हटले असावे. कारण त्याचे फिस्कारणे (खरेतर घाबरायलाच झाले होते) पाहून तसेच वाटले!

एकंदरीत सुंदर आठवणीमध्ये रमून आम्ही पुन्हा नागपूरच्या दिशेने निघालो. पण त्यावेळी ताडोबा आणि पेंचची आठवण झालीच!

संबंधित बातम्या