अमर्याद आणि मनस्वी भूसंपदा
भूरत्ना वसुंधरा
आपली पृथ्वी पर्वत, डोंगर-दऱ्या, पठारे, मैदाने, सरोवरे, नद्या, हिमनद्या आणि समुद्र किनारे अशा अनेकविध भूरूपांनी ओतप्रोत भरून गेली आहे. पृथ्वीवरील सर्वच प्रदेशांचे सौंदर्य केवळ याच भूसंपदेमुळे आहे. जगातील सर्वच प्रदेशांत आढळणारी भूसंपदेतील ही विविधता केवळ अनाकलनीय व अचंबित करणारी अशीच आहे.
पृथ्वीवर असलेली पर्वत, डोंगर-दऱ्या, पठारे, मैदाने, सरोवरे, नद्या, हिमनद्या आणि समुद्र किनारे ही सगळी भूरूपे आज जशी दिसतात तशीच ती अनादीअनंत काळापासून आहेत, असे आपल्याला वाटते. मात्र पृथ्वीवर आज आढळणारी ही विभिन्न भूरूपे वेगवेगळ्या कालावधीत व भूशास्त्रीय काळात तयार झाली आहेत.
वास्तविक प्रत्येक भूरूप, जन्म आणि मृत्यू या चक्रातून जात असते. पर्वताचा जन्म हा जसा भूकवचाच्या उंचावण्याने (Uplifting) किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकासारख्या घटनांतून होतो, तसाच पर्वतांशी निगडित असलेल्या नद्या, हिमनद्या, मैदाने यांचाही जन्म विशिष्ट प्रक्रियेतून होत असतो. आपल्या लाखो आणि कोट्यवधी वर्षांच्या जीवनकाळात या भूरूपांची नैसर्गिकपणे झीज चालू असते. अखेरीस ती सर्व झिजून झिजून लहान होतात किंवा भूपृष्ठाच्या हालचालींमुळे नष्ट होतात. भूकवच हळूहळू खचत गेल्यामुळेही त्यांची उंची कमी होते आणि नद्यांची पात्रे खचतात.
या अतिशय देखण्या भूरूपांकडे पाहण्याची जगातील पर्यटकांची, गिर्यारोहकांची आणि भ्रमंती करणाऱ्यांची दृष्टी वेगवेगळी असते. त्यांचे भूरूपिक (Geomorphic), भूवैज्ञानिक (Geoscientific), भूराजनैतिक (Geopolitical) आणि जैविक (Biotic) महत्त्वही प्रत्येकाला समजतेच असे नाही. अशा अनेक भूप्रदेशांबद्दलचे आपले ज्ञान अपूर्ण व काही वेळा चुकीचे आणि त्यांच्या क्षमतेबद्दलचे चुकीचे आडाखे बांधणारे असते.
भूशास्त्रीय दृष्ट्याही जगातील सगळ्याच भूप्रदेशांबद्दलचे आपले ज्ञान तसे नवीनच आहे, मात्र गेल्या काही वर्षांत ते अधिक योग्य आणि अचूक होत गेले आहे. सर्वच भूरूपांची निर्मिती आणि उत्क्रांती यासंबंधीचे ठोस पुरावे आज आपल्याला मिळाले आहेत.
हिमालय, सह्याद्री, अरवली, अँडीज्, आल्प्स हे पर्वत; पॅन्गॉन्ग, वुलर, वेम्बनाड, लेक ओन्टारियो ही सरोवरे, विविध किनारे, अशी देश विदेशातील अनेक भूरूपे आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असतीलच. ती पाहताना पर्यटन किंवा मुक्त भ्रमण (Trekking) असाच अनेकांचा उद्देश असतो. मी जेव्हा जेव्हा अशी भूरूपे पाहिली, तेव्हा ती पृथ्वीच्या कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीच्या कालखंडातील एक प्रातिनिधिक भूशास्त्रीय प्रसंग (Episode) म्हणूनच पाहिली. त्यामुळे पर्वत, पठारे, नद्या आणि समुद्र किनारे यांचे अनेक अदृश्य पैलू समजणे सोपे झाले. याचा एक उपयोग असाही झाला, की त्या त्या प्रदेशातील प्राणी, वनस्पती, मानवी वस्त्या आणि जीवन यांची त्या भूप्रदेशाच्या भौगोलिक आणि भूशास्त्रीय रचनेशी सांगड घालणे सोपे झाले. भूजल, पृष्ठजल या अत्यंत महत्त्वाच्या घटकांची उपलब्धता, कमतरता आणि ते जतन करून ठेवण्याच्या पद्धती, शेतजमीन, वस्तीयोग्य भाग याबद्दलही निश्चित आडाखे बांधता आले.
अशा ठिकाणी गेल्यावर पर्यटक म्हणून किंवा मुक्त भ्रमण करणारा म्हणून प्रत्येकालाच वेगवेगळे अनुभव येतात. स्थानिक संस्कृती, आचारविचार, रूढी आणि परंपरादेखील कळतात. एखाद्या अभ्यासकालाही असेच आणि त्याच्या अभ्यास क्षेत्रातील इतर अनेक अनुभव येतात. त्यातूनही त्या भूरूपाची आणि प्रदेशाची वेगळी ओळख होते.
भारतातील आणि इतर देशांतील अशा काही भूरूपांची, भूशास्त्रीय अंगाने, सामान्यपणे आपल्याला नसलेली ओळख करून देण्याचा ‘भूरत्ना वसुंधरा’ या लेखमालेतून प्रयत्न केला जाणार आहे. यात अपरिचित किंवा फारशी माहिती नसलेल्या आणि दुर्लक्षित अशा ठिकाणांचा प्रामुख्याने समावेश असेल. प्रचंड मोठा आवाका असलेल्या या भूरूपांची मर्यादित शब्दांत माहिती देणे हे खरे म्हणजे गगनाला गवसणी घालण्यासारखे आहे. त्यामुळे ही एकप्रकारे तोंडओळखच होईल, मात्र ती सामान्यपणे सहजगत्या न मिळणाऱ्या गोष्टींबद्दल असेल आणि म्हणूनच ती उपयुक्त व तुम्हाला आवडेल अशीच असेल याची खात्री वाटते.
‘पर्वत’ हे पृथ्वीवरील प्रथम श्रेणीचे आणि इतर अनेक भूरूपांच्या निर्मितीला कारणीभूत असणारे भूरूप आहे. त्यामुळेच आपण आपल्या लेखमालेची सुरुवात याच भूरूपापासून करणार आहोत.
आकारमानानुसार पर्वतांचे पर्वतरांगा, पर्वतराजी, पर्वतीय साखळ्या, पर्वत प्रणाली असे प्रकार केले जातात. सगळ्यात कमी उंचीचे पर्वत सातशे ते एक हजार मीटर उंचीचे, तर अत्युच्च पर्वत दोन हजार मीटरपेक्षाही जास्त उंचीचे असतात. त्याहीपेक्षा जास्त उंचीचे पर्वत आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीचे असून त्यांना अष्ट हजारी पर्वत म्हटले जाते. सह्याद्रीसारखे पर्वत किनाऱ्यासमीप, तर हिमालय आणि सातपुडा यांच्यासारखे पर्वत हे अंतर्गत पर्वत आहेत. हवाई बेटाजवळ ‘मोना की’सारखे एव्हरेस्टपेक्षाही जास्त उंचीचे पर्वत समुद्रतळावर आहेत. भूप्रक्षोभक हालचालींमुळे (Tectonic movements) वली पर्वत, ठोकळ्यांचे पर्वत, घुमटाकृती पर्वत व ज्वालामुखीय पर्वत तयार होतात. पृथ्वीवर आज आढळणारे पर्वत विभिन्न कालावधींत व भूशास्त्रीय काळात तयार झाले. युरोपमध्ये प्रिकेम्ब्रिअन काळातील पर्वत ५७ कोटी वर्षांपेक्षाही जुने आहेत. भारतातील अरवली, महादेव आणि सातपुड्याच्या पर्वतरांगा, कॅलेडोनियन कालखंडातील म्हणजे ५० ते ४० कोटी वर्षे जुन्या आहेत. टिएनशान, नानशान पर्वत हर्सिंनियन काळातील (३८ ते २८ कोटी वर्षांपूर्वी), तर रॉकीज्, अँडीज् हे साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या अल्पाईन काळातील पर्वत आहेत.
जगभरात हवामानात जे वैविध्य आढळते, त्याचे मुख्य कारण पर्वतच आहेत. पर्वतांचा परिणाम त्यांच्यापासून खूप दूर असलेल्या प्रदेशांच्या हवामानावरही होत असतो. हिमालय आणि सह्याद्री पर्वतांचा आपल्या मॉन्सूनच्या निर्मितीत होणारा परिणाम तर आपल्याला परिचित आहेच.
कोणत्याही पर्वताच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत हवामानात जे सूक्ष्म बदल होतात, त्यामुळे पर्वत प्रदेशात भरपूर जैवविविधता निर्माण होते. मानववंश शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर पर्वत नसते, तर आज आढळणाऱ्या विविध शारीरिक बांध्याच्या, वर्णाच्या, उंचीच्या आणि काटक व कणखर मनुष्य जमाती दिसल्याच नसत्या. पर्वतांचे माणसाला वाटणारे आकर्षण, हेही एक सार्वत्रिक सत्य आहे. माणसाच्या धाडसाला सदैव आव्हान देणाऱ्या या भूरूपाने अनेकांना पर्वतारोहण, प्रस्तरारोहण, मुक्त भ्रमण, शोधन व संशोधन करण्यास उद्युक्त केले आहे.
जगभरातील सर्वच पर्वतांत विलक्षण विविधता आहे. इतकी विविधता इतर भूरूपांत अभावानेच आढळते. जगातल्या काही अतीव सुंदर, अल्प परिचित आणि मनस्वी पर्वतांची ओळख आपण पुढील लेखातून करून घेणार आहोत.