विलक्षण भूवारसा स्थळे

डॉ. श्रीकांत कार्लेकर
मंगळवार, 5 जानेवारी 2021

भूवारसा पर्यटन

आपल्यापैकी अनेकांना सामान्यपणे एखाद्या ठिकाणचा सांस्कृतिक, ऐतिहासिक, पुरातत्त्वीय वारसा जाणून घेणे खूप आवडते. मात्र त्या स्थळाला एक भूशास्त्रीय वारसाही (Geo heritage) असतो आणि तोही तितकाच उत्कंठावर्धक असतो, याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. पृथ्वीवरील पर्वत, किनारा, वाळवंट असे प्रत्येक स्थळ ही एक मोठी भूशास्त्रीय संपदा असून त्याला एक प्रदीर्घ असा भूशास्त्रीय इतिहास असतो. अशी भूरूपे लाखो आणि कोट्यवधी वर्षे जुनी असल्यामुळे त्यांना विशिष्ट असा भूशास्त्रीय वारसा (Heritage) असतो. ‘भूवारसा पर्यटन’ या लेखमालेतून आपण जगातील आणि विशेषतः भारतातील अशा विलक्षण भूवारसा स्थळांची माहिती घेणार आहोत. 

आपल्याला लाभलेल्या देव दुर्लभ अशा या वारशाचा आपणच चालविलेला नाश, त्याचे बिघडणारे संतुलन व त्यामुळे पर्यावरणाची व भूदृश्यांची (Landscape) होत असलेली हानी आणि अशक्य वाटणारी त्यांची पुनर्निर्मिती (Restoration) याबद्दल सर्वांनाच चिंता वाटते आहे. या संदर्भात विविध देशात चाललेले विविध प्रयोग निसर्ग जतनाचा आणि निसर्ग समजून घेण्याचा मुद्दा विशेषत्वाने मांडीत आहेत.

भारतासारख्या, भूरूपांनी समृद्ध असलेल्या आणि खूप मोठ्या कालखंडाचा भूशास्त्रीय वारसा लाभलेल्या देशात तर या संकल्पनेला खूपच महत्त्व आहे. संपूर्ण भारत देश हा अनेक असामान्य, आकर्षक आणि विलक्षण सुंदर, पण तितक्याच क्लिष्ट भूरूपांनी (Landforms) समृद्ध झालेला आहे. भारतातील हिमालय, सह्याद्री, पूर्व आणि पश्चिम समुद्र किनारे आणि चिल्कासारखी सरोवरे, कच्छचे रण आणि सुंदरबनचे दाट खारफुटीचे जंगल अशा ठिकाणांची केवळ भूशास्त्रीय जडणघडण आणि वैशिष्ट्ये बघण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक येतात हे अनेकांना माहीतही नसते. आपला देश अनेक भूशास्त्रीय आश्चर्यांनी आणि भूवारसा स्थळांनी (Geo heritage sites) अगदी भरून गेलाय आणि जगातल्या देशांना भारतातील भूरूपांचे हे वेगळेपण आकर्षित करते आहे.   

पर्यटनवृत्तीचा वाढता कल आणि त्याची गरज व मागण्या लक्षात घेऊन, पर्यावरण हितैषी आणि पर्यटकांच्या जिज्ञासू वृत्तीचे समाधान करण्यासाठी नवनवीन संकल्पना सध्या पुढे येत आहेत. ‘भूवारसा स्थळ पर्यटन’ (Geo heritage tourism) ही त्यातलीच एक आधुनिक कल्पना. भूवारसा स्थळांच्या अभ्यासात आणि पर्यटनामध्ये मुख्य भर हा एखाद्या विशिष्ट प्रदेशातील नैसर्गिक भूरूपे व भूआकार यांनी तयार झालेल्या भूदृश्‍यावर (Landscape) असतो. त्यामुळे अशी ठिकाणे शोधणे व त्यांच्या भूशास्त्रीय  क्षमतेचे मूल्यमापन करणे या गोष्टी यात महत्त्वाच्या ठरतात. संपूर्ण सह्याद्री किंवा त्यातील कासचे पठार, रायरेश्वर पठार अशी उत्तम ठिकाणे भूवारसा म्हणून ओळखणे, अशा गोष्टी यात आणि भूवारसा स्थळ पर्यटनामध्ये केल्या जातात. महाराष्ट्राच्या किनाऱ्याची विविध वैशिष्ट्ये पाहता किनारपट्टी हा एक उत्तम भूशास्त्रीय वारसा प्रदेश म्हणून सांगता येतो. अशी अनेक ठिकाणे भारताच्या विविध भागांतून ओळखून त्यांना भूवारसा स्थळाचा दर्जा देऊन त्यांचे एक अमूल्य वारसा म्हणून महत्त्व वाढवता येते. 

कांचनगंगा, नंदादेवीची शिखरे, सियाचिन, पिंडारी, गंगोत्री अशा हिमनद्या; लोणार इथे असलेले उल्कापातातून तयार झालेले सरोवर, सुंदरबन, शिवसमुद्रमचा धबधबा,अशा हजारो भूरूपांचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण वाटत असते. ही भूरूपे ज्या प्रदेशात दिसतात त्या प्रदेशाचा भूगोल, भूशास्त्र, भूदृश्य आणि पर्यावरण याबरोबरच त्याच्या निर्मितीचा कालखंड, तिथल्या खडकाचे स्वरूप यांचा प्रामुख्याने विचार करून केलेले पर्यटन म्हणजे ‘भूवारसा पर्यटन’. अशा प्रदेशातील प्रत्येक भूरूप हे ताजमहाल, खजुराहोची मंदिरे, अजिंठा वेरूळची लेणी आणि कोणार्कच्या सूर्य मंदिराइतकीच किंवा थोडी जास्तच आकर्षक आणि विलोभनीय असतात. त्यातून प्रबळ आणि समर्थ निसर्गाची सतत जाणीव होत असते. या प्रदेशात आढळणारी, धबधबे, घळ्या, गुहा, कडे, पुळणी, हिमनद्या, वाळूच्या टेकड्या, खोल रांजण खळगे अशी भूरूपे पर्यटकाला विलक्षण आनंदाची अनुभूती तर देतातच, शिवाय त्यांच्याबद्दलचे कुतूहलही मनात जागृत करतात. ही सगळी निसर्गशिल्पे कशी आणि केव्हा निर्माण झाली असतील, ती किती काळ अजून शिल्लक राहतील, ती कुठल्या खडकांत तयार झाली असतील, असे अनेक प्रश्न पर्यटकाच्या मनात निर्माण होतात. 

दुर्दैवाने भारतात या प्रश्नांची उत्तरे अशा ठिकाणी अभावानेच मिळतात. ती उपलब्ध करून देणे हाच भूवारसा या संकल्पनेचा मुख्य उद्देश असतो. ती देत असताना प्रत्येक भूवारसा स्थळाचे नेमके स्थान कळावे म्हणून अक्षांश, रेखांश संदर्भ, त्याची समुद्रसपाटीपासून असलेली उंची, त्या प्रदेशाचा भूशास्त्रीय कालखंड आणि भूशास्त्रीय इतिहास, तिथे नेमके काय पाहावे आणि काय महत्त्वाचे आहे याचबरोबर तिथे कसे जावे याबद्दलची माहिती देणे अपेक्षित असते. आजकाल अशा ठिकाणांचे नेमके नाव माहीत असेल तरी गूगल मॅप्स वरून किंवा गूगल अर्थ ही संगणक प्रणाली वापरून स्थान विशिष्ट आणि तिथे कसे जावे याविषयींची सर्व माहिती सहजपणे उपलब्ध होते.            
आपल्या देशातील प्रत्येक राज्यासाठी अशा वैशिष्ट्यपूर्ण भूवारसा ठिकाणांचा संपूर्ण माहिती देणारा कॅटलॉग असणे फार गरजेचे आहे. भूरूपाच्या निर्मितीमागचा इतिहास, त्याची प्राचीनता, अखंडता व निर्मिती अशा गोष्टींचे मानवी मनाला निश्चितच आकर्षण वाटत असते. हिमालयासारख्या पर्वताची जडण घडण, ब्रह्मपुत्रेसारख्या नद्यांचा विस्तार सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांचा राकटपणा अशा सर्व गोष्टीत भूवारसा पर्यटनाचे सर्व गुणधर्म एकवटलेले आहेत.

आपल्याकडे सध्या किनारी पर्यटनाचे फार मोठे आकर्षण पर्यटकांना वाटते आहे. भूवारसा पर्यटन या नवीन संकल्पनेनुसार किनारी पर्यटनास वेगळी दिशा देऊन ते अधिक उपयुक्त व पर्यावरण हितैषी करता येईल. समुद्राच्या लाटांशी खेळणे, वाळूतून भटकंती करणे, होडीतून फेरफटका मारणे यापेक्षा खूप वेगळ्या गोष्टी यात समाविष्ट आहेत. निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी आणि त्याच्या विशालतेचा व ताकदीचा अंदाज येण्यासाठी तो समजून घेणे महत्त्वाचे. किनारी पर्यटनाचा खरा आनंद हा किनाऱ्यावरील वाळूच्या टेकड्या, खाड्या, पुळणी, समुद्राची खोली, भरती ओहोटीचे चक्र समजावून घेणे यातच आहे. त्यासंबंधीची माहिती पत्रके, धोकादायक प्रदेशांचे स्थान दाखविणारे नकाशे उपलब्ध करणे हे यासाठी महत्त्वाचे असते. दोन दिवसांची मौजमजा यापेक्षा निसर्ग वाचनाकरिता येण्याची संधी मिळवून देणे व पर्यटकांची तशी मानसिकता तयार करणे हा भूवारसा संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे. जागतिक स्तरावर होणारे भूरूपातील बदल, त्यांची होणारी हानी, मानवी हस्तक्षेपाचा परिणाम या समस्यांचा विचारही यात केलेला असतो. यामुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच पर्यटनाचा आनंदही घेता येतो, असे भूवारसा संकल्पनेचा आग्रह धरणाऱ्या सर्वांनाच मनापासून वाटते. आपल्याकडे त्यादृष्टीने खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. 
एखाद्या भुरूपाचा किंवा भूदृश्याचा भूशास्त्रीय वारसा समजून घेण्यासाठी भूशास्त्रीय कालानुक्रमात (Geological Time Scale) त्याचे नेमके स्थान कुठे आहे ते समजले, तर त्याचे नेमके आकलन होऊ शकते. त्यासाठी भूशास्त्रीय कालगणनेची संकल्पना माहीत असणे ही प्राथमिक गरज असते. पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतच्या सगळ्या भूशास्त्रीय काळाची भूवैज्ञानिकांनी निरनिराळ्या कालखंडात विभागणी केलेली आहे. ही विभागणी प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अशा चार प्रमुख महाकल्पात किंवा अजीव (Azoic), प्रागजीव (Proterozoic), पुराजीव (Paleozoic), मध्यजीव (Mesozoic) आणि नवजीवन (Cainozoic) अशा नावानेही केलेली आहे. भूशास्त्रीय कालगणनेनुसार चार अब्ज वर्षांपासून म्हणजे पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतच्या कालखंडाची  महाकल्प (Era), कल्प (Period) आणि युग (Epoch) अशा काळात विभागणी केलेली आहे. सध्या आपण ज्या कालखंडात राहत आहोत त्याला होलोसीन (Holocene) कालखंड म्हटले जाते. होलोसीन म्हणजे ‘नूतनतम’. या सध्या सुरू असलेल्या भूशास्त्रीय कालखंडाची सुरुवात अकरा हजार सातशे वर्षांपूर्वी, पृथ्वीवरच्या शेवटच्या हिमयुगानंतर झाली असे मानण्यात येते. या विस्तीर्ण कालखंडातील अनेक भूरूपे खडक, जीवाश्म (Fossil), ठसे (Imprints) अशा अनेक स्वरूपांत आजही पृथ्वीवर शिल्लक आहेत. 

मात्र यापैकी अनेक आज नष्ट होण्याच्या अवस्थेत आहेत. सगळीकडे सुरू असलेली विकासकामे, खननकर्म (Mining), पर्यटन सुविधा यामुळे ती बाधित होत आहेत. आपल्या या सुंदर पृथ्वीच्या विलक्षण उत्क्रांतीची ती साक्षीदार आहेत आणि म्हणूनच ती जतन करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे.  

संबंधित बातम्या