बॅरन आयलंड ज्वालामुखी

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 19 एप्रिल 2021

भूवारसा पर्यटन

भारताच्या अंदमान द्वीपसमूहातील बॅरन आयलंड हे बेट आणि त्यावरील ज्वालामुखी हा ज्वालामुखीच्या संदर्भात एक मोठा माहिती स्रोत असून भारतासाठी महत्त्वाचा भूवारसा आहे. 

अंदमान द्वीपसमूहात असलेला बॅरन आयलंड हा निद्रिस्त (Dormant) ज्वालामुखी आणि नार्कोण्डम हा मृत (Extinct) ज्वालामुखी ही ज्वालामुखीची दोन  ठिकाणे वगळता भारतात कुठेही जागृत ज्वालामुखी (Active volcanoes) आढळत नाहीत. 

सागरात बेटसदृश दिसणारे खडक (Rock outcrops/Islets) आणि पाण्याने वेढलेला भूभाग म्हणजे बेट (Island) यातला नेमका फरक नेहमी लक्षात न घेतला गेल्यामुळे अंदमान द्वीपसमूहात असलेल्या एकूण बेटांची संख्या २,१२,२७४ आणि ३१९ अशी वेगवेगळी सांगितली जाते. मात्र यात वस्ती असलेली केवळ ३८ बेटेच आहेत. या द्वीपसमूहाच्या पूर्वेला अंदमान समुद्र आणि पश्चिमेला बंगालचा उपसागर आहे.

सुंदा ही सुमात्रा म्यानमार दरम्यान पसरलेली बंगालच्या उपसागरातील जागृत ज्वालामुखी असलेली द्वीपशृंखला, उत्तरेकडे काही निद्रिस्त आणि मृत ज्वालामुखींपर्यंत पोचते. त्यावरच अंदमानच्या पूर्वेकडे बॅरन आयलंड आणि नार्कोण्डम ही बेटे आहेत. अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरच्या ईशान्येला १३५ किमी अंतरावर बॅरन आयलंड आहे. हेवलॉक बेटापासून सरकारी पूर्व परवानगी घेऊन बोटीने या बेटाकडे जाता येते. तीन किमी रुंदीचा कुठलीही वस्ती नसलेला हा बॅरन बेटाचा भूभाग आहे. बॅरन बेटावरचा आजचा ज्वालामुखी हा फार पूर्वीच्या मोठ्या ज्वालामुखीच्या आंतरवक्र विवराचा (Caldera) शिल्लक भाग आहे. यात बाहेरच्या बाजूला तीन किमी व्यासाची एक गोलाकार प्रेक्षागृहासारखी (Amphitheatre) रचना असून दोन तीन ठिकाणी ही रचना तुटलेली आहे. त्याला मोठ्या फटी पडल्या आहेत. ही रचना म्हणजे जुन्या ज्वालामुखी शंकूचा (Cone) उर्वरित भाग आहे. त्याच्या आत आणखी एक वर्तुळाकृती शंकू रचना असून ती आकाराने खूपच लहान आणि समात्र (Symmetrical) आहे. या आतल्या शंकूत अलीकडच्या काळात ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेले लाव्हाचे थर आढळून येतात. या शंकूच्या माथ्यावर समुद्र सपाटीपासून ३०० मीटर उंचीवर एक विवर किंवा खळगा दिसून येतो. बॅरन आयलंड ज्वालामुखीची समुद्रतळापासून एकूण उंची दोन हजार मीटर असून त्याचा १.७ किमी उंचीचा भाग पाण्याखालीच आहे. या बेटाचे स्थान एका विभंग प्रदेशावर (Fault) आहे. हा स्तरीत प्रकारचा ज्वालामुखी (Strato volcano) असून लाव्हा, खडकांचे तुकडे आणि ज्वालामुखीय राख यापासून तो तयार झालेला आहे.

या बेटावर ज्वालामुखीचा सगळ्यात पहिला उद्रेक १७८७ मध्ये झाला. त्यानंतर १७८९, १७९५, १८०३ आणि १८५२ मध्ये पुन्हा उद्रेक झाल्यानंतर जवळ जवळ दीडशे वर्षे तो निद्रिस्त अवस्थेत होता. नंतर झालेला १९९१ मधला उद्रेक सलग सहा महिने सतत चालूच होता. या उद्रेकात बेटावरील प्राणिजीवन मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. पक्ष्यांची संख्या कमी झाली. हा ज्वालामुखी १९९३ पर्यंत सतत धुमसत होता आणि त्यातून विषारी वायू बाहेर पडत होते.

जानेवारी, फेब्रुवारी १९९५ मध्ये दर ३० सेकंदाच्या अंतराने झालेल्या उद्रेकात मोठमोठे आवाज करीत, करड्या रंगाचा वायू, राख आणि पाण्याची वाफ हे सगळे पदार्थ २०० मीटर उंचीपर्यंत वर फेकले गेले होते. त्यावेळी ज्वालामुखीच्या मुख्य खळग्यातून (Crater) आणि शिखरापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या ईशान्येकडे तयार झालेल्या नलिकेतून (Vent) लाव्हा बाहेर पडला आणि तिथे आणखी एक दुय्यम विवर तयार झाले होते. यातून द्रव अवस्थेतील लाव्हाचा उद्रेक तुलनेने कमी प्रमाणात झाला होता. उद्रेकातील दगड धोंड्यांनी बेटावरील दऱ्या आणि नदीपात्रे भरून गेली होती. समुद्राच्या दिशेने दीड किमी अंतर वाहत गेलेल्या, ५० मीटर रुंद आणि सहा मीटर जाडीच्या लाव्हाने समुद्रात गेल्यावर जी पाण्याची वाफ तयार केली होती त्याने सगळा आसमंत भरून गेला होता. त्यावेळी अंतराळातील एका अवकाशयानाने बेटावरच्या ज्वालामुखीतून वायूचा एक मोठा ढग बाहेर पडत असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. 

सव्वीस डिसेंबर २००४ रोजी हा ज्वालामुखी ज्या विभंग प्रदेशावर आहे, त्याची हालचाल होऊन त्सुनामी निर्माण झाली होती. अलीकडच्या काळात २४ ऑगस्ट २००५ आणि ५ नोव्हेंबर २०२० रोजी पुन्हा इथे उद्रेक झाला आणि त्यातून असाच मोठा वायूचा ढग १,५०० मीटर उंचीपर्यंत वर फेकला गेला, जो नैऋत्येच्या दिशेने पसरला होता. 

या बेटावर असलेले सगळ्यात जुने लाव्हाचे थर १६ लाख वर्षांपूर्वीचे आहेत आणि तिथला समुद्रतळ ११ कोटी वर्षे जुना आहे. बेटाचे एकूण क्षेत्रफळ ८.३ चौ. किमी असून त्याची किनारपट्टी १२ किमी लांबीची आहे. बेटाची जास्तीत जास्त उंची ३५४ मीटर आहे. एकूण तीन किमी रुंद ज्वालामुखीच्या माथ्यावर असलेले विवर दोन किमी रुंद आहे. विवराच्या भिंती २५० ते ३५० मीटर उंचीच्या असून पश्चिमेकडच्या समुद्राच्या बाजूला तुटले असल्याचे दिसून येते. हे विवर २६ लाख वर्षे जुने असून याच भागातून १९९१ आणि १९९५ मध्ये लाव्हा बाहेर पडला होता. इथेच एक उष्ण पाण्याचा झरा आणि भूस्खलन झालेले ठिकाणही आढळते. बॅरन आयलंड ज्वालामुखीच्याच रेषेत पुढे नार्कोण्डम हा माथ्यावर विवर नसलेला ज्वालामुखी आहे. त्यावर झालेले अनावरण आणि झीज पहाता तो मृत असावा याची खात्री पटते. जवळच अलकॉक आणि सेवेल असे दोन ज्वालामुखीय समुद्री उंचवटेही (Sea mounts) आहेत. भारतीय भूतबक (Tectonic plate) या भागात म्यानमार भूतबकखाली जात असल्यामुळे त्यांच्या सीमारेषांवर या सगळ्या ज्वालामुखींचे स्थान आहे. बॅरन आयलंडचा अजूनही पुरेसा अभ्यास होऊ शकलेला नाही. आत्तापर्यंतच्या ज्वालामुखीच्या सगळ्या उद्रेकाच्या अभ्यासातून इथे बेसॉल्ट लाव्हा रसाचे अनेक थर तयार झाले असल्याचे दिसून आले आहे. १९९१ नंतरच्या उद्रेकानंतर अनेक ठिकाणी लाव्हा रसाचे थर वरखाली झाले असल्याचे आणि त्यांचे उत्थापन (Uplifting) झाले असल्याचे दिसून येते. २००८ मधल्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणावर राख (Tephra) बाहेर पडली होती. भूतबक सीमेवरील ज्वालामुखींची रचना आणि उद्रेक प्रक्रिया समजून घेण्याचा दृष्टीने बॅरन आयलंडवरील उद्रेक खूप मार्गदर्शक ठरतील असा ज्वालामुखी तज्ज्ञांना विश्वास आहे. म्हणूनच भारताच्या अंदमान द्वीपसमूहातील हे बेट आणि त्यावरील ज्वालामुखी हा ज्वालामुखीच्या संदर्भात एक मोठा माहिती स्रोत असून भारतासाठी महत्त्वाचा भूवारसा आहे. 

स्थान संदर्भ 

  • १२.२८ अंश उत्तर अक्षांश/९३.८६ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची : ३५४ मीटर 
  • भूशास्त्रीय वय : २६ लाख वर्षे
  • जवळचे मोठे ठिकाण : हेवलॉक बेट (९८ किमी)

संबंधित बातम्या