कच्छचे रण 

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
सोमवार, 11 जानेवारी 2021

भूवारसा पर्यटन

गुजरात राज्यातील कच्छचे रण हा क्षार प्रदेश निसर्गाचा एक असामान्य आणि देखणा आविष्कार आहे. अनेक बाबतीत वेगळा असलेला हा प्रदेश आपले अगदी स्वतंत्र भूशास्त्रीय रूप अजूनही टिकवून आहे आणि म्हणूनच भारतातील एक महत्त्वाचे भूवारसा स्थळ आहे. फार मोठ्या भूशास्त्रीय उलथापालथीतून गेल्यावरच या प्रदेशाला त्याची आजची सगळी वैशिष्ट्ये प्राप्त झाली आहेत. 

कच्छच्या विस्तृत भागात कच्छचे मोठे रण (Great Rann of Kachchh) पसरले आहे. त्याच्या आग्नेयेला कच्छचे छोटे रणही (Little Rann) आहे. कच्छचे मोठे रण त्याच्या विस्तारासाठी,  भूवैज्ञानिक इतिहासासाठी आणि जीवाश्मांसाठी एकमेव (Unique) म्हणून जगात प्रसिद्ध आहे. सोळा हजार चौरस किमीपेक्षाही जास्त क्षेत्रफळाच्या या प्रदेशात २० कोटी वर्षे जुन्या ज्युरासिक कालखंडातील अवसादी (Sedimentary) खडकांपासून तीन कोटी वर्षे जुन्या इओसीन कालखंडातील स्तरित अवसादी खडक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात अगणित जीवाश्मांचा अक्षरशः खच पडल्याचे आढळून येते. या प्रदेशाची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची पाच मीटरपेक्षाही कमी आहे. दर वर्षी इथे ३०० ते ४०० मिमी पाऊस पडतो. याच्या उत्तरेला थरच्या वाळवंटातील वाळूच्या टेकड्यांचा परिसर असून दक्षिणेला बानीचा गवताळ प्रदेश आहे. बानीचा प्रदेश मूलतः उत्थापित (Uplifted) चिखल सपाटीचा (Mud flat) असून दहा हजार वर्षांपूर्वी तो पाण्याखाली होता. बानी प्रदेशाचे आजचे स्वरूप गेल्या आठ हजार वर्षांत तयार झाले आहे.  

मोठ्या रणातील पच्छम, खदीर, बेला आणि चोरार या बेटांवर २५ ते ०.५ कोटी वर्षांपूर्वीचे समुद्रात तयार झालेले स्तरित, अवसादी खडक असून तेही असंख्य जीवाश्मांनी समृद्ध आहेत. सात ते दोन कोटी वर्षांपूर्वी कच्छच्या रणाला उथळ समुद्राचे रूप प्राप्त झाले होते. एक लाख वीस हजार पासून बारा हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या आंतर हिमानी (Inter glacial) काळात हे रण नळ सरोवरातून गुजरातच्या खंबायतच्या आखाताला जोडले गेले होते. 

आजपर्यंत अनेक वेळा कच्छ आणि  गुजरातच्या इतर भागांत समुद्र पातळी कमी अधिक प्रमाणात वर खाली होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना ज्या ज्या वेळी घडल्या त्या त्या वेळी अनेक सागरी वनस्पती आणि प्राणी समुद्रातील गाळात अडकून नष्ट झाले. त्यांचे जीवावशेष कच्छमध्ये आज जीवाश्मांच्या (Fossils) स्वरूपात फार मोठ्या संख्येने आढळून येतात. या जीवाश्मांतील विविधता खरोखरच आश्चर्यकारक असून जगात आज जीवाश्मांचा खजिना असलेले ठिकाण म्हणून कच्छ आणि कच्छचे रण ओळखले जाते!

कच्छचे रण हा प्रदेश जसा हंगामी (Seasonal) क्षारयुक्त म्हणून ओळखला जातो, तसा तो वाळवंटी पाणथळ (Desert Werland) म्हणूनही ओळखला जातो. पावसाळ्यात पाण्याखाली बुडालेला प्रदेश कोरड्या ऋतूत पाणी कमी झाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बाष्पीभवनामुळे क्षारांनी भरून जातो आणि सगळा प्रदेश पांढऱ्या शुभ्र रंगाने आच्छादून जातो. राजस्थानातील लुनी नदीतून या रणाला अधून मधून पाण्याचा पुरवठा होत असतो. आपल्या प्रचंड मोठ्या भूशास्त्रीय प्रवासातील विविध घटनांचे अनेक पुरावे जीवाश्म, खडक आणि भूरूपांच्या स्वरूपात या क्षार प्रदेशाने जपून ठेवले आहेत.

भूशास्त्रीय काळात हा अरबी समुद्राचाच एक भाग होता. त्यानंतर या भागाचे जे उत्थापन (Uplifting) झाले, त्यामुळे तो समुद्रापासून तुटला आणि त्याचे रूपांतर एका मोठ्या पाणथळीत झाले. अनेक वर्षांपूर्वीपर्यंत खोल पाण्यामुळे तिथे नौकानयनही (Navigation) करता येत असे. नंतरच्या काळात मात्र पाणथळीत झालेल्या गाळाच्या प्रचंड संचयनामुळे इथे चिखलाचे विस्तीर्ण सपाट भाग (Mud flat) तयार झाले. आज केवळ पावसाळ्यात हे रण पाण्याने भरून जाते आणि वर्षाच्या उर्वरित काळात क्षारांचे एक विशाल वाळवंट होते!

या प्रदेशाच्या उत्क्रांतीत वारंवार होणाऱ्या भूकंपांचे मोठे योगदान आहे. १८१९ मध्ये इथे झालेल्या विनाशकारी भूकंपात अनेक गावे नष्ट झाली होती आणि ‘अल्लाह बंड’ (Allah bund) या ९० किमी लांब आणि ४ ते ५ मीटर उंच नैसर्गिक बंधाऱ्याची निर्मितीही झाली. या बंधाऱ्यामुळे सिंधू नदीचा मार्ग बदलला आणि कच्छच्या रणाला होणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही संपुष्टात आला. या भूकंपाच्या साधारणपणे ८०० वर्षे आधीही असाच मोठा भूकंप झाल्याची नोंद आहेच. त्या भूकंपानेही या प्रदेशाच्या भूरूपिकीत (Geomorphology) मोठे बदल घडवून आणले होते. 

या पाणथळीच्या प्रदेशात आज लोकसंख्या खूपच कमी असली तरी मानवी वस्त्यांच्या उत्क्रांतीच्या इतिहासात याला खूप मोठे महत्व आहे. ६० हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाकडे जे प्राचीन मानवाचे स्थलांतर (Migration) झाले, त्या स्थलांतराच्या दुसऱ्या टप्प्यात ते मुख्यतः कच्छच्या रणाकडेच झाले, असे मानववंशशास्त्रज्ञ स्पेन्सर वेल्स यांचे मत आहे. ख्रिस्तपूर्व २६५० ते १४५० वर्षांपूर्वी हा प्रदेश सिंधू संस्कृतीचा किंवा हराप्पा संस्कृतीचा भाग होता. मोठ्या कच्छच्या रणात खदिर बेटावर ढोलावीरा नावाचे पुराजीवशास्त्रीय (Archaeological) वसतिस्थान उत्खननात मिळाले आहे. धोलावीराच्या जवळच ११ किमी अंतरावर १७ ते १८ कोटी वर्षे जुन्या झाडांचे अवशेष सापडले असून ते किनाऱ्यावरच्या दगडांत जीवाश्म स्वरूपात दिसतात. इथली नऊ मीटर लांब आणि अर्धा ते एक मीटर व्यासाची झाडे वालुकाष्मांत व चुनखडकांत अश्मिभूत (Petrify) झालेली आहेत! या भागाला त्यामुळेच जीवाश्म उद्यानाचा (Fossil Park)चा दर्जा देण्यात आला आहे. 

जागतिक स्तरावर पाणथळ प्रदेशाचे संधारण आणि तिथल्या नैसर्गिक संपदेचा योग्य वापर होण्याच्या दृष्टीने, इराणमधल्या रामसर शहरात १९७१ मध्ये रामसर आंतरराष्ट्रीय कराराला (Treaty) मान्यता देण्यात आली होती. या करारानुसार कच्छच्या रणाला २००२ मध्ये रामसर पाणथळीचा (Ramsar Wetland) दर्जा देण्यात आलाय.     

आज या क्षारयुक्त पाणथळ प्रदेशात अठरा जमातींचे वास्तव्य आढळते. मात्र इथली पारिस्थितिकी आज मोठ्या वाहनांची वर्दळ, वृक्षतोड, क्षार उत्पाटन (Extraction) यासारख्या घटनांनी बाधित होऊ लागली आहे. या विस्तीर्ण पाणथळीतच अनेक छोट्या पाणथळीही दिसून येतात. वाळवंटी पाणथळ, क्षार पाणथळ, लगून पाणथळ, दलदल पाणथळ यांनी आणि त्यातील जैवविविधतेने कच्छचे रण अगदी समृद्ध झाले आहे. स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांना, फ्लेमिंगोंना आणि अनेक प्राण्यांच्या जमातींना या प्रदेशाने मोठाच आधार दिला आहे.                                   

आज भारतातल्या या अशा संवेदनशील भूवारसा ठिकाणच्या जीववैविध्याला कुठलेही संरक्षण नाही आणि  म्हणावी तशी ओळखही दिली गेलेली नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असे प्रदेश हे जलीय जैवविविधतेचे  (Aquatic biodiversity) प्रचंड मोठे साठे असतात. परिसरीय, पर्यावरणीय आणि आर्थिक असे  त्यांचे महत्त्वही खूप मोठे आहे. हे भूवारसा स्थान आज शहरीकरण, प्रदूषण आणि बदलले भूमी उपयोजन (Land use) यांचा खूप मोठा ताण तणाव सहन करीत आहे. परिणामी या स्थळाचा भौगोलिक विस्तार अक्रसतो आहे आणि त्याची आर्थिक, पर्यावरणीय आणि जलशास्त्रीय क्षमताही कमी होते आहे. या क्षारयुक्त जागेत जलजीवांची पैदास होत असते, ती माणसाच्या त्या भागात चालणाऱ्या विविध उद्योगांमुळे कमी होऊ लागली आहे. कच्छमधल्या या भूवारसा पर्यटन स्थळाचा अभ्यास असे दाखवतो की आपल्याकडे ह्या क्षेत्राच्या संधारणाची व विकासाची कुठलीही ठोस आणि सुनिश्चित यंत्रणा आजही नाही. त्यामुळे २० कोटी वर्षांचा भूशास्त्रीय इतिहास आणि भूवारसा असलेल्या या स्थळाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणखीनच वाढली आहे हे नक्की.   

कच्छचे रण

  • स्थान संदर्भ : २३.९० उत्तर अक्षांश/६९.७४० पूर्व रेखांश
  • समुद्रसपाटीपासून उंची : पाच मीटरपेक्षा कमी  
  • भूशास्त्रीय वय : २० कोटी वर्षे
  • जवळची मोठी ठिकाणे : भूज (९० किमी), खबडा (१५ किमी), लोद्राणी (९ किमी).

संबंधित बातम्या