रामसेतू

डॉ. श्रीकांत कार्लेकर
रविवार, 31 जानेवारी 2021

भूवारसा पर्यटन

भारत आणि श्रीलंका यांच्या मध्यभागी, तामिळनाडूच्या आग्नेय टोकाकडील पंबन किंवा रामेश्वरम बेटापासून, श्रीलंकेच्या वायव्य टोकाकडील मानार बेटापर्यंत चुनखडकांनी तयार झालेली प्रवाळ बेटांची एक लांबच लांब पण तुटक रचना आहे. या रचनेला रामसेतू किंवा ॲडम्स ब्रिज असे म्हटले जाते. एका ब्रिटिश नकाशा शास्त्रज्ञाने १८०४ मध्ये मध्य श्रीलंकेत असलेल्या २,२४३ मीटर उंचीच्या ॲडम शिखराच्या नावावरून हे नाव दिले असा उल्लेख आढळतो. या सेतूला नळसेतू आणि सेतूबांध असेही म्हटले जाते. ‘नळ’ हा रामायणाच्या काळात स्थापत्य विशारद होता म्हणून त्याच्या सन्मानार्थ हे नाव दिले जाते.   

हा सेतू म्हणजे भारत व श्रीलंका यांना जोडणारा एक प्राचीन भूसेतू (Landbridge) असावा, असे भूशास्त्रीय पुराव्यांवरून लक्षात येते. तीस किमी लांबीचा हा सेतू पाल्कची सामुद्रधुनी व मानारचे आखात यांच्या दरम्यान पसरला आहे. श्रीलंकेतील इतिहासतज्ज्ञ म्हणतात, की हा एक हळूहळू खाली येणारा (Collapsible) पूल असावा. १५व्या शतकापर्यंत तो चालत जाण्यायोग्य होता असेही उल्लेख आढळतात. 

या भागातला समुद्र खूप उथळ असून त्याची जास्तीत जास्त खोली दहा मीटर आहे. या सेतूवरील उघडे पडलेले वाळूचे काही भाग पूर्णपणे कोरडे आहेत. अशा परिस्थितीमुळे या प्रदेशात नौकानयन (Navigation) होऊ शकत नाही. १४८० मध्ये इथे आलेल्या वादळामुळे मोठी पडझड झाली होती. त्यापूर्वीपर्यंत हा सेतू पाण्याच्या वर दिसत होता असे काही उल्लेख आढळतात. 

या सेतूचा सर्वप्रथम उल्लेख रामायणात असून, रावणाने अपहरण करून लंकेत नेलेल्या सीतेला सोडवून आणण्यासाठी, प्रभू रामचंद्रांच्या वानरसेनेने हा सेतू बांधल्याची कथा आपल्या सर्वांना परिचित आहेच. त्यामुळेच या समुद्राला सेतुसमुद्रम असेही म्हटले जाते. उथळ पाण्यातील दगडांची ही शृंखला पंबन बेटावरील धनुष्यकोडी पासून सुरू होते. पंबन बेट भारताच्या मुख्य भूमीशी दोन किमी लांबीच्या पंबन रेल्वे आणि रस्ता पुलाने जोडलेले आहे. श्रीलंकेकडील मानार बेट हे श्रीलंकेला एका उथळ उंच मार्गाने (Causeway) जोडले गेले आहे. 

रामसेतूच्या निर्मितीबद्दल आणि त्याच्या नेमक्या रचनेबद्दल अनेक मतमतांतरे आणि वाद आहेत. हा सेतू गाळ साचून व जमीन उंचावल्यामुळे तयार झाला असल्याचे आणि भारतापासून तुटून श्रीलंका दक्षिणेकडे सरकल्यामुळे निर्माण झाला, अशी दोन मते १९व्या शतकात मांडण्यात आली. सेतुप्रदेशातील चुनखडक सदृश रांगेतील खडक मोठमोठ्या चौकोनी तुकड्यांत तुटलेले आणि विखुरलेले दिसल्यावर हा सेतूही मानवनिर्मित रचनाच असावी असेही मत मांडण्यात आले. 

हा सेतू म्हणजे, पृष्ठभागावर कठीण आणि खाली भरड व मृदू असलेल्या वालुकाश्म (Sandstone) आणि गुंडाश्म (Conglomarate) खडकांच्या एकमेकाला समांतर असलेल्या उंचवट्यासारख्या (Ledges) रांगा आहेत. इथे झालेल्या अनेक संशोधनांमध्ये याचे वर्णन वेगवेगळ्या प्रकारे केले आहे. काहींनी सेतूला प्रवाळ खडकांची रांग म्हटले आहे तर काहींनी त्याचे वर्णन, दोन भूमिप्रदेश जोडणारी, पृथ्वीचे कवच पातळ होऊन तयार झालेली भूबद्ध रचना (Tombolo) असे केले आहे. काहींनी तिला लांबलचक वाळूचा दांडा (Spit), तर काहींनी रोधक बेटांची मालिका (Barrier island chain) म्हटले आहे. भारताच्या अवकाश संशोधन संस्थेने रामसेतू ही १०३ लहानमोठ्या प्रवाळ खडकांची भिंत (Reef) असल्याचे म्हटले आहे. सेतूच्या तुटलेल्या भिंतीमधील प्रवाळ खडकांचे सपाट माथे पाण्यातून वर डोकावणारे असून संपूर्ण प्रवाळ रांगेत प्रवाळ वाळू (Coral sand) आणि पुळण खडक (Beach rocks) दिसून येतात. 

काही शास्त्रज्ञांच्या मते हा सेतू म्हणजे भारत व श्रीलंका यातील सलग किनाऱ्याचाच भाग असून काहींच्या मते रामेश्वरम आणि तलैमनार यांच्या दरम्यानच्या तटवर्ती (Longshore) प्रवाहांमुळे झालेल्या अवसाद (Sediment) संचयनाचा तो परिणाम आहे. येथील प्रवाळांच्या वाढीमुळेच वाळू अडकून ही रचना तयार झाली असावी असाही दावा करण्यात आलाय. एका अभ्यासानुसार जागतिक समुद्रपातळीचा या सेतूच्या निर्मितीशी काही संबंध नसून जमिनीच्या स्थानिक उंचावण्यामुळे तो तयार झाला असावा. रामसेतूची ही रचना मनुष्यनिर्मित असल्याचा कोणताही पुरावा आढळत नाही, असे भारतीय पुरातत्त्व विभागाचे मत आहे. अशा तऱ्हेचे प्रवाळ खडक खोल समुद्रांत कधीही तयार होत नाहीत, त्यामुळे ही  रचना नैसर्गिक असूच शकत नाही, ती मानव निर्मितच असावी असेही एक निरीक्षण आहेच! सेतूची ही रचना साधारणपणे ३,५०० वर्षांपूर्वी समुद्रातून वर आली असावी असे मत मांडण्यात आले आहे. या सेतूच्या उत्तरेकडील भारताच्या बाजूकडील वाळूच्या पुळणी (Beaches) एक ते सहा हजार वर्षे जुन्या असाव्यात. सेतूच्या प्रदेशात आढळणाऱ्या पुळणी मात्र चार हजार वर्षे जुन्या आहेत. सेतूवर सापडलेला प्रवाळ खडक सात हजार वर्षे जुना आहे हेही आता नक्की झाले आहे! हा सेतू तरंगणाऱ्या खडकांनी तयार झालेला होता असे म्हटले जाते. हे तरंगणारे खडक प्युमिस (Pumice) खडक असावेत. लाव्हा रसाच्या उद्रेकातून रसाचा जो फेस (Fome) तयार होतो, तो हळूहळू कठीण होऊन त्यापासून हा खडक तयार होतो. तो तयार होतो तेव्हा सुरुवातीच्या काळात त्यात हवेचे अनेक बुडबुडे तयार होतात. हलका असल्यामुळे तो पाण्यावर तरंगतो मात्र कालांतराने या बुडबुड्यांच्या मोकळ्या जागेत पाणी भरते आणि दगड जड होतात व ते पाण्यात बुडतात. रामायणाचा कालखंड इ. स. पूर्व पाच हजार वर्षे असा होता. म्हणजे सात हजार वर्षांपूर्वीचा तो काळ होता. सेतू रचनेवर सापडलेला प्रवाळही कार्बन १४ या कालगणना पद्धतीप्रमाणे सात हजार वर्षे जुना आहे. त्याकाळी सेतू उथळ समुद्रातील पाण्यावर बांधण्यात आला असावा. त्यानंतर या भागात झालेल्या समुद्र पातळीच्या वाढीमुळे किंवा भूपृष्ठाच्या उंचावण्यामुळे तो आज पाण्याखाली गेला असावा, असे या पुलाचे जन्मरहस्य सांगितले जाते. भारताच्या दृष्टीने रामसेतू हा एक विलक्षण भूवारसा आहे आणि म्हणूनच भूवारसा पर्यटनासाठी एक उत्कृष्ट स्थळ आहे. आता पुन्हा एकदा या सेतूच्या निर्मितीचे रहस्य उलगडावे म्हणून भारतीय पुरातत्त्व खात्याकडून नव्या संशोधन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

स्थान संदर्भ 

  • ९.१ अंश उत्तर अक्षांश/७९.५४ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून सर्वाधिक खोली : १० मीटर 
  • सामुद्रधुनीचे भूशास्त्रीय वय : १८,४०० वर्षे, सेतूपुलाचे वय : ७,००० वर्षे 
  • लांबी : ३० किमी 
  • जवळचे मोठे ठिकाण : धनुष्यकोडी (४ किमी), रामेश्वरम (२२ किमी)

संबंधित बातम्या