गोंडवाना जंक्शन 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

भूवारसा पर्यटन

तामिळनाडूतील कन्याकुमारी या ठिकाणचे जगप्रसिद्ध विवेकानंद शिला स्मारक ज्या खडकावर बांधण्यात आले आहे, तो खडक म्हणजे जगाचा भूशास्त्रीय इतिहास बदलून टाकणाऱ्या एका विलक्षण घटनेचा साक्षीदार आहे! 

आज हजारो पर्यटक दरवर्षी हे देखणे अभिमानस्थळ आणि बंगालचा उपसागर, अरबी समुद्र व हिंदी महासागर यांचे पाणी एकत्र होते, ते भारताच्या दक्षिण टोकाकडचे ठिकाण पाहण्यासाठी येत असतात. याच खडकावर डिसेंबर १८९२ मध्ये स्वामी विवेकानंदांनी भारतमातेच्या उत्कर्षासाठी ध्यानधारणा केली म्हणून सर्व भारतीयांच्या मनात या ठिकाणाबद्दल खूप आदराचे स्थान आहे. 

हा खडक एक विलक्षण भूशास्त्रीय आश्चर्य आहे. साधारणपणे ३० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरचे सगळे भूखंड, अखिलभूमी किंवा पँजिया (Pangea) नावाच्या एकाच विशाल भूखंडाचा (Supercontinent) भाग होते. त्याचे दोन मोठे भाग होते. उत्तरेकडच्या उत्तर अमेरिका आणि युरेशिया असलेल्या भागाला लॉरेशिया (Laurasia) म्हटले जात असे. दक्षिणेकडच्या भागाला गोंडवनभूमी (Gondwanland) म्हटले जात असे. यात दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश होता. एडवर्ड सूस या भूगर्भ शास्त्रज्ञाने १८८५ मध्ये भारतातील मध्य प्रदेशातील गोंडवन या अति प्राचीन प्रदेशावरून या भागाला हे नाव दिले होते.  

वीस ते अठरा कोटी वर्षांपूर्वी ज्युरासिक या भूशास्त्रीय कालखंडाच्या सुरुवातीला लॉरेशिया आणि गोंडवनभूमी एकमेकांपासून वेगळे होऊन वेगळ्या दिशांनी सरकू लागले. ही भूशास्त्रीय घटना अतिशय संथ गतीने झाली. १८ कोटी वर्षांपूर्वी कारू आणि फेरार (Karoo-Ferrar) या दक्षिण आफ्रिका आणि अंटार्क्टिका प्रदेशात २,९०० किमी खोलीवरून झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर गोंडवनातील सर्व खंडांचे तुकडे झाले व त्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि अंटार्क्टिका हे जवळजवळ असलेले भूखंड १६ कोटी वर्षांपूर्वी एकमेकांपासून वेगळे झाले. त्यावेळी भारतातील आजचे मेघालय (शिलाँगचे पठार) आणि ऑस्ट्रेलियातील पर्थ ही ठिकाणे एका हाकेच्या अंतरावर होती!

वेगळे झालेले भूखंड कमी जास्त वेगाने एकमेकांपासून दूर सरकू लागले. भारत दरवर्षी १८ ते २० सेमी अशा जलद गतीने तर ऑस्ट्रेलिया, आफ्रिका दरवर्षी केवळ २ ते ४ सेमी अशा संथ गतीने सरकू लागले. अंटार्क्टिका खंड मात्र बऱ्याच अंशी स्थिर राहिला. भारतीय भूतबक (Plate) फक्त १०० किमी जाडीचे, तर बाकीची तबके १८० ते ३०० किमी जाडीची असल्यामुळे त्यांच्या सरकण्याच्या वेगात फरक होता, हे याचे मुख्य कारण. 

भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका हे खंड एकमेकांपासून नुसतेच दूर गेले असे झाले नाही, तर ज्या भागांत सर्व खंडांच्या सीमा लागून होत्या तिथल्या भूकवचाचे अनेक तुकडे झाले. हिंदी महासागराचा खळगा (Basin) तयार होत असताना ते अनेक ठिकाणी विखुरले. त्यातलाच एक तुकडा म्हणजे हा आत्ताच्या शिला स्मारकाचा खडक. गोंडवनभूमीतील त्या प्रसंगाचा हा खडक आज शिल्लक असलेला एकमेव पुरावा आहे. यामुळेच शिला स्मारकाचा हा खडक भारताचा एक महत्त्वाचा असा भूशास्त्रीय वारसा आहे. भूशास्त्रज्ञ याला ‘गोंडवाना जंक्शन’ म्हणून ओळखतात. ज्या खडकावर स्मारक आहे त्याच्या मागे आणि आजूबाजूलाही काही मोठे खडक आहेत. एका भूशास्त्रज्ञांच्या मते खडकांच्या समुच्चयाने (Cluster) तयार झालेला हा सगळाच भाग ‘गोंडवाना जंक्शन’चा भाग आहे. त्यावेळी मादागास्करपासून तुटलेला एक भूखंड तुकडा मॉरिशस जवळही सापडला आहे.  

गोंडवनभूमीतील भूखंड एकमेकांपासून दूर जाण्याच्या घटनेत सगळ्यात आधी आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका हे दोन खंड, मादागास्कर, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकापासून वेगळे झाले. त्यानंतर १४ कोटी वर्षांपूर्वी आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका एकमेकांपासून वेगळी झाली व दक्षिण अटलांटिक महासागर निर्माण झाला. साधारणपणे त्याच वेळी भारताचा भाग मादागास्करबरोबर अंटार्क्टिक आणि ऑस्ट्रेलियापासून दूर झाला आणि हिंदी महासागराचा मध्यवर्ती भाग निर्माण झाला.             

नऊ कोटी वर्षांपूर्वी भारत व मादागास्कर एकमेकांपासून दूर झाले. ऑस्ट्रेलियाही अंटार्क्टिकपासून दूर झाला. भारताचा प्रवास ईशान्येकडे सुरू झाला. आठ कोटी वर्षांपूर्वी प्रवासाचा वेग खूप जास्त म्हणजे दरवर्षी २० सेमी इतका होता. साडेपाच कोटी वर्षांपूर्वी  

भारताचा भूभाग युरेशियाच्या भूतबकावर (Tectonic Plate) आदळला व त्यातून हिमालय निर्मिती झाली.  

विवेकानंद शिला स्मारक आज ज्या खडकावर निर्माण करण्यात आले आहे, त्याच्या मागे ६५ मीटर अंतरावर दुसरा मोठा खडक असून त्यावर थिरुवल्लुवर यांचा पुतळा आहे. २७ डिसेंबर २००४ या दिवशी आलेल्या महाविध्वंसक त्सुनामीचा तडाखा या भागाला बसला होता. मात्र शिला स्मारकावरील पुतळ्याला आपटून लाटा परतल्यामुळे त्यावेळी तिथे असलेल्या दोन हजार पर्यटकांचे रक्षण झाले होते. 

या खडकाचा आकार एखाद्या व्हेल माशाच्या पाठीसारखा आहे. हा खडक किनाऱ्यापासून ५०० मीटर दूर समुद्रात असून चार्नोकाइट (Charnockite) प्रकारचा आहे. चार्नोकाइट हा गोंडवाना खडक श्रेणीतील रूपांतरित (Metamorphic) खडकांचा गट आहे. जॉब चार्नोक या त्यावेळच्या कलकत्त्यातील शास्त्रज्ञाचे नाव या खडक श्रेणीला देण्यात आले आहे. चार्नोकाइट खडक खोलवर झीज झालेल्या केम्ब्रियन पूर्व (Precambrian) या साडेचार अब्ज ते ५४ कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडातील आधार प्रस्तरामध्ये (Basement rock) आढळतात आणि ते अति उष्णतेमुळे झालेल्या स्फटिकीकरणातून (Crystallization) निर्माण होतात. अंटार्क्टिक, आफ्रिका आणि पश्चिम ऑस्ट्रेलियात अलीकडेच अशाच चार्नोकाइट श्रेणीतील खडक सापडले आहेत आणि ते सगळे खडक खोल भागात झालेल्या रूपांतरणाचा परिणाम आहेत. याचा अर्थ असा की शिला स्मारकाचा खडक हा सगळ्या जोडलेल्या खंडांचाच एक तुकडा असावा. या प्रकारचा खडक तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या उत्तर भागातही आढळतो. यावरून शिला स्मारक ज्यावर बांधले आहे तो किती जुना आहे आणि म्हणूनच भारतासाठी किती महत्त्वाचा भूवारसा आहे याची कल्पना येऊ शकते.

संबंधित बातम्या