कोसळलेल्या हिमखंडाचे संकट

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

चर्चा

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात जोशीमठाजवळ रविवारी नंदादेवी हिमनदीचा एक भाग तुटला, अलकनंदा नदीच्या खोऱ्यात अचानक महापूर आला आणि हिमालयाच्या पर्वतरांगांत हाहाकार उडाला. महापुराच्या तडाख्यात खोऱ्यातील विद्युत प्रकल्प वाहून गेले. तीसपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आणि १७०हून अधिक नागरिक बेपत्ता झाले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संकटामुळे राज्यात सन २०१३मध्ये झालेल्या भीषण ढगफुटीच्या स्मृती पुन्हा ताज्या झाल्या.

डेहराडूनपासून २९५ किलोमीटरवर असलेल्या जोशीमठाजवळ झालेल्या या हिमनदीच्या टोकाशी असलेल्या बर्फाची हिमकोसळ (Ice calving) झाल्यानंतर गंगा नदीच्या उपनद्या असलेल्या धौलीगंगा, ऋषिगंगा आणि अलकनंदा नद्यांना अचानक मोठे पूर आले आणि भीतीचे वातावरण पसरले. एनटीपीसीचा तपोवन विष्णुगड वीजप्रकल्प आणि ऋषिगंगा प्रकल्पांची यात मोठी हानी झाली आणि तिथे काम करीत असलेले अनेक मजूर अडकून पडले. पुरामुळे नदीकिनारी असलेली घरेही वाहून गेली. रैनी गावाजवळचा  पूल वाहून गेला आणि अलकनंदा सरासरीपेक्षा एक मीटर अधिक उंचावरून वाहू लागली.  

कोसळलेल्या हिमखंडामुळे आलेल्या महापुराने चमोली जिल्ह्यातले रैनी हे सुरेख गाव होत्याचे नव्हते झाले. ऋषिगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील या हिमनद्यांचे २४३ चौरस किलोमीटर हिमक्षेत्र घटून, आता २१७ चौरस किलोमीटर झाले आहे.हिमनदीचा एक भाग तुटल्याने हिमस्खलन होऊन धौलीगंगा नदीचे पाणी सरासरीपेक्षा दोन ते तीन मीटर उंचीवरून वाहत होते. महापुरानंतर उत्तराखंडमधील पौरी, टिहरी, रुद्रप्रयाग, हरिद्वार या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. 

या महिन्याच्या सात तारखेला सकाळी दहाच्या सुमारास चमोली जिल्ह्यातील रैनी या ५,४०० मीटर उंचीवरच्या गावाजवळ असलेल्या हिमनदीचा काही भाग कोसळला आणि काही मिनिटांतच ऋषिगंगा नदीतून प्रलयाची लाट आली, गावाजवळचा १३.२ मेगावॉटचा ऋषिगंगा विद्युत प्रकल्प बघता बघता नकाशावरून पुसला गेला. पुढे चार किलोमीटरवर ऋषिगंगा नदी धौलीगंगेला मिळते. तेथे ५२० मेगावॉटच्या तपोवन-विष्णुगड प्रकल्पाला या लाटेने गिळंकृत केले. धौलीगंगा पुढे अलकनंदेला मिळते. अलकनंदेच्या ४४४ मेगावॉट विष्णुगड-पिपलकोटी (अपुरा) आणि ४०० मेगावॉटच्या विष्णुप्रयाग या प्रकल्पांचीही हानी झाली. विष्णुप्रयाग आणि तपोवन प्रकल्पांना २०१३च्या पुराचाही फटका बसला होता. 

उत्तराखंडमधील पुराची घटना हिमनदीचा अधांतरी भाग कोसळल्यामुळे घडली असावी, अशी प्राथमिक शक्यता संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन वर्तविली आहे. शास्त्रज्ञांच्या गटाने चमोली जिल्ह्यातील हिमनदीचे हवाई सर्वेक्षण करून नोंदी केल्या आहेत. मुख्य हिमनदीचा अधांतरी भाग खालील चिंचोळ्या खोऱ्यात कोसळला असावा, असे प्रथमदर्शनी दिसते. तसेच हिमनदीच्या या भागाबरोबर डोंगरावरील दगड-धोंडेही वाहून आले आणि या अडथळ्यामुळे धौलीगंगा नदीच्या खोऱ्यात नवा जलाशय तयार झाला असावा. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे नव्याने तयार झालेला जलाशय फुटून तीव्र वेगवान अल्पकालीन पुरासारखी (Flash flood) स्थिती उद्‍भवली असावी अशी शक्यताही मांडण्यात आली. गेल्या काही दशकांत तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्या आक्रसत असल्याचे दिसून आले आहे. हिवाळ्यात, फेब्रुवारी महिन्यात उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील तापमान शून्याच्या खाली जाते. तापमान कमी असतानाही या परिसरात नंदादेवी हिमनदी का तुटली असावी याचे नेमके उत्तर मिळत नाही. भूगर्भशास्त्राचे अभ्यासक या प्रश्नासाठी हवामान बदलाला दोषी धरतात; पण ‘ही घटना अपवादात्मक असून, ती नेहमी होणारी नाही,’ असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  

हिवाळ्यात हिमनद्या पूर्ण गोठलेल्या असतात. त्यांचे पृष्ठभागही अत्यंत टणक झालेले असतात. अशा वेळी हिमस्खलन किंवा हिमकडा कोसळणे अशा दोनच घटनांमुळे अशी आपत्ती येऊ शकते. मात्र या वेळच्या घटनेत दोन्हीही घडलेले नाही. ऋषिगंगा पाणलोटातील उत्तर नंदादेवी, चांगबांग, रमणी बँक, बेथरटोली, त्रिशूल, दक्षिण नंदादेवी, दक्षिण ऋषी बँक आणि रौंथी बँक या आठ हिमनद्यांचा अभ्यास असे सांगतो, की गेल्या तीस वर्षांत या हिमनद्या १० टक्क्यांनी आक्रसल्या आहेत. 

अजूनही इतका मोठा पूर एकदम येण्यामागचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्यामुळे हिमानी सरोवराची (Glacial lake) निर्मिती आणि त्याचे एकाएकी फुटणे हेही कारण असावे असे सांगण्यात येत आहे. मात्र उपग्रह प्रतिमांवरून हिमानी सरोवराची निर्मिती झाल्याचेही आढळून येत नाही.  

वाढत्या तापमानामुळे २१व्या शतकाच्या प्रारंभापासून हिमालयातील हिमनग दुप्पट वेगाने वितळू लागले आहेत. भारत, चीन, नेपाळ आणि भूतान या देशांच्या ४० वर्षांच्या उपग्रह निरीक्षणावरून तापमानवाढ हा हवामान बदल हिमालयातील हिमनग गिळंकृत करत असल्याचे दिसून आले आहे. वर्ष २००० पासून दरवर्षी ३० सेमी या वेगाने हिमनग नष्ट होत आहेत. जागतिक तापमानवाढीचा हा परिपाक असून आता तापमान वाढ झाली नाही किंवा तापमान स्थिर राहिले, तरी हिम वितळण्याची ही प्रक्रिया अशीच चालू राहील असा अंदाजही वर्तविण्यात आलाय.    

उत्तराखंड राज्यातला हा उत्पात वरवर पाहता नैसर्गिक वाटला, तरी तो तसा नाही असेही अनेकांना वाटते. हिमालयाच्या कुशीत गेली तीन दशके विकासाच्या नावाखाली जो मानवी स्वैराचार चालू आहे, त्यामुळे ही आपत्ती कोसळली आहे. याच बरोबर भारत आणि चीन यांच्यात चालू असणारे अघोषित विकासयुद्धही याला जबाबदार आहे असेही एक मत आहेच. या विकासयुद्धात वीजनिर्मिती आणि जलवापर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरत आहेत. असे असले तरी अजूनही ही कारणे या पुरासाठी कारणीभूत असावीत असे दिसत नाही.  

शेफिल्ड विद्यापीठाचे भूस्खलन तज्ज्ञ डॉ. डेव्ह पेटली आणि इतर अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, नंदादेवी पर्वताजवळच्या त्रिशूल पर्वताच्या काही भागात अनेक दिवसांच्या हिमपातानंतर वाढते तापमान होते. या वाढत्या तापमानाच्या परिणामाने सात फेब्रुवारीला हा भाग आपल्या बर्फासकट ५,६०० मीटरपासून ३,८०० मीटर, म्हणजे १,८०० मीटर खाली कोसळला! तत्क्षणी, त्याचे हजारो तुकडे झाले आणि बर्फाचा, दगडांचा महाकाय लोट हिमनदीमधून वेगाने खाली येऊ लागला. खाली येताना या प्रवाहात हिमनदीमधील मोठमोठे दगड, बर्फ, माती, पाणी सगळे मिसळत गेले आणि एका अरुंद खोऱ्यात या प्रवाहाची शक्ती, वेग वाढत गेला. पाण्याच्या या लोटासमोर धरणे, घरे, रस्ते, गावे टिकू शकली नाहीत. लहान ऋषिगंगेमधून धौलीगंगेत आणि मग मोठ्या अलकनंदा खोऱ्यात आल्यावर याचा जोर कमी झाला. विष्णुप्रयाग, जिथे धौलीगंगा अलकनंदेला मिळते, तिथे सकाळी ११ वाजता पाण्याची पातळी २०१३च्या पुरापेक्षा ३.११ मीटर जास्त होती. आजवर नोंदली गेलेली इथल्या पाण्याची ही उच्चतम पातळी होती. 

एका मागोमाग एक झालेले जलविद्युत प्रकल्प आणि प्रकल्पांसाठी झालेले रस्ते, बांधकामे, त्यांचा नदीत टाकला गेलेला राडारोडा अशा गोष्टींमुळे या घटनेचा परिणाम कैक पट जास्त झाला. या भागात काही किलोमीटरमध्ये चार धरणे आहेत. यातील तीन मोठी आणि एक लहान आहे. उत्तराखंड राज्यात कार्यान्वित, बांधकामाधीन आणि प्रस्तावित असे एकूण सहाशेच्या वर छोटे-मोठे जलविद्युत प्रकल्प आहेत. या प्रकल्पांना स्थानिकांचा वाढता विरोध आहे. हिमालयातील विकासनीती तिथल्या परिसराला, लोकसमूहांना साजेशी असणे अनिवार्य आहे. 

पृथ्वीवरील अंटार्क्टिक व आर्क्टिक वगळता हिमनद्यांनी व्याप्त असे सगळ्यात जास्त क्षेत्र हिमालयात आहे. हिमालयातील हिमनद्यांची लांबीसुद्धा जगातील इतर हिमनद्यांच्या लांबीपेक्षा जास्त आहे. हिमालयात सुमारे चाळीस हजार चौरस किमी क्षेत्र हिम व हिमनद्यांनी व्यापलेले आहे. हिमालयातील हिमनद्या धोकादायक गतीने क्षय पावत असल्याचे दूर संवेदन तंत्रांमुळेच लक्षात आले आहे. हिमालयातील हिमनद्यांच्या पृष्ठभागावर वारंवार तयार होऊ लागलेली हिमसरोवरे हा हिम विलयन (Melting) क्रियेचाच परिपाक आहे, असा हिमनद्या तज्ज्ञांचा दावा आहे. हिमालयात अनेक ठिकाणी अशी अनेक विलयन जलाशये  तयार झाली आहेत. हिमनद्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सूर्य किरणांमुळे मिळणारी उष्णता हिमसरोवरात  शोषली जाते व सरोवराच्या तळभागावरील बर्फापर्यंत पोचविली जाते. त्यामुळे बर्फ वितळण्याची क्रिया जास्त गतीने होते. हिमप्रदेशातील हिमोढ (Moraine) बंदिस्त सरोवरे अतिशय अस्थिर असतात. हिम विलयनामुळे ती वारंवार फुटतात व महापुरांना आमंत्रण देतात. हिमनद्यांवर हिमगाळाचे जाड आवरण असते. त्यामुळे केवळ उपग्रह प्रतिमांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष हिमक्षेत्रात फिरून सत्यता पडताळून घ्यावी लागते. 

या सगळ्या गोष्टींचा विचार करून रैनी इथे जी आपत्ती आली तिचे विश्लेषण करावे लागेल. कारण वाहत आलेल्या दगड धोंड्यांच्या अडथळ्यामुळे तयार झालेले हिमानी सरोवर फुटल्यामुळे, भूस्खलनामुळे, हिमस्खलन झाल्यामुळे, हिमनदी तुटल्यामुळे आणि तापमानवाढीमुळे हे झाले अशी अनेक कारणे आज सांगितली जात असली, तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या या पुराचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

संबंधित बातम्या