बेट द्वारका

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 1 मार्च 2021

भूवारसा पर्यटन

गुजरात राज्यातील जामनगरच्या ओखामंडल तालुक्यात ओखा बंदरापासून तीन किमी अंतरावर कच्छच्या आखातात द्वारका बेट आहे. इथल्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर शंख (Conch Shells) मिळत असल्यामुळे याला शंखोदर बेट असेही म्हटले जाते. विष्णू पुराण, स्कंद पुराण आणि महाभारतात उल्लेख असलेली भगवान श्रीकृष्णाची द्वारका ती हीच प्राचीन द्वारका नगरी होती, याचे भक्कम पुरावे आत्तापर्यंत सापडले आहेत. हे ठिकाण भूशास्त्रीय दृष्टीनेही महत्त्वाचे भूवारसा स्थळ आहे. 

बेट द्वारका वाळू आणि दगडांनी तयार झालेले आहे. इथली वाळू तपकिरी पिवळी चिखलयुक्त असल्याचे दिसून येते. या बेटाची ईशान्य-नैऋत्य लांबी १३ किमी अाणि सरासरी रुंदी तीन किमी आहे. बेटाच्या पूर्व बाजूला दक्षिणेकडे वाढत जाणारा दीड किमी लांबीचा एक वाळूचा दांडा (Sand bar) तयार झाला आहे. बेटाचा नैऋत्येकडचा भाग हा बेटाचा उंच भाग असून त्याची सरासरी उंची १३ मीटर आहे. उत्तरेकडचा सखल भाग सहा मीटर उंचीवर आणि पूर्वेकडील सपाट भाग दोन मीटर उंच आहे. बेटाच्या आग्नेय किनाऱ्यावर काही समुद्रकडे (Sea cliffs) आणि चिखल पुळणी (Clay beaches) दिसून येतात. वायव्येकडील किनारा मात्र पूर्णपणे बारीक वाळूच्या पुळणींनी तयार झालेला आहे. ज्या कच्छच्या आखातात हे बेट आहे, ते आखात उथळ अाहे. मुखापाशी त्याची खोली केवळ ६० मीटर इतकीच आहे. आखाताच्या शीर्षभागी खोली फक्त २० मीटर आहे. आखाताचा समुद्राच्या दिशेने असलेला उतार अतिशय सौम्य आहे. 

आखातात येणारी भरती ओहोटी मिश्र अर्धदैनिक (Mixed Semidiurnal) प्रकारची असल्यामुळे दर सहा तासांनी कमी अधिक उंचीची भरती आणि ओहोटी येते. या सगळ्या गोष्टींचा परिणाम अर्थातच द्वारका बेटावरही होतोच. दहा चौ. किमी क्षेत्रफळ असलेले हे छोटेखानी बेट मूळ द्वारका या मुख्य भूमीवरील ठिकाणापासून उत्तरेकडे ३० किमी अंतरावर आहे. ओखा बंदरातून होडीने बेटावर पोचता येते. बेटावर कृष्णाचे मंदिर आहे. तिथून जवळच शिव मंदिर आणि इतरही अनेक मंदिरे आहेत. कच्छच्या आखातातील या बेटाचा गेल्या साडेतीन हजार वर्षांचा आणि त्याही आधीचा सगळा भूशास्त्रीय इतिहास वारंवार वरखाली होणाऱ्या समुद्राच्या पातळीशी निगडित आहे आणि भारताच्या किनाऱ्यावरचा एक विलक्षण सुंदर असा भूवारसाही आहे. गोव्याच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेतील (NIO) शास्त्रज्ञांच्या मते, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर व विशेषतः सौराष्ट्रच्या किनारपट्टीवर भूवैज्ञानिक काळात (Geological period) समुद्र पातळी अनेक वेळा खाली वर झाली असल्याचे पुरावे आढळतात. 

पंधरा हजार वर्षांपूर्वी ही पातळी आजच्यापेक्षा १०० मीटर खाली होती आणि किनाऱ्याचा फार मोठा भाग उघडा पडलेला होता. त्यानंतरच्या काळात पातळी हळूहळू वाढली आणि दहा हजार वर्षांपूर्वी ती आजच्या समुद्र पातळीच्या खाली ६० ते ७० मीटर उंचीवर स्थिरावली. त्यानंतरच्या १५०० वर्षांत ती अजून वर आली आणि आजच्या पातळीच्या खाली ४० मीटरवर येऊन थांबली. सात हजार वर्षांपूर्वी ती हळूहळू वर येत आजच्या स्थितीला आली. त्यानंतरही पुढच्या एक हजार वर्षांत त्यात पाच मीटरनी वाढ झाली. मग ती पुन्हा हळूहळू खाली गेली आणि ३,५०० वर्षांपूर्वी आजच्या पातळीच्या २० ते ३० मीटर खाली गेल्याचे पुरावे आढळतात. याच दरम्यान म्हणजे ३,५०० वर्षांपूर्वीच्या आसपास कच्छच्या आखातात उघड्या पडलेल्या बेटावर द्वारका नगरीची निर्मिती करण्यात आली.  

त्यापुढच्या हजारभर वर्षांत समुद्र पातळीत पुन्हा पाच मीटरनी वाढ झाली आणि द्वारका पाण्याखाली बुडाली. गेल्या एक हजार वर्षांत इथे समुद्र पातळी पुन्हा खाली गेली आणि आत्ताचे द्वारका बेट पाण्याच्या वर दिसू लागले. येत्या काही हजार वर्षांत कदाचित पातळी पुन्हा वाढेल. आज तशी चिन्हे दिसत आहेतच. बेटावर सहा ठिकाणी केलेल्या उत्खननातून असेही लक्षात आले आहे, की ३,८०० ते १,६०० वर्षांपूर्वी आजच्या भरतीच्या (High tide) उच्चतम मर्यादेच्या खाली बेटावर वस्ती असावी. 

श्रीकृष्णाच्या या बुडालेल्या द्वारकेचा शोध घेणे वर्ष १९३० पासून चालू आहे. १९८३ ते १९९० या काळात केलेल्या संशोधनात असे दिसून आले, की द्वारका नगरीच्या चारही बाजूंनी पूर्वी उत्तम तटबंदी होती. पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. राव यांच्या मताप्रमाणे पूर्वीच्या द्वारका नगरीला दक्षिण दिशेला चार किमी लांबीच्या तटबंदीच्या भिंती (Fortification walls) होत्या. आज त्या बुडालेल्या असून ७ ते १० मीटर खोलीवर आहेत, पण पूर्णपणे उद्‍ध्वस्त झाल्या आहेत. याचा अर्थ असा की गेल्या तीन हजार ते ३,५०० वर्षांत समुद्रपातळी १० मीटरनी उंचावली आहे! 

सिंधू संस्कृतीच्या काळात म्हणजे इ. स. पूर्व १३०० ते १६०० मध्ये हडप्पा कालखंडात इथे मोठी वस्ती असावी. १९८०मध्ये बेटावर केल्या गेलेल्या उत्खननात हडप्पा काळातील अनेक अवजारे व मातीची भांडी सापडली. बेटाजवळच्या समुद्रात सहा मीटर खोलीवर जहाजे नांगरून ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे अनेक दगडी नांगर सापडले. यावरून हे एक महत्त्वाचे बंदर असावे असा निष्कर्ष काढण्यात आला. साधारणपणे इ. स. पूर्व १५०० च्या काळातील शिलालेख आणि इ.स. पूर्व ३५२८ मध्ये वापरात असलेली मातीची भांडीही उत्खननात आढळून आली आहेत. बेटावर पहिले शहर इ.स. पूर्व सोळाव्या शतकातले असावे असे कुशस्थली इथे सापडलेल्या भिंतींच्या अवशेषांवरून लक्षात आले. 

डॉ. एस. आर. राव यांच्या मताप्रमाणे इथे द्वारकेचे अस्तित्व सिद्ध करणारे अजूनही अनेक पुरावे सापडण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी मोठे संशोधन होणे गरजेचे आहे. आज सरकारी अनास्था आणि इच्छेच्या अभावी कामे थांबली आहेत. दुसऱ्या अनेक देशात अशा महत्त्वाच्या भूवारसा स्थळांचे पूर्ण संशोधन आणि जतन करण्याचे भरपूर प्रयत्न आजही होताना दिसतात. भारतीयांसाठी द्वारका बेट हे केवळ पुरातत्त्वशास्त्रीय ठिकाण नाही, तर तो आस्थेचा आणि श्रद्धेचा भूशास्त्रीय वारसाही आहे. म्हणूनच या बेटाच्या आजूबाजूच्या समुद्र तळाचे संशोधन आणि बेटावर आणखी काही ठिकाणी उत्खनन करून बेटाचा भूशास्त्रीय इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.

स्थान संदर्भ 

  • २२.४६ अंश उत्तर अक्षांश/६९.१ अंश पूर्व रेखांश
  • समुद्रसपाटीपासून उंची : ८ मीटर 
  • भूशास्त्रीय वय : ३,५०० वर्षे
  • लांबी : १३ किमी 
  • सरासरी रुंदी : ३ किमी  
  • जवळचे मोठे ठिकाण : ओखा (३ किमी)

संबंधित बातम्या