बामणघळ

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 8 मार्च 2021

भूवारसा पर्यटन

हेदवीच्या समुद्र किनाऱ्यावर भरतीची वेळ असेल तर एका अरुंद भेगेतून पाच सहा मीटर उंच उसळणारा पाण्याचा एक जबरदस्त फवारा दिसतो. याच भेगेला बामणघळ म्हटले जाते. ओहोटीच्या वेळी पाणी खाली गेल्यावर पूर्ण घळ मोकळी होते आणि ती किती खोल आहे याची कल्पना येते.

दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी जगभरातील समुद्राच्या पातळीत वाढ होऊ लागली होती. या वाढीला फ्लँड्रीयन ट्रान्सग्रेशन असे म्हटले जाते. सुरुवातीला ही वाढ जलद गतीने आणि नंतर धिम्या गतीने होत होती. साधारणपणे तीन हजार वर्षांपूर्वीपर्यंत ही वाढ होतच होती. याच दरम्यान म्हणजे सहा हजार वर्षांपूर्वी जगातील अनेक भागांत आजची किनारपट्टी तयार झाली. मात्र तीन ते सहा हजार वर्षांच्या काळात समुद्र पातळीत अनेकवेळा घट झाली आणि पुन्हा थोडी वाढ झाली असल्याचे अनेक पुरावे आज दिसून येतात.

कोकणातही पुळणी, वाळूचे दांडे, आजच्या लाटांच्या प्रभावापासून दूर आणि थोड्या उंचीवर असलेल्या सागरी गुहा आणि सागरी कडे अशी अनेक भूरूपे उंच समुद्र पातळीच्या काळात तयार झालेली आज दिसून येतात. याच काळात कोकण किनाऱ्यावर लाटांच्या सतत होणाऱ्या आक्रमणामुळे भूशिरे (Headlands) आणि सागरी मंच झिजवले गेले, पण किनाऱ्यावरील बेसॉल्ट या कठीण अग्निजन्य खडकामुळे या झिजेचा वेग खूपच कमी होता. 

अशाही परिस्थितीत हेदवी या गुहागर जवळ असलेल्या ठिकाणी १२ मीटर लांबीचा आणि ७  मीटर खोलीचा एक आंतरमार्ग बेसॉल्ट खडकांत तयार झाला. गुहागरच्या किनाऱ्यावर, हेदवी या ठिकाणी मी माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन संशोधनाचे काम करीत असताना १९९२ साली कोकण किनाऱ्यावर सर्वप्रथम हे भूरूप पाहिले. ते आधीपासून स्थानिकांना परिचित असले, तरी हा प्रकार म्हणजे कोकणात दुर्मीळ असलेल्या ‘जिओ’ (Geo) म्हणजे आंतर्मार्ग या भूरूपाचे उदाहरण आहे हे तेव्हा लक्षात आहे. अगदी अनवधानानेच, हेदवीच्या किनाऱ्यावर मंदिरापाशी ओहोटीच्या वेळी या प्राचीन भूरूपाचा शोध लागला. ‘बामणघळ’ नावाने ते आजही ओळखले जाते. अलीकडेच त्याला ‘सागरघळ’ असेही म्हणू लागले आहेत. 

गुहागरच्या दक्षिणेला साधारणपणे वीस किमीवर असलेल्या हेदवी येथील प्रसिद्ध गणपती मंदिराचा परिसर असा आहे, की येथून जवळच, लखलखत्या वाळूचा, काळ्याभोर ताशीव बेसॉल्ट खडकांचा, बेभानपणे उसळणाऱ्या लाटांचा आणि दूरवर पसरलेल्या निळ्याशार पाण्याची झालर लाभलेला समुद्रकिनारा आहे, याची चाहूलही लागत नाही. हेदवी हे गाव गुहागरहून जयगडच्या खाडीकडे जाताना वाटेत लागणारे एक लहानसे खेडेगाव आहे. तीनही बाजूनी डोंगरांनी वेढलेले. पश्चिमेकडचा समुद्रकिनारा दोन्ही डोळ्यांनी आकंठ पिऊन घ्यावा असा. मुख्य  रस्त्याची चढण चढ़ून गेल्यानंतर दूरवरून धावत येणारा समुद्र दिसतो. निसर्गाचा इतका देखणा आविष्कार फारच कमी ठिकाणी दिसतो.  

थोडे पुढे गेल्यावर डावीकडे दिसते ती लांबवर पसरलेली पुळण आणि उजवीकडे रस्त्याच्या सोबतीनेच पुढे जाणारा डोंगर उतार. डोंगराच्या पायथ्याशी एक लहानसे मंदिर. रस्ता देवळासमोरच संपतो. मंदिराच्या समुद्राकडच्या बाजूला लाटांनी झिजवून तयार केलेल्या विविध आकारातल्या असंख्य लहान मोठ्या ताशीव खडकांचा पसारा. पावसाळ्याच्या दिवसांत उजवीकडच्या डोंगरातून ठिकठिकाणी पाझरणारे झरे. त्याच्या आधाराने ठिकठिकाणी वाढलेले शेवाळ आणि आपल्याला या भारावून टाकणाऱ्या निसर्गशिल्पातून वास्तवात आणणारी सगळ्या आसमंतात भरून राहिलेली सदैव फुटणाऱ्या लाटांची गाज. हेदवीला केव्हाही गेले तरी हा सगळा परिसर असाच विलोभनीय दिसतो. 

पावसाळ्याच्या दिवसांत तर निसर्गाची या भागावर विलक्षण मेहेरनजर असते. डोंगरावरून वेगाने खाली येणारे पाण्याचे प्रवाह, सतत कोसळणारा पाऊस आणि जबरदस्त वेगाने व ताकदीने समोर येऊन फुटणाऱ्या लाटा यांनी हेदवीचा आसमंत कोंदून गेलेला असतो. थोडे पुढे गेल्यावर भरतीची वेळ असेल तर एका अरुंद भेगेतून पाच सहा मीटर उंच उसळणारा पाण्याचा 

एक जबरदस्त फवारा दिसतो. हीच बामणघळ. 

ओहोटीच्या वेळी पाणी खाली गेल्यावर पूर्ण घळ मोकळी होते आणि ती किती खोल आहे याची कल्पना येते. इतकी खोल घळ बेसॉल्टसारख्या कठीण खडकात तयार होण्यासाठी किती मोठा कालखंड लागला असेल याचाही अंदाज येऊ शकतो. बेसॉल्ट खडकांत सागरी लाटा दरवर्षी दोन ते पाच सेंमी या वेगाने झीज करू शकतात. बामणघळ हा १२ मीटर लांबीचा आंतरमार्ग गेल्या चार हजार वर्षांत दरवर्षी तीन सेंमी या वेगाने किनाऱ्यावरील खडक झिजल्यामुळे तयार झाला असावा. 

भविष्यात समुद्र पातळीत वाढ झाली तर घळीचा मोठा भाग पाण्याखाली जाण्याचा धोका आहेच. पण हे संकट माणसाच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. बामणघळ ज्या कालखंडात तयार होत होती, त्याच काळात आजूबाजूच्या प्रदेशात पुळणीची झीज, सागरी कडे, गुहा आणि मंच निर्मिती या घटनाही चालूच होत्या. त्याचेही पुरावे इथे दिसून येतात. घळीच्या थोडेसे पुढे गेल्यानंतर डोंगरात लाटांनी तयार केलेली एक गुहा दिसते. गुहेत लहानमोठ्या दगडधोंड्यांची रासच तयार झालेली दिसते. गुहेच्या छतापासून लोंबणारी झाडांची मुळे आणि लाटांनी विदीर्ण केलेल्या गुहेच्या भिंती दिसतात. ही गुहा आजच्या सागरी लाटांच्या आघातांपासून थोडी दूर दिसते. पूर्वीच्या, आजच्यापेक्षा उंच सागरपातळीने तयार केलेली ही विलक्षण गुहा आता समोरच्या उचंबळणाऱ्या समुद्राकडे एखाद्या त्रयस्थासारखी पाहत उभी आहे. 

ओहोटीच्या वेळी साहस करून घळीत उतरणे आणि भरतीच्या वेळी घळीच्या खूप जवळ जाऊन घळीतून वर उंच उडणाऱ्या पाण्यात भिजणे अशा प्रकारांत पर्यटकांकडून वाढ होत असल्याचे सध्या इथे दिसून येते आहे. याला आळा घालणे गरजेचे आहे. परदेशातील काही ठिकाणी अशा भूरूपांचे बंदिस्त कुंपण घालून जसे संरक्षण केले जाते तसे करणे आवश्यक आहे. असे केले तर या विलक्षण आर्जवी आणि सुंदर भूरूपाचा आनंद घेता येईल. कोकण किनाऱ्यावर असे आंतरमार्ग (Gio) हेदवी वगळता इतरत्र दिसत नाहीत आणि म्हणूनच बामणघळीचे हे भूरूप कोकणातील एक अव्दितीय असा भूवारसा स्थळ आहे यात शंका नाही. 

स्थान संदर्भ 

  • १७.३६ अंश उत्तर अक्षांश/७३.२२ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची : १४-२० मीटर 
  • भूशास्त्रीय वय : चार हजार वर्षे
  • लांबी : १२ मीटर 
  • खोली : ७ मीटर 
  • जवळचे मोठे ठिकाण : गुहागर (२० किमी), हेदवी (१ किमी) 

संबंधित बातम्या