कोर्लईची भूबद्ध टेकडी

डॉ. श्रीकांत कार्लेकर
गुरुवार, 25 मार्च 2021

भूवारसा पर्यटन

हजारो वर्षांचा भूवारसा असलेली अनेक ठिकाणे महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आहेत. अशाच निसर्गसुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे अलिबागच्या दक्षिणेला असलेले कोर्लई गाव, कोर्लई टेकडी आणि किल्ला. या ठिकाणचे नैसर्गिक भूशास्त्रीय सौंदर्य आजही अबाधित राहिले आहे. रेवदंड्याकडून मुरूडकडे जाताना कुंडलिका नदीवरचा पूल ओलांडला, की उजवीकडे वळल्यानंतर समोरच समुद्रात घुसलेला कोर्लईच्या बेटाचा परिसर दिसतो. 

कोर्लईची टेकडी हे खरे म्हणजे पूर्वीचे एक सागरी बेट. समुद्रपातळी गेल्या दोन-अडीच ते तीन हजार वर्षांत खाली गेली आणि हे बेट एका संलग्न वाळूच्या दांड्याच्या निर्मितीनंतर मुख्य भूमीला जोडले गेले. अशा प्रकारच्या बेट आणि मुख्य भूमी जोडणाऱ्या वाळूच्या संचयनास आणि बेटास भूबद्ध द्वीप (Tombolo) असे म्हटले जाते. कोकण किनाऱ्यावर हे भूरूप अभावानेच आढळते. 

कोर्लईच्या टेकडीच्या उजवीकडे, कुंडलिका नदीच्या मुखाच्या प्रदेशात एक लहानसे, सहज लक्षात न येणारे बेट आहे. त्याचे नाव आहे रॅट आयलंड. ओहोटीच्या वेळी त्याचे अस्तित्व जाणवते. भरतीच्या वेळी थोडे निरखून पाहावे लागते. कोर्लई गावातून टेकडीकडे एका वाळूच्या दांड्यावरूनच आपण जात असतो. 

या गावात कुठेही कमीत कमी चार पाच मीटर खोदल्याशिवाय पाणी लागत नाही, दगडही लागत नाही. कारण हा सगळा वाळूच्या संचयनाचाच भाग आहे. समुद्राची पातळी खाली गेल्यामुळे कोर्लई बेट आणि मुख्य भूमी यांना जोडणारा हा भूसेतू आहे. कोर्लई टेकडीची उंची ९३ मीटर आहे. पश्चिम दिशेचे सर्व उतार अतिशय तीव्र आहेत. पूर्व बाजूलाही जवळपास तीच स्थिती आहे; पण पश्चिमेकडची बाजू अधिक देखणी, आकर्षक आहे. टेकडीच्या पायथ्यापासून एक सुंदर वळणावळणांची वाट आपल्याला थोड्याशा उंचीवर असलेल्या दीपगृहापर्यंत घेऊन जाते. या वाटेवरून जाताना डाव्या बाजूला दिसणारा अथांग, उसळता समुद्र आणि उजव्या बाजूचा उंच उभा डोंगर कडा पाहताक्षणीच मनात ठसतो. डोंगरकड्याच्या माथ्यावर पडके बुरूज आणि उद्ध्वस्त किल्ला. उतारावर ठिकठिकाणी थबकलेले प्रचंड आकाराचे दगड. वाहत खाली आलेल्या मातीचे ढिगारे आणि त्यात तयार झालेल्या घळ्या. डाव्या बाजूला डोंगराच्या पायथ्याशी ठिकठिकाणी तयार झालेल्या लहान-मोठ्या आकाराच्या वाळूच्या पुळणी आणि जवळपासच दिसणारे कडे, समुद्र-आघात छिद्रे, चित्रविचित्र खडक आणि त्यावरची नैसर्गिक जाळी. हे सर्वच मनाला विलक्षण आनंद देणारे आहे. दीपगृहाच्या मनोऱ्यावरून आजूबाजूचा समुद्र पाहता येतो; पण त्यापेक्षा डोंगरातल्याच वाटेने माथ्यावर जाऊन तेथून समुद्र दर्शन घेणे अधिक आनंददायी ठरते.

टेकडीच्या माथ्यावर गेल्यानंतर कोर्लई हे पूर्वी बेट होते, याची कल्पना येते. पायथ्याला येऊन उजवीकडच्या उतारावरून खाली येऊन, पायथ्याजवळून प्रदक्षिणा पूर्ण करता येते. भरती-ओहोटीबरोबर श्वासोच्छ्वास करणारा धीरगंभीर समुद्र आणि वाळूऐवजी चिखलयुक्त पुळणी, असे अगदी वेगळे दृश्य या बाजूला दिसते. जुन्या, मोडकळीस आलेल्या, झिजून गेलेल्या धक्क्याच्या खुणा अजूनही दिसतात. डोंगरातून झऱ्याच्या स्वरूपात खाली येणाऱ्या पाण्याचे अस्तित्व जागोजागी आढळते. या बाजूलाही माथ्यावरून खाली येणाऱ्या मातीचे ढीग आणि उतारावर थबकलेले विशाल दगड दिसतात. टेकडीच्या उत्तरेला लाटांमुळे झिजलेले दगड व पुळणी लक्ष वेधून घेतात. एखादा कालवा खोदावा, अशी आखीव रेखीव पाषाणशिल्पे, ज्यांना भूशास्त्रीय परिभाषेत भित्तिखडक म्हणतात, तशी येथे बरीच आढळतात. 

इतके सुंदर निसर्गसौंदर्य लाभलेल्या किल्ल्याचा थोडाफार इतिहास माहीत असला तर किल्ला पाहण्याच्या आनंदात भर पडते. एक उत्तम पोर्तुगीज किल्ला असे त्याचे वर्णन केले जात असे. युरोपियन लोकांना सोळाव्या शतकात हा किल्ला ‘चौल रॉक’ या नावाने परिचित होता. इ.स. १५२० ते १७०० पर्यंत या किल्ल्याने पोर्तुगीज, मुस्लिम, मराठे आणि ब्रिटीश यांच्यातील अनेक युद्धे पाहिली. किल्यावर आजही या घडामोडींच्या खुणा अवशेषांच्या स्वरूपात शिल्लक आहेत. सन् १७३९ ते १८१८मध्ये किल्ल्यावर मराठ्यांची हुकुमत होती. गणेश बुरूज, पश्चिम बुरूज, देवी बुरूज आणि राम बुरूज ही नावे याच काळातली.

किल्ल्याची लांबी साधारणपणे ९८५ मीटर व रुंदी ९३० मीटर आहे. किल्ल्याला पूर्वी अकरा दरवाजे होते. त्यातले चार बाहेरच्या, तर सात आतल्या तटबंदीला आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला, पूर्व बाजूस असलेला दरवाजा आजही बऱ्यापैकी शाबूत आहे.

भूशास्त्रीयदृष्ट्या या बेटाला फार महत्त्व आहे. कोकणची आजची समुद्र पातळी सहा हजार वर्षे जुनी आहे. समुद्राची पातळी जेव्हा आजच्यापेक्षा जास्त उंच होती, तेव्हा कोर्लईची टेकडी हे एक बेट होते. गेल्या दीड दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हा ही पातळी खाली गेली, तेव्हा टेकडी आणि मुख्य भूमी यातील ४३५ मीटरच्या उथळ भागात वाळू साठत गेली आणि कालांतराने कोर्लई बेट किनाऱ्याला जोडले गेले. भविष्यात समुद्र पातळी उंचावली तर पुन्हा एकदा या टेकडीचे रूपांतर बेटात होईल यात शंका नाही!

पूर्वी आजच्यापेक्षा जास्त उंचीवर असलेल्या समुद्राने या टेकडीच्या सर्व बाजूनी जी झीज केली, त्याचे अनेक पुरावे आजही इथे विखुरलेले दिसतात. समुद्र कडे, आघात छिद्रे (Notches), उघडे पडलेले किनारी मंच (Shore platforms) आणि त्यावर तयार झालेले खळगे ही अतिशय सुंदर शिल्पे इथे आढळून येतात. समुद्र पातळी खाली गेल्यानंतर ती उघडी पडली आहेत. बेट किंवा टेकडीचा मूळ बेसॉल्ट खडक मोठ्या प्रमाणावर लाटांनी झिजविलेला दिसून येतो. या खडकावर अनेक भेगा, खनिज रेषा आणि भित्ती खडक (Dykes) दिसतात. इथला मूळ खडक स्तंभ बेसॉल्ट (Columner Basalt) असावा असे दाखविणारे अनेक चौकोनी आकार इथल्या सागरी मंचावर दिसून येतात. आपल्या कोकण किनाऱ्यावरचे हे भूवारसा पर्यटन ठिकाण खूप वेगळ्या प्रकारचा आनंद देते ते त्याच्या या वेगळेपणामुळेच. 

स्थान संदर्भ 
१८.५४ अंश उत्तर अक्षांश/ ७२.९ अंश पूर्व रेखांश
समुद्र सपाटीपासून उंची : ९३ मीटर 
भूशास्त्रीय वय : ३००० वर्षे
लांबी : ९८५ मीटर 
सरासरी रुंदी : ३४० मीटर 
भूबद्ध पुळण ः ४३५ मीटर 
जवळचे मोठे ठिकाण : अलिबाग (१८ किमी)

संबंधित बातम्या