कर्णावती नदीपात्रातील घळ्या आणि धबधबे

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 29 मार्च 2021

भूवारसा पर्यटन

मध्य प्रदेशातील विंध्य पर्वताचा कडा कापून उत्तरेकडे जाणाऱ्या कर्णावती किंवा केन नदीने पांडवन मंदिर या ठिकाणापासून रानेहपर्यंतच्या तिच्या ६० किमीच्या मार्गात खोल घळ्या आणि धबधब्यांची निर्मिती केली आहे. नदीचा हा सगळा मार्गच त्यामुळे विलक्षण आकर्षक आणि रौद्र अशा भूशास्त्रीय सौंदर्याने सजून गेला आहे.

केन ही यमुनेची महत्त्वाची उपनदी असून अहिरगाव या गावाजवळ ५५० मीटर उंचीवर बारनेर पर्वतरांगेत ती उगम पावते. ही ४२७ किमी लांबीची नदी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून वाहते व उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात चिल्ला घाट येथे यमुना नदीला मिळते. बीजवार-पन्ना डोंगररांगा ओलांडण्यापूर्वी केन नदी १५ ते १८ मीटर खोल आणि ६० किमी लांबीच्या खोल घळई सदृश मार्गातून पुढे जाते. कटणी शहराच्या वायव्येला उगम पावलेल्या कर्णावती नदीला कामतनाजवळ सोनर ही मोठी उपनदी येऊन मिळते आणि १२ ते १५ मीटर खोलीचा नदीमार्ग तयार होतो. इथे एक खोल पाण्याचे तळेच निर्माण झाल्याचे दिसते. त्यापुढे साधारण एक किमीपर्यंत नदीचे रुंद पात्र तयार झाले असून अमनगंज किशनगड रस्त्यावरचा पूल आहे. त्यापुढे २०० मीटर अंतरावर उजवीकडून मिरहासन नदी केन नदीला येऊन मिळते. इथे नदीची रुंदी ३५० ते ४०० मीटर असून किनाऱ्यावर बारीक गाळाचे थर आढळतात.  

याच ठिकाणी मुख्य नदी तीन मीटरपेक्षाही अरुंद आणि १२ ते १५ मीटर लांब अशा पूर्णपणे दगडांनी भरलेल्या घळईत उडी मारते. थोडी पुढे जाऊन पांडवनपाशी ती रुंद होते. 

भूशास्त्रीय दृष्ट्या नदीच्या डाव्या किनाऱ्यालगत खोलवर एक विभंग रेषा (Fault line) उजव्या किनाऱ्यावरून सहज ओळखता येते. नदीचा डावा किनारा उजव्या किनाऱ्यापेक्षा एक दोन मीटरने जास्त उंच आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन किमी लांबीच्या नदीमार्गात लक्षावधी रांजण खळगे (Pot holes) आणि उर्मीचिन्हे (Ripple marks) आढळून येतात. हे रांजण खळगे विभिन्न आकाराचे आणि खोलीचे असून त्यांची सरासरी खोली तीन मीटर इतकी असल्याचे दिसून येते. त्यात अडकलेले दगड धोंडे पाण्याच्या प्रवाहात गोल फिरल्यामुळेच हे खळगे मोठे होत असतात. हे खळगे रुंद आणि खोल असतानाच  एकमेकांना जोडले जाऊन त्यांची जाळीच तयार झाल्याचेही आढळून येते. काही रांजण खळग्यांत दगड धोंड्यांऐवजी बारीक कणांची वाळू आणि मातीही दिसून येते. 

पन्ना राष्ट्रीय उद्यान परिसरातील गेहरिघाट इथे या नदी मार्गातला पहिला धबधबा दिसतो. तो सात मीटर उंचीचा आहे. या मार्गे विंध्य पर्वत छेदून नदी पुढे जाते. इथल्या नदीपात्रात १२० कोटी वर्ष जुन्या वालुकाश्म खडकांत (Sandstone) तयार झालेले अनेक रांजण खळगे दिसतात. नदीमार्गाच्या दिशेवर या प्रदेशातील भूकवचात असलेल्या संधी किंवा जोड (Joints) यांचा प्रभाव असल्याचे दिसून येते. गेहरिघाट येथील सात मीटर उंचीचा धबधबा ९० ते १४० कोटी वर्षे जुना असून तो विंध्य श्रेणीतील वालुकाश्म खडकांतच तयार झाला आहे. धबधबा पूर्वी नदीमार्गात थोडा पुढे असावा आणि नंतर हळूहळू नदीमार्गात वरच्या दिशेने (Upstream) सरकला असावा, असे भूशास्त्रीय अभ्यासानंतर लक्षात आले. 

नदीच्या या मार्गाला नदीचा वरचा घळई मार्ग असे म्हटले जाते. या मार्गावरचे घळईच्या तळभागावरचे खडक झीज झालेले गुळगुळीत वालुकाश्म आहेत. इथे अनेक आडव्या भेगा आणि रांजण खळगेही आढळून येतात. हा सगळा प्रदेश पूर्वी गिधाडांचे एक मोठे वास्तव्यस्थान (Habitat) होते.

महाराष्ट्रात इंद्रायणी आणि कुकडी नद्यांच्या पात्रातही असे रांजण खळगे दिसत असले, तरी ते त्यामानाने लहान, संख्येने कमी, आणि बेसॉल्ट खडकांत तयार झाले आहेत. नदीच्या अपक्षरण कार्यामुळे हे खळगे तयार होत असले तरी या नदीत मात्र त्यांची निर्मिती मुख्यतः भूप्रक्षोभक हालचालींमुळे (Tectonic  movements) झाली आहे. या सर्वच गोष्टींमुळे कर्णावतीच्या या नदीपात्रास अनन्यसाधारण असे भूवारसा महत्त्व प्राप्त झाले आहे. 

घळई मार्गाच्या दुसऱ्या टोकाजवळ आहे रानेह धबधबा. पन्नापासून ४३ किमी अंतरावर असलेला हा ३० मीटर उंचीचा धबधबा, बुंदेलखंड आर्किअन खडक श्रेणीतील ग्रॅनाईटमध्ये तयार झाला आहे. धबधब्याचे भूशास्त्रीय वय २५० कोटी वर्षे असावे. धबधब्याजवळ दिसणारे विविधरंगी खडक ग्रॅनाईट, डोलोमाईट आणि गारगोटी प्रकारचे आहेत. धबधब्याच्या पुढे असलेल्या घळईत भित्ती खडक (Dykes) असून किनाऱ्याच्या बाजूला ठिकठिकाणी शिला वेदिका (Rock benches) दिसतात. या वेदिका ९० ते १४० कोटी वर्ष जुन्या असाव्यात. घळईचा पाच किमी लांबीचा मार्ग खूप खोल असून तो वालुकाश्मात खोदला गेल्याचे दिसून येते. 

प्रस्तावित केन-बेटवा प्रकल्पात रानेह धबधबा आणि घळईचा हा विलक्षण सुंदर भूवारसा नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतातील लघु ग्रँड कॅनियन अशी ख्याती असलेल्या या ठिकाणाचे रक्षण होणे गरजेचे आहे. या घळईतील काही खळगे इतके खोल आहेत की त्यांची खोली ६० मीटरपेक्षाही जास्त आहे. प्रस्तावित प्रकल्पातील दौधन धरणाच्या पुढे २५ किमी अंतरावर हा धबधबा आहे. त्याच्यापुढे पाच किमी अंतरावर केन घरीयाल अभयारण्य असून त्याचाही मोठा भाग प्रकल्पग्रस्त होणार आहे. आशिया खंडात कुठेही न दिसणारे एक दृश्‍य इथल्या घळईत दिसते, ते म्हणजे पाच प्रकारचे एकत्रितपणे दिसणारे खडक. इथे हिरव्या रंगाचे डोलोमाईट हे कॅल्शिअम, मॅग्नेशिअम युक्त खडक, लाल रंगाचे जास्पर, करड्या रंगाचे गारगोटीचे खडक, गुलाबी ग्रॅनाईट आणि काळ्या रंगाचे बेसॉल्ट खडक एकत्रितपणे आढळून येतात.             

केन-बेटवा प्रकल्पामुळे या भागातील भूजल पुनर्भरण, वाळू संचय, मासे, नदीकिनारची वने (Riparian vegetation) आणि नदी पात्रातील प्राचीन खडक संरचना अशा सगळ्याच गोष्टी बाधित होणार आहेत आणि म्हणूनच असे हे विलक्षण सुंदर भूवारसा स्थळ बाधित करणाऱ्या प्रकल्पाला अनेकांचा आजही विरोध आहे. 

स्थान संदर्भ 
पांडवन मंदिर - २४.४४ अंश उत्तर अक्षांश/७९.९ अंश पूर्व रेखांश
समुद्र सपाटीपासून उंची : २८५ मीटर 
गेहरी घाट धबधब्याची उंची : ७ मीटर
रानेह धबधबा ः २४.८८ अंश उत्तर अक्षांश/८०.०५ अंश पूर्व रेखांश
धबधब्याची उंची : ३० मीटर
समुद्र सपाटीपासून उंची : १६५ मीटर
घळईचे भूशास्त्रीय वय : १२० कोटी वर्षे
घळईची लांबी : ६० किमी   
घळईची खोली : १५ ते १८ मीटर
जवळचे मोठे ठिकाण : पन्ना (५० किमी) 

संबंधित बातम्या