बेडाघाटची घळई आणि धुवांधार धबधबा

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 5 एप्रिल 2021

भूवारसा पर्यटन

नर्मदेच्या उगमापासून मुखापर्यंतचा परिसर अनेक विलक्षण भूशास्त्रीय घटनांनी आणि हालचालींनी तयार झालेले असे समृद्ध भूवारसा पर्यटन स्थळ आहे.

नर्मदा ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी असून तिची लांबी १,३१२ किमी इतकी आहे. भारतीयांच्या मनात नर्मदेविषयी नितांत आदर व श्रद्धा आहे. अमरकंटक येथील १,०४८ मीटर उंचीवर असलेल्या तिच्या उगमापासून पश्चिम किनाऱ्यावरच्या तिच्या मुखापर्यंतचा सगळा परिसर अतिशय पवित्र मानण्यात येतो. नर्मदा नदीखोऱ्याचे आणि नदीमार्गाचे भूशास्त्रीय महत्त्वही फार मोठे असून भारतीय उपखंडात ५४ कोटी वर्षांपूर्वीपासून आजपर्यंत घडलेल्या अनेक भूहालचालींचा इतिहास उलगडून दाखविणारी भूरूपे तिच्या पात्रात, किनाऱ्यावर आणि आजूबाजूच्या प्रदेशात आढळून येतात. ही नदी चार कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाली असावी याचे अनेक भूशास्त्रीय पुरावे सापडतात. 

बेडाघाट हे नर्मदेच्या नदीमार्गात जबलपूरपासून २० किमी अंतरावर असलेले ठिकाण हा भारतासाठी मोठा भूवारसा आहे. बेडाघाटचा नदीमार्ग घळईचा (Gorge) असून तिथून वरच्या नदीमार्गात तीन किमी अंतरावर धुवांधार नावाचा फेसाळलेल्या पाण्याचा ३० मीटर उंचीचा असलेला धबधबा हेही तितकेच आकर्षक भूरूप आहे. ही दोन्ही प्रसिद्ध पर्यटन स्थळेही आहेत. धबधब्याच्या आजूबाजूला संगमरवर आणि सुभाज (Schist) हे ५४ कोटी वर्षे जुने प्रीकॅम्ब्रियन काळातील आणि काही १४ ते ६ कोटी वर्षे जुने क्रिटेशिअस काळातील लॅमेटा खडकही आहेत. नर्मदा नदी सरळ रेषेत एका भंग रेषेवरून (Lineament) वाहते. गोंडवाना आणि विंध्य श्रेणीतील खडकांच्या दरम्यानची नर्मदा ही सीमारेषा आहे असे म्हणता येते. 

नर्मदेच्या या मुख्य भंग रेषेला छेदून जाणारे अनेक भंगप्रदेश (Cross faults) आहेत. अशा भंगप्रदेशांत छेद मार्गांवर ठिकठिकाणी धबधबे आढळतात. धुवांधारच्या वर तीन किमीवर लॅमेटा घाट येथे असाच एक धबधबा आहे. त्याला घुग्रा धबधबा म्हणतात. या धबधब्याच्या परिसरात चुनखडक, संगमरवर, शिस्ट खडक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. येथील सात ते दहा कोटी वर्षे जुन्या लॅमेटा या श्रेणीतील चुनखडकांत डायनोसॉरचे, अनेक सस्तन प्राणी आणि साप यांचे जीवावशेष (Fossils) आढळून येतात. लॅमेटा शिला श्रेणीतील १८ मीटर जाडीच्या खडकांचे चिखलयुक्त खडक (Clay stone), वालुकाश्म आणि गुंडाश्म (Conglomerate) असे प्रकार दिसून येतात.  

नर्मदेचा बेडाघाट जिथे आहे तेथून त्याच्यापुढे काही अंतरावर असलेल्या सरस्वती घाटा दरम्यान असलेले नदीपात्र २५० ते ५४ कोटी वर्षांपूर्वीच्या भित्तिखडकाच्या (Proterozoic dykes) झिजेतून तयार झालेल्या तीव्र उताराच्या दरीमुळे तयार झाले आहे. धुवांधार धबधबा आजूबाजूच्या रांगोळीच्या खडकांच्या (Talcose) विदारणामुळे तयार झाला आहे. इथे आजूबाजूला या संगमरवर खडकावरील रूपांतरित खडकांचे मोठे थर आहेत.  

धुवांधार धबधब्यालाच बेडाघाट धबधबा असेही म्हटले जाते. बेडाघाटची घळई या धबधब्याच्या पुढे असून ती तीन किमी लांब आणि २०० ते ८०० मीटर रुंद आहे. घळईचा मार्ग प्रस्तरभेगा (Fractures) आणि विभंग रेषा (Lineament) यांनी निश्चित केला असल्याचे दिसून येते, मात्र तिच्या वयाचा नेमका अंदाज येत नाही. घळईत सगळीकडे, खोल पाण्यात भोवरे, खोल खड्डे आहेत. नदीच्या पाण्याने केलेल्या झिजेमुळे नदीचे काठ तीव्र उताराचे बनले आहेत. 

धुवांधार धबधब्याचे ठिकाण हा सुरुवातीला नदीमार्गातील उतार बदल झालेला एक खाच बिंदू (Knick point) असावा आणि तो आजच्या स्थानापेक्षा खूपच पुढे असावा. नदीच्या प्रवाहाने वरच्या दिशेने केलेल्या शीर्ष क्षरणामुळे (Headward erosion) मागे मागे सरकत आत्ताच्या ठिकाणी आला असावा असे अभ्यासातून आढळून येते. धबधब्याचा मागे सरकण्याचा वेग लक्षात घेऊन गणित केले, तर असे समजते की आत्ताची घळई १८ लाख वर्षे जुनी असावी. 

ही घळई पूर्णपणे संगमरवरी खडकात खोदली गेली आहे. ५० ते ७० अंशाच्या कोनात कललेले तीव्र उताराचे घळईचे पांढऱ्या शुभ्र रंगाच्या संगमरवरात खोदले गेलेले काठ हे घळईचे विलक्षण सुंदर असे रूप आहे. हा संगमरवर म्हणजे डोलोमाईट (Dolomite) प्रकारचा स्तरित, गाळाचा कार्बोनेट युक्त खडक आहे. यात डोलोमाइट या खनिजाचे प्रमाण जास्त असते. डोलोमाइट आणि चुनखडक (Limestone) हे दोन्ही सारखेच खडक आहेत. त्यांचे गुणधर्म खूपच समान आहेत. त्यामुळेच घळईतीळ खडकांना चुनखडकाच्या रूपांतरणातून तयार झालेले संगमरवरी खडक असे म्हटले जाते.  

धुवांधारच्या जवळच नदीचा जुना मार्ग (Palaeo channel) दिसतो. तो कदाचित सहा कोटी वर्षे जुना असावा असा एक अंदाज वर्तविण्यात आला आहे. हा जुना मार्ग वळण घेऊन बेडाघाट घळईच्या पुढेपर्यंत जाऊन आजच्या नदीमार्गाला मिळतो. जुन्या नदीप्रवाहातील लाखो वर्षांपूर्वीच्या जुन्या गाळात तयार झालेले अनेक उथळ प्रवाह मार्ग (Gullies) आजही दिसून येतात. जुन्या मार्गाच्या किनाऱ्यावरील गाळात अनेक प्राचीन कलाकृती (Artefacts) आणि अश्मीभूत हाडेही सापडतात. जुना मार्गही डोलोमाइट संगमरवर खडकांची झीज करीत पुढे जात असावा असे दिसून येते. आज मॉन्सून काळात जेव्हा मोठे पूर येतात तेव्हा या जुन्या मार्गातही पाणी भरते.

नदीने पूर्वी वळण घेऊन जाण्याऐवजी एकाएकी मार्ग बदलला आणि ती डोलोमाईट संगमरवर प्रदेशावरून वाहू लागली. बेडाघाट येथे असलेली घळई जर १८ लाख वर्षे जुनी असली तर नदीने मार्ग बदलण्याची ही घटनाही त्या आधी घडली असावी. मार्ग वळवल्यानंतर आत्ताच्या मार्गावर तिने धुवांधार खाचबिंदू तयार केला आणि प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे घळई निर्माण झाली. धुवांधार खाच बिंदूही कालांतराने मागे सरकला. नदीने तिचा पूर्वीचा मार्ग अचानक का बदलला असावा याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. भूशास्त्रज्ञांच्या मते नर्मदा- सोन- तापी नद्यांच्या खचदरी प्रदेशात सदैव चालू असलेल्या भूकवचाच्या  हालचालींमुळे असे घडले असावे. अशा तऱ्हेच्या अनेक विलक्षण भूशास्त्रीय घटनांनी आणि हालचालींनी तयार झालेले असे हे समृद्ध भूवारसा पर्यटन स्थळ आहे यांत शंका नाही.

स्थान संदर्भ 

  • २३.१३ अंश उत्तर अक्षांश/७९.८ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची : ३७० मीटर 
  • भूशास्त्रीय वय : १८ लाख वर्षे
  • घळईची लांबी : ३ किमी   
  • घळईची रुंदी : २०० ते ८०० मीटर 
  • जवळचे मोठे ठिकाण : जबलपूर (२० किमी)  
     

संबंधित बातम्या