लोणार विवर आणि सरोवर

डॉ. श्रीकांत कार्लेकर
मंगळवार, 27 एप्रिल 2021

भूवारसा पर्यटन

महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात लोणार इथे एक उल्का आघात विवर आहे. ते बेसॉल्ट खडकात तयार झाले आहे. त्यात एक खारट पाण्याचे सरोवरही निर्माण झाले आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली. जवळपास १५० मीटर खोली असलेल्या या वर्तुळाकृती विवराचा व्यास साधारणपणे दोन किमी आहे. यातील पाणी भरपूर खारट आहे (pH 10.5). लवणासुर या शब्दावरून त्याचे नाव लोणार असे पडले. कोरड्या ऋतूत सरोवरात क्षारांचा जाड थर नेहमीच आढळून येतो. या विवराच्या तळभागावर झालेले गाळाचे संचयन ८० मीटर जाड असावे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

औरंगाबाद शहरापासून हे सरोवर १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले गेले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत.                   

ज्या उल्का आघातामुळे हा खड्डा तयार झाला तो आघात सहा लाख वर्षांपूर्वी झाला असावा असे संशोधन सांगते. या परिसरात जे संशोधन झाले त्यातील निष्कर्षानुसार ज्या उल्काखंडामुळे हे विवर तयार झाले तो उल्का खंड पूर्वेकडून ३० अंशापेक्षाही जास्त कोनात वेगाने खाली आला असावा. हा उल्काखंड ५० ते ६० मीटर व्यासाचा असावा. मात्र आघात करणाऱ्या या उल्काखंडाचे तुकडे विवराच्या आजूबाजूला कुठेही आढळत नाहीत. चंद्रावरील आणि मंगळावरील आघात विवरांशी याचे साधर्म्य असून मंगळावरील बेसॉल्ट खडकात जी उल्का आघात विवरे आहेत तसेच लोणार विवराचेही स्वरूप आहे!                 

सरोवराची निर्मिती ५ लाख २० हजार ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५ लाख ७० हजार वर्षे इतके वर्तवण्यात आले आहे. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे, तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी, खरगपूर (इंडिया) यांसारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.

पूर्वी लोणार सरोवर हे ज्वालामुखीय प्रक्रियेमुळे निर्माण झाले असावे असे मानले जात होते. पण एक अतिवेगवान धूमकेतू किंवा उल्का तिथे आदळल्याने ते निर्माण झाले असे आता सिद्ध झाले आहे. तिथे प्लँगिओक्लेज नावाचे खनिज सापडले आहे. हे खनिज एकतर मास्केलिनाइटमध्ये रूपांतरित झाले आहे किंवा त्याच्यामध्ये बदल झाले आहेत. असे बदल फक्त अतिवेगवान वस्तूच्या आघातामुळेच होऊ शकतात. त्यामुळे सरोवराची निर्मिती उल्केमुळे झाली यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. थर्मोल्युमिनेसन्स तंत्रज्ञानावरून काढलेले वय अंदाजे ५ लाख २० हजार वर्षे आहे. अरगॉन डेटिंग वापरून काढलेले वय ५ लाख ४७ हजार वर्षे आहे. सरोवराच्या कडेला आढळून येणाऱ्या प्रदेशाच्या झिजेच्या प्रमाणावरून हे वय सयुक्तिक वाटते असा दावा करण्यात येतो. या विवराच्या कडेचा (Rim) मूळ व्यास १८०० मीटर आणि कडेची उंची ४० ते ७० मीटर असावी.  

लोणार सरोवराच्या आसपास वाढत्या लोकवस्तीमुळे आणि पर्यटनामुळे तेथे सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आजूबाजूच्या वस्त्यांमधील सांडपाणी अणि दूषित पाणी लोणार सरोवरामध्ये सोडले जाते. त्यामुळे सरोवराचे पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे तिथली दुर्मीळ जैवविविधताही धोक्यात आली आहे.

आपल्या आकाशगंगेच्या अथांग पोकळीत असलेल्या ग्रहांबरोबरच अनेक लहानमोठे खडकांचे तुकडे इतस्ततः भटकत असतात. त्यांना स्थिर अशा भ्रमण कक्षा (Orbits) नाहीत. मंगळ ग्रह आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीत सापडून भटकणारे हे भल्या मोठ्या आकाराचे तुकडे जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून पृथ्वीच्या दिशेने येऊ लागतात तेव्हा त्यांचा वातावरणाशी घर्षण होऊन ते प्रकाशमान होतात. यांना आपण उल्का (Shooting stars) म्हणतो. वेगाने खाली येऊन या उल्का जेव्हा पृथ्वीवर आदळतात तेव्हा मोठे खड्डे किंवा आघात विवरे (Impact Craters) तयार होतात. 

आपल्या आकाशगंगेतील सर्वच ग्रह - उपग्रहांवर अशी विवरे तयार झाल्याचे दिसून येते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या अशा विवरात पृथ्वीवरील अपक्षरण, झीज, गाळ संचयन अशा क्रियांमुळे बरेच बदल झालेले आढळतात. भूपृष्ठाच्या विभिन्न हालचालींचाही त्यांच्या मूळ रचनेवर परिणाम झाल्याचे दिसते. आत्तापर्यंत पृथ्वीवर अशी १९० आघात विवरे दिसून आली आहेत. त्यांच्या वर्तुळाकृती आकारात विलक्षण वैविध्य आढळते. त्यांचा व्यास (Diameter) केवळ १० मीटर पासून ३०० किमीपेक्षाही जास्त असल्याचे दिसून आले आहे. एवढेच नाही तर पृथ्वीवरील ही विवरे अगदी दोन अब्ज वर्षांपासून, तर आधुनिक काळापर्यंतच्या कालखंडात निर्माण झाल्याचेही दिसते. या आघात विवरांनी पृथ्वीवरील पर्यावरणावर आणि जीवसृष्टीवर मोठे दूरगामी परिणामही केले आहेत. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर झालेल्या अशाच एका उल्का आघातामुळे सगळे डायनोसॉर पूर्णपणे नष्ट झाले होते. 

जी विवरे १० हजार वर्षांपेक्षा कमी काळातली आहेत आणि ज्यांचा व्यास १०० मीटरपेक्षाही कमी आहे अशी केवळ आठ विवरेच पृथ्वीवर आहेत. ऑस्ट्रेलियातील ‘हेंबुरी’ आणि ‘बॉक्सहोल’ आणि रशियातील ‘माछा’ ही त्यापैकीच काही. दहा हजार ते १० लाख वर्षे जुनी पण एक किमी व्यासाची विवरे अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतात, भारतातील लोणार इथे आहेत. दहा लाख ते एक कोटी वर्षांपूर्वीची आणि ५ किमी व्यासाची विवरे आफ्रिकेतील घानामध्ये दिसून येतात. पृथ्वीवर एक कोटी वर्षांपेक्षाही जुनी आघात विवरे आहेत. त्यांचा व्यास सामान्यपणे २० किमी एवढा मोठा आहे. आत्तापर्यंत अशी ४० विवरे शोधली गेली आहेत.  

स्थान संदर्भ 
१९.९७ अंश उत्तर अक्षांश/७६.५ अंश पूर्व रेखांश
समुद्र सपाटीपासून उंची : ४९५ मीटर 
भूशास्त्रीय वय : ६ लाख वर्षे
व्यास : २ किमी  
खोली : १५० मीटर 
जवळचे मोठे ठिकाण : औरंगाबाद (१५० किमी), जालना (७० किमी) 

संबंधित बातम्या