वुलर आणि दल सरोवर

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 3 मे 2021

भूवारसा पर्यटन

हिमालयाचे पंजाब हिमालय, कुमाऊँ, नेपाळ आणि आसाम हिमालय  असे चार प्रमुख भौगोलिक विभाग आहेत. त्यात अनेक सरोवरे आहेत, बरीचशी सरोवरे हिमानी स्वरूपाची म्हणजे हिमनद्यांनी तयार केलेली सरोवरे आहेत. मात्र वायव्य हिमालयात खूपच कमी सरोवरे असल्याचे आढळते. काश्मीर खोऱ्यात असलेली वुलर आणि दल ही दोन सरोवरे वेगळ्या प्रकारची असून त्यांचे भूशास्त्रीय महत्त्वही आगळेवेगळे आहे. 

वुलर हे जम्मू काश्मीर राज्यातील बांडीपोरा जिल्ह्यात असलेले सरोवर भूप्रक्षोभक (Tectonic) अशा भूपृष्ठाच्या हालचालींमुळे तयार झालेले आशियातील मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. झेलम नदी खोऱ्यात ज्या भूकवचाच्या हालचाली नेहमी चालू असतात, त्यांचा परिणाम यावर होत असतोच.

श्रीनगरपासून ३४ किमी अंतरावर हे सरोवर आहे. त्याची लांबी १६ किमी व रुंदी ८ किमी इतकी आहे. वायव्य, ईशान्य आणि पूर्व बाजूला असलेल्या हिमालयाच्या उंचच उंच पर्वतरांगांनी सरोवराला वेढले आहे. आग्नेयेकडून येणारी झेलम नदी या सरोवराला येऊन मिळते आणि नंतर त्यातून बारामुल्लाकडे वळते. मधुमती, दूधगंगा, एरिन आणि सुख नाला या इतर नद्याही सरोवराला येऊन मिळतात. 

सरोवराच्या पूर्वेला आणि उत्तरेला असलेल्या चुनखडकाचे आणि दक्षिणेकडच्या गाळाचे मोठ्या प्रमाणावर सरोवरात संचयन होत असते. हा सगळा गाळ २७ कोटी वर्षे जुना असल्याचेही लक्षात आले आहे. हा गाळ भूशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. ५४ ते २५ कोटी वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीय उद्रेकातून बाहेर पडलेल्या लाव्हाच्या बेसॉल्ट खडकातून आणि हिमानी (Glacial) प्रक्रियांतून तयार झालेले अवसाद (Sediments) या उथळ सरोवरात गाळ रूपात साठले आहेत.

होलोसीन म्हणजे गेल्या १२ हजार वर्षांतील या सरोवराचा इतिहास असे सांगतो, की या सरोवराने या काळात अनेक हवामान बदलांचा अनुभव घेतला आहे. नऊ, सात आणि पाच हजार वर्षांपूर्वीची ओल्या हवामानाची (Wet Climate) परिस्थिती आणि आठ, सहा आणि चार हजार वर्षांपूर्वीची कोरड्या हवेची (Dry Climate) स्थिती या वेळी असलेल्या सरोवराच्या आकाराविषयीचे आणि खोलीबद्दलचे अनेक पुरावे आजही इथे आढळतात. पाच ते सहा हजार वर्षांपूर्वी सरोवर आजच्यापेक्षा खूप जास्त खोल आणि रुंद असावे आणि चार ते साडेचार हजार वर्षांपूर्वी ते कोरडे पडले असावे असे भूशास्त्रीय संशोधनातून लक्षात येते.

दल हे काश्मीरमधील दुसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे. याचे क्षेत्रफळ १८ चौरस किलोमीटर आहे. सरोवराची लांबी ७.४४ किलोमीटर असून रुंदी ३.५ किलोमीटर आहे. सरासरी खोली १.४ मीटर असून जास्तीत जास्त खोली सहा मीटर आहे.

श्रीनगर ही मुघलकालीन दिल्ली दरबारची उन्हाळी विश्रांतीची जागा होती. सरोवराच्या काठावरील मुघलकालीन बगिचे, (जसे शालीमार बाग, निशात बाग वगैरे) सरोवरातील तरंगत्या बोटी या पर्यटकांसाठी खास आकर्षण आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत या परिसरातील तापमान शून्याखाली गेले की सरोवराचा पृष्ठभाग थोड्या काळापुरता गोठतो. या सरोवराच्या मधे एक बेट आहे, ते चार चिनार म्हणून ओळखले जाते. कारण तिथे चार चिनार वृक्ष वाढले आहेत. हे सरोवर चार भागात विभागले गेले आहे. गागरीबाल, लोकुटदल, बोडदल व नगीन हे ते चार भाग होत. नगीन हे स्वतंत्र सरोवर म्हणूनही ओळखले जाते.

दल सरोवरात पाण्याचा पुरवठा मरसर सरोवरातून तेलबाल नाल्यामार्फत होतो. या सरोवरातून दल गेट आणि नाला अमीरमधून पाणी बाहेर सोडले जाते. तरंगता बगीचा (Floating Garden) हे या सरोवराचे वैशिष्ट्य आहे. हा बगीचा सरोवराच्या वरच्या भागात तरंगत असतो आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या  ठिकाणी तरंगत जाऊ शकतो. जसे जहाज नांगरले जाते, तसे हा बगीचाही एकाच ठिकाणी नांगरून स्थिर करता येतो. 

मासेमारी हा या तलाव परिसरात एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. सरोवराच्या काठावरील बरेच लोक हा व्यवसाय करतात. कार्प नावाचे मासे हे येथील वैशिष्ट्य आहे. सध्या सरोवराचे पाणी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊ लागले आहे. सांडपाण्यामुळे या सरोवरात नायट्रोजन व फॉस्फरसचे प्रमाण वाढते आहे. याशिवाय सरोवरावर सर्व बाजूंनी बांधकामांचे आक्रमणही चालू झाले आहे. पूर्वी या सरोवराचे क्षेत्रफळ २२ चौरस किलोमीटर होते, ते कमी होत होत आता फक्त १८ चौरस किलोमीटर राहिले आहे. त्याचबरोबर वाढत्या गाळाची समस्याही वाढत चालली आहे. या सरोवराच्या निर्मितीबद्दल अनेक संकल्पना मांडल्या गेल्या आहेत. एका संकल्पनेनुसार दल सरोवर हा एका मोठ्या हिमानी सरोवराचा (Glacial lake) उर्वरित भाग असून त्याच्या आकारात अनेक बदल झाले आहेत. दुसऱ्या संकल्पनेनुसार पूर्वीच्या झेलम नदीतील कुंडल कासार सरोवर (Oxbow lake) असावे किंवा झेलमच्या पुराचे पाणी नदीपात्रातून वर येऊन पसरल्यामुळे (Spill) नदीने तयार केलेले सरोवर असावे.

सरोवराला येऊन मिळणाऱ्या आजूबाजूच्या प्रदेशातील प्रवाहांचे जाळे झाडाच्या फांद्यांसारखे (Dendritic) असून हे प्रवाह ज्या खडकांवरून वाहतात ते अग्निजन्य, गाळाचे आणि रूपांतरित खडक खूपच कमी सच्छिद्र असावेत असे लक्षात येते.   

या उथळ सरोवराला दाचीगम तेलबाल हा वर्षभर पाणी असणारा नाला येऊन मिळतो. या नालासदृश नदीची प्रणाली दोन प्रमुख विभंगांनी (Lineaments) प्रभावित झालेली आहे. याचबरोबर इतरही अनेक नाले सरोवराला येऊन मिळतात. 

या सरोवराचे पाणी उबदार असून ते कधीही पूर्णपणे गोठत नाही. पाण्याचे वरचे थर उबदार असल्यामुळे कमी घनतेचे आणि खालचे थर थंड असल्यामुळे जास्त घनतेचे असतात. त्यामुळे ते उन्हाळ्यात एकमेकांत मिसळत नाहीत. थंडीच्या दिवसांत वरचे थर पाण्याच्या खालच्या थरांइतकेच थंड होतात आणि त्यामुळे केवळ थंडीतच सरोवरातील पाण्याचे चांगले मिश्रण होते. 

काश्मीर खोऱ्यातील ही दोन्ही सरोवरे एकमेकांसारखी नाहीत. त्यांची निर्मितीही वेगळ्या प्रकारे झालेली आहे. पण दोन्ही एकाच नदीच्या म्हणजे झेलम नदीच्या मार्गात तयार झालेली आहेत. भूशास्त्रीयदृष्ट्या २५ कोटी वर्षांपेक्षा जास्त जुना इतिहास असलेली ही सरोवरे अद्वितीय अशी भूवारसा स्थळे आहेत.   

स्थान संदर्भ 

  • वुलर - ३४.३७ अंश उत्तर अक्षांश/७४.५५ अंश पूर्व रेखांश
  • दल - ३४.११ अंश उत्तर अक्षांश/७४.८६ अंश पूर्व रेखांश 
  • समुद्र सपाटीपासून उंची : १५७६ मीटर, १५८६ मीटर
  • भूशास्त्रीय वय : २५० कोटी वर्षे
  • जवळचे मोठे ठिकाण : श्रीनगर (३४ किमी)

संबंधित बातम्या