नदीच्या वाळूखाली गाडले गेलेले तळकाडू 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 10 मे 2021

भूवारसा पर्यटन

म्हैसूर शहरापासून ४५ किमी अंतरावर कावेरी नदीच्या डाव्या तीरावर तळकाडू नावाचे एक गाव आहे. इथे प्राचीन मंदिरांचा एक समूह असून त्यातली बरीचशी मंदिरे वाळूच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. अनेक दृष्टींनी तळकाडू हे वारसा स्थळ वेगळे आहे. प्रामुख्याने ते सांस्कृतिक वारसा स्थळ असले तरी त्याला असलेला भूवारसाही तितकाच महत्त्वाचा आहे. 

म्हैसूरपासून १४ किमी अंतरावर असलेल्या श्रीरंगपट्टणम शहरापासून ५५ किमी अंतरावर कावेरी नदी आहे. तिच्या डाव्या किनाऱ्याजवळ नदी पात्रात १.८ चौ.किमी क्षेत्रफळाचे अर्धचंद्राकृती आकाराचे एक मोठे वाळूचे संचयन (Point bar deposit) हजारो वर्षांपासून अस्तित्वात होते. कावेरी नदीच्या वरच्या टप्प्यात तळकाडूपासून चार किमी अंतरावर उत्तरेकडे हेमीगे गावाजवळ इ. स. ११४०मध्ये बांधले गेलेले एक धरण आहे. त्याला माधव मंत्री धरण म्हटले जाते. या धरणामुळे नदीच्या प्रवाहातील पाणी अडविले गेले आणि तिचा खालचा भाग कोरडा पडला. यामुळे नदीच्या डाव्या किनाऱ्याजवळचे वाळूचे संचयन उघडे पडले. त्यावरील वाळू मॉन्सूनमध्ये वाहणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे ईशान्येकडे आणि उत्तरेकडे उडून जाऊ लागली. मात्र त्या दिशेला असलेल्या वस्त्या आणि वायव्य आग्नेय दिशेने वाहणारे वारे यांच्या अडथळ्यामुळे वाळू पुढे न जाता खाली उतरली आणि वाळूखाली हळूहळू तळकाडू गावातली मंदिरे गाडली गेली. १७व्या शतकात दक्षिण भारतात पडलेल्या दुष्काळामुळे तोपर्यंत नदीत तयार झालेली वाळूही पुन्हा उडत आली आणि वाळूच्या टेकडीखाली आणखी मंदिरे झाकली गेली. सामान्यपणे इतक्या मोठ्या वाळूच्या टेकड्या वाळवंटात, समुद्र किनारी किंवा मोठ्या सरोवरांच्या काठी तयार होतात. इथे मात्र तळकाडूच्या परिसरातील या टेकड्या नदीतील वाळूमुळे तयार झाल्या आहेत. चार ते पाच चौ.किमी प्रदेशावर तयार झालेल्या या टेकडीचे सर्वप्रथम उत्खनन १९९६मध्ये आणि त्यानंतर २००८, २००९, २०१० आणि २०१८/१९मध्ये करण्यात आले. यातून इथे एकूण ३० मंदिरे असावीत असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ख्रिस्तपूर्व २४७ ते २६६ या काळात म्हणजे २२६५ ते २२८५ वर्षांपूर्वी हरीवर्मा नावाच्या राजाने ही मंदिरे बांधल्याचे उल्लेख आढळतात. 

कावेरीकाठी असलेले जुने तळकाडू गाव जवळजवळ दीड किमी लांब पसरलेल्या वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. कावेरी नदीच्या एका वळणावर तळकाडू गावाजवळ साडेचार चौ.किमी. क्षेत्रफळाचा वाळूच्या टेकड्यांनी तयार झालेला एक सखल उंचवटा (Low mound) आहे. या उंचवट्यावर १९९०मध्ये केलेल्या उत्खननातून प्राचीन मंदिरांचा एक समूह सापडला. यातली अनेक मंदिरे भग्नावस्थेत आहेत. ती ख्रिस्तपूर्व सहाव्या ते सतराव्या शतकात बांधली गेली असावीत असे पुराजीवशास्त्रीय संशोधन सांगते. 

सतराव्या शतकात या प्रदेशात भूकंप सदृश एक मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती. त्यात ही सगळी मंदिरे नदीने वाहून आणलेल्या वाळूखाली गाडली गेली. इथे केलेल्या संशोधनात असेही आढळून आले आहे, की नदीपात्राजवळचा हा उंचवटा केवळ वाळूनेच तयार झाला नसावा. कारण उत्खननानंतर आज उघड्या पडलेल्या काही मंदिरापाशी वाळूचा ढीग साठून ती नष्ट झाल्याचे कुठलेच पुरावे आढळत नाहीत, तर ती भूकंपासारख्या शक्तिशाली कंपनांमुळे भग्न झाली असावीत असे सुचविणारे अनेक पुरावे सापडतात. 

गेल्या ५०० वर्षांत नदीचा मार्ग चार ते पाच किमीने उजवीकडे सरकला असल्याची  काही भूरूपशास्त्रीय (Geomorphic) चिन्हे या प्रदेशांत आढळून येतात. नदीकाठचा भूभाग नदीने केलेल्या प्रचंड वाळूच्या संचयनासकट उंचावला गेल्यामुळे (Uplifting) व त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या कंपन लहरी आणि नदीने घेतलेले वळण अशा अनेक कारणांनी इथली मंदिरे उद्‍ध्वस्त झाली असावीत व काही वाळूत दाबली गेली असावीत असेही स्पष्टीकरण देण्यात येते.  

इथल्या काही मंदिरांच्या आजूबाजूच्या नदीतील गाळाच्या थरात, घर बांधणीतल्या विटा, दगड धोंडे यांचे बारीक वाळूत अडकलेले अनेक लहान लहान तुकडेही दिसून येतात. यावरून इथे भूकंप सदृश हालचाली झाल्या असाव्यात असा निष्कर्ष काढता येतो. या भागात मंदिरांच्या जवळपास असलेली तत्कालीन घरे भूकंपानंतर पुन्हा बांधली गेली असावीत अशाही खुणा मंदिर परिसरात आढळून येतात. तळकाडूच्या वायव्येला तीन किमी अंतरावर असलेल्या हेमिंगे या गावाप्रमाणेच तळकाडू गावातही मेगालिथिक (इ.स. ४५०० ते १५००) म्हणजे अश्मयुगाच्या अखेरची किंवा ताम्रयुगातील संस्कृती असावी असे पुराजीवशास्त्रीय संशोधन सांगते. मंदिरांचा हा सगळा समूह त्या वेळच्या अनेक राजांच्या कार्यकाळात बांधला गेला असावा आणि तळकाडू हे ‘मंदिरांचे शहर’ (Temple city) म्हणूनच वाढले असावे असे संकेत या वाळूच्या उंचवट्यावर केलेल्या उत्खननांतून मिळाले आहेत! सन २०१९ या वर्षाच्या सुरुवातीला या भागात उत्खनन करताना नदीच्या पुरापासून गावाचे संरक्षण करण्यासाठी बांधलेली एक प्राचीन भिंत सापडली आहे. नदीपात्रात आणि आजूबाजूला बांधकामांसाठी फारसा दगड मिळत नसल्यामुळे ही भिंत विटा, माती व चुन्याचा वापर करून बांधल्याचे दिसून येते. तीन मीटर जाडीची आणि ३३ मीटर उंचीची ही दगडी भिंत हा त्याकाळच्या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना असल्याचे मानण्यात येते. आज या भिंतीचा पाच मीटर लांबीचाच भाग दिसत असला, तरी मुळातच ती एक किमी लांब नक्कीच असावी असे लक्षात येते. पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत साधारणपणे एक हजार वर्षे ही भिंत अतिशय भक्कमपणे उभी असावी असेही जाणवते. 

तळकाडूच्या या सगळ्या भौगोलिक घटनांनी तयार झालेल्या इतिहासावरून ते किती महत्त्वाचे भूवारसा पर्यटन स्थळ आहे याची कल्पना येते. आज उत्खननात सापडलेली इथली सगळी मंदिरे अतिशय उत्तम प्रकारे सुरक्षित करून ठेवल्याचे दिसते. या मंदिराच्या परिसरात फिरताना सगळीकडे वाळूच्या टेकड्यांचे अवशेष सहजपणे दिसून येतात आणि किती मोठ्या प्रमाणावर नदीतील वाळू इथे उडत आली असावी याचा अंदाज करता येतो. 

स्थान संदर्भ 

  • १२.१८ अंश उत्तर अक्षांश/७७.०२ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची : ६५४ मीटर 
  • भूशास्त्रीय वय : २२८५ वर्षे
  • टेकड्यांची सरासरी उंची : ८ मीटर  
  • क्षेत्रफळ : १.८ चौ.किमी 
  • जवळचे मोठे ठिकाण : म्हैसूर (४५ किमी)

संबंधित बातम्या