मेघालयातील चुनखडक गुहा

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 17 मे 2021

भूवारसा पर्यटन

मेघालयाला आणि ईशान्य भारताला अनेक वर्षांचा भूशास्त्रीय इतिहास आहे. मेघालयातील गारो, खासी आणि जैंतिया येथील टेकड्यांमध्ये चुनखडकातील अनेक गुहा (Limestone caves) आढळून येतात. सगळ्यात जास्त लांबीच्या गुहा म्हणून त्यातल्या काही गुहा जगप्रसिद्ध आहेत. या गुहा चुनखडकात असल्यामुळे चुन्याच्या खाणींसाठी उत्खनन करणाऱ्यांकडून आज त्यांना खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. भारतासाठी या गुहा हा एक मौल्यवान भूवारसा असल्यामुळे त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

साडेसहा कोटी वर्षांपूर्वी भारतीय तबकाची (Indian plate) यूरेशियाच्या तबकाला धडक झाली आणि त्यानंतरच्या हिमालयाच्या निर्मितीच्या काळात दोन कोटी वर्षांपूर्वी मेघालयाचे पठार तयार झाले. गारो, जैंतिया आणि खासी डोंगरांचा चुनखडीयुक्त भागही तयार झाला. साडेपाच कोटी वर्षांपूर्वीच्या या भागातील टीथिस समुद्रतळावर उथळ भागात झालेल्या १० ते ३० मीटर जाडीच्या चुनखडीच्या संचयन क्रियेनंतर कालांतराने या खडकात अनेक गुहा निर्माण झाल्या. आज या गुहा समुद्र सपाटीपासून १,२०० मीटर उंचीवर आहेत. याचाच अर्थ असा, की ३५ लाख वर्षांपूर्वी मेघालय पठार जेव्हा एक किमीने उंचावले गेले, तेव्हा त्या तयार झाल्या आहेत. 

त्यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे या चुनखडीच्या दगडातून प्रदीर्घ काळ पाणी झिरपत राहिले. त्यातून मोठ्या गुहा, विवरे व भुयारे निर्माण झाली आणि त्यातून पाणी वाहू लागले. हिमालय निर्मितीत भरपूर प्रमाणात निर्माण झालेला चुनखडीचा दगड, अतिवृष्टी आणि उत्थापन (Uplifting) यामुळे मेघालयात ज्या प्रमाणात चुनखडी आणि वालुकाश्म खडकात भुयारे तयार झाली आहेत, तेवढी ती भारतात इतरत्र कुठेही तयार झाल्याचे दिसत नाही.

मेघालयातील गुहांमध्ये अनेक लवणस्तंभ आढळून येतात. तसेच मोसासौरस नावाच्या डायनोसॉरचे आणि शार्कचे काही जीवाश्म मेघालयाच्या गुहांमध्ये सापडले आहेत! तसेच गुहेच्या काळोखात राहणाऱ्या कीटक, मासे, बेडूक यांच्या जैविक रचनेत बदलही झाले आहेत. मेघालय पठाराच्या टेकड्यांमध्ये १,३०० गुहा शोधण्यात आज यश आले आहे. जैंतिया टेकड्यांत लियात प्रा ही ३० मीटर लांब, २४ प्रवेश ठिकाणे असलेली, कोटसती ही २२ मीटर लांब आणि त्यांहेंग ही २१ मीटर लांब गुहा आहे. चेरापुंजीच्या ११,७७८ मिमी इतक्या जास्त पावसाच्या ठिकाणाजवळ मोहसिंराम, लंगरीन, शेला आणि नोंगीरी या गुहा आढळतात. 

सोहरा (चेरापुंजी) या गावानजीक असलेली मॉमलू (Mawmluh) येथील तीन किमी लांब गुहा सगळ्यात लांब गुहा आहेत. गुहेत अनेक अधोमुखी (Stalectite) आणि ऊर्ध्वमुखी (Stalegmite) प्रकारचे लवणस्तंभ (Speleothems) आहेत. हे लवणस्तंभ गुहेत ठिबकणाऱ्या पाण्यातील चुनखडक कणांच्या, खालून वर आणि वरून खाली वाढणाऱ्या संचयनामुळे तयार होतात. यांची कमी वाढ किंवा उंची, कमी झिरपणारे पाणी आणि दुष्काळी परिस्थिती सुचविते. याउलट जास्त वाढ अति पर्जन्य अवस्था सुचविते. ब्रिटिशांकडून १८४४मध्ये शोधली गेलेली मेघालयातील ही पहिली चुनखडक गुहा. 

संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय गटाने मॉमलू येथील चुनखडकातील गुहेत तयार झालेल्या अधोमुखी लवणस्तंभांच्या (Stalectite) केलेल्या अभ्यासातून एका विशिष्ट कालखंडात झालेल्या हवामान बदलाच्या, विशेषतः मॉन्सून दुर्बळ झाल्याच्या घटनेचा सर्वप्रथम उलगडा २०११मध्ये झाला. त्या आणि त्यानंतर अजूनही चालू असलेल्या गुहेच्या सततच्या अभ्यासातून असे लक्षात आले, की ४,२०० वर्षांपूर्वी जगभरात अचानक मोठा दुष्काळ पडला, तापमानात घट झाली आणि त्यामुळे जगातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या. जगाने दुष्काळाचे हे संकट दोनशे वर्षे सोसले. इजिप्त, ग्रीस, सीरिया, पॅलेस्टाईन, मेसोपोटेमिया याचबरोबर सिंधू खोरे आणि चीनमधील यांगत्सेचे खोरे इथल्या संस्कृती जास्त बाधित झाल्या.       

भारताच्या दृष्टीने हे संशोधन नक्कीच एक अभिमानास्पद बाब होती. कारण आंतरराष्ट्रीय स्तरविज्ञान आयोग (International stratigraphy commission) यांनी १३ जुलै २०१८च्या आधारे ‘मेघालय पर्व’ अशा नवीन भूशास्त्रीय कालखंडाचा समावेश भूशास्त्रीय कालगणना श्रेणीत केला. यातून मिळालेल्या पुराव्याला ‘जागतिक स्तरप्रकार सीमा’ (Global boundary stratotype) हे मानांकन देण्यात आले. संपूर्ण भूशास्त्रीय कालगणना श्रेणीत (Geological time scale) भारतातील प्रदेशाच्या नावांवरून कालगणना श्रेणीतील कालखंडास संबोधण्याची ही पहिलीच वेळ होती! ज्या चुनखडक गुहेत याचे पुरावे आढळले, त्या गुहेजवळ गेल्याच वर्षी भारतीय भूशास्त्र सर्वेक्षण (Geological Survey of India) विभागाच्या ईशान्य प्रदेश शाखेने ही महत्त्वाची माहिती देणारा फलकही लावला आहे. या स्थानाला भूवारसा स्थळ (Geoheritage site) म्हणून मान्यता मिळावी म्हणूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. पृथ्वीच्या साडेचार अब्ज वर्षांच्या इतिहासात ‘मेघालय पर्व’ पहिले असे भूशास्त्रीय पर्व आहे, जे जागतिक पातळीवरील हवामान बदलांमुळे होऊन गेलेल्या सांस्कृतिक घटनांशी संबंधित आहे आणि म्हणूनच त्याला भूशास्त्रीय कालगणना श्रेणीत इतके महत्त्व आहे!  

समुद्र सपाटीपासून १,३०० मीटर उंचीवर असलेल्या मॉमलू गुहेतील चुनखडकात तयार झालेल्या लवणस्तंभातील अवसादांच्या पृथक्करणातून हवामान आणि मॉन्सून संबंधीचा निष्कर्ष काढता आला म्हणून होलोसीन कालखंडाच्या ४,२०० वर्षे ते आजपर्यंतच्या कालखंडाला ‘मेघालय पर्व’ असे नाव देण्यात आले. ११,७०० वर्षांपूर्वीच्या काळात मिळालेले तापमान वाढीचे पुरावे, ८३०० वर्षांपूर्वीच्या काळातील आत्यंतिक थंडीचे पुरावे आणि मेघालय काळातील ४२०० वर्षांपूर्वीचे महादुष्काळाचे अनेक पुरावे या अवसादात मिळाले. 

सोहराजवळची दुसरी महत्त्वाची आणि सर्वाधिक पर्यटकांनी पाहिलेली दुसरी गुहा म्हणजे मावसमाई (Mawsmai) गुहा. या चुनखडक गुहेतही अनेक लहान मोठे अंतरमार्ग आणि विवरे आहेत. गुहेच्या भिंती, छत आणि तळावर चुनखडक विरघळून तयार झालेले ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी लवणस्तंभ आहेत. ही गुहा एक किमी लांबीची असून तिची सरासरी रुंदी पाच मीटर आहे मुखाजवळ (Entrence) ती १५ मीटर उंच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व असलेल्या या गुहांतील लवणस्तंभांच्या कालनिश्चितीनमुळे भारतातील या भूवारसा स्थळाचे महत्त्व जगभरात कित्येक पटींनी वाढले आहे आणि म्हणूनच आपल्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा भूवारसा आहे यात शंका नाही.

स्थान संदर्भ 

  • २५.२६ अंश उत्तर अक्षांश/९१.७० अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची : १२७३ मीटर 
  • भूशास्त्रीय वय : ३५ लाख वर्षे
  • लांबी : तीन किमी 
  • जवळचे मोठे ठिकाण : सोहरा (चेरापुंजी, तीन किमी)

संबंधित बातम्या